July 27, 2024
Khajari Poetry collection book review by Priti Jagzhap
Home » नवयुवकांना दिशा देणारा झाडीबोलीतील कवितासंग्रह : खंजरी
कविता

नवयुवकांना दिशा देणारा झाडीबोलीतील कवितासंग्रह : खंजरी

कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या विचारांचे प्रसारक-वाहक असल्याने त्यांच्या या कार्यामुळे समाजातील सर्वच स्तरातील लोकांशी त्यांचा संपर्क येतो. त्या अनुभवातून ते अधिक समरसतेने व्यक्त होण्यास सक्षम झालेले आहेत असे मला वाटते शिवाय ते औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गणित ‌निदेशक आहेत. त्यांचा नवयुवकांशी संपर्क येतो. हा कवितासंग्रह नवयुवकांना दिशा देणारा आहे त्याप्रमाणे प्रबोधनात्मक आहे.

सौ. प्रिती विलास जगझाप
मु पो. बल्लारपूर जि.चंद्रपूर

“खंजेडी ! खंजेडी ! मेरी रोज बजेगी खंजेडी !! तुकड्यादास कहे, जब बजती ! पत्थर की भी छाती लजती ! गुरूकिरपा से रहे चढी !! खंजेडी!! खंजेडी!!

( राष्ट्रसंत तुकडोजी महाराज)

मानवी जीवन संगीताच्या नादमाधुर्याने मधुर झालेले आहे.अगदी आपली प्राचीन संस्कृती बघितली तरी डमरू,पावा, एकतारी ,वीणा, सतार,मृदंग, डफ इ.आणि बरेच काही संगीत साधनेच्या साहित्याने मानवी जीवन समृद्ध करण्याचे कार्य करत आहेत. मग पुरोगामी संत महात्मे, महापुरुष याला अपवाद कसे राहणार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना देखील खंजरी या वाद्याने भुरळ घातली डफली सारखी पण तिच्यापेक्षा छोटे हे चर्मवाद्य याला धातूच्या छोट्या चकत्या सारख्या अंतरावर बसवलेल्या असतात. खंजरी वाजवतांना एक रिदम तयार होते आणि सुरेल सुरावटींनी वातावरण मोहरून जाते.

पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनेक संत महापुरुषाचा मोठा वाटा आहे. त्यांनी आपल्या कवितेतून, भजनांतून, भारूडातून जनजागृतीचे, विचारप्रवर्तनाचे महान कार्य केले.यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव अग्रगण्य आहे. राष्ट्रसंतांनी जातीभेद निर्मूलन, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन व अनिष्ट रूढी परंपरेच्या निर्मूलनासाठी भजनाचा, कीर्तनाचा प्रभावीपणे वापर करून जनप्रबोधनात्मक कृतीशील कार्य केले. खंजिरी भजन हे राष्ट्रसंतांच्या भजनाचे प्रमुख वैशिष्ट्य होते. राष्ट्रसंतांच्या कार्याची प्रेरणा घेऊन गुरूदेव सेवामंडळाचे हाडाचे कार्यकर्ते ते ग्रामगीताचार्य या प्रवासात यशस्वी पणे वाटचाल करणारे बंडोपंत बोढेकर यांचा “खंजरी” हा झाडीबोलीतील एकूण छत्तीस कवितांचा हा कवितासंग्रह वाचनात आला. विदर्भातील प्राणवाहिनी वैनगंगेच्या पाण्याने समृद्ध आणि वनसंपदा लाभलेले भंडारा,गोंदिया,चंद्रपूर, गडचिरोली हे चार जिल्हे झाडीपट्टी म्हणून ओळखले जातात.या झाडीपट्टीतील विशेष लहेजा असलेली झाडीबोली सर्वसामान्य जनतेकडून बोलली जाते . त्यांच्या पर्यंत साहित्यरूपी विचार पोहचवणे हीच कवीची मनिषा आहे.

झाडीबोली साहित्य मंडळ शाखा चंद्रपूर द्वारा खंजरी कवितासंग्रहाची दुसरी आवृत्ती प्रकाशित केलेली आहे. काव्यसंग्रहाच्या नावाला साजेसे मुखपृष्ठ चित्रकार सुदर्शन बारापात्रे चंद्रपूर यांनी रेखाटलेले आहे आणि प्रत्येक कवितेंमधे आलेली साजेशी रेखाचित्रे बन्सी कोठेवार पळसगाव यांनी रेखाटलेली आहेत.

झाडीबोलीची चळवळ उभारणारे झाडीबोलीचे संशोधक डाॅ. हरिश्चंद्र बोरकर (साकोली ) यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना या संग्रहास लाभलेली आहे. इतर भाषिक वाचकाने कवितासंग्रह वाचल्यावर त्याला अर्थ लगेच कळावा म्हणून बोलीतील शब्दांचे अर्थ सुद्धा येथे दिलेले आहेत.

आज समाज कितीही सुधारलेला असला तरी एक घटक असा आहे , जो अजुनही सच्चेपणात निष्क्रीय आहे. परिसरातील साध्याभोळ्या लोकांकडून पैसे उधार घेणे, शासकीय कर्ज घेऊन परतावा न करणे, बँकांचे कर्ज घेऊन ते परत न करणे हि एक विकृती काही प्रमाणात या समाजात आढळून येते. पण सामान्यांना कितीही त्रास झाला तरी यांची पाठराखण करणारे देखील यंत्रणेत आहेत म्हणून अशा बुळवण्या लोकांचे निभत आहे.कवी म्हणतो,

” कोण करावा कटकट
अना कोरटाची पायरी चढावा पूना
आवबे लड्डू जावबे लड्डूसाटी
आपल्या खिशाले लागते चूना”(बुळवणे लोक)
आधुनिकतेच्या नावाखाली माणसाचे अधःपतन होत आहे.जनावर देखील एकमेकास “माणूस, माणूस “म्हणून चिडवतात आहे. साध्या सोप्या झाडीबोलीतील हि रचना मानवाच्या लालची प्रवृत्ती बद्दल व त्याच्या नाशिवंत शरीराबद्दल बरच काही सांगून जाते.

झाडीबोलीतील चंद्रपूर आणि गडचिरोली, गोंदिया हे जिल्हे घनदाट जंगलव्याप्त आहेत. प्रसिद्ध अभयारण्ये देखील येथे आहेत. वाघांना अभय असल्याने दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत आहे आणि मानव व वाघामधला संघर्ष देखील टोकाला गेला आहे. बरेचदा वाघ गावात येऊन पशुधनावर , मानवावर हल्ले होतात. माणसाचा जीव जातो पण एकांगी कायद्यामुळे वाघ मेला तर मानवास शिक्षा होते. बलाढ्य प्राणी, हिंस्र पशु कमजोर प्राण्यांवर राज्य करतात हे रूपक घेऊन गाय व बिबट्याचा सुरेख संवाद साधणारी मुक्तछंदातील कविता आहे

” मोटी लागलीस कलेक्टरीन जसी
माज्या वाटंल जाऊस नोको
मीई काई कच्या गुरूचा चेला नाई
कावून का माज्यासंगा सरकार आये
तुज्यासंगा कोन आये?
आये का कोनी?” (बिबट्या)
सत्य अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी. त्यांनी कृतीतून समाजप्रबोधन केले. देशभक्तीचा प्रचार प्रसार केला. बाह्य स्वच्छतेबरोबरच मानसिक स्वच्छता करण्याकडे देखील त्यांनी समाजाचे लक्ष केंद्रित केले.पण गांधी जयंती झाल्यावर त्यांनी दाखवलेल्या मार्गावर कोणीच चालत नाही हि खंत कवीने व्यक्त केलेली आहे.
महात्मा गांदी सप्याईलं पायजे
कावून का तो सप्याईच्या खिस्यामंदी रायते
गांदीलं तं सप्पाच मानतेत
पर त्याईचा कोनीच मानत नाई.(गांदीगिरी)

झाडीपट्टीतील भंडाऱ्या पासून तर वऱ्हाडातील अमरावती ते महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यापर्यंत गुरूदेव सेवा मंडळाचे काम पसरलेले आहे. बरेच लोक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना आपल्या आचरणात आणून जीवन जगतात. आणि चंद्रपूर जिल्ह्यात असलेली ” भूवैकुंठ अड्याळ टेकडी” तर ग्रामगीतेच्या ग्रामकुटूंब या अध्यायाची महान प्रयोगशाळा आहे. पूज्य श्रीगीताचार्य तुकारामदादा यांची ती पावनभूमी आहे. त्यांच्यावर आधारीत सुरेख माहितीपर कविता या संग्रहात समाविष्ट आहे.
तुमालं पूरा पूरा बरमांड समजला
देवबाबा तुकडोजी माहाराजाचा
अना मानसाचा मानवतेचा
धर्म समजला-मर्म समजला (सिरी तुकाराम दादा)

कितीही मोठा साहित्यिक असू देतं राजा असो वा रंक पण प्रत्येकाच्या जीवनात आई चे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मोजकेच लोकं भेटतात जे बापावर लिहितात . त्यातीलच एक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर आहेत. ते म्हणतात,
“मानूस मनून जगतांना
माज्या अनपड बापानं
नाई सिकवलंन मालं
जातीवाद अना धरमवाद
त्यानं सिकवला मालं
खराखुरा मानोसकीवाद (माजा बाप)
बापानं पोरांवर कोणते संस्कार करावेत याचे उत्तम आदर्श उदाहरण म्हणजे ही कविता होते.

मध्यंतरीच्या काळात ग्रामस्वच्छता अभियान हागणदारीमुक्त गाव या विविध उपक्रमांनी जोर धरला होता या शासकीय उपक्रमांमुळे बर्‍याच गावांचा चेहरा मोहरा बदलला आहे पण जेव्हा एखादी चांगल्या गोष्टीची सुरुवात होते तेव्हा असंख्य अडचणी येतात. सुरुवात आपल्याला स्वतःपासून करावी लागते . एखादा सज्जन व्यक्ती मिळाला तर या उपक्रमांना चळवळीचे रूप येते हे मात्र खरे.
कवीने अशीच एक कविता केलेली आहे. “ग्राम विकास” विविध उपक्रम राबवतांना गुरुजींचे महत्त्व देखील यात त्यांनी विशद केले आहे.
गराम विकासाची टेरनिंग
डोकस्यात भलती सिरली
आलो गावामंदी अना
गराम सभा दोन चारदा घेतली (गराम विकास)

आपण नेहमीच म्हणतो “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले” साहित्य समाजाचा आरसा असतो .साहित्यिकाने समाजातील ज्वलंत प्रश्नांवर, बुरसटलेल्या विचारावर, चालिरीतीवर, समस्येवर लिहावे आणि हे करत असतांना त्याने स्वतःदेखील समाजापुढे आदर्श वर्तन करावे हि साधी सोपी पण तेवढीच ताकदीची अपेक्षा कवींनी केलेली आहे.
जो लोकाईची सेवा करते
सोता आदर्स जीवन जगते
सत्याची पुजां तो करते
अना सप्पाईचा वाली वाटते
तोच खरा साइत्तिक (जनसाइत्तिक)

स्पर्धा, लगन ,फायरिंग, मोरामाऱ्या या कविता समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा व भीती या भावनांची सरमिसळ असणाऱ्या समाजजीवनाचे दर्शन घडवतात. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यावर त्याच्या बालपणीचे पडसाद उमटलेले असतात. आणि आयुष्याच्या कोणत्याही वळणावर आठवण अलगद येऊन आपल्याला सुखावून जाते अशीच बालरम्य कविता आहे
माज्या बालपनी
वावरी जावाचा
अना हुड्डा खावाचा
भूजून भूजून
सायकलच्या मंगा
धावाचा
हासून हासून (बालपनी)
बालपण म्हंटल की आपसूकच बालवयातील गाव देखील आठवते . जन्मभूमीप्रती अत्यंत आत्मीयतेची भावना पेलूरं गाव या कवितेतून व्यक्त केलेली आहे.
असा माज्या गावाचा गावपन
असाच हरदम रावो
या गावाची याद
माज्या ह्रदयात राहो
कुडी जावो नाई तं रावो…….!(पेलूरं गाव)

आपला भारत देश कृषिप्रधान देश आहे.गावातील विविध सणांचे वर्णन करणारी कविता देखील सुरेख आहे.
शेतकरी मायबाप राबराब राबून आपल्या मुलांना उच्च विद्याविभूषित करतात पण मोजक्याच लेकरांना याची जाणीव असते . उच्च शिक्षित झाल्यावर मुले कसे आईवडिलांना विसरून जातात हि शोकांतिका कवीने कवितेतून मांडलेली आहे.
एक दिस पोराचा संगी
आला त्याच्या घरी
अना इचारते कसा
‘अरे भाऊ हा बुडगा
कोण हो?’
त्यावर पोरगा मनते कसा
‘माज्या घरचा
सरवंट हो'(पोरफेसर)
उच्च विद्याविभूषित होऊन नोकरी मिळाली की पैसाही भरपूर येतो त्यावेळी मानूस भौतिकवादी, भोगवादी बनतो व विविध व्यसनांना बळी पडतो, वाईट संगतीचा दुष्परिणाम आपल्या आयुष्यावर कशा प्रकारे होतो याची उकल कवी पुढील प्रमाणे करतात.
तोंडामंदी आली गाटं
तरी खर्रा ना सुटं
डाॅक्टरांकडं चकरा
झाल्या सुरू
वेसनांपायी वाया गेला
तो लागला मरू (सायेब)

मानवाची आधुनिकतेकडे वाटचाल सुरू झाली आणि त्याच्या राहणीमानात घरांच्या पद्धतीत बदल झाला नेहमीच्या शेणामातीच्या लिपन आणि सारवणाची जागा फरशीने, टाईल्स ने घेतली त्याचे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होऊ लागले कवी व्यंगात्मक रित्या व्यक्त होतात.
एक दिस डोमा
सर्ररर ना घसरला
अर्रररा काय सांगू
कमरेच्या भारावच पल्ला
बायकोवर बिगल्ला
तुज्यापाई झाला वांदा
तुच मनली होतीस नां
घर बांदा(घर)
प्रचलित परीक्षा पद्धतीत होणाऱ्या काॅपी सारख्या गैरव्यवहारावर देखील कवीवर्यांनी सुरेख कविता केलेली आहे.त्याचप्रकारे समाजात हुंडा देणे आणि घेणे हि देखील एक कुप्रथाच आहे त्यावर अगदी सोप्या पण तेवढ्याच ताकदीच्या शब्दांत कवी म्हणतो,
बारावीची आली परिक्षा
पोरीबारी करतेत आरती
परसन्न होजो भोवाने मनून
चकरा मस्त मारती
रोडगा वाहिन तुलं मनती
अयीन परिक्षेच्या येरा (परिक्षा)

जो तो पईसास
नवरदेवच विकत घेवा लागते
झाला सारा मोटा गोंदळ
त्याईच्याच नाकाले दिसे सेंबळ (देज)

भारतीय संस्कृतीत दानाला अनन्य साधारण महत्त्व आहे.आणि रक्तदान हे तर सर्वश्रेष्ठ दान आहे.अतिशय सुरेख अशी रक्तदान कविता कवी म्हणतात.
रक्ततदान करा आया-बईनीनों
तुमी रकतदान करा
गावाजवरच्या दवाखान्याची
लवकर वाट धरा (रक्तदान)
त्याप्रमाणे झाडीतल्या फटाका ,आनंदभान, रिपोट, पानी, पीएचडी, या सुरेख कविता या संग्रहात आलेल्या आहेत.

कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या विचारांचे प्रसारक-वाहक असल्याने त्यांच्या या कार्यामुळे समाजातील सर्वच स्तरातील लोकांशी त्यांचा संपर्क येतो. त्या अनुभवातून ते अधिक समरसतेने व्यक्त होण्यास सक्षम झालेले आहेत असे मला वाटते शिवाय ते औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गणित ‌निदेशक आहेत. त्यांचा नवयुवकांशी संपर्क येतो. हा कवितासंग्रह नवयुवकांना दिशा देणारा आहे त्याप्रमाणे प्रबोधनात्मक आहे.
झाडीबोलीतील एक उत्तम कवितासंग्रह झाडी शब्दसाधकांसाठी निर्माण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करते. कविवर्य बोढेकर झाडीबोली साहित्य मंडळाचे एक महत्त्वपूर्ण आधारस्तंभ आहेत.

काव्यसंग्रह – खंजरी (झाडी बोली)
कवी – बंडोपंत बोढेकर
प्रकाशक – झाडी बोली साहित्य मंडळ, शाखा चंद्रपूर
मुल्य – १०० रूपये


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

लिखित आशयाचं काय करायचं ? उत्तर हवंय. मग वाचाच..पॉडकास्टिंग

आत्मज्ञानी होऊन आत्मज्ञानाची सेवा हीच भक्तीसेवा

दंडोबा टेकडीवरील फॅन-थ्रोटेड सरडे

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading