December 1, 2022
Imozil Guideline Stories in Corona Period book
Home » कोरोना काळातील मार्गदर्शक कथा…
मुक्त संवाद

कोरोना काळातील मार्गदर्शक कथा…

कोरोनाने आपल्याला दाखवून दिले की समाजातील कुठल्याही स्तरातला माणूस तितकाच असुरक्षित आहे. या पार्श्वभूमीवर सामान्य दिसणाऱ्या लोकांनी ह्या असामान्य परिस्थितीला कसे तोंड दिले, नवे मार्ग शोधले. ते दाखवणाऱ्या बारा कथा ‘इमोझील’ या पुस्तकात असून डॉ. महेश अभ्यंकर आणि आरती भार्ज यांनी स्वअनुभवातून लिहिल्या आहेत.

अशोक बेंडखळे

मागील पावणे दोन वर्षांहून अधिक काळ कोविड – १९च्या साथीने काही काळातच जगभरातील मानवजात हवालदिल झालेली आपण पाहत आहोत. कोरोना या रोगाच्या साथीने जगभराचे व्यवहार विस्कळीत केले. अनेकांनी प्राण गमावले. आपल्या जवळच्या अनेक व्यक्ती गेल्याचे आपण पाहिले. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा आपण सामना केला. दुसरी लाटही येऊन गेली आणि आता तिसरी लाटही आली आहे. एकूण या भयानक साथीची टांगती तलवार अजूनही आपल्या डोक्यावर लटकते आहे.

कोरोनाने आपल्याला दाखवून दिले की समाजातील कुठल्याही स्तरातला माणूस तितकाच असुरक्षित आहे. या पार्श्वभूमीवर सामान्य दिसणाऱ्या लोकांनी ह्या असामान्य परिस्थितीला कसे तोंड दिले, नवे मार्ग शोधले. ते दाखवणाऱ्या बारा कथा ‘इमोझील’ या पुस्तकात असून डॉ. महेश अभ्यंकर आणि आरती भार्ज यांनी स्वअनुभवातून लिहिल्या आहेत.

‘रेशीमगाठी’ या पहिल्या कथेत छानशौकीची जीवनशैली आवडणाऱ्या मंदार आणि त्याची कर्तव्यदक्ष सोशिक पत्नी मीना यांची कहाणी आहे. त्यांच्या घरात सगळ्या अद्यायावत सुखसोयी होत्या. मात्र, दोघांच्या नात्यामध्ये भावनिक संपर्क नसल्यामुळे दरी निर्माण झाली होती. लॉकडाऊन सुरू झाला आणि घरगडी, कामवाली नसल्यामुळे मीनावर कामाचा बोजा वाढला. मंदार काहीच मदत करीत नव्हता. एकदा तिला प्रचंड राग आला. मंदारने तिच्यावर हात उगारला. तेव्हा मीनाने घटस्फोट मागितला. नंतर मंदार ध्यानसाधना करू लागला. त्याला चूक कळून चुकली. पत्नीकडे चूक मान्य केली आणि प्रेमाच्या मिठीने त्यांच्यातील नात्याची दरी भरून निघाली.

आपल्याला कोरोनाची लागण तर झाली नसेल या मनातील भीतीने दीक्षितबाईंची आणि कुटुंबाची जी तारांबळ उडते ती सांगणारी कथा ‘घबराटीचे सावट’ यामध्ये आली आहे. दीक्षितबाईंना एक दिवस आपल्या छातीत कोंडले आहे असे वाटून कोविडचाच संसर्ग झाला आहे असे वाटतं. त्या सर्वांना घाबरवून सोडतात. सिस्टर अनिताला बोलावले जाते. ती त्यांना तपासून कोरोनाची बाधा नसल्याचे स्पष्ट करते. दीक्षितांनी पत्नीच्या मानसिक आजारासाठी एका समुपदेशकाची मदत घेतली. पण, त्याचाही काही उपयोग झाला नाही. सिस्टर अनिता त्यांना काही पॉझिटिव्ह मेसेज पाठवू लागल्या. त्यातून त्यांना कळते कोणतीही समस्या अशी नाही की त्यावर उपाय नाही आणि त्या स्वत:च बदल घडवून आणायला तयार होतात. एका सेवानिवृत्त डॉक्टराने कोविड-१९ च्या हॉस्पिटलमध्ये सेवा देऊन जो बदल घडविला, त्याची स्फूर्तिदायक ‘कथा एका कोरोनावीराची’ रोजनिशीमध्ये वाचता येते. निवृत्त डॉक्टर वैद्य हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतात. हॉस्पिटलमध्ये जाताच त्यांना तिथे विचित्र उदासिनचा जाणवते. तेथील वैद्यकीय कर्मचारी तनमन लावून काम करीत होते. रूग्णांची काळजी घेत होते. डॉ. वैद्य यांनी काही बदल केले.

तेव्हा सरकारी हॉस्पिटलमधील अनोख्या कामगिरीने बीबीसीचे रिपोर्टरही खूष झाले. १७ दिवसांच्या छोट्या मुलाला, ऑक्सिजनची लेव्हल कमी झालेल्या पेशंटला वाचवण्यात येत होते. असे अनेकांचे प्राण सहकार्याने वाचवण्यात आले. पन्नास दिवसांच्या अहोरात्र मेहनतीने डॉ. वैद्यांना समाधान लाभले होते. कोरोनाचा धसका घेतलेल्या गीता नावाच्या तरुणीची कथा ‘एक तारा क्षितिजापलीकडचा’मध्ये येते. गीता एका स्टोअरमध्ये विक्रेती म्हणून काम करीत होती. तिने अचानक कामावर येणे बंद केले. अनिरूध्दने फोन केला तेव्हा ती कोरोनाच्या संसर्गाने खूप खाबरली असल्याचे कळले. तिने भीतीने खोलीत कोंडून घेतले होते. त्यानंतर संध्या या समुपदेशकाची मदत घेण्यात आली. तिच्याशी बोलल्यानंतर लक्षात आले की लहानपणी गीता आजारी पडली की घाबरून जात असे. कोविडच्या थैमानात ती आतून हादरली होती. समुपदेशक संध्या यांच्या प्रयत्नांना यश येऊन ती त्यातून बाहेर पडली.

बोस्टनमध्ये नोकरी करण्याच्या आणि कोरोनामुळे नोकरी गमावलेल्या जिग्नेशची कथा ‘प्रेम हाचि मंत्र’मध्ये आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फर्मान काढतात आणि जिग्नेशची नोकरी जाते. त्याची मैत्रीण ॲनाही त्याला सोडून जाते. त्याची मन:स्थिती सैरभैर होते. काही दिवसांनी ॲनाचा संपर्क होतो. आणि ती जिग्नेशसाठी ठोस उपाययोजना करण्याचे ठरवते. कंपनीची सल्लागार डॉ. रिटाशी संपर्क साधून काही स्वयंप्रक्रिया मिळतात आणि तिने व्हिडिओ कॉल करून जिग्नेशला शिकवायला सुरुवात केली. शेवटी बिझनेस चॅनेलवरील चर्चेनं त्याला जाग येते. त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो. तो नव्या उमेदीने आकाशात झेप घ्यायला तयार होतो. लॉकडाऊननंतर विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची पध्दत बदलून गेली. मात्र, स्कॉलर आशिष अभ्यासात खूप मागे पडला. त्यातून तो कसा सावरला हे ‘ई शिक्षणाचा बागुलबुवा’ ही कथा सांगते. ऑनलाईन शिक्षणाचे अनेक तोटे होते. मुलांशी संवाद तुटला होता.

मुलं क्लास सुरू असता मोबाईलवर गेम खेळणं वगैरे करीत होती. आशिषला तीच सवयं लागली. आईने त्याला गोगटेबाईंकडे पाठवले. बाईंनी त्याला अभ्यासात मोबाईल बंद, मित्रामध्ये गटाने अभ्यास करणे असे काही उपाय सुचवतात. ओंकार साधना मंत्राने त्याला आत्मविश्वास दिला. गोगटेबाईंचं बौध्दिक आणि आजोबांचं प्रेमळ मार्गदर्शन यामुळे आशिष बदलला आणि नव्या युगाच्या अभ्यास पध्दतीत यशस्वी झाला. संगीताच्या जादूने अनिरुध्दचा मित्र जॉन नैराश्यातून कसा बाहेर आला ती कथा ‘किमया संगीताची’मध्ये येते. जॉन इंग्लंडहून भारतात आला होता. हॉटेल व्यवसायात होता. संगीताची त्याला आवड होती. चांगला गिटारवादक होता. आपण सर्वजण मरणार आहोत, या भीतीने अचानक त्याला ग्रासले. जॉनची मैत्रीण बेलिंडाने शाळेतला लहानपणचा त्याचा मित्र डेव्हिडशी गाठ घालून दिली. त्यांनी स्कूल बॉय युनिटी क्लबशी जॉनला जोडून घेतले आणि जॉन खुलू लागला. त्याने एक गाणे लिहून ते स्वरबध्द केले. त्याला उत्तम दाद मिळाली. त्याचा उत्साह द्विगुणित झाला. संगीतामुळे तो नैराश्यातून बाहेर आला.

असुरक्षित मी’मध्ये कोरोनाच्या काळात आपण सर्वजण असुरक्षित आहोत आणि म्हणून स्वच्छतेचा अतिरेक करणाऱ्या मेधा मावशीची कथा आली आहे. ही एक प्रकारची मानसिक समस्या होती; परंतु त्या मानायला तयार नव्हत्या. अनिरूध्दने त्यांना मानसोपचारतज्ज्ञ डॉ. स्नेहा यांच्या ग्रुपमध्ये सामील करून घेतले. ग्रुपमधील इतरांचे अनुभव ऐकल्यानंतर त्यांच्यात बदल होऊ लागला. त्यांनी मुलाच्या मदतीने एक ऑनलाईन चॅनेल बनवले. स्वत:चे व्हिडिओ बनवू लागल्या. कार्यक्रमाची आखणी, रेकॉर्डिंग, फेसबुकवर मित्रांना आवाहन या कामात सतत हात धुण्याचे, स्वच्छतेचे विसरून गेल्या आणि मानसिक समस्येतून बाहेर आल्या.

‘अस्तित्वाचे शोध’मध्ये अर्चना या कामात अतिशय व्यग्र असलेल्या गृहिणीची कथा येते. कुटुंबासाठी खरेदी करण्यासाठी ती बाहेर जात राहिली आणि कोरोनाने तिला गाठले. घरात दोन मिनिटेसुध्दा विश्रांती न मिळालेल्या तिला हॉस्पिटलमध्ये सक्तीची विश्रांती मिळाली. ती बरी होऊन घरी येते आणि घरातील सगळे वातावरण बदलले होते. घर व्यवस्थित चालू होते. आता तिने समाजसेवा करण्याचे ठरविले. कोरोना हेल्पर’ या संघटनेमार्फत अनेक उपक्रम राबवले.

राज्य सरकारने तिचा समाजसेविका म्हणून गौरव केला आणि आयुष्याला एक अर्थ प्राप्त झाल्याचे तिच्या लक्षात येते. ‘उत्कर्ष काळ्या मातीचा’मध्ये सौम्या या सामाजिक कार्यकर्तीची कथा आली आहे. सौम्या आणि या सर्व कथांमध्ये आलेला सूत्रधार अनिरुध्द यांचे प्रेमसंबंध यात दाखवले आहेत. आपल्या छोट्या गावात सौम्यामुळे काही प्रकल्प राबविले जातील म्हणून तो तिला गावी पाठवतो. आपल्या वृध्द आई-वडीलांना आधार मिळेल हा हेतूही त्यामागे असतो. सौम्या गावात मास्क बनविण्याचा लघुद्योग इम्युनो कॉम्बो आणि सॅनिटायझरचे प्रकल्प उभारून अनेकांना काम मिळवून दिले. सौम्यालाही गाव आवडले आणि गावाशी संबंधित राहण्याचा ती निर्णय घेते.

‘डिजिटलचे साम्राज्य’मध्ये डान्स मयुरी आणि क्रिकेटियर राहुल यांनी नैराश्यातून कसा मार्ग काढला. ती कथा सांगितली आहे. कोरोनानंतर मयुरीचे डान्स कार्यक्रम तसेच राहुलच्या क्रिकेटच्या टुर्नामेंट‌्स रद्द होतात. निराशेने राहुल आत्महत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न करतो. राहुलच्या मदतीला परुळेकर सर येतात. ऑनलाईन क्रिकेट ॲकॅडमीतर्फे राहुल सावरला जातो. तर मयुरी ऑनलाईन डान्स क्लासेस सुरू करते. एक कार्यक्रम स्टेजवरही परफॉर्म करते. त्यात चाहत्यांना ती मिस करते; परंतु यापुढे डिजिटल प्रणालीशिवाय पर्याय नाही हे ती मनाला पटवून देते. पंढरीच्या वारीचा अर्थ कोरोना काळातील ‘वारी पंढरीची’ ही कथा सांगते. आशाताई आणि निवृत्त मेजर अविनाश हे अनेक वर्षे पंढरीची वारी करीत असतात. मात्र, कोविड – १९च्या साथीमुळे या परंपरेला सरकारच्या बंदमुळे खंड पडला. या दाम्पत्याला नैराश्य आले.

मेधा काकूंचे चॅनेल त्यांच्या मदतीला आले. कोरानाची लागण झालेल्यांना आशाताई आणि अविनाश जेवणाचे डबे पाठवू लागले. अकस्मात मेजर अविनाश यांना कोरोरोना झाल्यामुळे टिफिनचे काम बंद होण्याची शक्यता निर्माण झाली. परंतु काही स्वयंसेवक तरुणांनी ते काम हाती घेतले. मेजर अविनाशने अनेक मुलांना प्रशिक्षित केले. आणि आशाताईंनी अनेक बायकांना काम शिकवले. यातून हजारो कुटुंबांना या जोडण्याने ‘दिशा’ दिली आणि खरी वारी म्हणजे आत्म्याचा प्रवास हे त्यांना उमगले.

या कहाण्यांचे वैशिष्य म्हणजे लेखकद्वयाने या प्रत्यक्ष अनुभवांवर लिहिल्या आहेत आणि वेगवेगळ्या कुटुंबांशी संबंधित आहेत. त्यामुळे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अशा कहाण्यांशी आपण सहज रिलेट करू शकतो. एकूण कोरोना काळातील या मार्गदर्शक कथा सर्वांचे मनोबल वाढविणाऱ्या आहेत.

पुस्तकाचे नाव – इमोझील
लेखक – डॉ. महेश अभ्यंकर/आरती भार्ज
प्रकाशक – रोहन प्रकाशन, पुणे
चित्रकार – राजू देशपांडे
पृष्ठे – १९४, मूल्य – रू. २५०
पुस्तकासाठी संपर्क – फोन ०२०-२४४८८०८६.

Related posts

पाककृती: रसगुल्ला मराठी रेसिपी (व्हिडिओ)

वर्हाडी बोल

मराठी राजभाषा दिनानिमित्त ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथेतील शब्द रत्ने..

Leave a Comment