July 27, 2024
Puja of Holy Fiscus Tree
Home » वडाचीच पूजा व्हावी !
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वडाचीच पूजा व्हावी !

आज रूढी-परंपरांच्या नावाखाली झाडांची कत्तल होते. झाडाचे नुकसान होते. कापलेल्या सर्व फांद्या विकल्याही जात नाहीत. राहिलेल्या फांद्यांचे ढीग बाजारात आणि रस्त्यावर पडतात. म्हणजेच कचरा वाढतो. सण साजरे करताना निसर्गाची, पर्यावरणाची हानी होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. फांद्याऐवजी दारात एका कुंडीत वडाची फांदी लावावी.

डॉ. व्ही. एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

भारतीय सण, प्रथा, परंपरा निसर्गावर प्रेम करायला शिकवतात. निसर्गातील प्रत्येक घटकाचे महत्त्व लक्षात आणून देतात. निसर्गात परस्परावलंबी अनेक साखळ्या आहेत. यात अनेक वृक्ष, प्राणी, जीवांचे मानवालाही सहकार्य मिळते. गांडूळ आणि सापाला शेतकऱ्यांचे मित्र मानतात. या परस्पर सहकार्याचे प्रतिबिंब प्रथा, परंपरा आणि सणामागे दिसते. लोकांनी निसर्गातील जैवविविधतेला जपण्यास प्रवृत्त व्हावे, हा अशा सणामागचा हेतू असावा. नागपंचमीला सापाची, बैलपोळ्याला बैलांची, आवळा पौर्णिमेला आवळा वृक्षाची पूजा, गुढीपाडव्याला कडूनिंब महत्त्वाचा, तर दसऱ्याला आपटा. प्रत्येक सण, प्रथा आणि परंपरेसोबत कथाही जोडल्या गेल्या आहेत. विविध घटकांचे मानवी जीवनातील महत्त्व लक्षात आणून देणे आणि त्या घटकाची उपलब्धता भविष्यात व्हावी, म्हणून त्यांचे जतन केले जावे, असा हेतू यामागे असावा.

मात्र प्रत्यक्षात तसे घडत नाही. अनेक सण, प्रथा आणि परंपरामध्येही झटपट जाण्याचे मधले मार्ग घुसले आहेत. त्यामुळे त्यामागील वैज्ञानिक कारण जाऊन आज निव्वळ सोपस्कार पार पाडले जातात. त्याचा परिणाम पर्यावरणावर होतो. निसर्गाचे मोठे नुकसान होते. पूर्वी गावात एकच होळी पेटायची, आज दारादारात पेटते. अनेकदा डांबरी रस्त्यावर ती पेटवल्याने हवेच्या प्रदूषणाबरोबर, डांबरी रस्त्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. रंगपंचमीला पाण्याची होणारी नासाडी उघड्या डोळ्याना पाहवत नाही. इंधनाचे नुकसान, हवेचे प्रदूषण आणि पायाभूत सुविधांचे होणारे नुकसान मनाला अस्वस्थ करते. गुढीपाडवा साजरा करतानाही कडूलिंबांच्या डहाळ्यांचे असेच नुकसान होते. गरजेपेक्षा जास्त फांद्या मोडल्याने झाडाचे नुकसान होते. त्या फांद्या वाढण्यास वर्ष किंवा कदाचित त्यापेक्षाही जास्त काळ लागतो. मात्र त्याचा विचार कधीच होत नाही.

काही दिवसात महिलांचा महत्त्वाचा सण येईल. वटसावित्री पौर्णिमा ! ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा होतो. यामागेही एक पौराणिक कथा आहे. फार-फार वर्षांपूर्वी अश्वपती नावाचा भद्र देशाचा राजा होता. त्याला सावित्री नावाची अत्यंत सुंदर, नम्र आणि गुणी मुलगी होती. राजाला आपल्या कन्येवर मोठा विश्वास होता. ती विवाहायोग्य होताच राजाने तिला आपला पती निवडण्याचे स्वातंत्र्य दिले. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. हा सत्यवान शाल्व देशाचा राजा धृमसेनाचा मुलगा. मात्र धृमसेन अंध होता. त्याचे राज्य दुसऱ्यांनी बळकावले होते. त्यावेळी ते राज्यातून परागंदा होऊन जंगलात राहात होते. नारदमुनीना माहीत होते की, सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचे आहे. नारदमुनीनी, सावित्रीने अशा अल्पायुषी सत्यवानाशी विवाह करू नये, असे सुचवले. मात्र सावित्रीने त्याचीच निवड केली. केवळ एक वर्षाचे आयुष्य असणाऱ्या सत्यवानाशीच विवाह केला. आपल्या कन्येची इच्छा राजा अश्वपतीने पूर्ण केली. लग्नानंतर सावित्री सत्यवानासोबत जंगलात राहू लागली. सासू-सासऱ्याची सेवा करू लागली. सत्यवान जंगलात लाकडे तोडून विकत असे आणि उदरनिर्वाह चालवत असे.

सत्यवानाच्या मृत्यूला तीन दिवस उरले असताना, सावित्रीने उपवास सुरू केला. अखेर त्याच्या मृत्यूचा दिवस उगवला. सावित्री त्याच्यासोबत जंगलात गेली. नियोजित वेळी यम सत्यवानाचे प्राण घेऊन निघाला. सावित्री त्यामागे जाऊ लागली. अनेकदा यमाने तिला परत जायला सांगितले, पण सावित्रीने काही ऐकले नाही. शेवटी यमाने तिला सत्यवानाचे प्राण सोडून तीन वर मागायला सांगितले. सावित्रीने प्रथम सासू-सासऱ्यांचे डोळे मागितले. दुसऱ्या वरामध्ये त्यांचे राज्य आणि तिसऱ्या वरामध्ये एक पुत्र मागितला. सावित्रीला कटवायच्या नादात, यमाने घाईमध्ये ‘तथास्तू’ म्हटले. नंतर त्याच्या चूक लक्षात आली. सावित्रीला पुत्र होण्यासाठी यमाला सत्यवानाचे प्राण परत द्यावे लागले. तेव्हापासून पतीला चांगले आरोग्य, दिर्घायुष्य लाभावे, म्हणून हे व्रत करण्याची प्रथा सुरू झाली. आता जन्मोजन्मी, सात जन्म हाच पती मिळावा म्हणून, महिला वटवृक्षाची पूजा करतात.

वडाचे झाड दिर्घायुषी आहे. त्याला पारंब्या येतात. प्रत्येक पारंबीपासून एक नवे झाड तयार होते. हे झाड अनेक जीवांचे घर असते. अनेक पक्षी यावर घरटी बांधतात. वडाच्या झाडाचा जसा विस्तार होतो, तसे कुटुंब विस्तारावे, अशीही धारणा आहे. वडाच्या मुळ्या भूजल शुद्धीकरणात उपयुक्त असतात. पाने पसरट आणि गर्द असल्याने सावली चांगली मिळते. जास्त कार्बन डायऑक्साईड शोषून ऑक्सिजन निर्मिती करतात. झाडाची पाने जनावरांना चारा म्हणून उपयुक्त असतात. त्यामुळे तसा मानवाला याचा कोठेही प्रत्यक्ष उपयोग नाही. तरीही वडाच्या झाडाना मानवाने जपावे, ती लावावीत, वाढवावीत, या हेतूने वडाला या व्रताशी जोडले असावे. वड, पिंपळ यासारखी झाडे जणूकाही एका गावासारखी असतात. अशा झाडाबरोबर एक परिसंस्था निर्माण झालेली असते. त्यामुळे त्यांचे निसर्गातील महत्त्व फार मोठे आहे.

ही घटना वटवृक्षाखाली घडली, म्हणून वटसावित्री पौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा होते. वडाची लाकडे जळण म्हणून वापरली जात नाहीत. त्यामुळे गावकऱ्याकडून या झाडाची तोड करण्यात येत नाही. वडाची झाडे रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेली होती. मात्र रस्ता रूंदीकरणात यातील झाडांची मोठ्या प्रमाणात तोड झाली आहे. वडाच्या झाडांची लाकडे डांबर वितळवण्यासाठी वापरण्यात येतात. पूर्वी गावाच्या वेशीत, मुख्य चौकात वडाचे एकतरी झाड असायचे. आता अशा झाडांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे हे व्रत पाळायचे तर खूप दूर जावे लागते. महानगरात तर अवघडच. म्हणून शॉर्टकट- वटपौर्णिमेदिवशी वडाच्या फांद्या विकण्याचा गोरखधंदा सुरू झाला. अनेक घरात वडाची फांदी विकत आणून पूजा करतात. पूजा ही वैयक्तिक बाब, तिला आक्षेप असण्याचे कारण नाही. झाडाची पुजा करण्याची परंपरा आहे, वडाला मुळ्या आणि पारंब्या असतात. फांदीला ना मूळ ना पारंब्या. मग हे व्रत खरंच शास्त्रानुसार होते का?

आज रूढी-परंपरांच्या नावाखाली झाडांची कत्तल होते. झाडाचे नुकसान होते. कापलेल्या सर्व फांद्या विकल्याही जात नाहीत. राहिलेल्या फांद्यांचे ढीग बाजारात आणि रस्त्यावर पडतात. म्हणजेच कचरा वाढतो. सण साजरे करताना निसर्गाची, पर्यावरणाची हानी होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. फांद्याऐवजी दारात एका कुंडीत वडाची फांदी लावावी. वडाच्या फांदीला लगेच मुळ्या फुटतात. फांदी आणून आताच लावली, तर रोप तयार होईल, त्या रोपाची पूजा केली, तर ती खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल. झाडाचा एखादा भाग हवा असेल; तर, अगोदरच्या दिवशी जाऊन त्या झाडाची क्षमा मागून, झाडाला, तो भाग देण्याची विनंती करण्यास भारतीय संस्कृती सांगते. रूढी परंपरा पाळताना याचा विसर न व्हावा इतकेच!


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

भाविकांच्या मृत्यूकांडानंतरही भोलेबाबा नामानिराळा…

तस्मै श्रीगुरवे नमः |

चक्क बर्फाच्या हॉटेलमध्येच मुक्काम ! (व्हिडिओ)

1 comment

Anonymous April 10, 2023 at 9:38 PM

very informative sir

Reply

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading