June 18, 2024
Home » तेही एक एक आघवे । चित्रिचे सिंहाडे मानावे । जैसे बोलोनि हाते घ्यावे । पुसोनियां ।। ( एकतरी ओवी अनुभवावी )
विश्वाचे आर्त

तेही एक एक आघवे । चित्रिचे सिंहाडे मानावे । जैसे बोलोनि हाते घ्यावे । पुसोनियां ।। ( एकतरी ओवी अनुभवावी )

कोणतेही युद्ध मनाने प्रथम जिंकायचे असते. मनात तसा विचार निर्माण करायचा असतो. अध्यात्माचा विकास साधायचा असेल तर आपण मनाने तशी तयारी करायला हवी.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

 तेही एक एक आघवे । चित्रिचे सिंहाडे मानावे । 

जैसे बोलोनि हाते घ्यावे । पुसोनियां ।। 474 ।। अध्याय 11 वा

ओवीचा अर्थ – ते देखिल एक एक पाहिले तर सर्वत्र भिंतीवर काढलेल्या सिंहाच्या चित्रासारखे ओल्या हाताने पुसून घेण्यास योग्य आहेत, असे समज.

युध्दभुमीवर योध्द्याला कसे प्रोत्साहन द्यायचे हे ज्ञानेश्वरीतून समजून घ्यायला हवे. शत्रूला कधीही मोठे मानायचे नाही. त्याचे भय कधीही घ्यायचे नाही. शत्रूला आपण जितके मोठे समजू तितके आपण कमजोर होतो. कारण आपली मानसिकता अशा विचाराने खचली जाते. मनामध्ये शत्रूचे भय कधीही ठेवायचे नाही. आपणाला त्याला निश्चित हरवू शकु असा आत्मविश्वास आपल्यामध्ये कायम ठेवायचा असतो. अशाने आपली मानसिकता प्रबळ होते. मन दुबळे करून कधीही शत्रूवर मात करता येत नाही.

आपण त्याला सहज हरवू असा भाव ठेवून मनाला प्रोत्साहित करायचे असते. तरच आपण शत्रूसमोर टिकू. युध्दात शत्रूला आपण कमजोर समजून आपल्या मनाला बळकट करू तितके आपण आत्मविश्वासाने त्याच्यावर मात करू शकतो. मन दुबळे करून, घाबरून शत्रूवर मात करता येत नाही. मनाला नेहमी आनंदी आणि धिट ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. शत्रूला इतके दुबळे समजायचे की आपण एखादे फळ्यावर काढलेले चित्र जसे सहज पुसून टाकू शकतो. इतक्या सहजतेने आपण या शत्रूवर मात करू शकतो. अशी मानसिकता आपण ठेवायची असते. युध्द भुमीवर अशी मानसिकता आपली असेल तर आपण अर्धी लढाई येथेच जिंकल्यासारखे आहे.

आपणाला एखादा आजार झाला आहे अशी मानसिकता आपण ठेवली तर आपणाला काहीही आजार नसतानाही आपण आजारी पडतो. कारण आपल्या विचाराचा आपल्या शरीरावर, आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. कोणतेही युद्ध मनाने प्रथम जिंकायचे असते. मनात तसा विचार निर्माण करायचा असतो. अध्यात्माचा विकास साधायचा असेल तर आपण मनाने तशी तयारी करायला हवी. आपले मन साधनेत रमवायला हवे. हे मला जमणार नाही. हे मला शक्य होणार नाही. ही मानसिकता आपण सोडायला हवी. प्रयत्न करत राहायचे असते. प्रयत्न सोडायचा नाही. प्रयत्नच केला नाही. जमणार नाही म्हणून बसून राहीलो तर आपण कधीच प्रगती साधू शकणार नाही. अध्यात्माची आवड असेल तर अध्यात्म काही अवघड नाही. स्वःची ओळख म्हणजे अध्यात्म. इतका सोपा अर्थ आहे.

मी कोण आहे ? याचा शोध घेणे म्हणजे अध्यात्म. खरे तर अध्यात्मात स्वतःचाच विकास साधला जातो. साधना जमत नाही म्हणून सोडून देणे म्हणजे युद्धातून पळून जाण्याचा प्रकार आहे. एकदा चुकेल दोनदा चुकेल. मी तर म्हणतो शंभरदा चुकेल. पण त्यानंतर तरी जमेल ना. जमणार नाही ही मानसिकता सोडली तर एका क्षणात आपणास सर्व काही हस्तगत होईल. हे लक्षात ठेवायला हवे. अध्यात्म विकास हा युद्ध भुमीवरील योद्धा सारखाच आहे. तशीच प्रबळ मानसिकता ठेवायची असते. अध्यात्म विकास हा आपल्या शरीराशी केलेले एक युद्धच आहे. आत्मज्ञान प्राप्तीसाठी स्वतःशी केलेले हे युद्ध आहे. तशी प्रबळ मानसिकता आपण ठेऊन या देहाशी आपण झगडायचे आहे. तरच आपण अध्यात्मिक विकास करू शकू. 

संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा अभ्यास एक तरी ओवी अनुभवावी असा या ग्रुपचा उद्देश आहे. मग होताय ना सहभागी..त्यासाठी लिंकवर क्लिक करा.
 https://www.facebook.com/groups/ShriDnyneshwariStudy

Related posts

स्व:च्या ओळखीतूनच विश्वाचे ज्ञान

गुरुंनी दाखवलेल्या वाटेवरच खरा आत्मिक आनंद

श्री ज्ञानेश्वरीतील पाणी व्यवस्थापन विचार…वाचा सविस्तर

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406