April 1, 2023
Principle Dr Kisanrao Patil Literature award announced
Home » प्राचार्य डॉ. किसनराव पाटील वाडःमय पुरस्कारांची घोषणा
काय चाललयं अवतीभवती

प्राचार्य डॉ. किसनराव पाटील वाडःमय पुरस्कारांची घोषणा

प्राचार्य डॉ. किसनराव पाटील वाडःमय पुरस्कारांची घोषणाःपवन नालट, उषा हिंगोणेकर,लतिका चौधरी यांना मानाचे पुरस्कार जाहीर

मराठीतील ख्यातनाम संशोधक, अभ्यासक, जेष्ठ साहित्यक-समीक्षक प्राचार्य डॉ. किसनराव पाटील (जळगाव) यांचे स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या वाडःमय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून “प्राचार्य डॉ. किसनराव पाटील राज्यस्तरीय वाडःमय पुरस्कार २०२२” अमरावती येथील कवी पवन नालट यांना त्यांच्या मी संदर्भ पोखरतोय या काव्यसंग्रहासाठी जाहीर झाला आहे. तर “प्राचार्य डॉ. किसनराव पाटील खानदेश स्तरीय वाडःमय पुरस्कार २०२२” उषा हिंगोणेकर (धगधगते तळघर) व लतिका चौधरी (माती ) यांना जाहीर झाला आहे.

प्राचार्य डॉ. किसनराव पाटील हे साक्षेपी समीक्षक व सर्जनशील साहित्यिक होते. मराठी साहित्य व संशोधन क्षेत्रातील त्यांचे योगदान मोठे होते. त्यांच्या या योगदानाला स्मरुण प्राचार्य किसन पाटील सरांच्या विद्यार्थ्यांकडून ज्ञानपरंपरा स्थापन करून दरवर्षी वाडःमय पुरस्कार दिले जातात. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे जळगाव जिल्हा शाखेफर्ते पुरस्कारांचे आयोजन करण्यात येते. दर वर्षी आलटून पालटून एका वाडःमय प्रकारासाठी हे पुरस्कार दिले जातात.

ह्या वर्षीच्या पुरस्कारांसाठी सन २०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहांचा पुरस्कारांसाठी विचार करण्यात आला. राज्यस्तरीय पुरस्काराचे स्वरूप अकरा हजार रूपये रोख, स्मृतीचिन्ह व शाल, श्रीफळ असे आहे. त्यासाठी अमरावती येथील कवी पवन नालट यांच्या मी संदर्भ पोखरतोय या काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली आहे तर खानदेश स्तरीय पुरस्कार दोंडाईचा येथील कवयीत्री लतिका चौधरी व जळगाव येथील कवयीत्री उषा हिंगोणेकर यांना विभागून जाहीर झाला आहे. पाच हजार रूपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे खानदेश स्तरीय पुरस्काराचे स्वरूप आहे.

गेल्या वर्षी कथा या वाडःमय प्रकारासाठी हा पुरस्कार ठेवण्यात आलेला होता. अवघ्या काही दिवसातच मराठी वाडःमय क्षेत्रात या पुरस्काराने स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. या वर्षीच्या पुरस्कारांसाठी काव्य हा साहित्य प्रकार आमंत्रीत होता. त्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. अत्यंत तोलामोलाच्या या पुरस्कारासाठी निवडसमितीत प्रा. डॉ. आशुतोष पाटील (जळगाव) व डॉ. संजीवकुमार सोनवणे ( धरणगाव) यांचा सामावेश होता. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा पाचोरा यांचे वतीने लवकरच पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र साहित्य परिषद, पाचोरा शाखेचे अध्यक्ष प्राचार्य भि. ना. पाटील व कार्याध्यक्ष प्रा.डॉ.वासुदेव वले यांनी कळविले आहे.

Related posts

कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी डंपरमध्ये  डिझेल ऐवजी एलएनजी वापर 

Video : महिला दिनानिमित्त वाळूशिल्प

आगळा वेगळा बोटॅनिकल फॅशन शो..

Leave a Comment