April 1, 2023
Sound pollution in city article by rajendra ghorpade
Home » शहरातील ध्वनी प्रदुषणाकडे नको दुर्लक्ष…
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शहरातील ध्वनी प्रदुषणाकडे नको दुर्लक्ष…

भारतातील केवळ पाच शहरे आहेत असे म्हणून याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हा प्रश्न अन्य शहरातही तितक्याचे वेगाने भेडसावणारा आहे हे विचारात घ्यायला हवे. यासाठी प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न हा व्हायला हवा. पर्यावरणाच्या प्रश्नावर असाच तोडगा निघू शकतो. हे विचारात घ्यायला हवे. यासाठी जागरूकता ही महत्त्वाची आहे.

भोंग्याचा आवाज सध्या वादाचा विषय ठरत आहे. भावनिकेतून मतांच्या बेरजेसाठी हे विषय उपयुक्त ठरत असल्याने याकडे सध्या सर्वांचे लक्ष जाते. गणेशोत्सव, नवरात्रामध्ये डॉल्बीच्या आवाजावर लक्ष ठेवले जाते, पण शहरात सध्या या व्यतिरिक्त वाढत असलेले ध्वनी प्रदुषण मांडण्याचा कोणीच प्रयत्न करत नाही. याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. मतांची गणिते विचारात घेऊन सध्या प्रश्न मांडण्याचा आणि सोडवण्याचा प्रयत्न राजकिय व्यासपीठावर सुरु असतो. असेच मुद्दे सध्या चर्चेत राहात असल्याने मूळ प्रश्नांकडे यामुळे दुर्लक्ष होत आहे. दुरदृष्टी ठेवून विचार करण्याची राजकीय परंपराच नामशेष झाली आहे. प्रश्न सोडवताना किंवा मांडताना तसा विचार सध्याच्या राजकारणात होत नाही. अशाने भावीकाळात अनेक मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागेल यासाठी आत्ताच जागरूक होऊन योग्य अंमलबजावणी करायला हवी.

संयुक्त राष्ट्र पर्यावरण अभियानाच्या (युएनईपी) अहवालनुसार भावी काळात ध्वनी प्रदुषण ही एक आपत्ती असल्याचे म्हटले आहे. या अहवालात भारतातील पाच शहरांचा ध्वनी प्रदुषित शहरात समावेश केला आहे. भारतात मुरादाबादासह जयपूर, कलकत्ता , आसनसोल, दिल्ली येथे सर्वाधिक ध्वनी प्रदूषण होते. मुरादाबादमध्ये सर्वाधिक 114 डेसिबल (डीबी) ध्वनी प्रदुषणाची नोंद केली गेली आहे तर, दिल्लीमध्ये 83, जयपूरमध्ये 84, कलकत्ता आणि आसनसोलमध्ये प्रत्येकी 89 डेबिसल ध्वनी प्रदुषणाची नोंद केली आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार 70 डीबीपेक्षा अधिक ध्वनी प्रदूषण आरोग्यासाठी हानिकारक असते.

दक्षिण आशियामध्ये झालेल्या पाहणीमध्ये रहदारी आणि वाहनांपासून होणारे ध्वनी प्रदुषण सर्वाधिक अधिक असल्याचे म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) ने 1999 मध्ये वसाहतीच्या क्षेत्रात 55 डीबी तर रहदारीच्या तसेच व्यावसाहिक क्षेत्रात 70 डीबीचे प्रमाण निश्चित केले आहे. कायदे करून ध्वनी प्रदुषण रोखले जाईल असे सध्या तरी वाटत नाही. कारण हा प्रश्न कायद्याच्या चौकटीपेक्षा जनजागृतीने सोडविल्यास यावर उत्तम तोडगा निघू शकतो.

सामुहिक प्रयत्नातून या प्रश्नाकडे पाहायला हवे. भारतातील केवळ पाच शहरे आहेत असे म्हणून याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हा प्रश्न अन्य शहरातही तितक्याचे वेगाने भेडसावणारा आहे हे विचारात घ्यायला हवे. यासाठी प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न हा व्हायला हवा. पर्यावरणाच्या प्रश्नावर असाच तोडगा निघू शकतो. हे विचारात घ्यायला हवे. यासाठी जागरूकता ही महत्त्वाची आहे.

डब्ल्यूएचओने 2018 मध्ये आरोग्य सुरक्षेचा विचार करून रस्त्यावरील ध्वनी प्रदुषणाची सीमा 53 डीबी निश्चित केली आहे. भारतातील शहरीभागात 55 डीबी इतकी ध्वनी सीमा निश्चित केली आहे. त्यापेक्षा अधिक डीबी असल्यास त्याची नोंद ध्वनी प्रदुषण शहरांमध्ये करण्यात येते. कागदोपत्री याची नोंद ठेवण्यात आपण नेहमीच पुढे असतो. पण तोडगा मात्र निघत नाही. यासाठी शहरातील चौकाचौकात प्रदूषण दाखवणारे यंत्र बसवायला हवे. यातून जनतेमध्ये प्रदुषणाच्या प्रश्नांची जाणिव होईल. नागरिकांना जागे करून लोकसहभागातून या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. ध्वनी प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगून जनतेला जागे करायला हवे.

युएनईपीचे कार्यकारी संचालक इंगर एंडरसन यांच्यामते ध्वनी प्रदुषणाचा केवळ मानवावरच नव्हे तर जनावरांवरही परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. माणसाचे आरोग्य धोक्यात येत आहे. स्वास्थ आणि झोपेवर प्रतिकुल परिणाम पाहायला मिळत आहेत. शहरांचा वाढता विस्तार हे यामागचे प्रमुख कारण आहे. युरोपात ध्वनी प्रदुषणामुळे हृदयरोग झालेले सुमारे 48 हजार रुग्ण आढळले आहेत. तर 2.2 कोटी नागरिकांमध्ये चिडचिडेपणाचा त्रास दिसून आला आहे. कॅनडामध्ये आठ टक्के नागरिकांना आवाजामुळे हृदयविकाराचा धक्का, हृदय बंद पडणे, मधुमेह यासारखे आजार झाल्याचे आढळले आहे. कोरियामध्येही हृदय व मेंदुच्या रक्त पुरवठ्या संबंधीत आजार हे ध्वनी प्रदुषणामुळे होत असल्याचे आढळले आहे.

भारत मात्र या प्रश्नाबाबत जागरूक असल्याचे पाहायला मिळत नाही. शहरीकरण करताना ध्वनी प्रदुषणाच्या प्रश्नावर उपाययोजना करता येणे शक्य होऊ शकते. योग्य ते उपाय योजले जाऊ शकतात. पण हा विचार आराखड्यात कोठेही मांडला जात नसल्याचेच चित्र आहे. हा प्रश्न आपल्याकडे कमी प्रमाणात असला तरी भावीकाळात तो मोठी डोकेदुखी ठरू शकतो याचा विचार आत्ताच करायला हवा. केवळ मतपेटीवर लक्ष देऊन प्रश्न सोडवण्याचा विचार न करता दुरदृष्टी ठेवून नियोजन करण्यावर भर द्यायला हवा. तरच भावी काळात आपण महासत्ता होण्याची स्वप्ने पाहू शकू, अन्यथा आपणही समस्येच्या गर्तेत अडकून संपून जाऊ हे लक्षात घ्यायला हवे. श्वासाचा स्वर ऐकून त्यावर विजय संपादन करण्याची परंपरा ठेवणारे भारतीय ध्वनी प्रदुषणावरही निश्चितच जागरूक होऊन मात करतीय यात शंका नाही. पण यासाठी दुरदृष्टीचा दृढनिश्चय करायला हवा.

Related posts

मुळा लागवड करायची आहे. मग जाणून घ्या तंत्र

ही झाडे पांढऱ्या कापडाने झाकली आहेत कारण…

हिमनग – अदृश्य भीषण वास्तव

Leave a Comment