साधनेत मनाने या सर्व वायूवर नियंत्रण मिळवता येते. या वायूंचे कार्य सुधारते साहजिकच आरोग्यही सुधारते. यासाठी नित्य साधना ही गरजेची आहे. मन सोहममध्ये यासाठी गुंतवायला हवे. चपळ मनाने तो स्वर सोहमचा स्वर पकडायचा आहे.
राजेंद्र घोरपडे
मोबाईल – 9011087406
प्राणाचां घरीं । अंगें राबतें भाऊ चारीं ।
आणिं मना ऐसा आवारीं । कुळवाडीकरु ।। २८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा
ओवीचा अर्थ – कारण प्राणाच्या घरी अंगाने मेहनत करणारे चार भाऊ ( अपान, व्यान, उदान व समान हे चार वायू ) आहेत. आणि मनासारखा (चपळ कारभारी) शेतीचा कारभार करणारा आहे.
प्राण आणि मन हे दोन्ही कसे आहेत हे जाणून घ्यायला हवे. मन चपळ आहे. सदैव इकडून तिकडे धावत असते. रात्र असो वा दिवस त्याला काही त्याची काळजी नसते. शेतकरी सुद्धा दिवस-रात्र राबत असतो. मनासारखी चपळता शेतकऱ्यांत असते. शेतीचा कारभारी हा चपळ असणे गरजेचे आहे. तितकी उर्जा त्याच्यामध्ये आहे. मन कधी इथे असते तर दुसऱ्या क्षणी ते तिथे असते. काही काम करत असलो तरी मन त्यात असते व त्याचवेळी अन्य काही विचार त्याच्यात घोळत असतात. शेतकरी सुद्धा शेतात असाच राबत असतो. इकडून-तिकडे नुसता धावत असतो. शेतकऱ्यांचे कष्ट, मेहनत यामुळे पिकांचा बहार फुलतो. मनाच्या चपळतेत सोहमचा सदैव ध्यास असेल तर निश्चितच आत्मज्ञानाचा बगीचा फुलणार. हे झाले मन.
शरीरातील वायूंचा अभ्यास
आता प्राण काय आहे हे जाणून घेऊया. प्राण हा वायू आहे. तो एकटा नाही. त्याच्या सोबत त्याचे चार भाऊ आहेत. अपान, व्यान, उदान आणि समान हे चार भाऊ त्याच्या सोबत आहेत. क्षेत्र म्हणजे शरीर. या शरीरात त्यांचे वास्तव्य आहे. या प्रत्येकाचे कार्य आपण जाणून घ्यायला हवे. वायूची का गरज आहे.? ते या शरीरात कोणते महत्त्वाचे कार्य करतात ? याचा अभ्यास करण्याची गरज आहे.
अपान वायू
अपान हा खाली जाणारा वायू आहे. शरीरातील रसात असतो. मोठ्या आतड्यामध्ये राहतो. मुलमुत्राचे विसर्जन करतो.
व्यान वायू
व्यान हा वायू सर्व शरीरात व्यापून असतो. हा वायू संपूर्ण शरीरात घुमतो. या वायूच्या प्रभावामुळे रस, रक्त तसेच अन्य जीवनोपयोगी तत्त्वे शरीरात वाहते राहतात. हा वायू नसेल तर शरीरातील सर्व क्रिया थंड पडतात. त्यानंतर शरीरात रोगाचा प्रसार होतो.
उदान वायू
उदान हा वर जाणारा वायू आहे. हा स्नायूतंत्रात असतो. कंठात राहातो व अन्न रसाचे विभाजन करतो.
समान वायू
समान हा संतुलन ठेवणारा वायू आहे. हाडांमध्ये संतुलन ठेवण्याचे कार्य तो करतो. हा नाभी कमलात राहातो तसेच तो सर्व नाड्यांना अन्नरस पुरवतो.
प्राण वायू
या चारही वायूंचा भाऊ प्राण. प्राणामुळे शरीराची हालचाल होत राहाते. या वायू मुख्यतः रक्तात असतो आणि हृदयात राहातो व श्वासोच्छवास करत राहातो. म्हणजेच हे पाचही वायू आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. अशा या वायूवर नियंत्रण आपण मिळवू शकलो तर आपण आपले आरोग्य निश्चितच टिकवून ठेऊ शकतो. यासाठी चपळ आणि चंचल मनाला याकामी लावायला हवे. मनाने तसा दृढ निश्चय करायला हवा. यासाठीच मनात साधनेचा विचार व्हायला हवा.
सोहम साधनेची गरज
मनाने साधना करायला हवी. मन साधनेत रमवायला हवे. साधना म्हणजे काय तर सोहम. श्वास आत घेण्याची व बाहेर सोडण्याची क्रिया यावर आपले लक्ष केंद्रिय करायचे. मन त्या स्वरात गुंतवायचे. म्हणजेच मन प्राणात गुंतवायचे. म्हणजे प्राणाची आपणास ओळख होईल. मी कोण आहे याची प्रचिती येईल. मी शरीर नाही याची अनुभुती येईल. मग मी कोण आहे ? मी आत्मा आहे याची ओळख होईल. आत्मा व शरीर वेगळे आहे याची अनुभुती येईल. ही अनुभुती नित्य ठेवणे म्हणजेच आत्मज्ञानी होणे. हीच साधना आपण साधायची आहे. नित्य त्याची अनुभुती घ्यायची आहे आणि या अनुभुतीने आपण स्वतःला आत्मज्ञानी करायचे आहे. ब्रह्मसंपन्न करायचे आहे.
सोहम बिजाची साधना
साधनेत मनाने या सर्व वायूवर नियंत्रण मिळवता येते. या वायूंचे कार्य सुधारते साहजिकच आरोग्यही सुधारते. यासाठी नित्य साधना ही गरजेची आहे. मन सोहममध्ये यासाठी गुंतवायला हवे. चपळ मनाने तो स्वर सोहमचा स्वर पकडायचा आहे. सद्गुरुंनी दिलेल्या त्या बिजाला खत पाणी घालून वाढवायचे आहे. त्या बिजातूनच मग आत्मज्ञानाचा अंकुर फुललो. तो वाढवायचा आहे. त्याची जोपासना करायची आहे. त्या बीजातून उत्पन्न झाडाला येणारी ब्रह्मसंपन्नतेची फळे चाखायची आहे. यासाठी सोहम स्वराच्या आनंदात डुंबायचे आहे. तरच हे सर्व साध्य होणार आहे.