मातीलाही मरणकळा यावी आणि नापिक होऊन निरर्थक बनावी अशी मरणकळा वर्तमानात जगणाऱ्या माणसांच्या वाट्याला आली. हे दुःख पचवत माणूस भोवऱ्यात अडकलेला आहे. माणसांच्या जगण्याची दिशा आणि संदर्भ बदलू लागले. माणसांच्या जगण्याचे नवे संदर्भ कवी वीरभद्र मिरेवाड यांनी मांडलेले आहेत.
प्रा. रामदास केदार
मोबाईल – ९८५०३६७१८५
गावकुसात राहून मातीशी नाते जोडतांना माणसांच्या मनाला भेगाळलेल्या मातीगत तडे जात आहेत. धास्तावलेली माणसे आणि माणसांच्या वाट्याला आलेले भोग हा चिंता आणि चिंतनाचा विषय बनला असून अशा खस्ता खाल्लेल्या माणसांची चिंतनशील कविता म्हणजे कवी वीरभद्र मिरेवाड यांच्या माती शाबूत राहावी म्हणून या कवितासंग्रहातील कविता होय.
कवी वीरभद्र मिरेवाड यांची कविता जीवनवास्तवाचा शोध घेत तळागाळातील माणसांच्या मनाचा ठाव घेणारी आहे. भूतकाळातल्या आठवणींना जागवत वर्तमानाला पचविण्यांचे त्यांचे प्रयत्न परिवर्तनाच्या दिशेने होत असले तरी प्रश्न आणि फक्त प्रश्नच त्यांच्या पदरात पडत आहेत. असंख्य प्रश्नांच्या गुंत्यात माणूस अडकलेला आहे. गुंता सोडवण्यातच माणसांचे आयुष्य निघून जात आहे. माणसाच्या वेगवेगळ्या समस्यांचा हा गुंता वीरभद्र मिरेवाड याच्या कवितेतून आलेला आहे. कवीने स्वतःही दुःख भोगलेले आहे. अवतीभोवती घडलेल्या घटेननी कवी मन होरपळून गेलेले आहे. दाह, चटका भोगलेले आहे. भोगलेली दाहकता कवी शब्दातून उभा करतो आहे. या संग्रहात एकोणसत्तर कविता आहेत. शेती आणि शेती व्यवस्थेतील बारदाना टिपतांना बापांची झालेली ससेहोलपट त्या काळातील दयनीय परिस्थिती सांगून जाते. बापाच्या निमित्ताने ही कविता वाचल्यानंतर कळते.
सोयाबीनच्या धाटानं माना टाकल्या
अन्
बाप दंडाळला
अस डायरेक्ट बापाच्या खिशात
हात घातलेल मुळीच आवडत नाही
पण
जर त्याच्या खिशात हात घातला
तर तो खिशा खाली करतो
म्हतारा गेल्याची गोष्ट ही कवी मनाला चटका लावणारी आहे. कुंकवाचा धनी गेल्यावर रित्या आभाळासारखं नशीबही रितं होऊन जाते. आयुष्यभरांच्या आठवणींने म्हतारी आतून जळत राहते.
पूर्वस्मृतीची राखरागोळी होतांना
काळ्या मन्यांची ऐपत संपताना
कुंकू कपाळांच पुसून टाकतांना
हातातल्या बांगड्या फोडतांना
ती पुटपुटली मनाशी..
धनी, खेळ मांडून असा शेवट
करु नये माणसांनी….
कवी माणसांच्या वेदनेचे कुळ आणि मूळ शोधतो आहे. मसणवाट्यातील भूतं देवळात अन् देवळातल्या देवाचा पत्ता नाही, घाण्याबिराच्या पाल्याचा वास देऊन मंत्र म्हणून, छडीन रट्टे मारीत भूतं हुसकावून लावायचं हे माझ्या आज्यान मला शिकवलं पण, माणसांनीच धरलं तर, त्याचा उतारा कशानी करायचा? भुतांची जागा आता माणसच घेऊ लागली. सगळ्याचा उतारा होऊ शकतो. पण माणसांचा उतारा काही केल्या कमी होत नाही.
माझीच माणसं मला पायाखाली निखारे देत आहेत. मला जगणं नको आहे. आणि पुनर्जन्म तर नकोच कारण इथली माणसं जिवंतपणीच देहाचा लिलाव करु पाहत आहेत. देहाचाही लिलाव करणारी माणसे आपल्या अवतीभोवती आहेत. भाव या कवितेत कवी लिहितो.
चुकूनही नाही घेणार
पुनर्जन्म माणसांचा
भाव करून देहाचा
मजला लिलाव केले
सध्याच्या परिस्थितीतीचा कवी चागलाच खरपूस घेतो.
मंदिरावरल्या पोथी पुराणावरही कवी आपले भाष्य करतो आहे. एका दुर्योधनाची आणि एका द्रोपदीची कथा ऐकली होती पण आता चौकाचौकात दुर्योधन आहेत. दुःशासन आहेत. कारण दिवस खूप खूप अवकाळी आहेत असे कवी म्हणतो. तर उन्हातान्हात राबणारी हातं एकीकडे, दिवसभर रक्ताचे पाणी करुन पालीतला आरडाओरड एकीकडे तर साध्या शब्दांच्या ठिणगीने महालात पेटलेले असतात दुसरीकडे.. अशी दोन जग का निर्मिलीस देवा ? असे कवी माणसांच्या जगण्याचे संदर्भ शोधून फरकही सांगतो आहे. गावसंस्कृती आणि लोकसंस्कृती जपायची असेल तर आपली माती शाबूत राहावी म्हणून मी थोडं गावाकडं जाऊन येते म्हणणारी आपली आई निरक्षर असूनही साक्षर माणसांच्या समोर गावमातीतले खरे तत्वज्ञान सांगते.
पोतरं घेऊन, शेणानं सडा सारवण करून
शुचिर्भूत अंगण व घर करणारी माय
तक्रार करत नाही माझ्याजवळ
डेटाल लाऊन पाँलीस फरशी पुसताना
वास सहन होत नसेल कदाचित
म्हणून
नाकाला पदर लावतेअन्
घासत राहते फरशी
घराखालची माती
शाबूत राहावी म्हणून..
मातीलाही मरणकळा यावी आणि नापिक होऊन निरर्थक बनावी अशी मरणकळा वर्तमानात जगणाऱ्या माणसांच्या वाट्याला आली. हे दुःख पचवत माणूस भोवऱ्यात अडकलेला आहे. माणसांच्या जगण्याची दिशा आणि संदर्भ बदलू लागले. माणसांच्या जगण्याचे नवे संदर्भ कवी वीरभद्र मिरेवाड यांनी मांडलेले आहेत. डॉ. माधव पुटवाड यांची पाठराखण तर डॉ श्रीपाल सबनीस व डॉ. किशोर सानप यांची प्रस्तावना आहे. कवी ज्या मातीत घडला त्या मातीतूनच ही कविता उगवलेली आहे. सतोष धोंगडे यांनी काढलेले मुखपृष्ठ आशयानुरुपच आहे.
पुस्तकाचे नाव – माती शाबूत राहावी म्हणून
कवी – वीरभद्र मिरेवाड
प्रकाशक – इसाप प्रकाशन, नांदेड
पृष्ठे – १०४ किंमत – १५०
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.