December 9, 2024
Book review of Shodha Katemundricha
Home » नवी पिढी घडवण्याची प्रेरणा देणारा शोध काटेमुंढरीचा
काय चाललयं अवतीभवती

नवी पिढी घडवण्याची प्रेरणा देणारा शोध काटेमुंढरीचा

महाराष्ट्रातील बालशिक्षणाच्या क्षेत्रातील मूलभूत व सर्वंकष प्रयोगांचा वस्तुपाठ ठरलेल्या कादंबरीचा सर्वांगीण शोध घेणारे पुस्तक शोध काटेमुंढरीचा लवकरच प्रकाशित होत आहे. या पुस्तकाचे संपादन शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख प्रा. नंदकुमार मोरे यांनी केले आहे. पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने यामधील प्रा. नंदकुमार मोरे यांची प्रस्तावना…

वाङ्मयीन कलाकृती म्हणूनही आणि एक सामाजिक कृती म्हणूनही ‘काटेमुंढरी’ मला महत्त्वाची वाटली. वाचणार्‍या प्रत्येकाला ही कादंबरी सतत प्रेरणा आणि उर्जा देत राहते.

प्रा. नंदकुमार मोरे

सदर पुस्तक गो. ना. मुनघाटे यांच्या ‘माझी काटेमुंढरीची शाळा’ या कादंबरीवरची चर्चा आहे. मात्र ही कादंबरीवरची रूढ समीक्षा नाही. ‘काटेमुंढरीची शाळा’ कादंबरीबरोबरच समाज, संस्कृती अभ्यासाचे साधन आणि एक शिक्षण संकल्पना म्हणूनही महत्त्वाची वाटते. नोकरीच्या पहिल्या तीनचार वर्षातच ही कादंबरी माझ्या वाचनात आली. एकदोन बैठकीत वाचून संपणारी ही कादंबरी वाचल्यापासून मनात घर करून आहे. पुढे तीन वर्षे ती शिकवण्याचे भाग्य मला लाभले. मुळात या कादंबरीने मलाच खूप शिकवले होते. त्यामुळे ती शिकवताना माझे अनेक तास आनंदात गेले. या कादंबरीमुळे मुलांना मूल्ययुक्त असे काही देणे शक्य झाले. माझ्यासाठी ही कादंबरी शिकवण्याचा अनुभव आनंदायी होता. कारण प्रत्येक वाचनात ती नवे काही शिकवत होती. स्वत:कडेच बघण्याची नवी दृष्टी देत होती. शिक्षकांकडे असायला हवेत, असे सारे गुण काटेमुंढरीच्या मास्तरांकडे आहेत. त्याग, सेवा, समर्पण, ध्येयवाद आणि सर्वात महत्त्चाची गोष्ट म्हणजे कल्पनाशक्ती, सर्जनशीलता या मास्तरांकडे आहे. काटेमुंढरीचे मास्तर कल्पक आहेत. धाडसी आहेत. त्यांच्यात कमालीचा आत्मविश्वास आणि समाजात मिसळण्याचा गुण आहे. त्यांना समाजातील सर्व स्तरातील लोकांविषयी, आपल्या सहकर्मींविषयी सद्भाव आणि प्रेम आहे. ते सोबत्यांना सहप्रवासी बनवतात. त्यांच्यात नवे काही करण्याची आंतरिक तळमळ आहे. वाङ्मयीन कलाकृती म्हणूनही आणि एक सामाजिक कृती म्हणूनही ‘काटेमुंढरी’ मला महत्त्वाची वाटली. वाचणार्‍या प्रत्येकाला ही कादंबरी सतत प्रेरणा आणि उर्जा देत राहते. पुढे नागपूर येथे नियुक्ती झाल्यानंतर या कादंबरीच्या लेखकांना दोनतीन वेळा भेटण्याचा योग आला. कादंबरीच्या वाचकांना ही कादंबरी म्हणजे गो. ना. मुनघाटे यांचे आत्मकथनच वाटते. तसे ते काही प्रमाणात आहेही. कारण कादंबरी लेखकाच्या जीवनानुभवाशिवाय साकारूच शकत नाही. आपल्याकडे असलेले अनुभवसंचित गो. ना. मुनघाटे यांनी कादंबरीच्या आकृतिबंधातून सर्जकतेनेे आपल्यासमोर ठेवले आहे. त्यामुळे या कादंबरीच्या लेखकाविषयी मला विशेष आदरभाव होता. मी वयाने त्यांच्यापेक्षा काही दशकांनी लहान असूनही त्यांचा बोलण्यातील आदरभाव, समोरच्या माणसावर निस्सिम प्रेम करण्याची आणि आपलेपणाने संवाद साधण्याची पद्धत बघून कादंबरीप्रमाणेच त्यांच्याही प्रेमात पडलो. ते प्रेम कधीतरी व्यक्त करावे, ही माझीही आंतरिक गरज होती.

            काटेमुंढरीवर शिवाजी विद्यापीठासाठी लेखन केले होतेच. परंतु, या कादंबरीवर स्वतंत्र चर्चा करता येतील, असे काही मुद्दे माझ्या मनात होते. ते या पुस्तकाच्या निमित्ताने चर्चिता आले. या कादंबरीवर बोलताना प्रत्येकाला व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘बनगरवाडी’ची आठवण होते. या पुस्तकातील बरेच लेख वाचतानाही ते जाणवते. त्यामुळे ‘काटेमुंढरी’ची ‘बनगरवाडी’बरोबर तुलनात्मक चर्चा करणारा एक लेख लिहावा, असे अनेक दिवस मनात होते. हे संपादन करण्याचे ठरले, तेव्हा तो लेख लिहायला घेतला. ‘बनगरवाडी’ ही मराठीतील एक अभिजात साहित्यकृती आहे. तिची वाङ्मयीन महत्ता अनेकांनी सांगितली आहे. परंतु, ‘काटेमुंढरी’बरोबर तुलना करताना समोर येणारे मुद्दे मलाही नवे होते. हे लिहिताना दोन कादंबर्‍या मला पुन्हा नव्या दिसू लागल्या. नवेच काही सांगू लागल्या. ती चर्चा या पुस्तकात समाविष्ठ आहे.

आज आजूबाजूला सर्वत्र अंध:कार दिसत असलेल्या काळात ही कादंबरी नवी उर्जा देण्याची क्षमता ठेवते. माणसाचा माणसावरचा विश्वास वाढवते. सेवेचा संस्कार देते आणि एकूणच नवी पिढी घडवण्याची प्रेरणाही देते. त्यासाठीच या कादंबरीच्या निमित्ताने येथे घेतलेल्या या शोधाला अनेक अर्थाने ‘शोध काटेमुंढरीचा’ असे म्हटले आहे. वाचकांनी हा शोध घेण्याची तयारी मात्र ठेवली पाहिजे. 

– नंदकुमार मोरे

            आज प्राथमिक शिक्षणाची अवस्था चिंता वाटावी इतकी भयावह आहे. पटसंख्या आणि इतर काही कारणांनी सरकारी बाबू शाळा बंद करण्याचा घाट घालताहेत. शाळा चालवण्याचे सरकारचे निकष कल्पनेच्या पलीकडचे आहेत. खासगी शिक्षणाला सतत मिळणारे प्रोत्साहन शिक्षण महाग होण्यात झाले. त्यामुळे ते पैसेवाल्यांच्या हातात गेले. दुर्दैव असे की, खूप पैसे मोजूनही आज चांगले शिक्षण मिळत नाही. ते फारच औपचारिक आणि कृत्रिम झाले आहे. खासगी संस्थांमध्येही योग्य, कल्पक आणि सर्जनशील विचार करणारे शिक्षक नाहीत. रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी यांच्या कल्पनेतील शिक्षण आजच्या शिक्षण संस्था चालकांना माहितच नाही. त्याचे परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. नवी पिढी श्रम, कर्तव्यांपासून दूर चालली आहे. गावागावातील उद्योगधंदे बंद आणि सर्वत्र बेकारांच्या फौजा तयार झाल्या आहेत. जे बेकार म्हणून भटकताहेत, त्यांच्याकडे पदवीचा कागद आहे. परंतु, ना त्यांच्याकडे कशाचे ज्ञान आहे ना कोणते कौशल्यं. त्यांना श्रमांवर श्रद्धा करण्याचे संस्कारच दिले गेले नाहीत. त्यामुळे त्यांना श्रम कमीपणाचे वाटताहेत. शिवाय आज मुलांमध्ये सहानुभाव, परस्परांबद्दलचे प्रेमही दिसत नाही. त्याग, समर्पणाची भावना संपलेलेली आहे. स्वत:पुरते पाहणार्‍या पिढ्या या शाळा तयार करताहेत. शिवाय मुलं भौतिक सुखसोयींच्या गराड्यात अडकताहेत. त्यांना वास्तव जीवनापेक्षा आभासी जीवनात जास्त रस आहे. मुलांना भारताच्या बहुसांस्कृतिक, बहुभाषिक, बहुधार्मिक जगण्याचे महत्त्व सांगितले जात नाही. त्यांना नैसर्गिक साधनसंपत्ती- बरोबर येथील दैदीप्यमान इतिहासाची जाण नाही. त्यांच्यावर चुकीच्या गोष्टींचे संस्कार वाढताहेत. प्रतिकूल हवामानातही टॉय, सुट आणि बुटांत दिवसदिवसभर बांधून ठेवले जातेय. वाईट याचे वाटतेय की, अशा बुजगावण्यासारख्या गणवेशात आपल्या मुलांना बघताना पालकांनाही कौतुक वाटतेय. हे पालकच आपल्या मुलांना मुक्तपणे जगू देत नाहीयेत. त्यांच्यावर शाळा आणि घरी वेगवेगळी बंधणे लादली जात आहेत. मुलांचे हात मातीत मळू दिले जात नाहीत. स्वत:च्याच बोलीत त्यांना मनसोक्त व्यक्त होऊ दिले जात नाही. यापेक्षा वाईट म्हणजे, मुलांच्या असे व्यक्त होण्याला मागास समजले जाऊ लागलेय. मुलांच्या शिक्षण, संस्कारांबाबत दृष्टिकोन कोता झाला आहे. त्यांच्या शाळेच्या प्रांगणातही मुलांना मातृभाषेत बोलायला अटकाव केला जातो आहे. भाषा, संस्कारांबाबत चुकीचे दृष्टिकोन बिंबवले जात आहेत. त्यातून श्रेष्ठ-कनिष्ठत्वाचे नवे संकेत रुजताहेत. यश आणि प्रगतीची परिभाषा बदललेय. पॅकेजीसची भाषा विकसित झालेय. पालक-शिक्षक ती मुलांच्या मनावर बिंबवताहेत. परंतु, त्यांना मिळणार्‍या पॅकेजचे काय करायचे, हे शिकवले जात नाही. अशा प्रतिकूल काळात काटेमुंढरीसारखी शाळा, तेथील मास्तर आणि गावकरी खूप काही शिकवून जातात. आपल्याकडे केवळ शिकण्याची दृष्टी हवी.

            त्यासाठी केवळ वाङ्मयीन कलाकृती म्हणून नाही, तर जीवनातील मार्गदर्शन म्हणूनही ‘माझी काटेमुंढरी शाळा’ मला महत्त्चाची वाटते. काटेमुंढरी हे आदिवासींचे आडवळणी दुर्गम गाव. तेथे कोणत्याही सेवासुविधा नाहीत. तरी मास्तर स्वच्छेने तेथे जातात आणि रमतात. एका ध्येयवादाने झपाटलेले असल्याने वाहून घेऊन तेथे काम करतात. ते शाळा उभी करतात. तेथील संस्कृती न्याहाळतात. पाचपंचवीस झोपडीवजा घरांच्या वस्तीत काम करतानाचा त्यांचा अनुभव म्हणजे ही कादंबरी आहे. परंतु, हा अनुभव खूप काही शिकवणारा आहे. शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना नवी दृष्टी देणारा आहे. त्यादृष्टीनेच या पुस्तकाचे संपादन करण्यात आले आहे. 

            प्रस्तुत पुस्तकाच्या निर्मितीचा हेतू वरील विवेचनात आहे. पुस्तकात जे लेख समाविष्ट करण्यात आले आहेत, त्यामध्ये काही गट कल्पिले आहेत. त्यावरूनही या पुस्तकाच्या निर्मितीचा हेतू, उद्देश लक्षात येईल. ही कादंबरी वाचणार्‍या प्रत्येकाला ‘काटेमुंढरी’बद्दल औत्सुक्य वाटते. तसे काही वाचक ही कादंबरी वाचून काटेमुंढरीचा शोध घ्यायला बाहेरही पडले. त्याबद्दल काही सांगू पाहणारा, ‘कुठे आहे ती काटेमुंढरी’ असा एक विभागच येथे दिला आहे. यामध्ये कादंबरीचे लेखक गो. ना. मुनघाटे आणि त्यांच्यासोबत ही काटेमुंढरी प्रत्यक्ष अनुभवलेल्या त्यांच्या दोन मुलांचे लेख समाविष्ट आहेत. गो. ना. मुनघाटे यांनी लिहिलेले छोटेसे टिपण कादंबरीच्या निर्मिती प्रक्रियेचा काहीएक उलगडा करतेच. परंतु, अनिल आणि प्रमोद मुनघाटे यांचे लेख, हे या पुस्तकातील नितांत सुंदर लेख आहेत. ते कादंबरीबद्दल आणि तिला निर्माण झालेल्या वलयाबद्दल बरेच काही सांगणारे आहेत. ते कादंबरीची निर्मिती प्रक्रिया सांगतात. काटेमुंढरी, तेथील शाळा आणि मास्तरांबद्दल वाचकांना वाटणारे कुतूहल क्षमवतात.

            शिवाजी विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू प्रा. दिगंबर शिर्के ‘काटेमुंढरी’ वाचून भारावले होते. त्यांना ही कादंबरी आजच्या काळात शिक्षकांसाठी खरी मार्गदर्शक आहे, असे वाटले. नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण राबविण्यासाठीच्या अनेक कल्पना काही दशकांपूर्वीच काटेमुंढरीच्या मास्तरांनी प्रत्यक्ष अंमलात आणल्या होत्या, असे त्यांचे निरीक्षण आहे. त्यामुळे या ग्रंथासाठी त्यांनी आवर्जून लेख लिहिला. ही कादंबरी त्यांना आजच्या काळाची आणि शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकासाठी कर्तव्यभावनेचा वस्तुपाठ आहे, असे वाटते. त्यांचा हा लेख आजच्या शिक्षण क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. तसेच शिक्षण आणि साहित्यक्षेत्रातील ऋषितूल्य व्यक्तिमत्त्व रमेश वरखेडे यांना ही कांदबरी म्हणजे दुर्गम भागातील शिक्षणाचा प्रयोग वाटते. ही कादंबरी प्रत्येक शिक्षकाने आणि सर्व संस्थाचालकांनी वाचून चिंतन करावे, असे त्यांनी म्हटले आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी ‘माझी काटेमुंढरीची शाळा’ ही कादंबरी खर्‍या अर्थाने महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचवली. त्यांच्या वाचनात ही कादंबरी आल्यानंतर ते भारावले. हे साहित्यातील अस्सल ‘सोनं’ आहे, असे त्यांच्या लक्षात आले. मात्र हे पुस्तक स्थानिक प्रकाशकांमुळे लोकांपर्यंत पाहोचण्यात मर्यादा येते, हे लक्षात त्यांच्या लक्षात आले. ते ही कादंबरी घेऊन नरेंद्र दाभोळकर यांना भेटले आणि साधनेकडून ते प्रकाशित करण्याची विनंती केली. त्यामुळे ही कादंबरी आज सर्वदूर पोहोचू शकली. इतके करून ते थांबले नाहीत. त्यांनी कादंबरीवर भरभरून लिहिले. लोकांना कादंबरीबद्दल बोलत राहिले. शिवाय गो. ना. मुनघाटे गुरुजींना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी आजच्या शिक्षणाची चिकित्सा केली. आजचे शिक्षक हे मुनघाटे गुरुजींसारखे नाहीत किंवा त्यांच्या कादंबरीतील मास्तरांसारखे नाहीत. त्यामुळेच शिक्षणाचे वाटोळे होतेय, असा त्यांचा एक निष्कर्ष आहे. त्यामुळे मुनघाटे गुरुजींसारखे शिक्षक पाहिल्यावर शिक्षक हीच समस्या आणि शिक्षक हेच उत्तर असल्याचे त्यांना वाटतेय.

            काटेमुंढरीचा शोध घेणारा स्वतंत्र विभाग आहे. येथे काटेमुंढरी हा एक व्यापक विचार गृहीत धरलेला आहे. जो विचार महात्मा गांधींच्या जवळ जाणारा आहे. जीवन अनुभवसंपन्न करणे, हा गांधीप्रणित शिक्षण प्रणालीचा पाया आहे. त्यांनी शिक्षण आणि समाजाचा विचार एकत्रित केला. गांधीजी समाजाच्या संदर्भात शिक्षणाचा विचार करीत होते. आपले परंपरागत ज्ञान, कौशल्ये आणि मूल्यांचा वारसा पुढील पिढीकडे संक्रमित करून समाज टिकवण्यावर त्यांच्या शिक्षणाचा भर होता. समाजातील वाईट, अन्याय्य आणि शोषणकारक गोष्टींबद्दल संवेदना तरल करणे त्यांना अपेक्षित होते. काटेमुंढरीचे गुरुजी यापेक्षा वेगळं काय करतात? ‘काटेमुंढरी’तील मास्तर काटेमुंढरीच्या लोकांकडून खूप काही शिकतात. तसे ते नम्रपणे मान्य करतात. याचा अर्थ समाज कोणताही असो, त्यांच्याजवळ परंपरागत असे मोठे ज्ञानसंचित असते. त्यांची म्हणून जगण्याची मूल्यं असतात. त्याच्या आधाराने तो समाज हजारो वर्षे वाटचाल करीत असतो. यासर्व गोष्टींचा आदर करीत काटेमुंढरीचे गुरुजी ज्ञान हे अनुभव आणि प्रयोगजन्य असल्याबद्दलचे सूतोवाच करतात. शिक्षणतज्ज्ञही कृतीतूनच समज पक्की होते, यावर विश्वास ठेवतात. गुरुजींचाही विश्वास त्यावरच आहे. गांधीजींना समाजानुसार शिक्षण देऊ शकणारे कल्पक शिक्षक अपेक्षित होते. काटेमुंढरीचे गुरुजीदेखील असेच कल्पक शिक्षक आहेत. ते स्वत:ला गावाशी जोडून घेऊन आपल्या शिक्षणविषयक कल्पना अंमलात आणतात. त्यांच्या शिक्षणाची गोडी आदिवासी मुलांना इतकी लागते, की जनावरे राखायला गावात मुलं शिल्लक उरत नाहीत. गावकरी याबद्दल गुरुजींचे तक्रारवजा कौतुक करतात. महात्मा गांधी यांची शिक्षणविषयक कल्पना आपण मागे टाकली. आज देशाने नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण स्वीकारले आहे. या धोरणात स्वीकारलेल्या अनेक गोष्टी गुरुजी काही दशकांमागे करताना दिसतात. त्याचाही शोध घेण्याचा येथे प्रयत्न केला आहे.

            नवे शिक्षण धोरण भारतातील सर्व भाषा, बोलींचा सन्मान करू पाहतेय. देश समजून घेण्यासाठी सर्व भारतीय भाषा महत्त्वाच्या आहेत. काटेमुंढरीतील गुरुजींना माडिया गोंडाच्या गोंडी भाषेमुळेच त्यांचे अंतरंग कळले. या मुलांना मराठी परकी भाषा आहे, हे जाणून ते त्यांच्या गोंडीत शिकवू पाहतात. मुलांना शाळेची ओढ लागावी म्हणून गोंडी गाणी म्हणतात. त्याचे सांस्कृतिक वैभव अनुभवताहेत. आपल्या समृद्धतेसाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रत्येकाच्या भाषा, संस्कृतीबद्दल जागरूक असले पाहिजेत. त्या भाषांमध्ये असलेल्या साहित्याबद्दल सजग असले पाहिजेत. गुरुजी हीच गोष्ट आपल्यावर आपल्या कामातून बिंबवू पाहताहेत. त्यातूनच एकतेची भावना वाढीस लागणार आहे. कोणत्याही समाजाची परंपरागत कौशल्य म्हणजेच ज्ञानसंचित आहे, ते जाणले पाहिजेत. काटेमुंढरीतील मुलांकडे असलेले परंपरागत ज्ञान पाहून मास्तर भारावतात. त्यांची शारीरिक तंदुरुस्ती, सांघिक भावना, कल्पकता आणि कौशल्यं पाहून ते थक्क होतात. आदिवासींची नैतिकता आणि त्यांचे नैतिक विचार स्वत:ला प्रगत समजणार्‍यांना शरमेने मान खाली घालायला लावणारे आहेत. आदिवासींच्या परंपरागत जगण्यात शिकारीसारख्या गोष्टी आहेत. परंतु, जंगल हाच ज्यांचा आधार आहे त्यांना शिकार करू नका म्हणून सांगणे, हे पाण्यात राहणार्‍या मासोळ्यांना पाणी पिऊ नका, असे सांगण्यासारखे आहे, हे मास्तर जाणतात. तरीही ते अहिंसेचे तत्त्व आदिवासींच्या मनावर पेरत राहतात. मास्तरांना जंगल एक संगीत वाटते. त्याची नादमयता ते ऐकतात. पर्यावरणाबद्दल प्रचंड सद्भाव व्यक्त करतात. डोंगराला वत्सलभावनेने ‘डोंगरी’ म्हणतात. पशुपक्ष्यांबद्दल आणि जंगलझाडीबद्दल कमालीची आत्मियता दाखवतात. यासंदर्भात ‘शोध काटेेमुढंरीचा’ या लेखात व्यापक वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर या कादंबरीची ‘बनगरवाडी’शी होणारी तुलना लक्षात घेऊन एक स्वतंत्र लेख येथे घेतला आहे. या व्यापक शोधाचा भाग म्हणून आदिवासींचे तत्त्वज्ञान हेच माणसाचे आदिम शहाणपण आहे, हे तेजस चव्हाण यांनी आपल्या लेखातून अधोरेखित केले आहे.

            शिक्षणाधिकारी म्हणून काम करणार्‍या तीन अधिकार्‍यांना काटेमुंढरीवर लिहायला सांगितले होते. त्यादृष्टीने आजचे शिक्षण, शाळा, शिक्षक आणि काटेमुंढरी याची चर्चा व्हावी, अशी अपेक्षा होती. नामदेव माळी, विश्वास सुतार आणि दीपक मेंगाणे हे तिघेही कल्पक आणि सर्जक शिक्षक आहेत. ते आज शिक्षणाधिकारी म्हणून आपली जबाबदारी पार पाडत असताना शिक्षकांकडून कृतिशील काम करून घेताहेत. शिक्षक, शिक्षणाबद्दल त्यांच्या म्हणून काही धारणा आहेत. अशा तीन अधिकार्‍यांनी लिहिलेले ‘काटेमुंढरीचे शिक्षण’ या गटातील लेख महत्त्वाचे आहेत. हे लेख शिक्षक, विद्यार्थ्यांसह पालकांनी मुद्दाम वाचले पाहिजेत. ‘माझी काटेमुंढरीची शाळा’ सर्वप्रथम शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात घेतली गेली. त्यावेळी अभ्यास मंडळाने कोणता विचार केला होता, याबद्दल तत्कालीन अभ्यास मंडळाचे अध्यक्ष अनिल गवळी आपली भावना सांगताहेत. हा लेखही मुद्दाम लिहून घेतला आहे. इतर विद्यापीठे, अभ्यास मंडळे आणि शाळा, महाविद्यालयांना त्यातून प्रेरणा घेता यावी, हा त्यामागील उद्देश आहे. तर एकनाथ आळवेकरांनी या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांसाठी लिहिलेला ‘काटेमुंढरी आपल्याला काय देते?’ हा लेखही कादंबरी वाचनाची एक दृष्टी देणारा आहे.

            ‘काटेमुंढरी’ हा एक शोध आहे. तो घेणे अनेकार्थाने आज फार आवश्यक आहे. शिक्षण, शाळा आणि शिक्षक याबद्दलच्या धारणा आज कमालीच्या बदलल्या आहेत. आजच्या शिक्षक, शिक्षणाची स्थिती सर्वांसमोर आहेच. त्यातून मार्ग काढण्यासाठी ‘काटेमुंढरी’चाच शोध घेतला पाहिजे, हे लक्षात येते. या कादंबरीत काटेमुंढरीसारख्या दुर्गम आदिवासी गावात राहून मास्तरांनी केलेले कार्य संपूर्ण देशातील शिक्षकांसाठी प्रेरणादायी आहे. सरकारला मार्गदर्शक आहे. पालक-विद्यार्थ्यांना नवी दृष्टी देणारे आहे. आजच्या व्यावहारिक जगात कादंबरीतील मास्तरांचे कार्य सर्वांनाच जवळचे वाटेल, असे नाही. परंतु, शिक्षण क्षेत्राची दुरावस्था पाहता या कामाचे मोल फार मोठे आहे, हे लक्षात येईल. आज मूल्यमापनाच्या मोजपट्ट्या बदलल्या आहेत. काटेमुंढरीच्या मास्तरांचे काम रूढ मोजपट्टीत मोजता येणारे नाही. त्यासाठी वेगळी दृष्टीच ठेवावी लागेल.

            याशिवाय ही कादंबरी म्हणजे एका आदिम समूहाच्या स्थितिगतीचा अनेक स्तरीय शोध आहे. त्यातून सुसंस्कृत जीवनाचा वस्तुपाठ आपल्यासमोर येतो. पर्यावरण आणि निसर्गविषयक सद्भावाची दृष्टी मिळते. आदिवासींसारख्या हजारो समाजांच्या पारंपरिक ज्ञानसंचिताचे साक्षात दर्शन ही कादंबरी घडवतेय. येथे जे योग्य आहे, ते करण्याविषयीचे ज्ञान आहे. फसवणूक, हिंसाचारी वृत्ती आणि अहिंसेसारखी तत्त्वे याबद्दलचा व्यापक दृष्टिकोन या कादंबरीत आहे. त्यासंदर्भातील शोध या चर्चेत आहे. शिवाय सहिष्णुता, समानता, सहानुभाव हा काटेमुंढरीतील आदिवासींच्या लोकजीवनाचा मूलभूत पाया आहे. लेखकांनी तो समजून कादंबरीतील मास्तरांकरवी तो रुजवला आहे. काटेमुंढरीच्या या प्रदीर्घ चर्चेतून मानवी कल्याणासाठी झटणार्‍या एका मास्तरच्या कर्तव्यकठोर कार्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. देश उभारणीत परस्परांवरचे जाज्वल्य प्रेम, निष्ठा आणि कर्तव्यभावना याबद्दल ही कादंबरी नेमकेपणाने आणि शाश्वत असे काही सांगते. ‘शोध काटेमुंढरीचा’ या लेखाचा समारोप करताना म्हटले आहेच, प्रेम करण्यासाठी कोणी असामान्य असणे जरुरीचे नाही. हे गरीब आदिवासी मुलांवर निर्व्याज प्रेम करून या उदात्त भावनेची थोरवी सांगणारी ही कादंबरी आहे. राष्ट्र उन्नत्तीसाठी प्रत्येकाला स्वत:च्या जाग्यावर उभा राहून काय करता येऊ शकते, याबद्दलचा वस्तुपाठ ही कादंबरी देते. आज आजूबाजूला सर्वत्र अंध:कार दिसत असलेल्या काळात ही कादंबरी नवी उर्जा देण्याची क्षमता ठेवते. माणसाचा माणसावरचा विश्वास वाढवते. सेवेचा संस्कार देते आणि एकूणच नवी पिढी घडवण्याची प्रेरणाही देते. त्यासाठीच या कादंबरीच्या निमित्ताने येथे घेतलेल्या या शोधाला अनेक अर्थाने ‘शोध काटेमुंढरीचा’ असे म्हटले आहे. वाचकांनी हा शोध घेण्याची तयारी मात्र ठेवली पाहिजे. 

पुस्तकाचे नाव – शोध काटेमुंढरीचा

संपादन – नंदकुमार मोरे

किंमत – २५० ₹ पृष्ठे – २००

संपर्क 073855 88335


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading