February 5, 2023
Book Review of Arthayan Prof Dr J K Pawar
Home » अर्थव्यवस्थेतील घडामोडींचा अर्थायनमधून आढावा
सत्ता संघर्ष

अर्थव्यवस्थेतील घडामोडींचा अर्थायनमधून आढावा

जागतिकीकरण, उदारीकरण, खासगीकरण आणि आधुनिकीकरण या चार मंत्रतंत्राचा उद्घोष करत भारतीय अर्थव्यवस्थेत आमुलाग्र बदल घडत आहेत. भ्रष्टाचार निर्मुलन हे आव्हान यातून उभे राहीले आहे. अशाच विविध आर्थिक घडामोडींचा आढावा घेणारे प्रा. डॉ. जे. के. पवार यांचे लेख वृत्तपत्रातून गेल्या 30 वर्षात प्रसिद्ध झाले. तेच ‘अर्थायन’ मधून पुस्तक रुपाने एकत्रितरित्या आले आहेत.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

राजकारण हे नेहमीच आर्थिक उलाढालीवर अवलंबून राहीले आहे. महाराष्ट्रात सध्या ईडीचे सरकार आले आहे. आर्थिक घोटाळ्यात अडकलेल्या राजकर्त्यांना भिती दाखवून आपल्याकडे खेचण्याचे कसब भाजपने केल्याचाही आरोप होतो आहे. सरकार पाडण्यात आर्थिक गोष्टी बऱ्याचदा कारणीभूत ठरतात. जनता दलाच्या सरकारने दोन रुपये किलोने साखर देऊन देशाची अर्थव्यवस्था बिघडवली होती. या घटनेमुळे पुढे त्यांना सत्तेतून पाय उतार व्हावे लागले होते. अशा अनेक घटनातून स्पष्ट होते की राजकारणात यशस्वी होण्यासाठी अर्थशास्त्राचे गणित जमवता येणे गरजेचे आहे. जागतिकीकरण, उदारीकरण, खासगीकरण आणि आधुनिकीकरण या चार मंत्रतंत्राचा उद्घोष करत भारतीय अर्थव्यवस्थेत आमुलाग्र बदल घडत आहेत. भ्रष्टाचार निर्मुलन हे आव्हान यातून उभे राहीले आहे. अशाच विविध आर्थिक घडामोडींचा आढावा घेणारे प्रा. डॉ. जे. के. पवार यांचे लेख वृत्तपत्रातून गेल्या 30 वर्षात प्रसिद्ध झाले. तेच ‘अर्थायन’ मधून पुस्तक रुपाने एकत्रितरित्या आले आहेत. या लेखातून लोकसंख्या, बालकामगार, कामगार, शहरी-ग्रामीण जीवन, शेती, उद्योग, व्यापार, बँकिंग, सहकार, महागाई, भ्रष्टाचार, पर्यावरण, बेरोजगारी, बदलते लोकजीवन आदी विविध विषयावरील मते त्यांनी मांडली आहेत.

अर्थायनची सुरुवात राजर्षी शाहू महाराज यांच्या अर्थनीतीने होते. शाहूंनी जनमानसात मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. संपूर्ण भागाची पाहाणी करून जनतेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. ग्रामीण भागात पाण्याची टंचाई आहे ओळखून त्यांनी विकासासाठी पाणी प्रश्नाला प्राधान्य दिले. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर शाहूंनी भर दिला होता. प्रजा सुखी तर राजा सुखी हे सुत्र वापरून त्यांनी केवळ सामाजिक क्रांती केली नाही तर ती धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीयही क्रांती होती. शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शेतीमध्ये विविध प्रयोग करून शेतीच्या विकासासाठी प्रयत्न केले. वेगवेगळ्या खतांचेही प्रयोग त्यांनी केले. माशापासून तयार करण्यात आलेले खत, राखेपासून तयार झालेले खत, शेणखत इत्यादीच्या वापराचे प्रयोग शेतीत केले. शेतीचे लहान आकारमान हा भारतीय शेतीच्या कमी उत्पादकतेचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. हे जाणून शाहूंनी तुकडेबंदी कार्यक्रमास चालना दिली. सहकार चळवळीला प्रेरणा दिली, सर्वांगीण औद्योगिक विकासावर भर दिला. उद्योगधंद्यांना स्वतःच्या पायावर भरभक्कमपणे उभे राहता यावे यासाठी त्यांनी योग्य प्रकारे पोषक परिस्थिती निर्माण केली. उत्पादने घेऊन त्याची विक्री व्यवस्था उभी करण्यासाठी व्यापार पेठेची स्थापन केली. कामगारांचे होणारे शोषण याकडे राजर्षींनी लक्ष दिले. कामगारांच्या संख्येबरोबरच त्यांच्या गुणवत्तेकडे राजर्षिंनी लक्ष पुरवले. जनेतला महागाईची, भाववाढीची झळ लागू नये यासाठी राजर्षींनी संस्थानातील खासगी खर्जाला काट करून पैसा वळवला होता. ऐतिहासिक तटबंदीप्रमाणे आर्थिक तटबंदीही लावून धरली. या सर्वाचे तत्त्वज्ञान सांगत न बसता तत्त्वाचारावर भर दिला. अशाप्रकारे शांहूंच्या अर्थनितीच्या आढावा पहिल्या लेखात प्रा. डॉ. पवार यांनी घेतला आहे.

पर्यावरणीय अर्थकारण हे आव्हानच आहे यावर लिहिलेल्या लेखात प्रा. डॉ. पवार यांनी पर्यावरण संरक्षणाची आणि संवर्धनाची फार मोठी समस्या संपूर्ण जगासमोर उभी राहील्याचे म्हटले आहे. पर्यावरणाचा दर्जा सतत उंचावत राहीला पाहिजे, तरच आर्थिक विकासाचा लाभ खऱ्या अर्थाने सर्वांना घेता येईल असे मत त्यांनी मांडले आहे. प्रदुषित झाली शहरे या लेखामध्ये प्रा. डॉ. पवार यांनी भारतीय शहरांच्या वाढीचा दर चीनसह जगातल्या इतर देशांच्या दरापेक्षा जास्त आहे असे सांगितले आहे. तर देशात झपाट्याने शहरीकरण होणारे राज्य म्हणून महाराष्ट्र ओळखले जाते असेही म्हटले आहे. नागरिकरणाची समस्या ही मानवनिर्मित आहे. यामुळे नागरीकरणाची आव्हाने, समस्या नष्ट करण्यासाठी. त्या समस्यांची तिव्रता कमी करण्यासाठी मानवी स्वभाव आणि वर्तणूक यामध्ये अनुकूल बदल करण्याची आवश्यकता आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

अर्थायनमध्ये आर्थिक गोष्टींचा आढावा घेताना मोलकरणींची समस्या, बालकामगार कायद्याच्या अंमलबजावणीची समस्या, कामगारांचे प्रश्न, गॅस भडकला अर्थात महागाई, लोकसंख्यावाढीची चिंता, वाढती बेरोजगारी, भ्रष्टाचार निर्मूलनाचे आवाहन, शिक्षणाच्या ओझ्याखाली खचलेले पालक अशा विविध समस्यांवरही चर्चा केली आहे. भारतातील लोकसंख्या विषयक धोरण फारसे यशस्वी झाले नसल्याचे मत प्रा. डॉ. पवार यांनी मांडताना धोरणाबाबत राजकीय पक्षांची इच्छाशक्ती, जनतेचा सक्रीय सहभाग हा महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. राष्ट्राच्या विकासासाठी आणि मानवाच्या हितासाठी लोकसंख्याविषयक धोरणाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे असे मत प्रा. डॉ. पवार यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रात ९५-९६ मध्ये शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात झुणका-भाकरीची योजना राबवण्यात आली. यामागचे राजकारण आणि अर्थकारण प्रा. डॉ. पवार यांनी अर्थायनमध्ये मांडले आहे. स्थिर सरकार देण्यासाठी आणि पुन्हा सत्तेत येण्यासाठी सरकार अशा सोयी सवलती देते. त्याकाळात एन. टी. रामाराव यांनी दारूबंदी + दोन रुपये किलो तांदूळ = विजय हे समीकरण सिद्ध करून दाखवले होते. तसेच झुणका + भाकरी = स्थिरता स्थिर सरकार असा प्रयोग झाला. प्रत्यक्ष भाववाढ, महागाई यावर काहीच उपाय योजना झाल्या नाहीत. संस्था आणि सरकारच्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण आणून भाववाढ, महागाई रोखण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो पण तसे कोठेही सरकार करत नाही. सत्तेसाठी योजना आणून राजकारण करण्यातच सरकारला रस वाटतो, असेच काहीसे चित्र आहे, असे लेखकाला वाटते.

बदलत्या आर्थिक परिस्थितीत प्रत्येकाच्या हातात दुचाकी आली आहे. अशा काळात पर्यावरणाचा विचार करून खिशाला परवडणारी अन् प्रकृतीला मानवणारी सायकल असा लेख लिहून प्रा.डॉ. पवार यांनी नव्यापिढीचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे. भुलभलैया जाहीरातींचा या लेखात जाहिरातींच्या बदलत्या रुपावर भाष्य केले आहे. सहकाराने, संदेशवहनाने बदलेले अर्थकारण यावरही या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे. इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, जवाहललाल नेहरू विद्यापीठ या अर्थशास्त्रज्ञ घडवणाऱ्या संस्थांची माहिती अर्थायनमध्ये देण्यात आली असून अर्थशास्त्रातील पदवीधरांना कशा प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत याचीही माहीत प्रा. डॉ. पवार यांनी दिली आहे. असे विविध ५२ लेख या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत. एकंदरीत गेल्या ३० वर्षातील अर्थकारणातील बदल या लेखातून आपणाला अभ्यासता येऊ शकतो.

पुस्तकाचे नाव – अर्थायन
लेखक – प्रा. डॉ. जे. के. पवार
प्रकाशन – राज प्रकाशन, कोल्हापूर
पुस्तकाची किंमत – 275 रुपये, पृष्ठे – 284

Related posts

..हा तर सरकारी दरोडेखोरीचा कायदा

जलनायक – सुधाकरराव नाईक

नका रे फिरवू आदिवासींच्या पोटावर जेसीबी…

Leave a Comment