आणि पारगड पुन्हा सजला.. 🚩🚩
परकीय सत्तांच्या गुलामगिरीत पिचलेल्या स्वराज्याला मुक्त करणाऱ्या छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी स्वराज्याचा आणखीन एक वारसदार पुन्हा सजला.
नैसर्गिक ताशीव कडा आणि नरवीर तानाजी मालुसरे यांचे सुपुत्र रायबा मालुसरे यांची किल्लेदारी असलेला स्वराज्यातला पार टोकाचा किल्ला पारगड.

सुर्यनारायणाने दर्शन दिले आणि गडावर लगबग सुरू झाली. काकड आरतीने सोहळ्याला सुरुवात झाली. स्वाभिमानाने भगवा फडकला, उधळलेल्या भंडाराऱ्याने संपूर्ण आसमंत पिवळया रंगात न्हाऊन निघाला. या सह्याद्रीच्या कड्या कपारीला ऐकू जाईल असा जय भवानी जय शिवाजी चा निनाद गडावर घुमू लागला.
पारंपारिक वाद्ये अजुन जास्त जोशात वाजू लागली. गडावर भगवं वादळ वाहू लागलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी निघाली. आई भवानीचा भव्य मंडप सजला. दर्शन झाल आणि सभागृहात सगळे शिवभक्त जमा झाले. डफली वर थाप पडली आणि शाहीरांचा आवाज घुमु लागला. यादवांच्या काळापासून सुरू झालेल्या पोवाड्याची सुरेल सुरुवात राज्याभिषेकाच्या दिमाखदार सोहळ्यावर येऊन थांबली. दामिनी प्रमाणे लवलवणाऱ्या तलवारीचे तांडव सुरू झाले. लाठीकाठी आणि अनेक मर्दानी खेळांनी डोळे दिपून टाकले. आणि आता ती वेळ आली.. मुहूर्त सजला. भटजी आले. ताम्हणात महाराजांची बैठी प्रतिमा आरूढ झाली.

मंत्रोच्चारांच्या घोषात अभिषेक सुरू झाला. अभिषेकासाठी लागणाऱ्या त्या पवित्र जलाचा प्रत्येकाला हस्तस्पर्श झाला आणि राज्याभिषेकाच अप्रूप सर्वांच्या चेहऱ्यावर दाटून आलं. आरती झाली.
आस्ते कदम……
गारदीने गारद दिली आणि जयघोषाने पुन्हा गड दुमदुमून गेला. अभिषेक संपन्न झाला, राजे स्थानापन्न झाले. रयतेचे राजे छत्रपती झाले. स्नेहभोजनाच्या पंगती उठल्या आणि दोन दिवसापासून सुरू असलेला हा ३४८ वा राज्याभिषेक दिन सोहळा मजरे कारवे येथील शहीद जवान वेलफेअर फाऊंडेशन व ग्रामस्थ मंडळ पारगड यांच्यावतीने पारगडावर मोठ्या दिमाखात साजरा झाला.
पारगडच्या संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ पहा –






पारगडावर शिवराज्याभिषेक सोहळा






















1 comment
पारगडावर तानाजी मालूसरे,शेलार यांचे वंशज रहातात.पैकी मालूसरे यांचे घरातील देव्हारया वर जूने टाक व तलवारी पहावयास मिळतात.