प्रश्न सुद्धा या वृक्षासारखेच आहेत. वृक्षाच्या बिजातून दरवर्षी अनेक बीजे उत्पन्न होतात. त्यातून हा वृक्ष वाढतच राहातो. तसेच प्रश्नांचे आहे. एका प्रश्नातून अनेक प्रश्न हे उत्पन्न होत राहातात. जसे प्रश्न वाढतील तसा त्या प्रश्नाचा विस्तारही वाढत राहातो. वृक्ष नष्ट करायचा असेल तर तो मुळासकट उपटून काढावा लागतो.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
तैसें मूळ अविद्या खाये । तें ज्ञान जैं उभें होये ।
तैंचि यया अंतु आहे । एऱ्हवीं नाहीं ।। 229 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा
ओवीचा अर्थ – त्याप्रमाणे संसारवृक्षास मूळ असलेल्या अविद्येला खाऊन टाकणारे ज्ञान जेंव्हा उत्पन्न होईल, तेंव्हाच या संसारवृक्षाला शेवट आहे, एऱ्हवी नाही.
एखादा प्रश्न समाधानकारक उत्तर मिळेल तेव्हाच सुटतो. अन्यथा तो प्रश्न हा अनुउत्तरीतच राहातो. काहींना प्रश्न सोडवण्याची इच्छाच नसते. प्रश्न सुटावेत अशी मनोकामनाच नसते. कारण त्या प्रश्नाच्या सुटण्याने त्याचे अस्तित्व संपेल असेच त्यांना वाटत असते. तो प्रश्न आहे तोपर्यंत आपले अस्तित्व आहे अशी त्यांची धारणा झालेली असती. वकीलाचा व्यवसाय हा प्रश्नावरच चालतो. कित्येकांना प्रश्न सोडवण्या ऐवजी तो लटकत ठेवण्यातच अधिक रस असतो. या मानसिकते मुळेच अनेक खटले हे वर्षानूवर्षे सुरु राहीलेले पाहायला मिळतात. कारण प्रश्न सुटावा, अशी त्यांची मानसिकतचा नसते. काही राजकर्त्यांचे तर प्रश्नांच्या भाडवलावरच जगतात. त्यांची कारकिर्द निव्वळ तो प्रश्न हाताळण्याच जाते. उत्तर मात्र काही निघत नाही. कारण उत्तर शोधणे ही त्यांची मानसिकताच नसते. उत्तर आले, तोडगा निघाला तर त्यांचे अस्तित्व संपेल अशी भीती त्यांना असते.
प्रश्न सुद्धा या वृक्षासारखेच आहेत. वृक्षाच्या बिजातून दरवर्षी अनेक बीजे उत्पन्न होतात. त्यातून हा वृक्ष वाढतच राहातो. तसेच प्रश्नांचे आहे. एका प्रश्नातून अनेक प्रश्न हे उत्पन्न होत राहातात. जसे प्रश्न वाढतील तसा त्या प्रश्नाचा विस्तारही वाढत राहातो. वृक्ष नष्ट करायचा असेल तर तो मुळासकट उपटून काढावा लागतो. काही फांद्या छाटून वा तोडून हा वृक्ष नष्ट होत नाही. फाद्या छाटून त्याचा विस्तार अधिकच वाढत राहातो. तोडलेल्या एका फांदीला अनेक फुटवे फुटत राहातात. तो नष्ट करण्यासाठी त्याच्या मुळावरच घाव घालावा लागतो. मुळच काढले तर वृक्षाची वाढच थांबते. वृक्ष आपोआपच नष्ट होतो. जसे मुळापासून वृक्ष नष्ट करावा लागतो, तसेच प्रश्नाचेही आहे. प्रश्नाच्या मुळाशी जाऊन तो सोडवावा लागतो तरच तो सुटतो. अन्यथा तो एकाचे दोन, दोनाचे तीन, तिनाचे चार असे तो विस्तारतच राहातो. हा वाढणारा विस्तार रोखण्यासाठी प्रश्नाच्या मुळावरच घाव घालावा लागतो.
संसारवृक्षाचे मुळ ही अविद्या आहे. ही अविद्या ज्ञानाने संपविता येते. ज्ञान उत्पन्न झाले तरच या संसारवृक्षाचा शेवट होईल. अध्यात्म हे ज्ञान-विज्ञानाच्या बळावरच उभे आहे. ज्ञानानेच अध्यात्मिक प्रगती साधता येऊ शकते. यासाठी आपला कल हा ज्ञानी होण्याकडे असावा. ज्ञान मिळावे यासाठी आपले प्रयत्न असायला हवेत. साधनेतून ज्ञान मिळते. यासाठी साधना ही नित्य नियमाने करायलाच हवी. संसाराच्या वृक्षात अडकून पडलो तर ज्ञानाचा बोध होणार नाही. संसार छाटून किंवा त्याग करून संसार संपत नाही. संसार कापला तर अनेक फांद्या त्यातून उत्पन्न होतात. म्हणजे तो अधिकच विस्तारतो हे लक्षात घ्यायला हवे. संसारवृक्ष हा ज्ञानाने संपविता येतो. कारण तो अज्ञानाने उभा राहीलेला आहे. अज्ञान ज्ञानानेच काढून टाकता येते. संसार होत असतो. संसार सोडून हिमालयात गेला तरी तेथे राहाण्यासाठी, रोजचा चरितार्थ चालवण्यासाठी काम हे करावेच लागते. म्हणजे संसार हा आपोआपच उभा राहात असतो. तो टाळून ज्ञान मिळवता येत नाही. यासाठी संसारात राहून ज्ञानी होण्याचा प्रयत्न करायला हवा. ज्ञानानेच संसारातील क्षणभंगूरपणा समजू शकतो. एकदा का हे समजले की मग पुन्हा त्यात अडकणे नाही. यासाठी प्रश्नाच्या मुळाशी जाऊन प्रश्न सोडवायला हवेत. तरच ते सुटतात. हे विचारात घेऊन कृती करायला हवी.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.