April 19, 2024
Book Review of Mhavti Ravi Rajmane Novel
Home » म्हवटीत शेतकऱ्यांच्या परस्परांतील संघर्षाचे वास्तव
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

म्हवटीत शेतकऱ्यांच्या परस्परांतील संघर्षाचे वास्तव

सारांश:

म्हवटी ही रवी राजमाने यांची कादंबरी १ ऑगस्ट २०२३ मध्ये प्रकाशित झाली आहे. एका शेतकऱ्याच्या मुलाने सत्याच्या बाजूने लढून प्रशासनाला जागं केलं. एखाद्या कर्तव्यदक्ष तहसीलदार अधिकाऱ्यामुळे कुठेतरी गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळतो म्हणून शेतकरी जगतो. खूप वैचारिक पातळीवरील ही कादंबरी वास्तवदर्शी आहे. समरला मिळालेले यश हा कादंबरीचा शेवट सुखकारक आहे जो वाचकांना अपेक्षित होता. त्यामुळे वाचकाचे समाधान होते. मराठीतील साहित्याचे सध्याचे स्वरूप लक्षात घेता ही ग्रामीण कादंबरी ठरेल. लेखकाने २३९ पृष्ठाच्या या संघर्षाचे सत्य नोंदवलेले आहे. माणसांच्या प्रेरणा प्रवृत्तीचा शोध घेतलेला आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात अनेक प्रश्न आहेत. मात्र शेतकरीच दुसऱ्या शेतकऱ्याच्या जीवनात कसा प्रश्न निर्माण करतो व त्याचे जगणे आणि स्वप्न यात संघर्ष कालवतो, याचे यथार्थ चित्रन म्हवटी कादंबरीत आले आहे. स्वतःच्याच शेतात जायला मज्जाव होताना निर्माण झालेला मानसिक, कौटुंबिक, सामाजिक संघर्ष अत्यंत रंजक व बोलक्या पद्धतीने मांडण्याचे काम लेखक रवी राजमाने यांनी केले आहे. त्यात त्यांना चांगले यश आले आहे.

प्रस्तावना:

आधुनिक जगात प्रकाशित झालेल्या साहित्य कृतींना समकालीन साहित्य म्हणतात. अनेकदा आधुनिक काळातील सामाजिक समस्या आणि सामाजिक प्रासंगिकता यावर भाष्य करते साहित्य हे समाज जीवनाचे प्रतिबिंब असतं असं म्हटलं जातं. साहित्यामध्ये समाज जीवनाच प्रतिबिंब पडते. त्या काळात या घटना घडत असतात त्या विचार प्रणाल्या प्रभावी असतात. त्या काळातील समाजातील लोकांची मानसिकता जाणिवा मते तयार झालेले असतात. त्यांचे चित्र ज्या साहित्यात घडते. त्याला समकालीन साहित्य असं म्हणतात. मराठीतील पहिली कादंबरी कोणती याविषयी अभ्यासकांमध्ये दुमत असल्याचे आढळून येते. काही अभ्यासक विधवांच्या दु:स्थितीचे निरूपण करणाऱ्या बाबा पद्मनाजीच्या यमुना पर्यटन या कादंबरीला मान देतात. तर काही अभ्यासकांच्या मते लक्ष्मण शास्त्री हळवे यांची ‘मुक्तामाला’ १८६१ ही कल्पित गोष्ट हीच मराठीतील पहिली कादंबरी ठरते. कादंबरी ची कथा वस्तू घटना प्रसंगाच्या सहाय्याने केले जाणारे व्यक्तिचित्र, वातावरण निर्मिती, कादंबरीची भाषा शैली याबाबत मोचणगडकरकरत्या गुंजीकरांची जाण बरीचशी प्रगल्भ होती म्हणूनच मराठीतील केवळ पहिली ऐतिहासिक कादंबरी म्हणून नव्हे तर मराठीतील पहिली कादंबरी म्हणून त्यांच्या ह्या कृतीचाच उल्लेख करणे उचित ठरावे. सध्या अत्यंत संवेदनशील वृत्तीच्या तीव्र बुद्धिमत्तेच्या धीटपणे कोणत्याही अनुभवाचे दर्शन घडवू शकणाऱ्या आणि जागतिक पातळीवरील वाङ्मयाच्या क्षेत्रातील विविध प्रवृत्ती प्रवाहची जाण असणाऱ्या कादंबरीकारांची संख्या हळूहळू वाढत असल्याने मराठी कादंबरीचे अधिक मोठी आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य वृद्धिंगत होत आहे.

म्हवटी या कादंबरीचे स्वरूप:

म्हवटी या कादंबरीत शेतातील वाटेसाठी समरला कचाट्यात पकडत त्याच्या स्वप्नपूर्तीच्या मार्गात अडथळे आणण्याचे काम शेजारच्या शेतकऱ्यांनी केले. समर या अन्यायाच्या विरोधात न्यायाने संघर्ष करत होता. समरला जे जे शेतकरी भेटले त्यांनी वाटेची बिकट कहाणी सांगतली. शेतातील वाटेचा प्रश्न एकट्या समरचा नव्हता तर तो गावागावातील शेतकऱ्यांचा होता. मोठ्या माशाने छोट्या माशांना गिळण्याण्यासाठी षडयंत्र रचावे तसे हा सारा प्रकार असल्याचे भासत होते. हा संघर्ष शेतातून सरकारी कार्यालयात आणि अनेक हेलपाटे मारून झाल्यानंतर डोळ्यावर पट्टी बांधलेल्या न्यायालयात पोहोचतो. तिथे असे अनेक शेतकरी समरला भेटतात त्याची वर्णने लेखकाने जिवंत रेखाटली आहेत. तारेचे बंडल आणायला गेल्यानंतर रामभाऊंनी त्याच्या शेताच्या वाटेची कहाणी समरला सांगितली. हृदय पिळवटून टाकणारे प्रसंग वाचकाच्या डोळ्यात अश्रू आणण्यात लेखक यशस्वी होतो. त्याच्या वडिलांचा मृत्यू शेतातल्या घरात झाला. त्याच्या म्हाताऱ्याला शेवटची वाट सुद्धा मिळाली नाही त्याला शेतातच अग्नी द्यावा लागला या प्रसंगातून या प्रश्नाचे गांभीर्य किती आहे. याची प्रचिती वाचकांना पटवून देण्यात लेखक यशस्वी झाल्याचे पटते. किसन अन्नाचं एक वाक्य “असू दे होईल ना आज उद्या सरळ.” यातून शेतकरी किती आशावादी असतो. अस्मानी सुलतानी संकटाला तो तितक्याच ताकतीने सामोरे जातो. हा संदेश ठिकठिकाणी मिळतो. समर हाडाचा शेतकरी प्रत्येक प्रसंगाला तोंड देत होता. शेतकऱ्यांच्या वहिवाटीचा प्रश्न मांडताना राज्यकर्त्यांच्या कारभाराचे वाभाडे देखील कादंबरीतून काढण्यात आले आहेत.

भारत हा शेतीप्रधान देश आहे हे फक्त लाल-किल्ल्यावरून भाषण देण्या इतपत मर्यादित आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळच कोणाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे घटनेत करून ठेवले आहेत. पण लोकप्रतिनिधी त्याची अंमलबजावणी करत नाहीत. शेतकऱ्यांच्या समस्यांचे राज्यकर्त्यांना काहीही घेणं देणं नाही. शेतकऱ्यांच्या वाटेबरोबरच निसर्ग, बाजार भाव, सरकारी धोरण याचे वास्तव चित्रण केले आहे. घरातली आर्थिक परिस्थिती ही डबघाईला आली होती. अडचणीतल्या माणसांना बोळात गाटायची सवय लोकांना आहे. संघर्ष माणसाला जगण्याचा मार्ग दाखवतो. शेतकऱ्याला शेतीत काही परवडत नाही. नुसता सातबारा शेतकऱ्याच्या नावावर बाकी सारं शून्य. तरी पण शेतकरी शेतीवर जीवापाड प्रेम करतो. “पुस्तकी ज्ञान पुस्तकातच ठेवायचं” ही वाक्ये मनाचा ठाव घेतात. कथानकाच्या अनुषंगाने लेखकाने माणसांच्या प्रेरणा प्रवृत्तीचा घेतलेला शोध महत्त्वाचा आहे. लोकशाही व्यवस्थेची अधोरेखित केलेली स्थिती वस्तुस्थितीला धरून आहे. चिंताजनक आहे.

दुसरे म्हणजे वहीत शेतकऱ्यांच्या रस्त्याचा प्रश्न केवळ या कादंबरीतील, संत गावातील शेतकऱ्यांचा नाही तर तो महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचा आहे. ही कादंबरी बहुसंख्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी आहे. त्या प्रश्नांची चिंताजनक स्वरूप अधोरेखित करणारी आहे. हे जाणीवपूर्वक लक्षात घ्यायला हवे.

शोधनिबंधाचा उद्देश :

१) शेतातील वहिवाटीचा प्रश्न किती बिकट आहे याचा सखोलपणे अभ्यास करणे.
२) लेखक रवी राजमाने यांच्या कादंबरी लेखनाच्या शैलीचा अभ्यास करणे.
३) ग्रामीण जीवनशैलीचा तेथील पात्रांच्या जीवनावर प्रकाश टाकणे.
४) शेतकऱ्यांच्या जीवनात शासकीय कार्यालयाचे किती महत्त्व आहे हे विशद करणे.
५) जीवनाकडे सकारात्मक पद्धतीने पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या संघर्षाचा आढावा घेणे.

आशय आणि विविध मुद्दे :

किसन अण्णा प्रामाणिक कष्टाळू वयोवृद्ध शेतकरी त्याचा मुलगा समर कादंबरीचा मुख्य नायक समरने त्याच्या आजोबांनी विकलेली जमीन विठ्ठल तात्याकडून विकत घेतली. ते शेत म्हणजे म्हवटी. हा म्हवटी कादंबरीचा प्राण आहे. समर किसन मोरे हा कादंबरीचा नायक आहे. तो राहणारा संतगावचा तालुका वडगाव. वंशपरंपरेने शेतकरी व पेशाने सरकारी नोकरदार. नायकाचे वडील किसन मोरे आर्थिक परिस्थितीने गरीब आहे. स्वभावाने साधे सरळ आहेत.त्यांना गाव गाड्यातल्या जीवन पद्धतीचे भले बुरे रूप माहित आहे. ज्या गावात आपल्याला राहायचे आहे त्या गावातल्या मुजोर लोकांशी आणि जमीनदाराची भिडणे आपल्याला परवडणार नाही याचे त्यांना भान आहे. सामाजिक जीवनात समूहभाव जपला पाहिजे हा त्यांचा आग्रह आहे. वत्सलाबाई ही नायकाची आई व वत्सलाबाईचां स्वभाव भांडखोर नाही पण ती स्वाभिमानी आहे. तिला गुलामगिरी मान्य नाही. प्रसंगी मारामारी करायची तिची तयारी आहे. समरचा भाऊ दिनकर अलिप्त स्वभावाचा आणि आत्ममग्न वृत्तीचा आहे. आपणास नोकरी नाही म्हणून मानसन्मान नाही ही त्याची भावना आहे. रागिनी ही समर मोरे याची पत्नी ती सुशिक्षित आहे. तिला शेती व्यवसायातलं फारसं काही कळत नाही. ती गावातल्या माणसांच्या अंतर्गत संघर्षाला कंटाळलेली आहे. पण वाट्याला आलेल्या परिस्थितीला खंबीरपणे तोंड देणारी आहे.जिद्दी आहे. नायकाला तिचा भक्कम आधार आहे.

किसन मोरे याची परिस्थिती गरिबीची ते मजूर म्हणून गावातल्या जमीनदाराच्या जमिनीत काम करत होते. पण काळ मागे पडतो परिस्थिती बदलते. किसन मोरे यांचा मुलगा सरकारी नोकरीला लागतो. विठ्ठल तात्या हे त्याच गावातले जमीनदार श्रीमंत माणूस. कधी काळी किसन मोरे त्यांच्या शेतात रोजगारी म्हणून राबलेले असतात. त्यांची तीन एकर जमीन विकायला काढतात. एक प्रामाणिक व कष्टाळू माणूस म्हणून ते त्यांची म्हवटी या नावाने ओळखली जाणारी, तीन एकर जमीन जाणीवपूर्वक किसन मोरे यांना विकतात. किसन मोरे यांची मुले ती जमीन विकत घेतात. म्हवटी च्या विक्री व्यवहारात त्याच गावातल्या पुदाले अप्पानी मध्यस्ताची भूमिका पार पाडलेली असते. साल २००७ या काळात किसन मोरे यांच्या मुलांनी ती तीन एकर जमीन २ लाख ८० हजार रुपये एकर याप्रमाणे खरेदी केलेली असते. म्हवटी वर गावातल्या अनेकांची नजर असते. कारण ती जमीन अत्यंत कसदार आहे गावातल्या अनेकांनी जास्तीची किंमत द्यायची तयारी दाखवलेली असते मात्र विठ्ठल तात्या मोहाला बळी पडत नाहीत. ते किसन मोरे यांना दिलेला शब्द फिरवत नाहीत. हा माणूस आपल्या शेतात प्रामाणिकपणे राबला आहे. त्याचे आपल्यावर उपकार आहेत ही त्यांची भावना असते. जमिनीचे सर्व पैसे पोहोचण्याच्या अगोदर ते जमिनीचे कागद करून देतात.

मजुराचा मुलगा जमीनदाराची जमीन विकत घेणे हे त्या गावातील जमीनदारांना पचत नाही त्यांच्या भावकीतल्या लोकांनाही समरचे भले पाहवत नाही. सखाअण्णा त्याच गावातला जमीनदार त्यांनी म्हवटी कडे जाणारा रस्ता ४० वर्षांपूर्वीच मुजवलेला असतो पिढीजात वाट बंद केलेली असते. सखाअण्णा ने त्याच्या शेतातून एका बाजूने रस्ता दिलेला असतो. मात्र कागदोपत्री त्याची नोंद नसते. त्या रस्त्याने विठ्ठल तात्याची व इतर शेतकऱ्यांची जा ये सुरू असते. सखाअण्णांनी विठ्ठल तात्याला विरोध केलेला नसतो. कारण तेही मोठे जमीनदार असतात. मात्र समर मोरे यांनी विठ्ठल तात्यांची जमीन विकत घेणं. सखांअण्णा देसाई व त्यांचा मुलगा दिगंबर यांना पचत नाही त्यांनी पिढीजात वाट बंद केलेली असते. आता ते नव्या वाटेबद्दल इथे वाटच नाही अशी भाषा बोलू लागतात. समर मोरे यांची आणि त्या बाजूला ज्यांची शेती असते त्या गोरगरीब शेतकऱ्यांची पंचायत होते.त्यांच्याकडे पैशाच्या आणि माणसांचे बळ असते. काठी-कुऱ्हाडी घेऊन मारामारीला तयार असणारी ही माणसं इतरांची कोंडी करतात. म्हवटी कडे जाणारा रस्ता बंद करतात. केवळ पाऊलवाट ठेवली जाते. त्या पाऊलवाटेने शेतातल्या माणसांना शेतमाल डोक्यायावरून आणावा लागतो.

समर मोरे यांना म्हवटी खरेदीसाठीचे पैसे जमवण्यासाठी खूप धावपळ करावी लागलेली असते. आपण एकदाची जमीन खरेदी केली आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण केली याचा त्याला आनंदा असतो.परंतु दिगंबर देसाई व थोरवताची मुलं आणि गावातील कुटील माणसं तो आनंद त्याला मिळू देत नाहीत मग तिकडे जाणारा रस्ता बंद करून त्यांची कोंडी केली जाते. आणि मग सुरू होतो वहिवाटीच्या शेतीच्या रस्त्यासाठीचा संघर्ष या कादंबरीचा नायक समर किसन मोरे शेतात जाण्या येण्यासाठी रस्ता मिळावा म्हणून ग्रामपंचायतीकडे अर्ज करतो. तंटामुक्ती अध्यक्ष कडे अशी विनंती करतो. पण त्याचा काहीही फायदा होत नाही. ज्यांना ज्यांना त्यांच्या शेतीकडे जाण्यासाठी रस्ता नसतो ती माणसं एकत्र येतात व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १४३ अन्वये तहसीलदारांकडे अर्ज करतात.

तहसीलदार समरच्या बाजूने निकाल देतात. पण प्रत्यक्षात रस्ता मिळत नाही.दिगंबर देसाई आणि थोरवताच्या मुलांची दादागिरी कमी होत नाही. ते हात-घाई वर येतात. समरला मारहाण करतात. समर कायदेशीर मार्गाने लढा देत राहतो हा लढा उच्च न्यायालयापर्यंत जातो. उच्च न्यायालयाचा निकाल ही समरच्या बाजूने असतो. मात्र तरीही दिगंबर देसाई व थोरवताच्या मुलांची मग्रूरी कमी होत नाही. समर आता लोक लढा उभा करतो. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढतो. मात्र परिस्थिती जैसे थे शेवटी तो गावातल्या काही शेतकऱ्यासह थेट मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्र्यांना भेटतो. त्यांच्याकडे जमीन महसूल खाते असते सगळी वस्तुस्थिती व उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देतो मग कार्यवाहीचे चक्र फिरते. वडगावच्या तहसीलदाराची बदली होते नव्या तहसीलदार अस्मिता जामदार या तहसीलदार पदी रुजू होतात. त्या संत गावातील शेतकऱ्यांच्या रस्त्याचा प्रश्न सोडवतात. म्हवटी कडे आणि त्या भागातील शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्यासाठी रस्ता तयार करून देतात हा संपूर्ण प्रवास म्हवटी या कादंबरीत उलगडत जातो.

म्हवटी या कादंबरीची वैशिष्ट्ये:

१) म्हवटी या कादंबरीत शेतकऱ्यांच्या शेतीतील वहिवाटीच्या नव्याच प्रश्नांची सुंदर मांडणी करण्यात आली आहे.
२) मोठा मासा छोट्या माणसांना गिळण्याचा प्रयत्न करतो त्याप्रमाणे गावातील मोठी मंडळी छोट्या शेतकऱ्यांना कसा त्रास देतात याचे उत्तम उदाहरण होय.
३) प्रशासकीय व्यवस्थेतील यंत्रणा जेव्हा भ्रष्ट होते तेव्हा सर्व सामान्यांना न्याय मिळण किती अवघड होते याचे ज्वलंत चित्रण.
४) आपल्या देशात सर्वसामान्यांच्या हितासाठी अनेक कायदे आहेत मात्र त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नसते याची प्रचिती आणणारे संवाद.
५) जिद्दीला पेटलेला तरुण व्यवस्थेशी लढा देऊन जीवनात यश कशा पद्धतीने मिळू शकतो याची प्रेरणा देणारे लिखाण.
६) ग्रामीण भागात सर्वसामान्य व्यक्तींना छोट्या-मोठ्या समस्या सोडवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष.
७) एखादा प्रामाणिक अधिकारी आपल्या कर्तव्यातून अनेक व्यक्तींना न्याय देऊ शकतो याचा संदेश देणारे लिखाण.
८) ग्रामीण भागात बहुजन समाजातील व्यक्तींची प्रगती देखील जुन्या प्रतिष्ठांना डोळ्यात कशा पद्धतीने खूप ते याचे यथार्थ चित्रण.
९) शेतकऱ्यांच्या जीवनात इतर व्यक्तीकडून निर्माण होणाऱ्या समस्या अनेक आणि मांडल्या आहेत मात्र एक शेतकरीच दुसऱ्या शेतकऱ्याच्या जीवनात कशी समस्या बनतो याचे वेगळे उदाहरण.
१०) जीवनात सकारात्मक पद्धतीने विचार करून निर्माण झालेल्या संकट समयात कसा मार्ग काढता येऊ शकतो याची बोलके उदाहरण म्हणजे म्हवटी कादंबरी

निष्कर्ष:

१) कादंबरीचा नायक समर किसन मोरे यांनी म्हवटी खरेदी करण्यासाठी केलेली यातायात आणि म्हवटी कडे जाण्यासाठी रस्ता मिळावा म्हणून केलेला संघर्ष हे या कादंबरीचे मूळ कथानक त्या कथानकाची लेखकाने केलेली मांडणी आणि नोंदवलेले तपशील थक्क करणारे आहेत.
२) शासन आणि प्रशासन शेतकऱ्यांना अपेक्षित ते सहाय्य करत नाही ही शेतकऱ्यांची ओरड आहे ही ओरड बऱ्यापैकी असून ही वस्तुस्थिती मराठीतल्या अनेक लेखक कवीनी नोंदवलेली आहे मात्र शेतकऱ्यांच्या अपप्रवृत्तीवर फारसं लिहिलं गेलं नाही. रवी राजमाने यांनी म्हवटीत शेतकऱ्यांच्या परस्परांतील संघर्षाचे वास्तव नोंदवलेले आहे.
३) कादंबरीची विवेचनशैली संवादाची भाषा खूप आकर्षक आहे. ग्रामीण बोली प्रमाण बोली अशा संमिश्र स्वरूपात लेखन केले आहे.कोर्ट निकाल या प्रसंगामुळे इंग्रजी हिंदी व्यावहारिक भाषेचे नमुने आले आहेत. संवाद सहज नैसर्गिक आहेत मनुवादी प्रवृत्तीवर अप्रत्यक्ष हल्ला चढवला आहे.
४) लेखकाने या कादंबरीत शासन आणि प्रशासन यांच्यातल्या अभद्र युतीचे आणि त्यात सामील असणाऱ्या समाजाचे रूप स्वरूप चित्रित केले आहे. निवडणुकांचे वास्तव टिपले आहे. लोकशाही व्यवस्थेच्या मर्यादाकडे लक्ष वेधले आहे. प्रसार माध्यमांचे उथळपण नोंदवलेले आहे.
५) लोकशाही कुठे दिसत नव्हती. संविधानाची पायमल्ली होत होती. तहसीलदार, प्रांत, सिविल कोर्ट उच्च न्यायालय यांचे निकाल ही ग्राह्य धरले जात नव्हते. समर मात्र सत्यासाठी लढत होता. आमदार खासदार मतासाठी श्रीमंताची बाजू घेत होते.तरीही समर शेती विषयक कायद्याची कलमे जाणून लढत राहिला यातून लढण्याचा बाणा दिसून येतो.

समारोप:

लेखक रवी राजमाने यांचे शेती विषयक प्रश्नांचे सूक्ष्म निरीक्षण वैचारिक विचार यामुळे कादंबरी वाचकाला गुंतवून ठेवते. कादंबरीत कृषी संस्कृतीचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय मांडून कादंबरीच्या क्षेत्रात या पुस्तकात एक वेगळा ठसा उमटवला आहे. कादंबरीचा विषय कुठेही भरकटत गेला नाही. आपल्या आजूबाजूला हे कथानक घडतंय असा वारंवार भास वाचताना होतो. शेतकरी इतर माणसासारखीच माणस आहेत. तेही काम, क्रोध, मद, मोह या सह जगत असतात. एकमेकांना साह्य करतात तसे अडचणीत ही आणत असतात. कुटील डावपेच खेळत असतात हे हे निसंधिगतपणे अधोरेखित केलेले आहे. शेतीत जाण्यासाठीच्या शेतकरी संघर्ष करता उभा करतात. कादंबरी म्हणजे प्रत्यक्ष वास्तवाची जशास तशी मांडणी नसते तर ते स्वतंत्र नवनिर्मिती असते. कादंबरीचे कथानक रचताना कलावंत त्या कथेत कल्पकतेने अनेक रंग भरत असतो. या कादंबरीच्या आशयाला वास्तवाचा आणि विवेकाचा भक्कम आधार आहे. आणि ते या कादंबरीचे सामर्थ्य आहे.

संदर्भ:

१) म्हवटी कादंबरी : रवी राजमाने, दर्या प्रकाशन पुणे.
२) आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास- रा. श्री. जोग
३) समकालीन साहित्य : डॉ. सुनीलकुमार लवटे
४) महाराष्ट्रातील प्रवाह कादंबरी – ल. ग. जोग
५) समकालीन विविध परिप्रेक्ष: प्रा. संजय एल / मादर.

Related posts

प्लास्टिक बंदी पोकळ बडगा

अर्थव्यवस्थेतील महागाईचे ढग जास्त गडद

खपली गव्हाची लागवड करायची आहे, मग हे वाचाच…

Leave a Comment