April 25, 2024
book-review-of-shrivardhan-patole-mule-geli-avkashat
Home » मुलं गेली अवकाशात’ : गोष्टींचा गुच्छ!
मुक्त संवाद

मुलं गेली अवकाशात’ : गोष्टींचा गुच्छ!

अवकाशाचे आकर्षण माणसाला आजन्म असते. मुलांना तर विशेषच ! ‘मुले गेली अवकाशात’ ह्या कथेत श्रीवर्धनने अवकाशाची सफर घडविली आहे. मुलांच्या विश्वातील वस्तू मुलांना बोलत असतात. किंबहुना त्यांची आपसात खूप छान गट्टी जमलेली असते. यशच्या दप्तरातील ‘बोलका पेन’ चक्क त्याच्याशी गप्पा मारतो. आहे की नाही धमाल !

डॉ. सुरेश सावंत

नांदेड

श्रीवर्धन पाटोळे हा तुंग येथील अंकुर बालमंदिरात सातवीत शिकणारा विद्यार्थी आहे. त्याचा ‘मुलं गेली अवकाशात’ हा बालकथासंग्रह १४ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रकाशित झाला आहे. ह्या संग्रहात श्रीवर्धनच्या छान छान अशा ९ गोष्टी आहेत. ह्या कथांमधून श्रीवर्धनचे अवघे भावविश्व उलगडत जाते. श्रीवर्धनसारखेच हुशार, चुणचुणीत, चौकस, धडपडे आणि आपल्याच विश्वात रमणारे नायक ह्या बालकथांमध्ये आपल्याला भेटतात. ह्या सर्वच कथांमध्ये एक प्रकारचा प्रवाहीपणा आहे. मनोरंजनाबरोबरच काही एक मूल्यसंस्कार देणाऱ्या ह्या कथा आहेत.

काऊचिऊ हे बालपणातील पहिले सखेसवंगडीच ! ‘चिव चिव चिमणी’ ही श्रीवर्धनची पहिली कथा तनू नावाचा मुलगा आणि एक चिमणी यांच्या मैत्रीची गोष्ट आहे. तनूच्या अंगणात रोज एक चिमणी येते. तिच्याशी तनूची मैत्री होते. तनू तिच्यासाठी झाडावर अन्नपाण्याची सोय करतो. ‘मोबाईलवर ठेवा नियंत्रण। पक्ष्यांना द्या निमंत्रण।’ असा फलक तयार करून तो लावतो.

कोरोनाच्या काळात निसर्गचक्र उलटे फिरले. जंगलातील प्राणी गावात येऊ लागले. सई नावाची एक इटुकली मुलगी सशाच्या मागे धावत चुकून जंगलात गेली. पण प्राण्यांनी तिला काही त्रास दिला नाही. हत्तीवर बसवून तिला सुखरूप गावात आणून सोडले. मानव आणि प्राणी यांच्या सहजीवनावर आधारित ‘प्राणी आले गावात’ ही कथा वाचनीय झाली आहे.

कोरोनाच्या काळात शाळा बंद झाल्या. एरवी सुट्टीची आतुरतेने वाट पाहणारी मुले कोरोनामुळे मिळालेल्या सक्तीच्या सुट्टीला वैतागली. ‘एकदाची सुरू झाली शाळा’ ह्या कथेचा नायक मयुरेश असाच शाळा सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत असतो. मास्क, सैनेटायझर, ऑक्सिमिटर, थर्मल गन, ऑनलाईन क्लास यांसारखे शब्द आता बालकथेत सहजपणे येत आहेत. शाळा सुरू झाल्यामुळे मयुरेशने मोकळा श्वास घेतला आहे. तो म्हणतो, मला आता कळतय, बांधून घातलेल्या जनावरांची काय अवस्था होत असेल ! आता ही मुलं आपल्यावरून इतरांचा विचार करायला लागली आहेत. कोरोनाने शिकविलेला हा एक धडाच म्हणावा लागेल !

‘कलिंग्या मलिंग्या’ ही दोन रानगव्यांची गोष्ट आहे. दोघेही एका जंगलात आपले आपले कळप करून राहत असतात. दोघेही एकमेकांकडे संशयाने पाहत असतात. काही कारणाने दोघांनाही पश्चात्ताप होतो. पुढे दोघेही एकोप्याने मिळून मिसळून राहू लागतात. मैत्रीचे व एकीचे महत्त्व सांगणारी ही एक छान प्राणिकथा आहे !

‘चिठ्ठीची किमया’ ही हुशार आणि कल्पक सोहमची गोष्ट आहे. त्याचे आजोबा बहिरे झाले आहेत. म्हातारपणामुळे त्यांना ऐकायला जवळजवळ येतच नाही. सोहमला आजोबांसोबत खूप गप्पा मारायच्या आहेत. मनातल्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची आहेत. पण करणार काय! आजोबांना ऐकताच येत नाही. सोहम एक युक्ती शोधून काढतो. प्रश्नांच्या चिठ्ठ्या तयार करून एका डब्यात ठेवतो. आजोबा एकेक चिठ्ठी वाचतात आणि सोहमच्या प्रश्नांची उत्तरे देतात. आहे की नाही मज्जा!
ही आहे सोहमच्या चिठ्ठीची किमया! सोहम आजोबांसोबत एक सेल्फी काढून आपला आनंद साजरा करतो. सोहम हा तंत्रस्नेही पिढीचा खराखुरा प्रतिनिधी आहे.

‘चिंगी मुंगी’ आणि मुंगसाच्या जगावेगळ्या मैत्रीची गोष्ट वाचून तर आपण जाम खूश होऊन जातो. ही चिंगी मुंगी सापापासून बचाव करण्यासाठी मुंग्यांची संघटना बांधते. मुंगसाच्या मदतीने सापाला पळवून लावते. ही मुंगी मुंगसाच्या शेपटीवर घसरगुंडी खेळते. कथेच्या शेवटी मुंगी आणि मुंगूस गाणे म्हणतात, ही दोस्ती तुटायची नाय! ह्या कथा लिहिताना श्रीवर्धन प्रत्येक पात्राशी एकरूप झाला आहे, असे दिसते. एकीचे बळ आणि संघशक्तीचे महत्त्व सांगणारी ही कथा मुळातून वाचायला हवी.

लहान मुलांना एकीकडे कुत्र्यांची भीती वाटत असते आणि दुसरीकडे कुत्र्याची पिलं पाळायला फार आवडतात. सहावीत शिकणारा राज त्यापैकीच एक. शंतनूने राजला एक कुत्र्याचे पिलू भेट दिले. तीच त्याची ‘आगळीवेगळी भेट’ आहे.

अवकाशाचे आकर्षण माणसाला आजन्म असते. मुलांना तर विशेषच ! ‘मुले गेली अवकाशात’ ह्या कथेत श्रीवर्धनने अवकाशाची सफर घडविली आहे. मुलांच्या विश्वातील वस्तू मुलांना बोलत असतात. किंबहुना त्यांची आपसात खूप छान गट्टी जमलेली असते. यशच्या दप्तरातील ‘बोलका पेन’ चक्क त्याच्याशी गप्पा मारतो. आहे की नाही धमाल !

अशा खूप गमतीजमती ह्या पुस्तकात आहेत. यातील दोन कथांमध्ये कोरोनाकाळाचे पडसाद उमटले आहेत. ह्या कथा म्हणजे स्वप्नांचे पंख लावून कल्पनाविश्वात मारलेल्या भरा-या आहेत. ह्या मुक्त कल्पनाविलासाला मर्यादाच नाहीत. श्रीवर्धनची छोटी छोटी वाक्ये गोष्टींची रंजकता वाढवतात. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने हे पुस्तक वाचायलाच हवे.

पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि आतील चित्रे राजेंद्र जाधव यांनी चितारली आहेत. नामदेव माळी यांनी श्रीवर्धनच्या कथांंचे स्वागत केले आहे. सृजन प्रकाशनाने केलेली पुस्तकाची निर्मिती बहारदार आहे.

पुस्तकाचे नाव – ‘मुलं गेली अवकाशात’ (बालकथासंग्रह)
लेखक : श्रीवर्धन पाटोळे.
पृष्ठे – ६४. किंमत रुपये १५०
प्रकाशक : सृजन प्रकाशन, सांगली.
लेखकाचा संपर्क : ९९७५१८६२९५
प्रकाशकांचा संपर्क : ७२१९६००५०३.

Related posts

सेतु निघाले शहरे जोडायला

आंतरिक जिद्दीचा यशस्वी सोहळा: २९वे झाडीबोली साहित्य संमेलन

असा साठवा अन् टिकवून ठेवा चारा

Leave a Comment