वनसंपदा संवर्धन हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आपण अभिमानाने सांगतो आमची भारतीय संस्कृती विज्ञानावर आधारित आहे. पण ती कशी याचा अभ्यास आपण कधीही करत नाही. किंवा त्याचे पालन आपण करत नाही. यामुळे संस्कृती नष्ट होत चालली आहे. आपण सणासाठी आवश्यक म्हणून वनसंपदेच्या संवर्धनाऐवजी त्याची बेसुमार तोड करत आहोत. दसऱ्यामध्येही आपट्याच्या झाडाची तोड केली जाते. अशाने आपट्याची झाडे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सणांचे महत्त्व अबाधित राहावे व त्यातून पर्यावरण पूरक संदेश देता यावा अशा उद्देश ठेऊन आता सण साजरे करण्याची गरज आहे. हेच लक्षात घेऊन मलकापूर येथील प्रा. एन. डी. पाटील महाविद्यालयात पर्यावरण पूरक दसरा साजरा करण्यात आला.
दसऱ्याला आपल्याकडं आपट्याची पानं वाटण्याची प्रथा आहे. परंतु अलीकडील काळात आपट्याबरोबरच त्याचे भाऊबंद असणारे कांचन, सुवर्णकांचन, कंचनार इत्यादी झाडांची बेसुमार तोड होत आहे. परिणामी त्यांची संख्या कमी होत चालली आहे. यावर पर्याय म्हणून प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालय, मलकापूर-पेरीड येथील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे डॉ. मकरंद ऐतवडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे दसरा सण साजरा करण्यात आला.
टाकाऊ कागदांपासून उदाहरणार्थ लग्न पत्रिका, कॅलेंडरची पानं, रद्दी पेपर आदीपासून आपट्याच्या पानाच्या आकाराची पर्यावरणपूरक पाने तयार केली जातात. ही पानं रंगविली जातात काही पानांना पालक, हळद यासारख्या वनस्पतींचे रंग वापरले जातात. पर्यावरण, प्लास्टिक, पाणी, वृक्षसंवर्धन आणि स्रीभ्रूणहत्या आदी सामाजिक विषयांची चित्रं काढून व संदेश लिहून हि पानं सजवून आकर्षक बनवतात.
पर्यावरणाचा व वृक्षसंवर्धनाचा संदेश देणारी पानं महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर विद्यार्थ्यांना वाटली जातात. आला आला दसरा पानं तोडणं विसरा, कडीपत्ता कडीपत्ता प्लास्टिक करा बेपत्ता, सेव्ह ट्री सेव्ह लाईफ, झाडांना नका करू नष्ट-श्वास घ्यायला होईल कष्ट, स्वच्छता, लेक वाचावा, पाणी वाचवा, से नो प्लास्टिक, पृथ्वीला वाचवा स्वतःला वाचवा असे संदेश व कविता या पानांवर लिहिल्या आहेत. अशा पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एन. घोलप यांचे सतत प्रोत्साहन मिळते.
यावर्षी दसऱ्याचे औचित्य साधून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध आकाराची लहान मोठी अशी अनेक पानं बनविली होती. यातील काही निवडक आकर्षक पानांचं प्रदर्शन भरविण्यात आलं होत. या प्रदर्शनाचं उदघाटन राजाराम महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ. अंजली पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. एन. एस. आडनाईक, नॅक समन्वयक डॉ. एस. बी. पोरे, डॉ. एम. एन. मोळे, श्री आर. व्ही. मोरे, श्री. व्ही. एस. थोरात, डॉ. एन. के. कांबळे तसेच विद्यार्थी, प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेत्तर सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी संपर्क: डॉ. मकरंद ऐतवडे
वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख
प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालय, मलकापूर-पेरीड
मो. 8208437839/8552958096
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
1 comment
वर्षात एकदा आपट्याच्या झाडाची कत्तल होते ती होऊचनये पण आताचे केंद्र सरकार विकासाच्या नावे मोठमोठे महामार्ग, उद्योगधंदे तसेच इतर प्रकल्पासाठी शेतकऱ्यांचा विरोध डावलून मनमानी भूसंपादन करत पीकांपासून मीळणारा प्राणवायू गमावत,शेतीत असलेली झाडी तोडत त्याचबरोबर शेतकरी कुटूंबाला संपवण्याच षडयंत्र सुरु आहे त्यावर आवाज उठवला पाहिजे. विकासच राबवायचा असेल तर आमच्या देशात अजूनही २२/२३ % पडिक जमीन आहे त्यात राबवून पर्यावरण वाचवल्यास कोरीणासारखी महामरी होणार नाही त्यासाठी प्रामाणीक प्रयत्न झाल्यास खरी आ.एन.डी.साहेबानां आदरांजली ठरेल.