April 23, 2024
Eternal gain is ever more useful than momentary gain
Home » क्षणिक लाभापेक्षा शाश्वत लाभ कधीही उपयुक्त
विश्वाचे आर्त

क्षणिक लाभापेक्षा शाश्वत लाभ कधीही उपयुक्त

मंदिरात प्रवेश मिळवून झटपट दर्शन घ्यावे यासाठीही वशिला लागतो. पैसा देऊन झटपट दर्शन घेण्याची पद्धत आज रुढच झाली आहे. झटपट देवदर्शनाने समाधान मिळते की रांगेत उभे राहून दर्शनाने अधिक समाधान मिळते हे प्रत्यक्ष अनुभवावरूनच सांगता येऊ शकते. देव मात्र दर्शन दोघांनाही एकसारखेच देतो.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

एक ते अवधानाचा पुरा । विडापाऊड भीतरां ।
देऊनि रिघती गाभारां । अर्थज्ञानाचां ।। ४६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – कित्येक पुरते अवधानरूपी विडापैसा देऊन गीतारूपी मंदिराच्या अर्थज्ञानरुपी गाभाऱ्यांत प्रवेश करतात.

वशिला लावायची पध्दत पूर्वीच्या काळीही होती. आजकालतर वशिल्याशिवाय छोटी छोटी कामे सुद्धा होत नाहीत. शिफारसपत्र असेल तरच नोकरी दिली जाते. अशी स्थिती आजच्या प्रत्येक क्षेत्रात पाहायला मिळते. मोठमोठ्या कंपन्यामध्ये कडक शिस्त असते तेथे वशिल्याने प्रवेश नसल्याचा दावा केला जातो पण तेथेही वशिल्यानेच नोकऱ्या दिल्या जातात. अशा या कारभाराचे तोटे आहेत हे कोणी विचारातच घेत नाही. वशिल्यामुळे गुणवत्तेला महत्त्व राहात नाही. याचा परिणाम कंपनीच्या कामाच्या तसेच उत्पादनाच्या गुणवत्तेवर होतो. गुणवत्ता टिकवायची असेल तर गुणवंतांना प्राधान्य द्यायला हवे. पण सध्यातरी तसे होताना कोठेही पाहायला मिळत नाही. याकडे झालेल्या दुर्लक्षामुळेच अनेक मोठ मोठ्या कंपन्याही आर्थिक संकटात सापडलेल्या पाहायला मिळत आहेत. इतकेच नव्हेतर काही बंदही पडल्या आहेत.

वशिल्याने केलेल्या भरतीचे हे तोटे आहेत. गुणवत्तेला प्राधान्य देऊन निरपेक्ष भावनेने केलेली भरती हितकारक ठरते. कोणतीही गुणवत्ता नसणारी मानसे आज उच्चपदावर कार्यरत असल्याचे पाहायला मिळते. ज्या गुणवत्तेचे ते असतात तिच गुणवत्ता त्यांच्या कामात उतरते. अर्थातच त्याच गुणवत्तेचे उत्पादनही होत राहाते. हे समजण्याइतकेही भान मालकवर्गाला नसते. आर्थिक संकटात आल्यानंतरही याकडे दुर्लक्ष होते. अन् पदरी निराशा पडते. कंपनीच्या उभारीच्या काळात वशिल्यापेक्षा गुणवत्तेला जसे प्राधान्य दिले गेले होते अन् भरभराट केली होती. हा विचार जरी लक्षात घेतला तरी तोट्यात जात असलेल्या कंपन्या नफ्यात येऊ शकतात. स्वतःचे अस्तित्व पुन्हा स्वतः निर्माण करू शकतात.

मंदिरात झटपट प्रवेश मिळवून दर्शन घ्यावे यासाठीही वशिला लागतो. पैसा देऊन झटपट थेट दर्शन घेण्याची पद्धत आज रुढच झाली आहे. झटपट देवदर्शनाने समाधान मिळते की रांगेत उभे राहून दर्शनाने अधिक समाधान मिळते हे प्रत्यक्ष अनुभवावरूनच सांगता येऊ शकते. देव मात्र दोघांनाही एकसारखेच दर्शन देतो. झटपट पैसे देऊन आला म्हणून त्याला वेगळा मान अन् तासनतास रांगेत उभा राहून आला म्हणून त्याला वेगळा मान असा भेदभाव देव करत नाही. दोघांनाही एकच देव दिसतो. दोघांनाही एकच दर्शन भेटते. देवाच्या देवळात समान नागरी कायदा आहे. सर्वांना एकच लाभ. राजमार्गाने आलेल्या राजाला अन् रांगेतून आलेल्या प्रजेला एकच देवदर्शन भेटते.

आता सगळीकडे वशिलेबाजी चालते म्हटल्यावर अध्यात्मात कशी नसणार ? तेथेही वशिल्याने लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न केला जातो. येथे अवधानरुपी विडापैसा दिला जातो. अन् देवाच्या अर्थज्ञानरुपी गाभाऱ्यात प्रवेश मिळवला जातो. नियमित साधना करणारे मात्र रांगेतच उभे राहून प्रवेश मिळण्याची प्रतिक्षा करत राहातात. पण या दोघांनाही एकच बोध होतो. वेगवेगळा मोक्ष मिळत नाही. एकच मोक्ष मिळतो. झटपट दर्शन अन् नियमानुसार दर्शन दोघांनाही एकच लाभ आहे. पण यातील फरक लक्षात घेण्यासारखा आहे तो असा की नियमानुसार दर्शन हे शाश्वत असते. झटपट दर्शन हे क्षणिक लाभाचे असते. अवधानाचा विडापैसा देऊन क्षणिक ज्ञानाची अनुभूती मिळवण्याच्या मागे न लागता नियमानुसार नित्य नियमाने साधना करून शाश्वत असा आत्मज्ञानाचा लाभ मिळवणे कधीही फायदेशीर. कारण दोन्ही ठिकाणी लाभ हा एकच आहे. पण त्याची गुणवत्ता, शाश्वती महत्त्वाची आहे. ती विचारात घेण्याची गरज आहे.

Related posts

गावगाडा साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

वाचनकट्टा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवा

विचारसौंदर्य आणि मूल्यात्मकतेचे प्रतिबिंब असलेला दिवाळी अंक – ‘कुळवाडी’

Leave a Comment