April 20, 2024
book-review-of-dr-shrikant-patil-lockdown
Home » ‘एका महामारीचा उत्तुंग दस्ताऐवज ठरणारी कादंबरी ‘लॉकडाऊन’
मुक्त संवाद

‘एका महामारीचा उत्तुंग दस्ताऐवज ठरणारी कादंबरी ‘लॉकडाऊन’

‘एका महामारीचा उत्तुंग दस्ताऐवज ठरणारी कादंबरी ‘लॉकडाऊन’

‘लॉकडाऊन’ ह्या कादंबरीत डॉ. श्रीकांत पाटील यांनी आत्मभान ठेवून आपल्या डोळ्यांनी पाहिलेले या समाजाचे चित्र वास्तवपणे मांडलेले आहे. यात कोणत्याही प्रकारची काल्पनिक अथवा अतिशयोक्ती भावमुद्रित केलेल्या व्यक्ती आढळून आल्याचे दिसत नाही.

प्रमोद पिवटे
‘शब्दशिवार’ ७/२ गोदावरीनगर, मु.पो.ता.मुक्ताईनगर, जि. जळगांव चलभाष- ८३०८४९१९४७

साहित्याचा रचनात्मक दर्जा असलेला चपखलपणे वापरलेला ग्रामीण बोलीचा बाज हा तिथल्या वारणा काठचा असल्याने यातील अस्सल ग्रामीण मराठी शब्द प्रमाणभाषेतसुद्धा डॉ. श्रीकांत पाटील यांनी आपल्या कादंबरीत आपल्या परिशिष्ठ २ मध्ये सुलभ करुन दाखविला आहे. यातील व्यक्तिरेखा परसू आणि त्याची धर्मपत्नी रखमा या कादंबरीचा आत्मा असून त्यांच्यातील संवादांमुळे ‘कोरोना’ ही भानगड नेमकी काय आहे हे पुढील पिढीस सुलभरीत्या सुलभ भाषेत डोक्यात उतरवून देणारी ठरावी. ही कादंबरी जरी डॉ. श्रीकांत पाटील यांनी आज लिहिली असली तरी ही कादंबरी शतकानुशतके अशीच ताजी आणि वर्तमान भाषेतच राहील, अशी एक संकल्पना ही कादंबरी वाचताना प्रत्ययास येते. यात शिक्षकीपेशा असलेले प्राध्यापक मनोज शिवा गुरुजी, अशोक आणि विश्वनाथ अशी मैत्रीची श्रृंखला गुंफणारी मनमोकळ्या स्वभावाची आणि एकमेकांप्रती भाव-भावना व्यक्त करणारी व्यक्तिरेखा प्रतीक डॉ. पाटील यांनी ‘लॉकडाऊन’ कादंबरीत वापरलेली आहेत.

या कादंबरीत लेखकाने एकतर्फी लेखन केलेले नसून, समाजभान ठेवून प्रत्येक सामाजिक स्तरातील मग ते ग्रामीण भाग असो की शहरीभाग असो. गरीब असो वा श्रीमंत असो. नोकरदार असो की, शेतकरी असो. सुशिक्षित रोजगार असो वा आयोजित असो. स्त्री असो वा पुरुष असो अशा सर्वाच्या भावनेला वाचा फोडणारी ही कादंबरी ठरणारीच असावी असे वाटते. ‘कारोनाग्रस्त’ मरणाची भिती सोडून जगण्याच्या प्रचंड आशावादाची प्रतिभा आणि प्रतिके या सुंदर रूपकातून ही कादंबरी एका विशिष्ट मार्गाने सकारात्मक भूमिकेकडे डॉ. श्रीकांत पाटील यांनी मोठ्या मार्मिकेतून वळवली आहे. ही कादंबरी खूप आशावादी आणि यशावादी ठरावी असं वाटते.

‘लॉकडाऊन’ ही कादंबरी लिहितांना लेखकाने रचना किंवा साचा तयार करून न लिहिता येणारी वास्तविकता ओघवत्या लेखन शैलीने सहज आणि सुलभपणाने मांडली आहे. ‘संकट माणसाला जवळ आणतात आणि माणसांत माणुसकी जागृत करतात आणि या माध्यमातून एकमेकांना मदत करतात’ किती मार्मिकतेने आलेली ही ओळ कादंबरीची श्रीमंती वाढवणारी ठरते. संकटकाळी आपण कोणाचे काही देणं लागतो ही भावना जागृत होऊन या पंचमंडळींनी गावात कोरोनाचा संसर्ग होऊ नये अथवा थांबावा यासाठी या मंडळींनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून मास्क वाटण्याची जी शक्कल लढवली ती म्हणजे या कादंबरीचा गाभाच समजावा. हातावरचं पोट असणारी या कथित गावातील लहान कुटुंबे आणि नंदीवाल्याचं कुटुंब हे गावोगावी फिरत फिरत या गावात अडकून पडलेले असते.

आधारकार्ड नसलेल्या कुटुंबांना शासनाचे स्वस्त धान्यापासून वंचित कुटुंबांना आधार देण्यासाठी परसू आणि मित्रमंडळी यांनी अक्षरश: धान्य आणि किराणा दोन महिने पुरेल एवढा साठा उपलब्ध करुन दिला. संकटाला तोंड देण्यासाठी या लोकांना ही मदत म्हणजे देवाघरची मदत ठरावी. एरवी या महामारीच्या काळात माणूस माणसाच्या दूर ढकलला जात असताना बोटावर मोजण्याएवढ्या लोकांमध्ये ही भावना रुजणे ही प्रशंसनीय बाब आहे अशी मदत म्हणजे तुमचा ‘धर्म’. कोणतीही बाब क्षुल्लक असून ‘मानवता धर्म’ हा श्रेष्ठ आहे. हा माणुसकीचा धडा शिकवून हा ‘लॉकडाऊन’ गेला. माणसात माणूस धर्म आणण्यासाठी, लोकांना समजावून सांगण्यासाठी पोलीसांच्या माध्यमातून, डॉक्टरांच्या माध्यमातून, ग्रामसेवकांच्या माध्यमातून प्रबोधन व शिस्तीचे नियम सरकार सांगताना अगदी मेटाकुटीस आलं हे या कादंबरीतून अधोरेखित होते. म्हणून अशा जनतेस वठणीवर आणण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लेखकाने प्रत्यक्षात व वास्तवात आलेल्या मांडल्या आहेत.

रानातील पीक खाऊ नये म्हणून एकेकाळी बैलांना मास्क वापरत होते. आज तोच मास्क माणसाच्या तोंडाला लागला. त्याला कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून. काळ बदलतो, वेळ बदलते. एकेकाळी मुलांना शाळेत अथवा घरी मोबाईल वापरणे बंदी होती. आज त्याच मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल बंधनकारक करण्याच्या तयारीत सरकार आहे. भौतिक सुखाच्या गर्तेत माणूस डोहाच्या अगदी तळाला बुडायला लागला आहे की काय? असं वाटून जातं.

माणसाला जगणं शिकवणारी म्हणजे दररोज सकाळी व्यायाम, प्राणायाम, योगा करून आरोग्य सुदृढ होण्यासाठी शुद्ध शाकाहार म्हणजे फळं, भाज्या खाऊन आपली प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी याच काळात आबालवृद्धांनी कंबर कसल्याचे जाणवले. ज्यांच्याकडे सद्गुण आहेत. त्यांनी सृजनशीलतेने या कोरोना संकटावर मात केली असेही लेखकाने मांडून खऱ्या अर्थानं कांदबरीची रुचकता वाढवली आहे. खरोखरच लेखकाचं म्हणणं अगदी बरोबर आहे की, ‘कोरोना ही अशी एक शर्यत आहे जिथं धावणारा नाही तर थांबणारा जिंकेल. आपण थांबू या, कोरोनालापण थांबवू या.’ लेखकांनी अगदी बारीक सारीक गोष्टी या कादंबरीत मांडल्या आहेत.

गावातीलच संभाजी नामक फौजदार पोलिसाला मुंबईची परिस्थिती विचारतांना त्यांना संभाजीचं आपबीती संभाषण ऐकून साऱ्यांची बोलती बंद झालेली होती. पोलीसांना कसली ‘कोरोना’ सुरक्षा कीट असायचं? आपलं गुरं वळण्यासारखं लोकांना वळत असायची ही आपल्या देशाची शोकांतिका आहे.

‘लॉकडाऊन’ काळात लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या परप्रांतीय कामगार, रस्त्यावरील भिकारी, मोकाट प्राणी यांना अन्नदान करण्यासाठी या संकट काळात उद्योगपती आणि सेवाभावी सामाजिक संस्था पुढे सरसावल्या होत्या. एकीकडे पोटासाठी मेटाकुटीस आलेले गोरगरीब, परप्रांतीय, भिकारी आणि दुसऱ्या बाजूनं आपल्या नातेवाईक, घरातील माणसांच्या ताटातुटीमुळे जीव भांड्यात अडकल्यागत झालेला . एकूणच भयावह परिस्थिती मांडतानाच दुसऱ्या बाजूने हायसं वाटणारं चित्रही आपणास या कादंबरीत दिसते.

नदी, ओढे आपोआपच स्वच्छ झालेले पाहिले. पाण्याच्या पात्रात मगरींचा वावर, निरनिराळे प्रकारचे मासे, वेगवेगळ्या पक्षांचे थवेच्या थवे, गावशिवारातून, रानशिवारातून फिरताना दिसत होते. कधी कोकिळेची कुहूकुहू, तर चिमण्यांचा किलबिलाट अंगणात नाचतांना ऐकू येत होता. रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला होता. वातावरण शांत नीरवता मिरवत होती. अवकाश स्वच्छ, निरभ्र झालं होतं. आता लोक रात्रीच्या चांदण्या मोजत अंगणात, बाल्कनीत, टेरेसमध्ये झोपण्यासाठी वापर करु लागले होते. झोपण्याच्या उठण्याच्या, जेवणाच्या साऱ्या सवयी बदलल्या होत्या. एकूणच लेखकाने म्हटल्याप्रमाणे मानवाची जगण्याची जीवनशैलीच या कोरोनामुळे बदलली आहे.

ज्वलंत प्रश्न मांडतांना लेखकाने शेती आणि शेतकऱ्यांची लॉकडाऊन काळातील दैना मांडली.
‘इडा पिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे.’ असं म्हणतानाच ते कबूल करतात की, बळीचं राज्य काय आलं नाही. उलट त्याची अवस्था वर्षानुवर्षे बिकट होत गेली. लॉकडाऊनच्या काळात त्यांना कोणीच वाली राहिला नाही. या ज्वलंत घटनांत लेखकांनी गावाबाहेरच्या उघड्या माळावर उतरलेल्या मजुरांच्या, गबाळ्यांच्या विस्कटलेल्या झोपड्या आणि विस्कटलेला संसार पाहून त्यांची मुकपणाची आर्त पहावया जात नव्हती. याच संकट काळात गावातील जिल्हा परिषद शाळा राहण्यास देण्यास परसू आणि गावकऱ्यांनी समर्थता दाखविली. यामध्ये तात्या या व्यक्तिरेखेने तर स्वयं पांडुरंगाला हात जोडत साद घातली. दिनवाणे होऊन उदगारतो, ‘देवा विठ्ठला, पांडुरंगा सोडीव रे माझ्या ह्या माणसांना या संकटातून.’ यावरुन ह्या संकट काळात देवाला लोक आर्त विनवण्या करीत होतेच.
एरवी गावशिव सोडून आयुष्यात कधी गावशिव न पाहणाऱ्या मंडळींना कोरोना विषाणूच्या भयाने त्यांना आता आपला गावशिव आठवत होता.

शहरी सिमेंटच्या जंगलात राहण्यापेक्षा त्यांना गावठी म्हणजे गावाकडच्या निसर्गरम्य शेती भातीच्या रानात जीव वाचवण्याच्या भीतीपोटी राहणं पसंत करीत होते. हेही लेखकाने या कादंबरीत आवर्जून मांडलं आहे. खऱ्या अर्थानं कोरोना या विषाणूने एवढे तरी माणसाला शिकवले की, शेती शिवार माणसांनी गजबजायला लागले. माणसांनं जीवाच्या आकांतानं रानाची वाट धरली होती. म्हणजे त्यांनी मळ्यांत जाण पसंत केलं होतं. रानात टाईमपास करण्यासाठी शेतातील किरकोळ कामं करीत होती. आता कोठे माणूस निसर्गप्रेमी वाटू लागला होता. देव देवळात नसून माणसांत देव असल्याची जाणीवही लेखक करून देतात. या संकट काळात ज्यांनी ज्यांनी या कोरोना निर्मूलन होण्यासाठी जिवाचे रान करुन आपला जीव डावावर मांडून सहकार्य केले. सतत कार्यरत राहिले असे पोलीस, डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार, ग्रामसेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना देवदूत मानून या व्यक्तिरेखांवर पुष्पवृष्टी करीत त्यांचे लोकहितवाद्यांनी अभिनंदन करून एकप्रकारे मानाचा मुजराच दिला आहे.

हे पाहून लेखक म्हणतात की, जगाला मानवतेचा, भूतदयेचा, दातृत्वाचा संदेश देणाऱ्या आणि कृतीतून दाखवून देणाऱ्या भारतमातेचे गुणगान उद्या सारे विश्व पाहील. तोच आपल्या दृष्टीने महत्त्वाचा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असेल असा विश्वास डॉ. श्रीकांत पाटील यांना आहेच. तोच आपणासही सार्थ वाटावा असाच असेल. आपला भारत यावरही मात करून उद्या महासत्ता म्हणून उदयास येण्याची नांदी फार दूर नाही असे वाटते.

लेखकाने इथल्या मातीत खितपत पडलेल्या अगदी ग्रामीण भागातील छोटे उद्योग करणारे जसे की, गारेगारवाले, आईस्क्रीमवाले, पाणीपुरीवाले, भेलपुरीवाले, चहा गाडीवाले, स्टोव्ह रिपेअर करणारे, गॅस शेगडी दुरुस्त करणारे, केसावर फुगे विकणारे यांनी काय खायचं? पोट कसे भरायचं? याची चिंतापण सतावत होती. ही चिंता मानसिकता बिघडवत होती. यातूनच ते वैफल्यग्रस्त होऊन मांडतात. ‘फैलाव म्हणाव! टाक मारून माणसांना! ठेव बंद करून पुन्हा’ हे बोल एक सुशिक्षित शेतकरी परसू बडबडायला लागला होता. एरवी महात्मा गांधीजीच्या ‘स्वच्छ भारत मिशन’मधून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवतांना तोंडघशी पडलेल्या सरकारांना आता लोकांना ‘सॅनिटायझर’ हे काय आहे. हात धुण्याचे काय फायदे आहेत. एकंदरीत स्वच्छता काय विषय आहे हे समजावण्याचे कारण राहिले नाही. ते आपोआप लोकांच्या अंगवळणी पडणल्याचे दिसते. नाहीतर लोकांना हे इंग्रजी शब्द आजपावेतो कळलेच नाही. जसे की, कंटेन्टमेंट झोन, सॅनिटायझर, मास्क, सोशल डीस्टन्स, आयसोलायझेशन स्टॅब, क्वॉरन्टाइन, ट्रीटमेंट हे शहरी भागातून ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेच नव्हते. हे लेखकांनी वास्तवता मांडली आहे. याच काळात दुसरीकडे लोक कॅरम, बुद्धिबळ, कागदकाम, रंगकाम, वस्तू बनवणे, पुतळे बनविणे, चित्र काढणे, अशा एक ना अनेक कल्पना साकारून शिकत होते. अगदी पन्नास वर्षांच्या आधीचा कालखंड उपभोगल्यासारखं काही जाणकार सांगत होते. ‘मी सुरक्षित, गाव सुरक्षित’ ही उक्ती देशभक्तीचं चांगलं उदाहरण असल्याचं जाणवलं ही भावना ज्यामध्ये आहे तो खरोखरच एक चांगला देशभक्त आहे. असं वाटून जाते.

याहीपुढे लेखक मांडतात की, रोगाला जात-धर्म नसतो. तो गरीब-श्रीमंत असा भेद ठरवत नाही. जो उपचारांनी बरा होतो. त्या बऱ्या झालेल्या कोरोनाग्रस्ताला एकटे टाकू नका. त्याच्याकडे दूषित नजरेने पाहू नका. त्यांच्यावर बहिष्कार टाकू नका, कारण या कोरोनापेक्षा सामाजिक बहिष्कार हा भयंकर रोग आहे. एवढे मात्र निश्चित, म्हणून लेखक हे आवर्जून मांडतात. परंतु ह्या महामारीवर मात करण्यासाठी आत्मविश्वास, प्रेरणा, आधार आणि कौतुक हे फक्त भारतात घडू शकतं. जो यातून बरा होऊन बाहेर पडतो त्याला ‘कोरोना योद्धा’ ही उपाधी देऊन त्याचा सन्मान करतात हे फक्त भारतातच घडू शकतं. हेही तेवढंच सत्य आहे.

ही कादंबरी लिहिताना समाजातील भाव-भावना जाणतांना लेखकाने आत्ममन, आत्मशरीर स्वतः जाणून सर्मपण केल्याचे अन्यथा एवढे बारकावे या कादंबरीत टीपताच आले नसते. या संकट काळात कोरोनावर मात करण्यासाठी स्वतः डॉ. पाटील यांनी एक कर्तव्यदक्ष आणि देशाप्रती प्रेम असलेल्या भावनेतूनच हे कार्य सकारात्मक भावनेतून टीपलेली ही कादंबरी भावी काळात ‘एका महामारीचा उत्तुंग दस्ताऐवज ठरणारी ठरावी’ असे वाटते. या कोरोना विषाणूच्या महामारीच्या समरांगणात लेखकाने झोकून देऊन ही मानवी मूल्ये जोपासताना जोखंडात असलेला वारू उधळल्यागत न लिहिता संथ गतीने एक भावनात्मकता नाजुक क्षणांनी जेवढी शब्दबध्द केली. तेवढीच भावविभोर, मरणाला जवळून पाहण्यासारखंच ही कादंबरी टीपतांना लेखकाला वाटत असावे.

या कादंबरीचे मुखपृष्ठ श्रीरंग मोरे यांनी मार्मिकपणे रेखाटले आहे. प्रकाशिका ॲड. कुमुदिनी घुले यांनी पुस्तक स्वरुपात या साऱ्या घडामोडी आणून साहित्यविश्व रुंदावत वाचकांना अंतर्मुख होण्यास भाग पाडले.

Related posts

‘लिव्ह इन’सारख्या ‘अनोख्या रेशीमगाठी’

जलसंवर्धन चळवळीतून पाणी प्रश्नावर तोडगा

जप, साधना कशी असावी ?

Leave a Comment