June 18, 2024
Family Concept for spiritual Development Rajendra Ghorpade article
Home » विकासासाठी परिवार संकल्पना
विश्वाचे आर्त

विकासासाठी परिवार संकल्पना

ही कंपनी म्हणजे आपला परिवार आहे असा भाव जेंव्हा उत्पन्न होतो तेंव्हा मात्र वातावरण वेगळे होते. प्रत्येकजण या भावनेने वागताना वेगळ्याच प्रकारचा अनुभव येतो. ही कंपनी आपले कुटूंब आहे तेव्हा त्याची निगा, विकास घरच्या प्रमाणे करण्याचा भाव साहजिकच मनात उत्पन्न होतो.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल 9011087406

ऐसा मागेन वरु । तेथ हो म्हणती गुरू ।
मग तो परिवारू । मीचि होईन ।। 407 ।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ – असा मी (श्री गुरुला ) वर मागेन तेंव्हा गुरु हो म्हणतील. मग तो त्यांचा सर्व परिवार मीच होईन.

परिवार म्हटले की, आपणास घर परिवार आठवतो. आई, वडील, भाऊ, बहिण एकत्र कुटुंब असेल तर चुलते, मावशा सगळ्या मंडळींचा यात समावेश होतो. परिवारात एक आपुलकी असते. गोडी असते. जिव्हाळा असतो. आपलेपणा असतो. यातून मनाचा विकास होतो. साहजिकच मानवी जीवनात एक आधार वाटतो. परिवारातून विकास निश्चितच होतो. अध्यात्मिक सतसंग हा सुद्धा एक परिवारच आहे. या परिवारात आल्यानंतरही शांतीतुन आत्मज्ञानाचा विकास होतो.

स्वातंत्र्यानंतर देशात विकास करून देश उभा करायचा होता तेव्हा औद्यागिक विकासासाठी मोठी आव्हाने होती. अशा काळात लोकांना विश्वासात घेणे तितकेच गरजेचे होते. एकतर कंपनीचे लोक बाहेरून आलेले असत. त्यामुळे अशा कंपनीवर स्थानिक किती विश्वास ठेवणार हा सुद्धा मुद्दा होताच. गरज असून सुद्धा त्या कंपनीकडे कोणी वळत नव्हते. वळला तरी पटकण कोणी आपलेसे करून घेत नव्हते. संशयवृत्तीने त्याकडे पाहीले जायचे. त्यात स्थानिक उद्योजकांचाही विरोध असायचा. अशावेळी काही औद्योगिक कंपन्यांनी स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी परिवार ही संकल्पना राबविली. ही कंपनी स्थानिकांना आपलीसी वाटावी यासाठी ही संकल्पना रुजवण्यात आली.

तुम्ही कामाला येता ते तुमच्या घराचे काम आहे इतका विश्वास त्यांच्यात उत्पन्न केला जात असे. इतकी जवळीक कामगारांशी साधली जायची. यामुळे कंपनीचे वातावरणच बदलून जात होते. आवडीने कामगार सुद्धा काम करायचे. कंपनीतील प्रत्येक कामगार हा आपलाच परिवारातील सदस्य आहे या भावनेने काम करायचा. यामुळे मालक आणि कामगारांच्यातही आपुलकी, आपलेपणा राहात होता. नव्या कामगारालाही लगेच तेथील वातावरण आपलेसे करून जायचे. अशाने कंपनीचा विकास सहजपणे साधला जात असे. स्थानिकांचाही विरोधही अशाने कमी केला जात असे. स्थानिकात विश्वासही उत्पन्न होत असे.

घरात काम करताना आपण हे काम आपलेच आहे असे समजून करतो. तसे कंपनी परिवार संकल्पनेत आपण हे काम कंपनीचे नाही तर आपल्या घरातील आहे, असे समजून करतो. घरच्या वस्तू हाताळताना नुकसान होणार नाही याची काळजी घेतो. तसेच स्वतःचे घर आपण आपलुकीने स्वच्छ, सुंदर, निटनेटके ठेवण्याचा प्रयत्न करतो. या कामातून स्वतःला आनंदही मिळतो. तसे कंपनीत काम करताना होत नाही. फोन आपटाआपटी किंवा कीबोर्ड हाताळताना बोटांची आपटाआपटी होते. हळुवार वस्तू हाताळाव्यात हा भाव नसतो. त्यामुळे वस्तूंची निगा योग्य प्रकारे राखली जात नाही. इतर कामगारांशीही वागताना ते आपले स्पर्धक आहेत हाच भाव निर्माण होतो. जसे आपण शेजाऱ्याशी स्पर्धा करतो तसे तिथेही स्पर्धा होते. पण यात आपुलकी नसते. आपलेपणा नसतो.

ही कंपनी म्हणजे आपला परिवार आहे असा भाव जेंव्हा उत्पन्न होतो तेंव्हा मात्र वातावरण वेगळे होते. प्रत्येकजण या भावनेने वागताना वेगळ्याच प्रकारचा अनुभव येतो. ही कंपनी आपले कुटूंब आहे तेव्हा त्याची निगा, विकास घरच्या प्रमाणे करण्याचा भाव साहजिकच मनात उत्पन्न होतो. तेव्हा काम करताना स्पर्धा नसते, तर प्रेम असते. प्रेमाने व्यक्तीचा विकास होतो. साहजिकच कंपनीचाही विकास होतो. यासाठी कंपन्यांनी विकासाची ही संकल्पना विचारात घ्यायला हवी. कंपन्यांनी किंवा संस्थांनी हा विचार करून परिवार ही संकल्पना राबविल्यास निश्चितच विकासाची बिजे रोवली जातील.

अध्यात्मातही असेच आहे. गुरुंचा परिवार आपण व्हायचे असा आशिर्वाद मागायचा असतो. त्यामुळे काय होते. तर गुरुंच्या प्रेमाचा वर्षाव, त्यांच्या ज्ञानाचा वर्षाव आपल्यावर, आपल्या परिवारातील सदस्यावर होतो. परिवार या नात्यामुळे सद्गुरु व शिष्य यांच्यातील दुजाभाव जाऊन आपण त्यांच्याशी एकरूप होतो. या एकरुपतेने आपण आत्मज्ञानाचे लाभार्थी होतो. यासाठी सद्गुरुंचा परिवार लाभावा असा आशिर्वाद मागायचा असतो. त्यांच्या सहवासात राहून आत्मज्ञानाच्या आनंदात डुंबायचे असते. परिवार ही संकल्पना विकासाची आहे. तसेच संरक्षण देणारी आहे. या संकल्पनेचा विचार विकासासाठी राबवण्याची गरज आहे.

Related posts

उपासमारीसंदर्भातील जागतिक आकडा चिंताजनक

स्वानुभवासाठीच हवे वैराग्य

नंदी बैलासारखी मान डोलावून कामे नकोत, तर…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406