May 30, 2024
Prof D P Sakhadev Dronacharya of Civil science
Home » बांधकाम शास्त्राचे द्रोणाचार्य – प्रा. डी. पी. सखदेव
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

बांधकाम शास्त्राचे द्रोणाचार्य – प्रा. डी. पी. सखदेव

प्रा. डी. पी. सखदेव सरांनी महाराष्ट्राच्या जीवनदायी प्रकल्पावरील नोकरीला बाय बाय करून स्थापत्य शास्त्राच्या अध्ययनाच्या कामाचा शिवधनुष्य पेलण्याचे कार्य हाती घेतले आणि खरोखरच त्यांनी अनेक निष्णात दर्जेदार कार्यकुशल अभ्यासू, प्रामाणिकबाण्याचे अभियंते घडविले. म्हणूनच प्रा. सखदेवसरांना बांधकाम शास्त्राचे द्रोणाचार्य म्हटले तर त्यामध्ये काहीच वावगे ठरणार नाही .

महादेव ई. पंडीत

लेखक वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत.
(जुलै 1989 बॅच)

प्रा. डी. पी. सखदेव.
शिक्षण : B. E.  Civil  : COEP
            M. E. Civil WCE Sangli
जन्म  : ९ ॲागस्ट १९३०
मृत्यू  : ३  जानेवारी  २००८

 माझे 10 वी पर्यंतचे शिक्षण मातृभाषेतून मौजे भादवण (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथे झाले. माझे वडील व जवळचे नातेवाईक पॉलिटेक्नीकल कॉलेजमध्ये प्रवेश घे आणि तीन वर्षानंतर कोर्स संपेल आणि लगेचच सरकारी बांधकाम किंवा पाटबंधारे खात्यामध्ये नोकरी मिळेल असे सांगत होते. पण माझे बंधु श्याम पंडीत मला पदवीधारक अभियंता हो असा मार्गदर्शक सल्ला देत होते. शेवटी अनेक विचाराअंती मी व माझे वडील पदवीधारक अभियंता व्हायचे या एकमतावर आलो. त्यानंतर जून 1983 मध्ये मी 11 वी व 12 वी सायन्ससाठी न्यु कॉलेज कोल्हापूर येथे प्रवेश घेतला. सायन्स शाखेसह टेक्नीकल हा विषय घेतला. टेक्नीकल या विषयामुळे माझ्या पीसीएम ह्या गृपमध्ये 5 टक्के मार्कांचे वेटेज मिळणार होते. गावाकडील बरीच मंडळी सायन्स शाखा खुप अवघड असते त्यामुळे मातृभाषेत शिक्षण घेणाऱ्या खेड्यापाड्यातील मुलांना पीसीएम ह्या  गृपमध्ये चांगले गुण मिळत नाहीत अशी चर्चा करायचे आणि याच चर्चेमुळे माझ्या मनात थोडीशी धास्ती होतीच. पण चांगला हुशार मित्र परिवार मिळाला त्याचप्रमाणे पी. के. पाटील, श्री. पेठे सर आणि श्री. दळवी सर त्याचप्रमाणे न्यू कॉलेज कोल्हापूर मधील अनेक सरांचे योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे मला चांगले मार्कस मिळाले.

1947 साली कै. धोंडुमामा साठे, प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक व प्रसिध्द उद्योगपती सेठ लालचंद हिराचंद या दोन महान दुरदर्शी व्यक्तीनी स्थापण  केलेल्या व  अल्पावधीतच महाराष्ट्रात अग्रगण्य हा सोनेरी मुकूट परिधान केलेल्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाला मी पहिली पसंती दिली. माझ्या वडिलांचे माजी विद्यार्थी आनंदराव सुतार व माझ्या जेष्ठ बंधूचे जावई ज्ञानदेव ल. पवार हे दोन अभियंते लघुपाटबंधारे विभागात त्यावेळी ज्युनियर इंजिनियर ह्या पदावर कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्याशी वेळोवेळी कोर्सबाबत चर्चा होत होती आणि तेव्हाच मी स्थापत्य अभियांत्रिकी मध्येच पदवी घ्यायची असे मनोमनी पक्के केले होते.

पदवीधारक अभियंता होण्यासाठी एकंदरीत आठ सेमिस्टर असतात. पहिली दोन सत्रे सिव्हील, मेकॅनिकल व इलेक्ट्रीकल ह्या तीनही ब्रॅंचसाठी समाईकच असतात. पहिल्या वर्षानंतर ब्रॅंच बदलण्याचा पर्याय असत, त्यामुळे माझा कोल्हापूरचा मित्र दिपक उगारे मेकॅनिकल साईड सोडून सिव्हील ब्रॅंचमध्ये आला होता. तिसऱ्या सत्रापासून आपण निवडलेल्या शाखेचा अभ्यासक्रम खोलवर शिकविला जातो. तिसऱ्या सेमिस्टरला बिल्डींग कन्स्ट्रक्शन व ड्रॉईंग पार्ट 1 हा विषय अभ्यासक्रमात होता आणि BCD हा विषय शिकवण्यासाठी प्रा. डी. पी. सखदेव सर होते. सर नेहमी ग्रामीण भागातील मुलांना प्रोत्साहीत करण्यासाठी झटत. ड्रॉईंग वर्क निटनेटके मुद्देसुद असेल तर सरांना खुप आवडायचे. सखदेवसरांना ड्रॉईंग सीट चेक करण्यासाठी कमीतकमी अर्धा तास तरी लागत असे यावरुनच सर किती तन्मयतेने ड्रॉईंग सीट तपासत असतील याची कल्पना येईल. सीट चेक करतानाच त्यातील बारकावे सर समजून सांगायचे. BCD 1 ह्या विषयाच्या नावाप्रमाणेच आमच्यासाठी सखदेव सर स्थापत्य शास्त्राच्या अगदी सुरवातीलाच बुस्टर डोसच ठरले आणि अगदी आठव्या सेमिस्टरपर्यंत त्या बुस्टरची मात्रा शरीरात कायम टोचत राहीले आणि आजपर्यंत त्या डोसचा चांगलाच परिणाम व मात्रा आमच्या सर्वांच्या व्यावसायिक कार्यकाळात उपयोगी पडतो आहे.

स्थापत्य अभियंत्याना आवश्यक असणारी आस्थापणा, क्षमता, कौशल्य, नियोजन, चिंतन आदीबाबी सखदेवसरांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या नसानसात अत्यंत कुशलतेने रुजविलेल्या आहेत. जसा कुंभार मातीचे मडके ओले असताना त्याला योग्य आकार देतात अगदी त्याच कौशल्याने सखदेवसरांनी प्रत्येक शिकाऊ स्थापत्य अभियंत्याला चांगलाच आकार व क्षमता दिल्या आहेत.

चौथ्या वर्षाच्या पहिल्या सत्रामध्ये 75 मार्कासाठी एक सेमिनार व दुसऱ्या सत्रामध्ये 200 मार्कांचा एक प्रोजेक्ट असे दोन टास्क असतात. खरेतर Lift Irrigation, Sewage Treatment Plant , Influent Treatment plant , Design and analysis of structures इत्यादी विषयांवर बरीच मुले प्रोजेक्ट व सेमिनार करतात. पण सखदेव सरांनी स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील Planning, design, estimation, drawing work and Interior detailing त्याचप्रमाणे Perspective इत्यादी विषयांची व बाबींची सखोल माहिती होण्यासाठी B. E. च्या आठव्या सेमिस्टरला Building Project प्रचलित केला. तो विषय विद्यापीठ स्तरावर मंजूर करून घेतला याचे संपुर्ण श्रेय सखदेव सरांना जाते. पुढे ह्या Project चा विस्तार ज्युनियर प्रा. शैलेंद्र घोरपडे यांनी डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत पुणे विद्यापीठात पण प्रचलित केला. सुरुवातीला त्याला काही अडीअडचणी आल्या होत्या पण घोरपडेने स्वतःचा Project Report विद्यापीठात सादर करून त्याचप्रमाणे मार्कलिस्टचा पूरावा सादर करून मंजूर करून घेतला. पारंपारिक पद्धतीप्रमाणे Project work करून घेण्यापेक्षा स्थापत्य अभियंत्याच्या दैनंदीन जीवनाशी निगडीत असलेल्या इमारत या विषयाचा Project मुलांकडून करून घेणे अत्यंत महत्वाचे व उपयोगाचे आहे हे सखदेव सरांनी 1988 सालीच रुजविले होते यावरून सरांचा दूरदर्शीपणा किती उच्च कोटीचा होता याची आपणास कल्पना येईल.

शेवटच्या आठव्या सेमिस्टरला प्रोजेक्टसाठी 5 -5 मुलांच्या बॅचेस तयार करायच्या होत्या. माझ्या बॅचमध्ये मी, शैलेंद्र घोरपडे, नंदू पाटील, दिपक उगारे आणि अशोक भालकर असे पाच जण होते. ही निवड सखदेव सरांनीच केली आणि ह्या बॅचने Commercial Complex  चा Building Project करावा अशी अपेक्षा व्यक्त  केली. Building Project अभ्यासात घेऊन आपले स्थापत्य शास्त्राचे सखोल ज्ञान अद्यावत करून इमारत बांधकामाची अगदी A To Z माहीती मिळावी ह्या मुळ हेतूने सखदेव सरांनी Building Project ची जबाबदारी आमच्यावर टाकली. सखदेव सर Project Guide म्हणून मार्गदर्शन करणार होते. त्यामुळे आमच्या Project Work साठी तसेच आमच्यासाठी सखदेव सर द्रोणाचार्याच्या भुमिकेत, बघा मित्रानो एखादे चांगले काम होणार असेल तर दुग्ध शर्करा योग नियतीच  घडवूनच आणते. आमच्या बॅच मधील पाचही मेंबर हुशार व कष्टाळूच होते. कॉलेजमध्ये सरांना इतर कामामुळे वेळ मिळाला नाही तर सर Project च्या टिप्स देण्यासाठी सर्वांना स्वतःच्या घरी बोलवायचे त्याचप्रमाणे सांगलीतील प्रमुख वास्तु विशारदांचे मुलांना मार्गदर्शन मिळावे यासाठी कॉलेजमधून मुलांची शिफारस पत्रे पाठवायचे. आम्हाला Building Project साठी आंतरराष्ट्रीय प्रसिध्द वास्तु विशारद चार्लस कोरीया यांच्याकडे कामकाज केलेले श्री गाडगीळ यांचे मार्गदर्शन सुध्दा सखदेव सरांच्या शिफारस पत्रामुळेच मिळाले. Commercial Complex च्या Project Work चा आम्हा पाच जणांना स्थापत्य अभियंता ही पदवी प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक जीवनात खूपच उपयोग होत आहे. शैलेंद्र घोरपडे हा तर पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात एक लिडींग आर्कीटेक्ट म्हणून नावारूपाला आला त्या अगोदर तो स्थापत्य शास्त्रातील अनेक विषयांचा तरुण निष्णांत प्राध्यापक म्हणून सुध्दा अल्पावधीत घोरपडे सर ह्या नावाने पिंपरी चिंचवडमध्ये नावारूपास आलाच होता. दिपक उगारेने सुरुवातीच्या काळात पुण्यातील आर. डी. नगरकर ह्या बांधकाम व्यावसायिकाकडे अगदी कमी कालावधीत उत्तम व चाणाक्ष अभियंता म्हणून नाव कमाविले आणि नंतर कोल्हापूर नगरीत प्रामाणिक व वक्तशीर बांधकाम व्यावसायिक ह्या नावाने ओळखला जाऊ लागला. नंदू पाटील तर आज कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये ज्यु. इंजिनियर ते उपनगर अभियंता या पदापर्यंत मजल मारत नावारूपाला आला आहे. अशोक भालकर महाराष्ट्र शासनाची प्रतिष्ठेची MPSC ही परिक्षा उत्तीर्ण होऊन आज स्मार्ट सिटी ह्या प्रकल्पाचे मुख्य सुत्र संचालक म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे येथे कार्यरत आहे. खरेतर माझी देहरचना पाहिली तर सर्वजण बोलतील की हा सरकारी किंवा खाजगी नोकरीचा मस्त खेळाडू आहे पण आज मी मुंबई येथे जिओटेक्नीकल अन्वेषण, NDT, स्ट्रक्चरल रिपेअर आणि Topo Survey या स्थापत्य शास्त्राच्या चारही विंगमध्ये व्यवस्थित व चांगले व्यावसायिक करीयर केलेले आहे, याचे सर्व श्रेय सखदेव सरांसोबत वालचंद कॅालेज, न्यू कॉलेज तसेच भादवण हायस्कूल मधील आतापर्यंतच्या सर्व शिक्षकांनाच जाते.

एखाद्या आंतरराष्ट्रीय शहरात स्वतःच्या व्यवसायाची प्रगती करायची असेल तर बांधिलकी, चिकाटी, विनयशीलता, एकाग्रता, दुसऱ्याला समजून घेण्याची वृत्ती, त्याला आपलं म्हणणं पटवून देण्याची क्षमता, व्यवसायावरील निष्ठा, प्रामाणिकपणा आदी गुण असायला हवेत आणि हे गुण माझ्यात रुजविण्याचे वेळोवेळीचे काम सखदेव सरांसोबत इतरही प्राध्यापक मंडळींनी केले.

वालचंदमधील सर्वच शिक्षकांची शिकवण्याची शैली प्रात्याक्षिकावरच आधारित होती. त्यामुळे शिकाऊ अभियंत्यांना स्थापत्य शास्त्राचे अगदी सुक्ष्म ज्ञान सुध्दा लवकरच अवगत होत होते. शिक्षणात गुरु तरबेज असेल तर त्यांचे शिष्यसुध्दा कार्यकुशल होणारच यात तीळमात्र शंका नाही. खाण तशी माती व गुरुसारखा शिष्य अगदी या म्हणीप्रमाणे वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली ही सोन्यासारखे चकाकणारे अभियंते तयार करणारी सोन्याची शैक्षणीक खाणच संबोधणे येथे उचित ठरेल. सोन्याच्या खाणीतून शिकाऊ अभियंत्याना फक्त चार वर्षांत अगदी कार्यकुशल, प्रामाणिक, अभ्यासू असे अनेक पैलू पाडणाऱ्या सखदेव सरांना अभियंत्याचा व स्थापत्य शास्त्राचा द्रोणाचार्य संबोधनेच उचित ठरेल.

प्रा. डी. पी. सखदेव सरांचे कोणतेही लेक्चर कोणताही शिकाऊ स्थापत्य अभियंता चुकवायचा नाही. क्लासमध्ये सर्वजण अगदी तन्मयतेने सरांचे लेक्चर ऐकत असत. सखदेव सर प्रत्येक विषय अनेक संयुक्तिक व लॉजीकल उदाहरणे देऊन त्यातील अनेक बारकावे समजून सांगायचे. त्यामुळे प्रत्येक शिकाऊ अभियंत्यांच्या मनामध्येच ते ज्ञान कायमचे कोरले जायचे. सखदेव सरांनी अनेक प्रकल्प स्थळावर काम केलेले असल्यामुळे BCD, Irrigation किंवा BPD हे विषय अगदी  Theoretical आणि practical यांची व्यवस्थित सांगड घालून शिकवायचे. पुस्तकी ज्ञान आणि प्रकल्पावरचे प्रॅक्टीकल ह्या दोन्ही बाबी प्रत्येकजण परस्पर वेगवेगळ्या आहेत असे समजतो पण सखदेव सर क्लासरूम मध्ये स्थापत्य विषयाचे लेक्चर देत असतांना अनेक प्रकल्पांची व्यवस्थित उदाहरणे, स्केचेस त्यांचे फोटो इत्यादी बाबीचे सादरीकरण करत असल्यामुळे जणू प्रकल्पस्थळावरच तो विषय शिकवत आहेत असेच भासायचे.

वालचंद महाविद्यालयामध्ये  सखदेव सर २० मार्च  १९६२ पासून कार्यरत होते. वालचंद मधील प्राध्यापक ह्या जॉबच्या अगोदर सखदेव सर कोयना डॅमवर पाटबंधारे विभागाचे एक्स्पर्ट डिझायनर म्हणून कार्यरत होते. कोयना डॅमचे काम सन 1954 ते 1964 ह्या कालावधीमध्ये सुरू होते. कराडपासून सांगलीपर्यंतच्या सर्व साखर कारखान्यांच्या इरिगेशन स्कीम सरांच्या मार्गदर्शनाखाली सिव्हील स्टाफने तसेच शिकाऊ अभियंत्यांच्या सहकार्याने डिझाईन केलेल्या आहेत. कोयना डॅमवर काही ब्रिटीश अभियंते सुध्दा कार्यरत होते असे सखदेव सर आम्हाला मोकळ्यावेळी सांगायचे. ब्रिटीश अभियंते प्रकल्प स्थळावर हाफ पँट घालून यायचे याचे कारण प्रकल्प स्थळावर सर्व्हे करीता अनेक हालचाली व डोंगरदऱ्या मध्ये मार्गक्रमण करावे लागायचे आणि ह्या सर्व हालचाली हाफ पँट पोशाखात अगदी आरामात होत होत्या.

सरांच्या मिशा अर्ध ओठावरच पिळदार केलेल्या होत्या त्यामुळे सर्व क्लासवर त्यांचा प्रेमळ व भितीदायक असा दरारा होता. Building Construction, Irrigation Engineering व Building Planning & Design हया विषयाचे सखदेव सर अगदी पारंगत, कुशल व हाडाचे प्राध्यापक होते. 1967 साली डिसेंबर मध्ये कोयनानगर येथे भूकंप झाला त्यावेळी कोयनेचे धरण फुटले तर महापूर येऊन सारे सांगली शहर वाहून जाईल अशी भिती सगळीकडे पसरली होती पण त्यावेळी कॉलेजमधील प्रा. भाटे, प्रा. सखदेव व प्रा. संतपूर यांनी गावातील चौकात खुल्या सभा घेऊन लोकांच्या भितीचे निरसन सुध्दा केले होते.

 सन 1962 पासून ते निवृत्तीपर्यंत म्हणजेच 1992 पर्यंत सरांनी एकुण 30 बॅचेसना मार्गदर्शन केलेले आहे म्हणजेच एकंदरीत 1800 ते 2000 अभियंत्यांना स्थापत्य शास्त्राचे धडे अगदी तन्मयतेने दिलेले व रुजविलेले आहेत. शिकाऊ अभियंत्यांना अनेक प्रकल्पस्थळाचे नियोजन शैक्षणिक सहलीमधून त्यांच्यावर संस्कारीत केलेले आहे. स्थापत्य अभियंत्यांना प्रकल्प स्थळावर कोणत्या पैलुची गरज आहे अगदी त्यांच्या त्यांच्या भुखेप्रमाणे त्यांना ते ते  शैक्षणिक खाद्य पूरविले आहे.

१९७० च्या बॅचचे उल्हास कलगुटकर आज Technogym Consultant ह्या नावाने ब्रीज, उड्डाणपुल आणि महामार्ग ह्या विभागांचे नामांकित स्ट्रक्चरल सल्लागार म्हणून देशात कार्यरत आहेत. पहिला रोल नंबर असणारे माझे बॅचमेट सदा साळुंखे आज पुणे विभागाचे मुख्य अभियंता या पदावरून कोल्हापूर, सांगली, पुणे, सातारा, सोलापूर व अहमदनगर अशा एकंदरीत सहा महाकाय जिल्ह्यांचा सार्वजनिक विभागांचा संपुर्ण कार्यभार अत्यंत प्रामाणिकपणे व कुशलतेने कार्यरत ठेऊन त्या विभागाला जागतिक नामांकन मिळवून देत आहेत. माझा मित्र कर्नल रविशंकर घोडके याने देशाच्या आर्मीमध्ये  कर्नल या  पदावरुन अनेक दुर्गम सिमा भागात देशाच्या संरक्षणार्थ जलदगतीने  रोडची कामे पार पाडली आहेत. माझे सिनीयर मित्र विजय घोगरे आज ठाणे पाटबंधारे विभागातील ठाण्यासह कोकण विभागाचा सर्व कार्यभार अधिक्षक अभियंता या पदावरून अत्यंत कुशलतेने मार्गक्रमण करत समाजाची अत्यंत जीवनदायी बाब म्हणजे पाण्याचे साठवणूक व डिस्ट्रिब्युशनचे नियोजन व्यवस्थित पार पाडत आहेत. त्याचप्रमाणे माझे दुसरे बॅचमेंट सुनिल म्हस्के आज मुख्य प्रकल्प व्यवस्थापक म्हणून मुंबई रेल विकास निगम लि. मध्ये कार्यरत असून विरार ते डहाणू ह्या  लोकल सेवेचे चौपदरीकरण करून समाजाची प्रवासाची निकड सोईस्कर व आरामदायी करण्याच्या प्रकल्पात रात्रंदिवस कार्यमग्न आहे. तसेच मनिष पवार माझे वर्गमित्र कोल्हापूर विभागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात कार्यकारी अभियंता या पदाचा कार्यभार अत्यंत तांत्रिक पद्धतीने हाताळून समाजाची तहान भागवत आहेत. माझे बॅचमेट डॅा. प्रताप सोणावने वालचंद कॅालेजमध्येच प्राचार्य  या पदावर विराजमान आहेत. अशी अनेक सिनियर व ज्युनियर स्थापत्य अभियंता मित्रमंडळी सरांच्या मार्गदर्शनाखालीच तयार झाली. प्रा. सखदेव सरांनी महाराष्ट्राच्या जीवनदायी प्रकल्पावरील नोकरीला बाय बाय करून स्थापत्य शास्त्राच्या अध्ययनाच्या कामाचा शिवधनुष्य पेलण्याचे कार्य हाती घेतले. सर सर्व शिकाऊ अभियंत्यासाठी स्थापत्य बांधकाम शास्त्राचे द्रोणाचार्य ठरले.

Related posts

उपासमार अन् मातृप्रेमाने भारावलेले आत्मकथन: याडी

स्वदेशी बनावटीची पहिली हायड्रोजन फ्युएल सेल बस

प्रेम चिरंतन…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406