भक्त आत्मज्ञानी व्हावा. यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. या भक्ती सेवेतून मग भक्त आत्मज्ञानी होतो. आत्मज्ञानी झाल्यानंतरही त्याची सेवा अखंड सुरू असते. आत्मज्ञानी होऊनही आत्मज्ञानी गुरूंची सेवा सुरू असते. तसेच इतरांनाही आत्मज्ञानी करण्याचे कार्य सुरू असते. ही एक आत्मज्ञानाची शाळाच आहे. या शाळेत आत्मज्ञान प्राप्ती ही पदवी मिळवायची असते.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
आत्मज्ञानी होऊन आत्मज्ञानाची सेवा हीच भक्तीसेवा
ऐसें मीच होऊनि पांडवा । करिती माझी सेवा ।
परि नवलावो तो सांगावा । असे आईक ।। 196 ।। ज्ञानेश्वरी अध्याय नववा
ओवीचा अर्थ – अर्जुना, याप्रमाणें मीच होऊन ते माझी सेवा करतात, पण त्यांचा सेवा करण्याचा प्रकार आश्चर्यकारक आहे. तो सांगतो, तो ऐक.
अध्यात्म ही सेवा आहे. दीनदुबळ्यांची सेवा, दुःखी, पीडितांची सेवा, अन्यायाने ग्रस्त व्यक्तींची सेवा, आई-वडिलांची सेवा, वयोवृद्धांची सेवा. हा सर्व ईश्वर सेवेचाच एक भाग आहे. अशा सेवेतून मनावरील ताण दूर होतो. अध्यात्मात या सर्व सेवेस महत्त्व आहे. मंत्र, जप, साधना हीसुद्धा सेवा आहे. ही सेवा नित्य नेमाने करायला हवी. भगवंत प्राप्तीचा तो मार्ग आहे. दैनंदिन धकाधकीच्या जीवनात ही सेवा करण्यास वेळ मिळत नाही. म्हणून काही व्यक्ती तीन दिवसांची, आठवड्याची सुटी घेऊन मठामध्ये ही सेवा करतात.
संतांचे पुण्यतिथी उत्सव हे यासाठीच आहेत. या सेवेतून आनंद मिळतो. मन प्रसन्न होते. वर्षातून एकदा जरी ही सेवा केली. तर वर्षभर तो उत्साह भक्तांमध्ये राहातो. अशा उत्साहातून भक्तांमध्ये सेवाभाव जागृत व्हावा. हळूहळू भक्त भक्तीमार्गाला लागावा. त्याची अध्यात्मिक प्रगती व्हावी. भक्तामध्ये सद्गुरूभाव प्रकट व्हावा. हाच उद्देश सद्गुरूंचा असतो.
भक्त आत्मज्ञानी व्हावा. यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. या भक्ती सेवेतून मग भक्त आत्मज्ञानी होतो. आत्मज्ञानी झाल्यानंतरही त्याची सेवा अखंड सुरू असते. आत्मज्ञानी होऊनही आत्मज्ञानी गुरूंची सेवा सुरू असते. तसेच इतरांनाही आत्मज्ञानी करण्याचे कार्य सुरू असते. ही एक आत्मज्ञानाची शाळाच आहे. या शाळेत आत्मज्ञान प्राप्ती ही पदवी मिळवायची असते. पदवी मिळाल्यानंतर इतरांनाही ही पदवी प्राप्त व्हावी यासाठी प्रयत्न करायचे असतात. प्रत्येक भक्तास ही पदवी मिळावी यासाठी सद्गुरूंचे प्रयत्न असतात. त्या पद्धतीने त्यांचे कार्य सुरू असते. पण सर्वच भक्त ही पदवी मिळवतात असे नाही. हा लाभ एक-दोन भक्तांनाच होतो. पण इतरांना लाभ झाला नाही म्हणजे सर्व व्यर्थ आहे, असे म्हणणे योग्य नाही.
या सेवेचे अनेक लाभ आहेत. मनःशांती, मोक्ष, आरोग्य, दुःखातून मुक्ती असे अनेक अगणित लाभ या सेवेने प्राप्त होतात. आत्मज्ञान प्राप्ती हा सर्वोच्च लाभ आहे. या लाभानंतर सेवा संपते असे होत नाही. सेवा ही अखंड सुरूच असते. ही सेवेची परंपरा आहे. आदिनाथापासून ही सेवा अखंड सुरू आहे. अनादिकालापासून या सेवेत कधीही खंड पडलेला नाही. ही अनाथांना नाथ करणारी परंपरा आहे. यामध्ये अनेक नाथ झाले. त्यांना संजीवन समाधीचा लाभ झाला. ते आजही भक्तांना अनुभव देत आहेत. अनुभवातूनच ते भक्तांची प्रगती साधत आहेत. भक्ती सेवेचा हा मेळावा महाराष्ट्रात सर्वत्र पाहायला मिळतो.