जो राबतो त्यालाच यश मिळते. कष्टाने उभारलेला वृक्ष सहजासहजी मोडून पडत नाही. कारण तो उभारताना अनेक अनुभव आलेले असतात. या अनुभवातूनच अनुभूती येते. जितके अनुभव जास्त तितकी अनुभूती उत्तम असते. तितके यशही मोठे असते.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
गाई दुवाड शिंग । शेवंतीये अडव आंग ।
भोजनसुख महाग । रांधितां ठाई ।। 187 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा
ओवीचा अर्थ – गाय एऱ्हवी चांगली असते, परंतु शिंगाचा मारकेपणाचा दोष तीत आहेच. शेवंती सुवासिक फुलाच्या दृष्टीने उत्तम परंतु तिलाही काट्याच्या फांद्याची अडचण आहेच. भोजनाचे सुख चांगले खरें, परंतु स्वयंपाकाच्या दगदगीमुळे तेहि कष्टसाध्यच होते.
जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. चांगले काम करताना कष्टही तितकेच पडते. शेतातून चांगले उत्पन्न येण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात. चांगले भोजन पाहिजे मग ते तयार करण्यासाठी स्वयंपाकाचा कंटाळा करून चालेल का ? कमळाचे फुल पाहिजे मग चिखलात जायला नको का? गुलाब, शेवंतीची फुले हवीत मग त्यांना असणारे काटे टोचणार याची भीती धरून कसे चालेल. गायीचे दूध काढायचे आहे. मग ती शिंगाने मारेल याची भीती बाळगून दूध मिळेल का?
ही कामे करण्याचे आता आधुनिक तंत्रज्ञान आले आहे. माणसाचे कष्ट कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दूध काढण्यासाठी यंत्रे विकसित केली आहेत. फुले, फळे काढताना त्यांना इजा होणार नाही याची काळजी घेतली जाते. यासाठी विविध तंत्र विकसित केले आहे. नवनव्या युक्त्या वापरून कष्टप्रद कामे सोपी करण्याचे प्रयत्न होत आहेत. शेतीची अनेक कामे आता सोपी करण्यात आली आहेत. पण म्हणून कष्टमय जीवन कमी झाले असे म्हणता येणार नाही. कष्ट हे आहेतच.
कष्टाचा कंटाळा करून काहीच साध्य होत नाही. शेतकरी म्हणतो माझेच जीवन कष्टाचे आहे. पण तसे नाही कोणत्याही चांगल्या गोष्टीसाठी कष्ट हे पडतातच. मोठमोठे उद्योगपती यांचे जीवन आरामाचे आहे असे म्हटले जाते. पण त्यांनाही कष्ट करावे लागते. डोक्यात इतके विचार असतात की रात्री झोपही नीट लागत नाही. वातानुकूलित गाडीतून फिरले म्हणजे कष्ट कमी झाले असे होत नाही. येथे डोक्याची मशागत होते. डोक्यावरील केसांनाही योग्य पोषण न झाल्याने अशा व्यक्तींना टक्कल पडते. इतकी वाईट अवस्था त्यांच्या कष्टामुळे होते. मलाच तेवढे कष्ट आहेत इतरांना नाहीत असे नाही.
सर्वांचे जीवन हे कष्टाचे आहे. राजा असला तरी राज्य चालविण्यासाठी त्याला कष्ट हे करावेच लागतात. ऐशोआरामात जीवन जगणाऱ्या राजांचे राज्य खालसा झाल्याचा इतिहास आहे. जो राबतो त्यालाच यश मिळते. कष्टाने उभारलेला वृक्ष सहजासहजी मोडून पडत नाही. कारण तो उभारताना अनेक अनुभव आलेले असतात. या अनुभवातूनच अनुभूती येते. जितके अनुभव जास्त तितकी अनुभूती उत्तम असते. तितके यशही मोठे असते.
सहज मिळाले तर त्याला किंमत वाटत नाही. कष्टाने साध्य केलेल्या कर्माला गोडी असते. ते साध्य केल्याचे समाधान असते. त्या कर्माने तृप्ती येते. मन तृप्त झाले की प्रसन्न वाटते. शांती वाटते. या कष्टमय जीवनाचा आनंद उच्च पराकोटीचा असतो. साधनेतही कष्ट आहेत. विविध अनुभवातूनच आत्मज्ञानाची अनुभूती येते. पण माऊलीने योगाचा कष्टमय मार्ग सोपा करून सांगितला आहे. शरीराला त्रास न देता साधना करून आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग सांगितला आहे. फक्त साधनेतील कष्ट करण्याची मनाची तयारी करावी लागते.