स्वागताध्यक्षपदी जगदीश महाराज उंद्रे, निमंत्रकपदी नितीन भागवत
सासवड : खानवडी (ता. पुरंदर) येथे होणाऱ्या सोळाव्या राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री डॉ. स्वाती शिंदे -पवार यांची निवड करण्यात आली आहे. स्वागताध्यक्षपदी जगदीश महाराज उंद्रे यांची तर निमंत्रकपदी नितीन भागवत यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.
महात्मा फुले यांच्या मूळ खानवडी गावी सोमवारी (ता. २७ नोव्हेंबर) साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषदेच्या वतीने दरवर्षी साहित्य संमेलन भरविले जाते. संमेलनास उद़्घाटक म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते बाबाराजे जाधवराव उपस्थित राहणार आहेत.
संमेलनाध्यक्ष डॉ स्वाती शिंदे या गेली तीस वर्षे राज्यभर साहित्य चळवळीत सहभागी आहेत. वाटेवरती काचा गं हे त्यांचे कवितेचे पुस्तक विशेष गाजले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या एम. ए व्दितीय वर्ष अभ्यासक्रमामध्ये स्त्रिकोष चा समावेश केला आहे. बंडखोर कवयित्री अशी त्यांची ओळख असून नववीच्या शालेय अभ्याक्रमात वाटेवरती काचा गं या शिर्षक कवितेचा समावेश आहे. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या बी.ए. भाग एकच्या अभ्यासक्रमात
वेदनेच्या खोल तळाशी या पुस्तकातील जातं कवितेचा समावेश आहे.
स्वागताध्यक्ष उंद्रे हे अध्यात्मिक विकास परिषदेचे अध्यक्ष आहेत. सामाजिक व धार्मिक क्षेत्रात कार्यरत असून, वात्सल्य धाम गोशाळा ते चालवितात. ज्ञानलीला वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली आहे, साप्ताहिक ज्ञानलीलाचे ते संपादक आहेत. निमंत्रक नितीन भागवत हे कामगार चे रहिवासी असून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.
यापूर्वी झालेल्या महात्मा फुले साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद साहित्य मार्तंड यशवंतराव सावंत, इतिहासाचार्य मा. म.देशमुख, म. भा. चव्हाण, प्रा. गंगाधर बनबरे, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, प्रा. रतनलाल सोनग्रा, डाँ सय्यद जब्बार पटेल, डॉ जयप्रकाश घुमटकर, दशरथ यादव, भा. ल. ठाणगे, रावसाहेब पवार, अविनाश ठाकरे यांनी भुषविले आहे.