पुणेः कवयित्री शान्ता शेळके जन्मशताब्दीनिमित्त राजन लाखे यांनी “बकुळगंध” ग्रंथाची निर्मिती केली आहे. यातून १०० मान्यवर, १०० कविता, १०० आठवणी सोशल मिडियाच्या माध्यमातून जगातील मराठी रसिकांपर्यंत पोहचवून त्यांचे लक्ष वेधले आहे. तसेच हा दस्तऐवज ग्रंथाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मराठी वाचकांपर्यत पोहचवून राजन लाखे यांनी मराठी साहित्य इतिहासात वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांना यासाठी “बकुळग्रंथकार” ही उपाधी प्रदान करतो अशी घोषणा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांनी केली.
निमित्त होते दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंथा आयोजित बहुचर्चीत “बकुळगंध” या ग्रंथावर संवाद आणि चर्चा या कार्यक्रमाचे. त्यावेळी व्यासपीठावर माजी आमदार उल्हासदादा पवार, ज्येष्ठ रंगकर्मी सुरेश साखवळकर, ज्येष्ठ कवयित्री डॉ. अश्विनी धोंगडे, शिरीष चिटणीस, राजन लाखे तर मान्यवरांमध्ये प्रसिद्ध गायिका बकुळ पंडित उद्योजिका चंद्रलेखा बेलसरे, लेखक विश्वास वसेकर, चित्रपट निर्माते एम. के. धुमाळ आदि उपस्थित होते.
तब्बल तीन तास चाललेल्या या रंगतदार कार्यक्रमात बकुळगंध ग्रंथाची निर्मिती प्रक्रिया, शान्ता शेळके यांच्या आठवणी, त्यांच्या रचना याला सांगितीक जोड मिळाल्याने रसिक भान हरपून तल्लीन झाले होते. प्रसिद्ध गायिका बकुळ पंडित यांनी रसिकांच्या आग्रहाखातर शांताबाईच्या ” का धरिला परदेस” या गाण्याची झलक दाखवून कार्यक्रमास उंचीवर नेऊन ठेवले. तीन तास उलटून गेले तरी रसिकांनी जागा सोडण्याची मानसिकता दाखवली नाही हे कार्यक्रमाचे वेगळेपण मानायला हवे.
जोशी पुढे म्हणाले, बकुळगंध या ग्रंथाच्या निमित्ताने शांताबाईंच्या आयुष्यातील विविध घटना, प्रसंग, साहित्यिकांचे अनुभव वाचकांना प्रेरणादायी ठरतील.
उल्हासदादा पवार म्हणाले, शांताबाईंचं व्यक्तिमत्व हे बहुआयमी होतंं. त्या कवितांमधून, गाण्यांमधून आजही अजरामर आहेत. बकुळगंध या ग्रंथामधून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू वाचकांना ऐकायला मिळतील.
डॉ. अश्विनी धोंगडे म्हणाल्या, शांताबाईंच्या कविता म्हणजे उत्तम शिल्प आहेत. बकुळगंध हा ग्रंथ म्हणजे शांताबाईचे स्मृतीस्थळ आहे जे वाचकांना अनुभवयाला मिळणार आहे.
सुरेश साखवळकर म्हणाले, शांताबाई या नावाप्रमाणेच शांत प्रवृत्तीच्या होत्या. प्रतिभेच्या जोरावर शांताबाईंनी साहित्य क्षेत्रात जो गंध निर्माण केला तो गंध म्हणजे बकुळगंध हा ग्रंथ होय.
राजन लाखे यांनी रसिकांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरे देऊन बकुळगंधची कल्पना, निर्मिती प्रक्रिया व त्यावेळी आलेले अनुभव व रंजक किस्से सांगितले. शान्ता शेळके यांच्या आठवणी सोबत, शब्द, रुप, भाव, आशय, भाषा, विचार कल्पना लय यांचा सुंदर मिलाफ ऐकताना, शब्द आणि स्वर यांचा अनोखा संगम रसिकांच्या डोळ्यासमोर तरळत होता. आयोजक शिरीष चिटणीस यांनी प्रास्ताविक केले तर प्राची गडकरी यांनी सुत्रसंचालन केले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.