June 19, 2024
Book review of Gavathi Gichha by Dr Shrikant Patil
Home » गाव-शिवाराचे सर्वांग सुंदर प्रतिबिंब : गावठी गिच्चा
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गाव-शिवाराचे सर्वांग सुंदर प्रतिबिंब : गावठी गिच्चा

ग्रामसंस्कृती, गावगाडा मोडीत निघाला आहे. जगाचा पोशिंदा बळीराजाच आज बळी जात आहे. समाज दिशाहीन झालेला आहे. हीच गावखेड्यातील समाजाची दिशाहीनता, अज्ञान, अंधश्रद्धा, सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्ती, विविध सामाजिक समस्या व सनातन प्रवृत्तीवर सचिन पाटील यांनी आपल्या ‘गावठी गिच्चा’ या कथासंग्रहात भाष्य करीत लेखन केलेले आहे.
डाॅ. श्रीकांत पाटील

कथा हा सर्वस्पर्शी व लोकप्रिय असा साहित्यप्रकार आहे. लोककथेतून उगम पावलेला हा साहित्य प्रकार पिढ्यान् पिढ्या मानवी मनाची भूक भागवीत आलेला आहे. लोकांचे रंजन करीत त्यांच्या डोळ्यात प्रबोधनाचे अंजन घालण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या साहित्य प्रकाराने केले आहे. साठोत्तरी ग्रामीण कथा आपल्या परिसराचा, शेती-मातीचा, रीतीरिवाजांचा, संस्कृती संस्कारांचा, गुराढोरांचा त्याचबरोबर रांगड्या ग्रामीण माणसांबरोबरच, दुर्बल वंचित घटकांचाही उहापोह करीत मराठीत प्रवाहित राहिली आहे. एकविसाव्या शतकातील कथा ही अस्तित्ववादी आहे. घटना प्रसंगांचे जसेच्या तसे अगदी उघडे-वाघाडे चित्रणही मराठी कथेत दिसून येऊ लागले आहे. बोलीचा प्रभावी वापर करून वाचकांना आकर्षित करण्याची सगळी तंत्रे कथाकारांनी आपसूकपणे स्विकारली आहेत, त्यामुळे कथेची लोकप्रियता आजही कालातीत राहिली आहे.

आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानवाने अफाट प्रगती केलेली आहे. माणूस स्वतःच्या बुद्धी सामर्थ्याच्या जोरावर चंद्रावर जाऊन पोहोचला. आता मंगळावर जाण्याची स्वप्ने पाहू लागला. जग आज गतिमान झाले पण गतीच्या या युगात आज माणूस मात्र अगतिक होताना दिसत आहे. आज न्यायाची जागा अन्यायाने, नीतीची जागा अनीतीने, संस्काराची जागा कु संस्काराने, विश्‍वासाची जागा विश्वासघाताने घेतलेली आहे. आज माणूसच माणसाला बोलू लागला आहे, तोलू लागला आहे, एकमेकांना फसवू लागला आहे. नातेसंबंध दुरावले आहेत. ग्रामसंस्कृती, गावगाडा मोडीत निघाला आहे. जगाचा पोशिंदा बळीराजाच आज बळी जात आहे. समाज दिशाहीन झालेला आहे. हीच गावखेड्यातील समाजाची दिशाहीनता, अज्ञान, अंधश्रद्धा, सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्ती, विविध सामाजिक समस्या व सनातन प्रवृत्तीवर सचिन पाटील यांनी आपल्या ‘गावठी गिच्चा’ या कथासंग्रहात भाष्य करीत लेखन केलेले आहे. गाव शिवार आणि गाव गाड्यातील घटना-घडामोडींचा वेध घेत वाचकांना अंतर्मुख होऊन विचार करायला या कथांमधून प्रवृत्त केले आहे.

‘गावठी गिच्चा’ मधील कथा या सामान्यपणे नायिकाप्रधान कथा असून त्या बोधप्रद, विचारप्रवण व नर्म विनोदी अशा सरमिसळ स्वरूपाच्या आहेत. लेखकाच्या सामाजिक पर्यावरणातील घटना, प्रसंग, समस्या घेऊन आपल्याच अवतीभोवतीच्या पात्रांची प्रतीकात्मक निवड करून गावगाडा सचित्र करण्याचे लेखकाचे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे. सांगली-कोल्हापूर परिसरातील बोलली जाणारी अस्सल ग्रामीण बोली भाषा घेऊन कथांना जिवंतपणा आणण्यात लेखक कमालीचा यशस्वी झाला आहे.

प्रबोधन करणे, विचार करायला भाग पाडणे आणि वाचकाला निखळ आनंदाची पर्वणी बहाल करणे, हे साहित्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे. या कथासंग्रहातील उमाळा, दंगल, कोयता आणि डोरलं या कथा वाचकांना गंभीरपणे विचार करायला भाग पाडणाऱ्या आहेत. तर सायेब, करणी, चकवा, तंटामुक्ती या कथा सकृत दर्शनी साध्या सरळ कथानक असणाऱ्या वाटल्या तरी त्यात प्रबोधनाची बिजे आहेत. सामाजिक स्थिती-गतीचा वेध घेत पुष्ठ-दुष्ट विचारांतील संघर्ष मांडून दुष्टांचे निर्दालन आणि त्यांना न्याय अशी मांडणी कुणाही वाचकाला आनंददायी वाटत असते. अतिशय गंभीर अशा प्रकारच्या वातावरणाची, पात्र प्रसंगांची योजना करीत लेखकाने या कथांच्या निर्मितीतून वाचकांना अंतर्मुख केले आहे. तर उपास, गावचं स्टँड, टोमॅटो केचप आणि गावठी गिच्चा ही शीर्षक कथा यांनी विनोदी शैलीचा आधार घेत वाचकांना गालातल्या गालात हसायला भाग पाडले आहे. साधा सोपा आशय, विचारप्रवण बनवणारी कथानके आणि विनोदी शैलीचा शिडकावा यांची चांगली शृंखला साधल्याने, यातील कथांची पर्यायाने कथासंग्रहाची उंची वाढली आहे.

कथानक एकूणच कथेचा आत्मा असते. ‘गावठी गिच्चा’ मधील डझनभर कथानके एकाहून एक सरस उतरली आहेत. वाचक मनाची पकड घेणारी ही सर्वच कथानके कौटुंबिक आणि सामाजिक परिघात साकारलेली आहेत. त्याला गावगाडा आणि शेतशिवाराची पार्श्वभूमी आहे. नात्यांची वीण, शेजारधर्म, आपले, जवळचे, आप्तस्वकीय, ओळखीचे, अनोळखीचे घटक कथानकाला गती देण्यासाठी येतात. आपली आपली भूमिका निभावतात. कथानक प्रवाही करतात आणि आपला कार्यभार संपला की लेखकाच्या मर्जीनुसार निघूनही जातात. आणि कथाही विराम घेते. असेच चित्र यातील कथानकांबाबत आहे.

रामभाऊ आणि पुष्पाआक्का या बहिण-भावाच्या नात्यातील उमाळा आपणास ‘उमाळा’ या कथेत वाचावयास मिळतो. सावत्र बहिणीच्या अचानक माहेरी येण्याने रामभाऊंचे मन शंकाकुल होते. थोडीशी तर्‍हेवाईक असणारी आक्का नातवाच्या ओढीने ताबडतोब परतही जाते. पण विहीर काढणाऱ्या भावाला गोड पाण्याचा उमाळा लागणार असल्याची भावना ती बोलून दाखवते. आणि घडतेही तसेच ! शीर्षकाची यथार्थता सिद्ध करणारी ही कथा नातेसंबंध दृढ करणारी आहे. तर गणपती उत्सवाच्या पार्श्‍वभूमी वर सांगलीत उद्भवलेल्या भयानक दंगलीचे वास्तव चित्र ‘दंगल’ या कथेत चित्रित करण्यात आलेले आहे. निराधार अम्मीला तिची मुलगी रेशमच्या बाळंतपणासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून सरकारी दवाखान्यात दाखल करण्यासाठी खटाटोप करणारा रिक्षावाला जेकब आणि राजू समाजात अजूनही माणुसकी, मानवता शिल्लक असल्याचा प्रत्यय देतात. दंगलीच्या भीषण सामाजिक समस्येचा अविष्कार या कथेत लेखकाने केला आहे.

ऊसतोड मजुराची सुंदर मुलगी सुली. तिच्या तरुण मनातील भीती, घालमेल, अस्वस्थता टिपणारी ही कथा आहे. तिच्यात परिस्थितीने निर्माण केलेले धाडस दाखवून देत वासना विकृत, सडलेल्या, किडलेल्या समाजातील घाणेरड्या प्रवृत्तीवर प्रकाश टाकणारी ही कथा आहे. कोयत्याचे प्रतीक घेऊन लेखक आणि ऊसतोड मजुरांच्या जीवनातील कष्ट, असुरक्षितता, विकृती, व्यसनाधीनता यासारख्या प्रश्नांची अभिव्यक्तीही केली आहे. ‘डोरलं’ ही कथा कर्जबाजारीपणा, व्यसनाधीनता, खाजगी सावकारी, पिळवणूक, वासना विकृती या प्रश्नांचा आढावा घेते. सुली नावाच्या विधवेची हतबलता, प्रसंग परत्वे तिच्या ठायी निर्माण झालेला स्वाभिमान चित्रित करते. आत्मसन्मानासाठी शेवटी नवऱ्याची आठवण म्हणून ठेवलेलं डोरलं विकून कर्ज फेडण्याचा तिचा निर्णय तिच्या सत्शीलतेचा व सुसंस्कृतपणाचा प्रत्यय वाचकाला देऊन अंतर्मुख करून जातो.

साध्या सोप्या विषयांना कथा रूप देऊन लोकांना बोध देण्याचे सामर्थ्य सचिन पाटील यांच्या करणी, चकवा, सायेब व तंटामुक्ती या कथांत जाणवते. म्हशी वर झालेल्या करणी मागील गम्य माहीत असूनही गप्प राहणारा रघु, समाजात फोफावणारी अंधश्रद्धा शेजापाजाऱ्यां वर, आप्तस्वकीयां वर निष्कारण घेतल्या जाणाऱ्या शंका, संशय अशा विविध विषयांना वाचा फोडते. ‘आपण मोठ्यांचे ऐकत असतो पण ऐकत नाही!’ अशी सामान्यपणे मुलांची अवस्था असते. अभ्यासाला तिलांजली दिलेला साहेब, हा मुलगा नापास होतो. तेव्हा त्याला अधिक काही न बोलता ‘तू पुन्हा प्रयत्न करून पास हो’ असा उपदेश त्याची आई करते. आईचे बोल प्रमाण मानून तो अभ्यासाला लागतो आणि खरेच ‘साहेब’ होतो. मुलांना प्रेरणादायी असे कथानक असलेली ही कथा सरस अशीच उतरली आहे. अंधश्रद्धा या सामाजिक समस्येचा तारुण्यसुलभ अविष्कार करणारी ‘चकवा’ ही कथा आहे.

तारुण्यसुलभ भावनांच्या गुंत्यात बज्याच्या जीवनातील माधुरीचा चकवा त्याला कसा पेचात टाकतो, याचे सहजसुलभ ग्रामीण चित्रण या कथेत आले आहे. तर समाजातील वृत्ती-प्रवृत्ती, गावगाड्यातील राजकारण त्यातील बेरकीपणा ‘तंटामुक्ती’ या कथेत आविष्कृत झाला आहे. गावं तंटामुक्त व्हावीत म्हणून शासनाने तंटामुक्ती अभियान राबविले पण त्याच्या अध्यक्ष पदासाठीच तंटे होऊ लागले, हे वास्तव लेखकाने या कथेत विनोदी अंगाने मांडलेले आहे.

‘हसा आणि निरोगी रहा’ असा आरोग्याचा मंत्र आता सार्वत्रिक झालेला आहे. आज धकाधकीच्या जीवनात माणसाच्या चेहऱ्यावरील हास्य लुप्त झाले आहे. एकेकाळी साहित्यामध्ये ‘कलेसाठी कला’ ही भूमिका घेऊन निखळ करमणूक प्रधान साहित्य निर्माण होत होते. लोकांची मनोरंजनाची भूक भागवीत होते. त्यांना श्रमपरिहार व दुःखाचा विसर पडण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होते. ‘गावठी गिच्चा’ कथासंग्रहातील चार कथा या नर्मविनोदी पठडीतल्या आहेत. सामाजिक आशय घेऊन लोकांच्या वृत्ती-प्रवृत्तीवर, घटना-प्रसंगातील प्रसंगनिष्ठ विनोदावर लक्ष ठेवून त्याची चपखल योजना उपास, गावचं स्टँड, टोमॅटो केचप व गावठी गिच्चा या कथांमध्ये केली आहे.

सकाळी आणि संध्याकाळी अशा दोनच वेळी बस येणाऱ्या गावातील स्टँडचे वर्णन, तेही विनोदी शैलीत ‘गावचं स्टँड’ या कथेमध्ये अनुभवास येते. तर ‘उपास’ ही कथा नवरा-बायकोच्या नात्यातील कौटुंबिक ओढाताणीवर, प्रसंगानुरूप भांडणावर व त्यातून पतिराजांना भोगाव्या लागणाऱ्या उपवासावर आधारित आहे. अलीकडे आपल्या परिघातील मित्रमंडळींचे फोन नंबर, रेडिओ केंद्रांना देऊन टोमॅटो केचप च्या माध्यमातून पोपट करण्याचे किस्से आपल्या अवतीभोवती पहावयास मिळतात. वास्तविक हे केवळ खेळीमेळीत व मनोरंजनासाठी असते. त्याचा आनंद अनेक एफ.एम. चॅनेल द्वारे असंख्य श्रोते लुटत असतात. याच घटनेवर आधारलेली सत्या नामक युवकाची मोबाईलवर फोन आल्यानंतर झालेली फजिती ‘टोमॅटो केचप’ या कथेमध्ये वाचून आनंदाच्या उकळ्या फुटल्या शिवाय राहात नाहीत. रेडिओवर आपण फक्त ऐकत असतो. पण लेखकाने फजिती होणाऱ्याचेही दु:ख मांडले आहे.

‘गावठी गिच्चा’ ही या कथासंग्रहातील शीर्षक कथा आहे. मुळत: स्वभावाने रागीट असणारा शिवा मोहिते आणि त्याची बायको या गावातील छोट्या कुटुंबातील ही कथा आहे. बायको पाय धुवायला तांब्याभर पाणी देत नाही म्हणून तो आपल्या बायकोला चिखलाराडीतून गावभर फिरवतो. तिची झालेली फजिती हाच गावठी गिच्चा आहे. अणुकुचीदार भोवऱ्याने रिंगणातल्या भोवर्‍याला गिच्चा मारून त्याला वर्तुळाबाहेर काढणे व त्याची फरपट करणे. किंबहुना त्याला फोडणे किंवा बेजार करणे, असा त्याचा मूळ अर्थ आहे. हेच प्रतीकात्मक खेळचित्र डोळ्यासमोर ठेवून मानवी भावभावनांचा अविष्कार करीत वाचकांचे निखळ मनोरंजन ही कथा करते.

सचिन पाटील यांचा ‘गावठी गिच्चा’ हा कथासंग्रह नव्या पिढीतील सशक्त आणि दमदार ग्रामीण कथांचे प्रतिनिधित्व करत आहे. गावगाड्यातील व्यक्तिरेखा, घटना प्रसंग, एकूणच मानवी भावभावनांचे नेटके चित्रण करणारा आहे. सकस आणि समृद्ध कथानके हेच या कथासंग्रहातील कथांचे बलस्थान आहे. ओघवती परंतु अस्सल ग्रामीण बोलीभाषा, मिश्किल अतिशय वाचनीय लेखनशैली, ठसकेबाज व आकलन सुलभ वर्णने, सांगली-कोल्हापूर भागातील अस्सल बोलीभाषा, म्हणी वाक्प्रचारांचा नेमका आणि अचूक वापर, लयबद्ध, तालबद्ध भाषिक तोल सांभाळताना पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त, अनुकरण वाचक शब्दांचा केलेला समयोचित वापर, नेटके पण गोळीबंद संवाद, लोकांच्या जगण्यातील स्थितीगतीचे वर्णन, गाव शिवारातील वृत्ती-प्रवृत्तीवर प्रकाश टाकण्याचे कसब यांमुळे हा कथासंग्रह लक्षणीय व वाचनीय बनलेला आहे. चित्रमय भाषा व प्रवाही निवेदनामुळे गावगाडा सचित्र झाला आहे. यामधील गंभीर कथा बरोबरच, साध्या सरळ व नर्म विनोदी कथानकांमुळे व सोप्या, सुलभ भाषेमुळे तो वाचकादरांस नक्कीच पात्र ठरेल असे वाटते.

साहित्यकृती ही लेखकाच्या वैयक्तिक प्रतिभेची निर्मिती असते. तरीही त्या निर्मितीला सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरांचा आधार असतो. ती स्वायत्त असली तरी समाजजीवनाशी अनेक नात्यांनी, अनेक धाग्यांनी जोडलेली असते. सचिन पाटील यांच्या ‘गावठी गिच्चा’ मधील बाराही कथा समाजाला आपल्या व्यवस्थेचे खरे स्वरूप पहायला लावणाऱ्या आहेत. ग्रामजीवनातील कुटुंब आणि संस्कृतीवर प्रकाश टाकणाऱ्या आहेत. गावातील छंदी-फंदी, रंगी-ढंगी पत्राबरोबरच सारे काही मुकाट्याने सहन करणाऱ्या शोशिकांची दखल घेणार्‍या या कथा आहेत. समाजातील अत्याचार, दुराचार, व्यभिचार, भ्रष्टाचार, या सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या आहेत. सरळ, सहज संवादातून कथेचा ओघ कायम ठेवून वाचकांची उत्कंठा शिगेला पोहोचविणाऱ्या आहेत. जीवनाचे सत्व आणि स्वत्व सांगणाऱ्या आहेत. वाचकांना अंतर्मुख करणाऱ्या आहेत.

पुस्तकाचे नावः कथासंग्रह – गावठी गिच्चा
लेखक : सचिन वसंत पाटील
प्रकाशन : तेजश्री प्रकाशन
पृष्ठे १४४, मूल्य २०० रुपये.

Related posts

भाषिक व्यवहारातील स्त्रीचे दुय्यमत्व

मोदी सरकार `हा` महत्वपूर्ण निर्णय घेणार का ?

सडे संवर्धन काळाची गरज

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406