September 8, 2024
Dr V N Shinde article on Earth Roatation
Home » पृथ्वी कलंडतेय !
संशोधन आणि तंत्रज्ञान

पृथ्वी कलंडतेय !

चार-पाच वर्षांपूर्वी नांदेडमध्ये अशीच एक कुपनलिका खोदली जात होती. हजारपेक्षा जास्त खोल जाऊनही पाणी लागले नाही. मालकाने आणखी खोल जाण्याचा आग्रह धरला. अखेर त्या बोअरमधून उष्ण द्रवपदार्थ बाहेर पडला आणि त्यामध्ये कूपनलिका खोदणाऱ्या मशिनचे मोठे नुकसान झाले. तरीही माणसाचा हव्यास काही सूटला नाही.

डॉ. व्ही. एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

शेतीसाठी जमिनीतील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात येतो. विशेषत: १९६० च्या दशकापासून अमेरिकेत मोठ्या प्रमाणात कुपनलिका खोदण्यास सुरुवात झाली. तरीही हे प्रमाण १९८० पर्यंत मर्यादित होते. १९९० नंतर तर पाण्याची गरज असेल तेथे कूपनलिका खोदण्यात येऊ लागल्या. भारतात, त्यातही महाराष्ट्रात १९७२ च्या दुष्काळापासून कूपनलिकांचे तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात झाली. या तंत्रज्ञानामुळे कमी खर्चात पाणी उपलब्ध करून घेता येते, हे लक्षात आल्यानंतर लोकांनी सर्वत्र कूपनलिका खोदल्या. हे प्रमाण इतके वाढले की अर्ध्या एकरामध्ये तीन-तीन कूपनलिका खोदल्या गेल्या. यातून जमिनीतील पाण्याचा अमर्याद उपसा सुरू राहिला. या पाणी उपशाच्या दुष्परिणामाने आता पृथ्वीच्या अस्तित्वावर घाला घालायला सुरूवात केली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका संशोधन निबंधात पृथ्वीचा अक्ष आपली जागा सोडत असल्याचे संशोधकांनी जाहीर केले आहे. पृथ्वीच्या या वागण्याची सांगड संशोधकांनी भारत आणि उत्तर अमेरिकेतील अमर्याद पाणी उपशाशी घातली आहे. याचा सध्या वातवरण आणि पर्यावरणावर परिणाम होणार नाही, असे संशोधकांचे मत आहे.

पर्यावरणाचा समतोल राखायचा तर, जल, जंगल आणि जमीन यांचा समतोल ठेवला पाहिजे. मात्र पृथ्वीवरील मानवी लोकसंख्या वाढू लागली आणि मानवाचा निसर्गातील हस्तक्षेप वाढला. जसजशी लोकसंख्या वाढली, तसा मानवी हस्तक्षेप वाढला. मानवाच्या मूलभूत गरजा अन्न, पाणी आणि हवा. या तिन्ही गरजांची पूर्तता, निसर्ग करतो. अन्न, पाणी आणि हवा उपलब्ध करून देण्यामध्ये वनस्पतींची भूमिका महत्त्वाची असते. वनस्पतींसाठी पाण्याची उपलब्धता आणि जमीन चांगली असावी लागते. त्यामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकून राहायची असेल तर या तीन गोष्टींचा समतोल राहायला हवा. मात्र, मानवाने आपले जीवन सुखकर बनवण्यासाठी या बाबीकडे दूर्लक्ष करून, हा समतोल मोठ्या प्रमाणात बिघडवला.

वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज भागवण्यासाठी शेतीसाठी झाडे तोडून जमीन उपलब्ध करून घेतली. शेतीसाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी नद्यावर बांध घातले. विहिरी बांधल्या. शेतीसाठी पाण्याचा अमर्याद उपसा सुरू केला. पुरेशा पाण्याच्या उपलब्धतेसाठी, विज्ञान, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कुपनलिकेचे तंत्रज्ञान विकसित झाले. सुरूवातीला कुपनलिकांना शंभर-दीडशे फूटांपर्यंत पाणी सहज लागत असे. पुढे पाण्याची पातळी खाली गेली. त्यामुळे कुपनलिकांची खोली आणखी वाढली. तरीही, पाणी कमी पडू लागले. त्यामुळे आणखी खोल, आणखी खोल कुपनलिका खोदण्यात आल्या. कुपनलिकांची खोली वाढत, वाढत हजार फुटांपर्यंत कधी गेली हे कळलेच नाही. हजार फुटांच्यापुढे काही लोक कुपनलिका खोदू लागले. जमिनीतील पाण्याची पातळी आणखी खोल जात राहिली, कारण या कुपनलिकातून जितके पाणी उपसले जाते तितके पाणी पुन्हा जमिनीत मुरत नाही.

जगाचा विचार केला तर वर्षभरात सरासरी ४१ इंच पाऊस पडतो. त्या तुलनेत भारतात जास्त म्हणजे सरासरी ४३ इंच पाऊस पडतो. महाराष्ट्रात त्याहीपेक्षा जास्त सरासरी ४८ इंच पाऊस पडतो. मात्र महाराष्ट्रात जमिनीखाली बेसॉल्ट खडकाचा थर आहे. या कठीण थरातून पाणी खाली पाझरत नाही. त्यामुळे पर्जन्यमान जास्त असले तरी, जमिनीत पावसाचे पाणी पाझरण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. जर १०० लिटर पावसाचे पाणी उपलब्ध झाले तर, त्यातील ६७ लिटर पाणी नद्यातून वाहत जाऊन समुद्राला मिळते. १७ लिटर पाण्याची वाफ होते. केवळ सहा लिटर पाणी तलावातून साठवले जाते, तर १० लिटर पाणी जमिनीत पाझरते. उपलब्ध पाण्यातील केवळ ११ टक्के पाणी नागरी वस्त्यांसाठी किंवा थेट मानवी वापरासाठी वापरण्यात येते. १९ टक्के पाणी उद्योग-व्यवसायासाठी वापरण्यात येतो. तर ७० टक्के पाणी शेतीसाठी वापरण्यात येते. शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यातील जवळपास तीस टक्के पाणी हे नद्या आणि तलावातून उपलब्ध होते, तर सत्तर टक्के पाण्याची उपलब्धता ही विहिरी आणि कुपनलिकांमधून होते.

या कूपनलिकांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होऊ लागला. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खाली गेली. त्यामुळे दोनशे फूट खोलीपर्यंत कूपनलिका खोदण्याचा शासनाचा नियम असताना पाचशे, सहाशे फुट गाठत, हजाराच्यापुढे खोदल्या जाऊ लागल्या. चार-पाच वर्षांपूर्वी नांदेडमध्ये अशीच एक कुपनलिका खोदली जात होती. हजारपेक्षा जास्त खोल जाऊनही पाणी लागले नाही. मालकाने आणखी खोल जाण्याचा आग्रह धरला. अखेर त्या बोअरमधून उष्ण द्रवपदार्थ बाहेर पडला आणि त्यामध्ये कूपनलिका खोदणाऱ्या मशिनचे मोठे नुकसान झाले. तरीही माणसाचा हव्यास काही सूटला नाही. आजही खोल कुपनलिका खोदण्याचे प्रमाण काही कमी होत नाही.

दुसरीकडे चीन १०००० मीटर खोल जमिनीत छिद्र खोदण्याचा प्रयत्न करत आहे. पृथ्वीच्या अंतर्गत रचनेचा अभ्यास करण्यासाठी, हे ३०००० फूट खोलीची कूपनलिका खोदत असल्याचे चीन सांगतो. असे अनेक प्रयोगाच्या नावाखाली उपदव्याप मानवाकडून सुरू आहेत. कुपनलिकातून अधिकचा पाणी उपसा झाल्यामुळे भूजल पातळी खाली जाणे हा तत्काळ होणारा परिणाम. मात्र भूजल पातळी खाली गेल्यामुळे खोलवर मुळ्या असणाऱ्या झाडांना जमिनीतून पाण्याचा पुरवठा होत नाही. त्यामुळे पिंपळ, कडुनिंब अशी झाडे सुकतात आणि अंतिमत: मरून जातात. हा दुसरा फटका. झाडे वाळल्यानंतर त्यांच्या मुळ्या मृत होतात. या मुळ्या जमिनीतून झाडाला जगवण्यासाठी जसे जमिनीतून पाणी घेतात, त्यापेक्षा जास्त प्रमाणात पाऊस पडताना, पाणी जमिनीत नेण्याचे कार्य करतात. तेही थांबते. भूजल पुनर्भरण होत नाही. हा तिसरा दुष्परिणाम. याचा आणखी पुढे काही परिणाम होत असेल, असे कोणाच्या मनातही येत नाही. कुपनलिकांच्या माध्यमातून शेकडो वर्षांपूर्वी जमिनीत जाऊन स्थिरावलेले पाणी मोठ्या प्रमाणात उपसल्याने आणि त्याचे पुनर्भरण न झाल्याने पृथ्वीवरील जीवसृष्टीला मोठा फटका बसू शकेल, असा शोध संशोधकांना लागला आहे.

मागील काही वर्षांत पृथ्वीचा अक्ष ८० सेंटिमीटर पूर्वेकडे सरकल्याचे संशोधकांच्या लक्षात आले आहे. यामागे भारत आणि उत्तर अमेरिकेतील भूजल पातळी खाली गेल्याचे कारण संशोधकांनी जाहीर केले. भारत आणि उत्तर अमेरिकेत मागील तीस वर्षांत २१८० गिगाटन पाणी उपसले गेले आहे. त्यामुळे दरवर्षी पृथ्वीचा अक्ष ४.३६ सेंटिमीटरने १९९३ ते २०१० या काळात सरकला आहे. यामुळे हवामानाचे अंदाज बदलू शकतात. जेवढे जमिनीतून पाणी उपसले ते जर समुद्रात पसरले तर समुद्राची पातळी ०.२४ इंचाने वाढेल. त्याचा अनेक गावांना फटका बसू शकतो. आपण निसर्गात कसलाही हस्तक्षेप करताना त्याचा पुन्हापुन्हा विचार करायला हवा. पण हा हव्यास थांबत नसल्याने, पृथ्वी कलंडतेय, तिचा तोल जातोय!’


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

हायड्रोजन इंधन तयार करण्याची सोपी अन्‌ कमी खर्चिक पद्धत

पकाल्यामध्ये ग्रामीण भागातील जीवनाचे दाहक वास्तव

मनातील विकारांचे खडे साधनेने दूर करणे शक्य

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading