March 29, 2024
Wari feelings article by Meera Utpat Tashi
Home » जेथे जातो तेथे तू माझा सांगाती
मुक्त संवाद

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती

पंढरपूरची वारी संपली. हा वारी वरचा शेवटचा लेख असं मी म्हटलं तरी देव काही वारीचा शेवटचा लेख असं म्हणायला तयारच नाही. कारण त्यानं परत एकदा त्याच्या अस्तित्वाचा प्रत्यय दिला. आणि मला अजून एक लेख लिहायला भाग पाडलं. माझे पुरूषोत्तम काका गेले वीस पंचवीस वर्ष आळंदी ते पंढरपूर पायी वारी करत आहेत. ते ऐंशी वर्षांचे आहेत. त्यांनाच आलेले हे दोन अनुभव‌.

मीरा उत्पात-ताशी
9403554167

माऊलीच्या पालखीची वाटचाल आता शेवटच्या टप्प्यात सुरू होती. वेळापूर ते भंडी शेगाव हे चालण्याचं अंतर खूप आहे. काका गेली वीस वर्षे त्यांच्या ठरलेल्या दिंडी बरोबर चालत येतात. यावेळी दिंडी बरोबर चालत असताना अचानकच दिंडीची आणि त्यांची चुकामुक झाली. वेळापूरला सोपान काका, तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या एकत्र येतात त्यामुळे प्रचंड गर्दी असते. आणि चुकामुक होण्याची खूप शक्यताही असते. तसंच झालं. शिवाय जोरात पाऊसही होता. त्यामुळे वीज गेली होती. प्रचंड गर्दी, पाऊस आणि वीज नाही या गोंधळात काकांची आणि दिंडीची फारकत झाली. ते पुढे पुढे चालत राहिले. खूप वेळ चालत असताना माणसांच्या गर्दीत त्यांना दिंडीतली माणसं दिसेनात. मग पुढे गाठ पडतील असा विचार करून ते अजून पुढे चालत राहिले. चालण्याच्या नादात सर्व्हिस रोड वरून जायचे ऐवजी उड्डाण पुलावरून चालू लागले. थोडे चालल्यानंतर समोर पूर्ण रस्ता अंधारा. एखाद्या दुसरं तुरळक वाहन सोडलं तर माणूस नाही. खाली परत फिरावं तर निम्मा रस्ता चालून झाला होता. आता त्यापेक्षा पुढे चालावं असा विचार करत ते चालतच राहिले. जवळपास पाच किलोमीटर रस्ता तुडवत आहेत. पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता. श्रमानं जीव कासावीस झाला होता. शेवटी एकदाचा रस्ता संपला आणि समोर काही माणसं दिसायला लागली. तिथे चिंचवडच्या दिंडीचा मुक्काम होता. दिंडीतल्या माणसांनी आधी काकांना हाताला धरून आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी आणले. काका काही विचारायच्या बोलायच्या आतच त्यांनी तुम्ही खूप दमला आहात आधी पोटभर जेवून घ्या असं म्हणून पहिल्यांदा जेवायला वाढलं. पाणी प्यायला दिलं. जेवण झाल्यावर काय झालं म्हणून विचारल्यावर काकांनी दिंडी चुकली असं सांगितलं. त्यावर ते म्हणाले थांबा मी माझा माणूस देतो तुमच्याबरोबर. तुम्ही एकटं जावू नका. असं म्हणून त्यांनी आपल्या जवळचा एक माणूस काकांच्या बरोबर पाठवला. काका आणि तो माणूस परत दोन किलोमीटर माघारी आले. जिथे त्यांची दिंडी वर्षांनुवर्षे थांबत होती तिथे गेले तर कळलं की ती जागा सोपान काकांच्या पालखी साठी दिलेली आहे. आणि त्यांच्या दिंडीला उतरायला दुसरीकडे जागा दिलेली आहे. त्या सोपान काकांच्या दिंडीतल्या लोकांनी त्यांना कुठे जागा दिली हे सांगितलं. मग त्या माणसाने काकांना त्यांच्या दिंडी जवळ आणून सोडलं. तोपर्यंत काकांच्या दिंडीतली माणसं सुध्दा त्यांना हूडकून परेशान झाली होती. सात वाजता मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायचे होते तर या गोंधळात दहा वाजत आले होते. सगळेजण जेवायचे थांबले होते. एकमेकांची गाठ पडल्यानंतर पुन्हा देवाचे आभार मानत रात्रीच्या मुक्कामानंतर सकाळी पंढरपूरकडे वाटचाल सुरू झाली.. हा पहिला प्रसंग.

दुसऱ्या प्रसंगात काका पंढरपूरहून पौर्णिमेचा काला घेऊन, गोंदवलेकर महाराजांचे दर्शन घेऊन पुण्याला निघाले. मध्ये फलटणला त्यांचा एक मित्र प्रसाद घेण्यासाठी त्यांना भेटणार होता. त्यानुसार काका फलटणला आल्यावर ‘माझ्या मित्राला एवढा प्रसाद देऊन येतो’ असे कंडक्टरला सांगून खाली उतरले. मित्राला प्रसाद देईपर्यंत ड्रायव्हर ने तिथून गाडी हलवून थोडीशी बाजूला उभी केली. तोपर्यंत तिथे कोल्हापूर गाडी लागली. काका हीच आपली गाडी असं समजून पटकन चढले. गाडी लगेच सुटली. पुढे चार पाच किलोमीटर आल्यावर कंडक्टर तिकीट काढू लागल्यावर त्यांच्या लक्षात आलं की आपली गाडी चुकलेली आहे. त्यांनी कंडक्टरला सांगितलं की मला पुण्याला जायचं आहे आणि मी चुकून या गाडीत चढलो. कंडक्टरने त्यांना पुण्याची एसटी मिळेल अशा ठिकाणी उतरवलं. इथून तुम्हाला पुण्याची एसटी मिळेल असं सांगितलं. खाली उतरल्यावर समोरून एक मुलगा दुचाकीवरून येत होता. त्याला थांबवले तर तो योगायोगाने त्यांच्या मित्राचा मुलगा होता. त्याला घडलेली हकीकत सांगितली. त्यानं काकांना पुण्याच्या एसटीत बसवून दिलं. तोपर्यंत आधीच्या कंडक्टर ने फलटण स्टॅण्ड वर फिरून काकांना शोधलं.. सापडले नाहीत म्हणून बॅग उघडून डायरीतला नंबर पाहून फोन केला. योगायोगाने तो नंबर त्यांच्या सूनेचा होता. तिला घडलेली हकीकत सांगितली. बॅग कुठे जमा करू? असं विचारलं. तिनं काकांना फोन करून विचारलं. त्यांनी स्वारगेट डेपोला जमा करायला सांगितले. तिनं कंडक्टर ना तसं सांगितलं. बॅग स्वारगेट डेपोला कंडक्टरने व्यवस्थित उतरून दिली. दरम्यान काका पुण्याला पोहोचले. ओळख पटवून बॅग ताब्यात घेतली.. दोन्ही कंडक्टर ने कुठलीही अपेक्षा न ठेवता हे सारं केलं होतं… त्यांच्या विषयी बोलण्यासाठी शब्दच नाहीत..

आज-काल औषधाला ही माणुसकी बघायला मिळत नाही असे म्हणतात. पण ह्या दोन प्रसंगाने माणुसकीचं अथांग दर्शन घडवलं. सारी त्या ज्ञानेश्वर माऊलीची आणि विठू माऊली ची कृपा..तो आपल्या बरोबर आहे. वारी माझ्या वर विसंबून कर मी तुला चुकू देणार नाही हे त्याचं आश्वासन!! त्यावर विसंबून तर दरवर्षी लाखो वारकरी दरवर्षी वारी करतात. जगात अजूनही माणुसकी जिवंत आहे आणि देवही आहे याचे प्रत्यय देणारे हे दोन ताजे प्रसंग!! तेव्हा या विठोबाच्या पायी लोक का वेडी होतात यांचाही प्रत्यय देऊन जातात…

Related posts

काव्यप्रदेशातील स्त्री मराठी समीक्षेच्या प्रांतातील दखलपात्र समीक्षा लेखन

महिलेला न्याय देण्यासाठी पाथ फाऊंडेशनची धडपड…

आत्महत्येपेक्षा कधीही वीरमरण श्रेष्ठ

Leave a Comment