December 7, 2023
Spiritual progress only after Ego gone
Home » मीपणा गेल्यावरच आध्यात्मिक प्रगती
विश्वाचे आर्त

मीपणा गेल्यावरच आध्यात्मिक प्रगती

मनात येणारे विचार काही थांबत नाहीत अन् मन साधनेवर नियंत्रित होत नाही. असे का होते ? सर्व काही उपलब्ध असूनही, सर्व प्रकारची काळजी घेतलेली असूनही मन साधनेत रमत नाही.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

परी हें मी करितु असें । ऐसा आठवु त्यजी मानसें ।
तैसेंचि पाणी दे आशें । फळाचिये ।। २०१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – परंतु हे कर्म मी करतो असे कर्तृत्वाचे स्मरणहि मनांतून टाकतो व त्याप्रमाणे फलेच्छेवरहि तो पाणी सोडतो.

मनाला नियंत्रणात ठेवायचे कसे ? मनात उत्पन्न होणारे विचार थांबवायचे कसे ? हा प्रश्न प्रत्येक साधकाला भेडसावत असतो. कारण मन साधनेत रमत नाही. मनापासून साधना होत नाही. आपण साधनेला बसलेलो असतो, पण मन मात्र इतरत्र भटकत असते. मनात येणारे विचार हे आपल्या नियंत्रणात नाहीत. मग मुळात ते आपले विचारच नाहीत असा भाव प्रकट केला तर काय होईल. ते आपले नाहीत मग आपण त्यात गुंतायचे कशासाठी ? हे मनाला विचारून पाहायला हवे. अन् त्यातून आपली सुटका करून घ्यायला हवी. तरच आपले मन आपल्या नियंत्रणात येईल.

आजकाल अनेक मठांमध्ये, आध्यात्मिक केंद्रामध्ये साधना शिबिरे आयोजित केली जातात. तीन दिवसापासून दहा दहा दिवसांची ही शिबिरे असतात. असा हा उपक्रम निश्चितच प्रशंसनिय आहे. तसेच सध्या बदलत्या जीवनशैलीमध्ये याची तितकीच आवश्यकताही वाटत आहे. येथे या फक्त साधना करा, ध्यान करा. लागणाऱ्या सर्व सुविधा मठातर्फे किंवा केंद्रातर्फे पुरविण्यात येतात. वेळेवर जेवण, वेळेवर अंघोळीसाठी पाणी, सर्व काही जागच्या जागी उपलब्ध करून दिले जाते. फक्त आपण आपले मन साधनेवर नियंत्रित करायचे असते. या शिबिरात प्रवेशानंतर फक्त साधना, अन् साधनेचाच विचार व्हावा अशी सर्व सोय केलेली असते. पण तरीही येथे मनापासून साधना होत नाही, अशी अनेकांची तक्रार असते.

धकाधकीच्या जीवनातून थोडा बदल म्हणून या शिबिरात दाखल झाल्यास पहिले दोन दिवस थोडे बरे वाटते. पण त्यानंतर मात्र मनात चलबिचलता वाटू लागते. मन अस्वस्थ होते. कारण सर्व सुविधा असूनही मनाला समाधान हे वाटत नाही. मनात येणारे विचार काही थांबत नाहीत अन् मन साधनेवर नियंत्रित होत नाही. असे का होते ? सर्व काही उपलब्ध असूनही, सर्व प्रकारची काळजी घेतलेली असूनही मन साधनेत रमत नाही. तसा हा प्रश्न सर्वच साधकांचा असतो असे नाही. पण बऱ्याच साधकांना ही समस्या असते. मन साधनेत रमवणे तितके सोपे नाही असे का वाटते ?

यासाठीच तर मनात येणारे विचार हे आपले नाहीत असा भाव उत्पन्न करायचा आहे. साधनेचे कर्म हे माझ्याकडून करवून घेतले आहे अशी अनुभूती यायला हवी. म्हणजे आपले मन इतरत्र भरकटणार नाही. मनाला लागलेली मीपणाची सवय ही जायला हवी. मीपणाचा अहंकार गेल्याशिवाय साधनेत प्रगती होत नाही. जे आपले नाही त्यात आपण गुंतायचेच कशासाठी ? असे केल्यानेच मन त्यातून बाहेर पडून साधनेवर केंद्रित होईल. नित्य सवयीने, यातील नित्य विचाराने हे शक्य होते. झटकण हे होत नाही यासाठीच नित्य साधनाही आवश्यक आहे. फळाची अपेक्षा न ठेवता नित्य साधना केल्यास त्याची गोडी वाढते अन् मन साधनेत रमते.

Related posts

निसर्गाच्या रंगात तिरंगा…

नवी पिढी घडवण्याची प्रेरणा देणारा शोध काटेमुंढरीचा

गोकूळी हवा धूंद आहे

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More