September 15, 2024
A proper diet essential for good health
Home » उत्तम साधनेसाठी हवा योग्य आहार
विश्वाचे आर्त

उत्तम साधनेसाठी हवा योग्य आहार

काहीतरी पोटासाठी खावे म्हणून आहार केला जातो. याचा परिणाम शरीर, मन आणि बुद्धीवरही होतो हे लक्षात घ्यायला हवे. शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आवश्यक भाजीपाला, फळे यांचा आहारात समावेश असायला हवा.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

तैसे एकमेकां सळें । रोग उठती एकेवेळे ।
ऐसा राजसु आहारु फळे । केवळ दुःखे ।। १५१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा

ओवीचा अर्थ – त्याप्रमाणें एकमेकांच्या स्पर्धेने एकदम रोग उठतात ( उत्पन्न होतात ) अशारितीनें रजोगुणी आहारानें केवळ दुःखरुप फळ प्राप्त होते.

सदृढ आरोग्यासाठी आहाराचे महत्त्व आहे. धकाधकीच्या जीवनात आहारही धावपळीतच घ्यावा लागतो आहे. बाहेर कोठेही काहीही खाणे होते. संतुलित आहार हा नियम पाळणे अशक्य झाले आहे. हे जरी खरे असले तरी संतुलित आणि ताजा आहार हाच निरोगी आरोग्यासाठी आवश्यक आहे हे लक्षात घ्यायला हवे. बदलत्या जीवनशैलीत हा नियम पाळणे महत्त्वाचेच आहे.

किमान ४० घटक रोजच्या आहारात हवेत असे तज्ज्ञ सांगतात. धान्य, डाळी, भाज्या, फळे, दूध, दही, ताक, तेल, तुप यातून हे आवश्यक घटक मिळतात. पण आहार केवळ पोट भरण्यासाठी केला जातो. काहीतरी पोटासाठी खावे म्हणून आहार केला जातो. याचा परिणाम शरीर, मन आणि बुद्धीवरही होतो हे लक्षात घ्यायला हवे. शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आवश्यक भाजीपाला, फळे यांचा आहारात समावेश असायला हवा. पण त्याबरोबरच योग्य आहारही घ्यायला हवा हे लक्षात घ्यायला हवे. कोरोना विषाणूने आपणास रोगप्रतिकारक शक्ती उत्तम ठेवण्यासाठी चांगलाच धडा दिला. यानंतरतरी आता यातून धडा घ्यायला हवा.

शिळे अन्न खाणे हा तामस आहार आहे. अशा अन्नाने आपले पोट जरूर भरते पण रोग उत्पन्न होतात. बदलत्या जीवनशैलीमुळे शिजवलेले ताजे ताजे गरम गरम अन्न वेळेवर मिळणे कठीण झाले आहे. ताजे अन्न न मिळणे, ताजा भाजीपाला न मिळणे, फळे-दुधाचा वापर कमी अशामुळे आरोग्यसाठी आवश्यक अन्न घटकांची कमतरता जाणवते. मुळात रोग बळावण्याचे हेच मुख्य कारण आहे. यासाठी आहाराची दैनंदिनी तयार करण्याची गरज आहे.

पोषक आहाराचे महत्त्व लक्षात घेऊन तशी जीवनशैली तयार करणे गरजेचे आहे. फास्टफुजच्या जमान्यात सर्वच वेगात होते आहे. यामुळे आजारही एकदम उत्पन्न होतात याकडे लक्ष द्यायला हवे. शरीर, मन आणि बुद्धीवर परिणाम न करणारा आहार सेवनावर भर द्यायला हवा. आहाराची स्पर्धा कधीही घातक. अति आहार घेणेही घातक ठरू शकते. आपल्या आवश्यकतेनुसार योग्य तो अन् योग्य तेवढाच आहार घेणे उत्तम. साधनेसाठी मन, बुद्धी अन् शरीर तिन्ही उत्तम असणे गरजेचे असते तरच साधना व्यवस्थित होते. आहाराचा परिणाम या तीनही गोष्टीवर होत असल्याने प्रथम आहाराचीच काळजी घ्यायला हवी. दुःख देणाऱ्या आहाराचे सेवन टाळावे.

या संदर्भात कॅलिफोर्निया विद्यापीठात सॅन फ्रान्सिस्को येथील संशोधकांनी आहार आणि व्यायाम कार्यक्रमासह माइंडफुलनेस प्रशिक्षण देऊन मानवी आरोग्यावर काय परिणाम होतात यांचा अभ्यास केला. या संशोधकांच्या मते, उच्च तणाव पातळी, बैठी जीवनशैली आणि स्वस्त उच्च-कॅलरी खाद्यपदार्थांची उपलब्धता याचा अर्थ असा आहे की बेफिकीर खाण्याची सवय लागणे सोपे आहे. आपण अनेकदा भूक लागली म्हणून जास्त खातो असे नाही, तर अन्न दिसायला किंवा चवदार असल्यामुळेही आपण विचलित होतो किंवा आपल्याला अप्रिय संवेदना दूर करायच्या आहेत तेव्हा आपण जास्त खातो. हे जास्त खाणे नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. यावर अभ्यास करण्यासाठीच नियत्रित आहार जीवनशैलीचा प्रयोग या संशोधकांनी केला. साडेपाच महिन्यांच्या या संशोधन कार्यक्रमात सजग खाण्याच्या व्यायामाव्यतिरिक्त, ध्यान, योगासने, श्वासोच्छवासाचे व्यायाम आणि “प्रेमळ दयाळूपणा” याचेही प्रशिक्षण देण्यात आले. ज्यामध्ये “स्वतःसाठी आणि इतरांबद्दल प्रेम आणि दयाळूपणाची भावना सक्रियपणे विकसित होते.” असे प्रयोग करण्यात आले. कार्यक्रम सुरू केल्यानंतर अठरा महिन्यांनंतर, संशोधकांना असे आढळले की माइंडफुलनेस गटातील सहभागींमध्ये नियंत्रण गटातील लोकांच्या तुलनेत रक्तातील साखरेची पातळी सरासरी 4.1 mg/dl ने कमी होती. याव्यतिरिक्त त्यांचे ट्रायग्लिसराइड/एचडीएल प्रमाण नियंत्रण गटापेक्षा अंदाजे 0.36 कमी होते. मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका असलेल्या लोकांमध्ये ही कपात प्रभावी ठरू शकते,असे मत संशोधकांनी या संशोधनात नोंदविले आहे. यातून असे स्पष्ट होते की उत्तम आरोग्यसाठी योग्य व प्रमाणबद्ध आहार आवश्यक आहे. 


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

वातावरणीय बदल परिषदेची स्थापना करण्याचा निर्णय

शिल्पकार सोनाली पालव : शाश्वत सत्याचा शोध

उत्कृष्ट संसदपटू ‘विधीज्ञ’ बापूसाहेब परुळेकर

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading