September 13, 2024
Cultivation of Guru Beej article by rajendra ghorpade
Home » जे पेराल तेच उगवणार…
विश्वाचे आर्त

जे पेराल तेच उगवणार…

पेरलेल्या गुरुमंत्राला साधनेचे खतपाणी द्यावे लागते. अहंकार, राग, द्वेष आदी तणे उगवणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागते. तरच आत्मज्ञानाची फळे चाखायला मिळतील. चांगले परले तर चांगलेच उगवणार. सत्कर्म परले तर सत्कर्माचीच फळे चाखायला मिळणार.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

नातरी विधीचिये वो। सत्क्रियाबीज आरोपे ।
तरी जन्मशत मापें । सुखचि मविजे ।। ३२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा

ओवीचा अर्थ – अथवा विधीची योग्य वाफ साधून जर सत्कर्मरुप बीज पेरले तर शेकडोचे शेकडो जन्म सुख भोगावें, एवढे अचाट पिक येतें.

शेतात कोणती पिके घ्यायची हे शेतकऱ्याला आधी ठरवावे लागते. योग्य वेळी योग्य पिके घेतली तरच भरपूर उत्पादन मिळते. बाजारभावानुसारही पिकांचे नियोजन करावे लागते. तरच नफा मिळतो. पुढील काळातील गरजा ओळखून पिकांची निवड करावी लागते. सध्या शेतीचे स्वरूप बदलले आहे. आधुनिक तंत्राने शेती केली जात आहे. अधिक उत्पादनासाठी नव्या सुधारित जातींची निवड केली जात आहे, पण योग्य जमिनीत योग्य तीच पिके घ्यावी लागतात. वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळी पिके घेतली जातात. हे जे ठरले आहेत त्यानुसारच शेती केली तर ती फायदेशीर ठरते. अन्यथा शेतीत मोठा फटका बसू शकतो. मेहनत करूनही ती व्यर्थ जाते.

अध्यात्मातही अगदी तसेच आहे. येथेही नियमांचे पालन करावे लागते. कोणतीही गोष्ट करायची म्हटले की त्यासाठी असणारे नियम, हे पाळावेच लागतात. अन्यथा सर्व व्यर्थ जाते. अध्यात्मात प्रगती साधायची असेल तर गुरूंचा शोध घ्यावा लागतो. गुरू हा आत्मज्ञानी असावा लागतो. या देहाच्या क्षेत्रात आत्मज्ञानाचे पीक घेण्यासाठी आत्मज्ञानी गुरूकडूनच बीजाची (गुरुमंत्राची) पेरणी होणे आवश्यक आहे. तरच त्या पिकाला आत्मज्ञानाची फळे येतील.

पेरलेल्या गुरुमंत्राला साधनेचे खतपाणी द्यावे लागते. अहंकार, राग, द्वेष आदी तणे उगवणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागते. तरच आत्मज्ञानाची फळे चाखायला मिळतील. चांगले परले तर चांगलेच उगवणार. सत्कर्म परले तर सत्कर्माचीच फळे चाखायला मिळणार. विशेष म्हणजे तणांची पेरणी कोणी करत नाही. तणे ही शेतात आपोआप उगवत असतात. देहाच्या शरीरात साधनेच्या तिफणीतून पेरलेले गुरुमंत्राचे बीज उगवते. पण त्या शेतात तणेही उगवत असतात. ही तणे मुख्य पिकाला मारक ठरणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. शेतात तणांचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी नियोजन करायला हवे. योग्य वेळेत तणांचा नायनाट हा करायला हवा.

तणे लहान असतानाचा काढूण टाकल्यास मुख्य पिकाची वाढ जोमदार होते. गुरुमंत्र्याच्या बीजाची वाढ जोमदार होण्यासाठी अहंकार, राग, द्वेष, मत्सर आदी तणे लहान असतानाच उपटून टाकायला हवीत. म्हणजे गुरुमंत्राच्या बीजाच्या वाढीला अडथळा होणार नाही. बीजाची वाढ जोमदार झाल्यास त्याला फुले, फळेही जोमदारच येणार. साहजिकच उत्पादनही अधिक मिळणार. मिळालेले उत्पादनाची चवही तितकीच गोडसर असणार. पेरलेलेच उगवणार मग आत्मज्ञानाचे बीज पेरल्यानंतर आत्मज्ञानाचे पिक उगवणार अन् आत्मज्ञानाचीच फळे लागणार.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

अजून किती लुटाल ?

शिकली सवरली..

श्रीशब्द काव्यपुरस्कार 2024 जाहीर

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading