समुद्रातील पाण्याने अनेक व्याधीही दूर होतात. त्याच्या खारटपणामुळे रोगही जातात. तीर्थातून शरीराची शुद्धी होते. समुद्राच्या पाण्यातूनही शुद्धी होते. शरीराच्या शुद्धते बरोबरच मनाची शुद्धताही साधनेत महत्त्वाची आहे. शुद्ध मनाने, शुद्ध अंतःकरणाने केलेली साधना निश्चितच आध्यात्मिक प्रगती साधते.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
कां तीर्थें जियें त्रिभुवनीं । तियें घडती समुद्रावगाहनीं।
ना तरी अमृतरसास्वादनीं।रस सकळ ।।26।। ज्ञानेश्वरी अध्याय 1 ला
ओवीचा अर्थ – अथवा समुद्रस्नानानें त्रैलोक्यांत जेवढीं तीर्थे आहेत तेवढी घडतात किंवा अमृतरसाच्या सेवनानें सर्व रसांचे सेवन घडते.
अध्यात्मात प्रगती करण्याचे अनेक मार्ग आहेत. साधनेचेही अनेक प्रकार आहेत. पण प्रत्येकालाच सध्या घाई झाली आहे. अवघड मार्गाने जाण्यात तर कोणालाच रस नाही. सोपा मार्ग प्रत्येकालाच हवा असतो. ज्ञानेश्वरीत साधनेचे सर्व सोपे मार्ग सांगितले आहेत.
आध्यात्मिक शांतीसाठी अनेक भाविक धार्मिक पर्यटनाला जातात. अनेक तीर्थात डुबकी मारतात. गंगा स्नान करतात. हे तीर्थ पवित्र त्यापेक्षा ते तीर्थ अधिक पवित्र. असा भेदभावही करतात. सर्व शुद्धीसाठी तीर्थांना महत्त्व आहे. याचा अर्थ पूर्वीच्याकाळी स्वच्छतेला अधिक महत्त्व होते. घराचा परिसरही स्वच्छ ठेवण्यावर अधिक भर दिला जात होता.
अध्यात्मातही स्वच्छतेला अधिक महत्त्व आहे. स्वच्छ वस्त्रे घालावीत. अंघोळ करून साधना करावी. एकंदरीत साधना व्यवस्थित व्हावी, मन साधनेत रमावे यासाठी स्वच्छतेला महत्त्व आहे. तीर्थात स्नान हे शुद्धीसाठी करायचे आहे. पण सध्या तीर्थातील पाणीच अशुद्ध असते की त्या पाण्यात डुबकी मारण्याची इच्छाही होत नाही. सर्व प्रथम तीर्थात होणारे प्रदूषण रोखण्याची सध्या गरज निर्माण झाली आहे. गंगेच्या प्रदुषणाबाबत ठोस पावले उचलली आहेत. पण सुशोभिकरण म्हणजे शुद्धीकरण नव्हे हे लक्षात घ्यायला हवे.
श्रद्धा म्हणून आता अनेकजण या तीर्थात डुबकी मारतात. जीवनात सर्वच तीर्थांना जाता येईल का हे सांगता येणार नाही. सर्वच तीर्थांचा लाभ घेता येईल का हे ही सांगता येणे कठीण आहे. हे तीर्थ घडले. पण हे तीर्थ घडले नाही. ही मनात रुखरुख राहाते. अशाने साधनेवर याचा परिणाम होतो. यासाठी संत ज्ञानेश्वरांनी त्रैलोक्यातील सर्व तीर्थ घडविण्याचा सोपा मार्ग सांगितला आहे. समुद्रात डुबकी मारा सर्व तीर्थांचे स्नान घडेल. जगभर भटकंती करण्याची काहीच गरज भासणार नाही किंवा एखादे तीर्थ घडले नाही म्हणून नाराज होण्याचेही काही कारण नाही.
समुद्र हे असे तीर्थ आहे. ज्यामध्ये सर्व तीर्थे सामावली आहेत. सर्व तीर्थांचे मुळच समुद्र आहे. यासाठी हे सर्वांत पवित्र असे हे तीर्थ आहे. शास्त्राचा विचार करता समुद्राच्या पाण्याची वाफ होते. त्या वाफेला थंड हवा लागल्यानंतर पाऊस पडतो. नदीतून हे पाणी पुन्हा समुद्रालाच मिळते. तीर्थामध्ये असणारे पाणी हे समुद्रातीलच आहे. सर्व तीर्थे ही समुद्रातच सामावलेली आहेत.
समुद्रातील पाण्याने अनेक व्याधीही दूर होतात. त्याच्या खारटपणामुळे रोगही जातात. तीर्थातून शरीराची शुद्धी होते. समुद्राच्या पाण्यातूनही शुद्धी होते. शरीराच्या शुद्धते बरोबरच मनाची शुद्धताही साधनेत महत्त्वाची आहे. शुद्ध मनाने, शुद्ध अंतःकरणाने केलेली साधना निश्चितच आध्यात्मिक प्रगती साधते.
।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।