मराठी गझलेच्या समृद्धीत भर घालणारा गझलसंग्रह : ‘ एक कैफियत ‘
डॉ. लबडे ह्यांची गझल कल्पना किंवा चमत्कृती व्यक्त करत नाही, तर वास्तव व्यक्त करून तिच्यातूनच ती रसिकांकडून ‘ वाह ! क्या बात है ? ‘ हा उद्गार हस्तगत करते. तिचे हे वेगळेपण लक्षवेधक आहे. समकालीनता हा तिचा गुणधर्म असला , तरी ती कोठेही प्रासंगिक होत नाही. उलट ती सार्वकालिकही होत जाते.
– डॉ अविनाश सांगोलेकर
आद्य मराठी गझलसंशोधक आणि ज्येष्ठ गझलकार , पुणे
‘एक कैफियत ‘ हा डॉ. बाळासाहेब लबडे ( गुहागर , जि.रत्नागिरी) ह्यांचा ‘ महाद्वार’ आणि ‘मुंबई.. बंबई.. बाँम्बे ‘ ह्या गाजलेल्या दोन कवितासंग्रहांनंतरचा तिसरा कवितासंग्रह आणि पहिलाच गझलसंग्रह असून तो पुण्याच्या महाजन पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केला आहे. ह्या संग्रहाच्या रूपाने डॉ. लबडे ह्यांनी मराठी गझलेच्या क्षेत्रात पहिलेच पाऊल , तेही दमदार टाकले आहे. मराठी गझल विपुल प्रमाणात लिहिली जात असून ह्या गझलपरंपरेच्या समृद्धीत भर घालणारा हा गझलसंग्रह आहे. ह्या गझलसंग्रहातून कैफियत मांडताना डॉ. लबडे ह्यांनी टोकदार भाषेचे उपयोजन केले आहे.शिवाय उपरोध,उपहास,मिश्किलपणा, सडेतोडपणा ह्यांनी ही कैफियत युक्त असून नवा ढंग आणि नावीन्यपूर्ण आविष्कार करत तिने गझलकाराच्या अंतरीची सल अनेकविध वृत्तांमधून मांडली आहे.
“वेदना डाग रापून देते,
शुभ्र ही लाडकी छान माझी ! “, ह्यातून तिचा कलंदारपणा स्पष्ट होतो. ह्या संग्रहातील गझला
मानवी जीवनाच्या अनेकविध पैलूंना आपल्या कवेत घेतात. त्यासाठी त्या सर्व नव्या परिवर्तनवादी, सामाजिक बांधीलकीच्या सर्जनात्मक जाणिवा प्रतिमा ,प्रतीक, रूपक ह्यांच्या आधाराने व्यक्त करतात. ह्या गझलांचा अधिक भाव हा वास्तववादी आहे.मानवी जीवनातील सत्याच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न त्या करताना दिसतात.
” जिंदगी पेटवी रान माझी,
वाटते वाढली शान माझी ! “, ही जिंदादिली त्या व्यक्त करतात.
ह्या गझला मानवी संवेदनांना आवाहन करूनच थांबत नाहीत, तर त्या रसिकांच्या मनात विचार आणि भावना ह्यांचे तरंगही निर्माण करतात. नव्या सामाजिक, राजकीय ,आर्थिक, सांस्कृतिक, नैतिक व्यवस्थेचा पुरस्कार करणाऱ्या ह्या गझला आहेत.
” वरवर जशी खरी नसतात माणसे ,
जर खोदली भुते असतात माणसे ! ,” हे माणसांबद्दलचे गझलकाराचे चिंतन वास्तववादी नाही, असं कोण म्हणेल ?
मानवी जगण्याला आपल्या कवेत घेताना ह्या गझलांची गझलियत ही शब्दांना पिळवटून व्यक्त करते.अंतरातून प्रतिमांना व्यक्त करताना ती तरल होते. तशीच ती धारदार राकटपणाही व्यक्त करते.ह्या प्रतिमा सहज सोप्या आहेत. ह्या गझलांमधून कधी अलंकारांची नजाकत सालसपणे व्यक्त होते,तर कधी प्रतिकांची मुक्त उधळण तिला संवेदनांची एक दृक् निर्मिती करते. ह्या संवेदना चित्रदर्शी आहेत. त्यामुळे द्विपदींना ( शेरांना ) कथात्मकता प्राप्त होते.
डॉ. लबडे ह्यांची गझल कल्पना किंवा चमत्कृती व्यक्त करत नाही, तर वास्तव व्यक्त करून तिच्यातूनच ती रसिकांकडून ‘ वाह ! क्या बात है ? ‘ हा उद्गार हस्तगत करते. तिचे हे वेगळेपण लक्षवेधक आहे. समकालीनता हा तिचा गुणधर्म असला , तरी ती कोठेही प्रासंगिक होत नाही. उलट ती सार्वकालिकही होत जाते.
” एकएक कोपराच सांधतात बायका,
त्या घरात श्वास होत नांदतात बायका !” ,
असे अनुभावाला उजागर करत अर्थवाही होण्याचे सामर्थ्य तिच्यात आहे.
” हा जातीचा तिढा केवढा मज वाटतो ,
पार करणे सागर एवढा मज वाटतो !”
ह्यातील गझलियत ही मोडतोडीची नाही, तर ती थेट आशयाला घेऊन येणारी आहे.दोन ओळींमधील सहसंबंध – ज्याला आपण ‘राबता’ म्हणतो – तो अनोखा आहे. खयालांमध्ये नावीन्य आहे.गझलेची जमीन पक्की आहे.काफिया वेगळे आहेत. त्यामुळे तिचे नवशिकेपण निघून गेले आहे.ही गझल वाचल्यानंतर ती अन्य गझलकारांच्या गझलेसारखी वाटत नाही. कारण ती अन्य कोणा गझलकाराच्या अनुकरणातून वा अंधानुकरणातून लिहिली गेलेली नाही.त्या अर्थाने ती स्वयंभू आहे. ही तिची जमेची बाजू आहे.खयालात रसिकांना चक्रावून टाकणे , दोन ओळींमधून अधिक आणि अनेक अर्थ सांगणे, हा तिचा गुणधर्म आहे. त्यामुळे रसिकानुसार अर्थाचे अनेक तरंग तयार होतात.
” पेटली ओली लाकडे आता !
माणसे झाली माकडे आता ! “, हे गझलकाराचे निरीक्षण अंतर्मुख व्हायला प्रवृत्त करते.
डॉ.लबडे ह्यांनी योजलेल्या वृत्तांमध्ये विविधता आहे. बहारदार लयींचाही प्रत्यय त्यांची गझल देते. ती परस्परविरोधी भावनांना चपखलपणे पकडते.कोणताही विषय तिला वर्ज्य नाही.ती संवादी, संवेदनशील आणि काळाची सहप्रवासी आहे. वाचताना तिचा आतला आवाज जाणवतो.मराठी गझलेच्या समृद्धीत भर घालणाऱ्या, आपल्या वेगळ्या जाणिवांचा ठसा उमटवणाऱ्या ह्या गझलसंग्रहाचे मराठी गझलविश्वात चांगले स्वागत होईल, असा विश्वास वाटतो.
पुस्तकाचे नाव – ‘एक कैफियत ‘
लेखक/कवी – बाळासाहेब लबडे,
प्रकाशक – महाजन पब्लिशिंग हाऊस, पुणे, २७
पृष्ठे : १०४ , किंमत : २१०/- रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.