एक-दोन नव्हे भाताच्या तब्बल विविध ६५० जातींचे संवर्धन करणाऱ्या सत्यनारायण बेलेरी यांना पद्मश्री देऊन गौरविण्यात आले आहे.
पारंपारिक बियाण्यांचे संवर्धन ही आता काळाची गरज बनली आहे. रसायनांच्या वापरामुळे संकरित बियाण्यांचे उत्पादन वाढले पण त्याच्यातील गुणांचे संवर्धन करणे अशक्य झाले आहे. रसायनांच्या वापरामुळे मानवी आरोग्यावरही त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. अशावेळी सेंद्रिय शेती आणि पारंपारिक बियाणे यांचे महत्त्व अधोरेखित होते. याबाबत जागरूक होऊन अनेक जण पारंपारिक बियाण्यांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या दोन दशकात याबाबत जागरुकताही झाल्याचे जाणवते. या कार्याला आता प्रोत्साहित करण्याची गरज आहे. कारण हे संवर्धक सर्वसामान्य अन् कमी शिकलेले आहेत. असे असूनही ते आपले कार्य एक मिशन म्हणून करत आहेत.
अवघे बारावीपर्यंत शिक्षण झालेले भात जनुक बँकेचे संरक्षक सत्यनारायण बेलेरी यांना यंदा पद्मश्रीने सन्मानित केले आहे. दक्षिण कन्नडपासून पाच किलोमीटर अंतरावर केरळमधील कासारगोड येथील नेट्टानिगे गावातील हे शेतकरी आहेत. त्यांनी भाताच्या विविध ६५० जातींचे संवर्धन केले आहे. २००८ पासून त्यांनी या कार्याला सुरुवात केली. बेलूर गावातील ते मूळ रहिवासी आहेत. तेथेच त्यांनी परसबागेत बियाणे संवर्धनाचे कार्य सुरु केले. सत्यनारायण यांनी 100 ग्रॅम बियाण्यांपासून आपल्या मिशनची सुरुवात केली. प्रथम त्यांनी केरळमधून आणि नंतर देशभरातून विविध भाताच्या जातींच्या बिया गोळा केल्या.
सर्वप्रथम राजकायमे या भाताच्या जातीचे संवर्धन करण्याचा प्रयोग सत्यनारायण यांनी केला. याबाबत बोलताना सत्यनारायण म्हणाले की, कापणीनंतर त्यातीलच काही भात बियाणे म्हणून साठविण्यास सुरुवात केली. हे बियाणे छोट्या जागेवर वाढविण्याची आवड मला लागली. केरळमधील विविध ठिकाणांहून भाताच्या विविध जातीची अशी बियाणे गोळी केली. वेगवेगळ्या रंगाच्या, वेगळ्या चवीच्या, बटू आणि लांब गवताच्या, कमी आणि दीर्घ कालावधीच्या आणि विविध हवामानाच्या परिस्थितीत वाढणाऱ्या या भाताच्या जातींची ही बियाणे होती. सध्या अशा सुमारे ६५० हून अधिक जातींचे संवर्धन मी केले आहे. हे एक मिशन म्हणूनच मी काम हाती घेतले आहे. त्यामुळे देशभरातील कृषी शास्त्रज्ञ आणि शेतकरी यांना हे बियाणे सुपूर्द करण्यास मी इच्छुक आहेत. माझ्यासाठी, मूठभर बियाणे पुरेसे आहे, कारण मी फक्त संवर्धनाच्या उद्देशाने लागवड करत आहे.
इतके हे महत्त्वाचे कार्य करत असूनही सत्यनारायण बेलेरी हे स्वतःला भात शेतकरी मानत नाहीत तर फक्त एक संरक्षकच मानतात. एकामागून एक अशा या छोट्याशा भागावर वर्षभर सर्व प्रकारच्या बियांची लागवड ते करतात. इच्छुक शेतकऱ्यांना ते हे बियाणे मोफत देतात. लोकांना शेती करू द्या. हाच त्यांचा या मागचा उद्देश आहे.
उदरनिर्वाहासाठी, सत्यनारायण चार एकर जमिनीवर रबर आणि सुपारी पिकवतात. ज्यामध्ये त्यांचे आई-वडील आणि लहान भाऊ यांचा समावेश आहे. केरळमधील शेती ही उताराची आहे. त्यांच्या वाट्याला आलेल्या जमिनीचा भूभाग उताराचा होता आणि तो भातशेतीसाठी योग्य नव्हता. म्हणून, सत्यनारायण यांनी घराच्या अंगणात बियाणे संवर्धनाचा प्रयोग सुरू केला. पिशव्यामध्ये रोपे तयार करून लहान कुंडीत या रोपांची लागवड त्यांनी केली.
औषधी गुणधर्म असणाऱ्या काही भाताच्या जातींचे संवर्धनही सत्यनारायण यांनी केले आहे. या जातींच्या गुणधर्मांचे संवर्धन करण्यासाठी पूर्णतः सेंद्रिय लागवड करणे गरजेचे असते. यातील काही जातींची गणना ही दुर्मिळ जातीमध्ये केली जाते. संवर्धित केलेल्या जातीमधील इडिकुणी ही जात पुरामध्ये तग धरू शकते तर क्षारपड जमिनीमध्ये येऊ शकणाऱ्या मनिला या जातीचे संवर्धनही त्यांनी केले आहे. विशिष्ट चवीच्या, सुगंधीत भाताच्या जातींच्या लागवडीचे संवर्धनही त्यांनी केले आहे. शिवम आणि त्रिनेत्रा या भाताच्या जातीही सत्यनारायण यांनी विकसित केल्या आहेत.
सत्यनारायण यांना पद्मश्रीने सन्मानित केले आहे. याबद्दल बोलताना सत्यनारायण म्हणाले, पद्म पुरस्कार अनपेक्षित होता. या नव्या ओळखीने मला अधिकच जबाबदार बनवले आहे. मी माझे ध्येय पुढे चालू ठेवीन आणि माझ्या संग्रहात आणखी बिया टाकेन. त्यांच्या या महान कार्याला सलाम !
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.