July 27, 2024
The establishment of Sant Vichar Pitha will be a historical landmark in the future
Home » ‘संत विचार पिठाची’ स्थापना पुढील काळात ऐतिहासिक ठरावी
काय चाललयं अवतीभवती

‘संत विचार पिठाची’ स्थापना पुढील काळात ऐतिहासिक ठरावी

साने गुरुजींनी पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून उपोषण केले. त्या उपोषणाला यश आल्यामुळे दलित, बहुजनांना दर्शन मिळू लागले. त्यांनी समाजातील अमानवीयता मिटविण्यासाठी आयुष्यभर कार्य केले.

मेधा पाटकर

पंढरपूर येथील ‘संत विचार पिठाची’ स्थापना ही पुढील काळात ऐतिहासिक ठरावी अशी कृती आहे, जी ९ मे २०२४ रोजी मेधा पाटकर यांच्या हस्ते उद्घाटन होवून प्रत्यक्षात अमलात आली.
महाराष्ट्रातील वारकरी परंपरा ही मूलतः सामाजिक सुधारणेची म्हणजेच अन्याय, विषमता निर्मूलनाची चळवळ आहे.

जनतेची भावनिक, अध्यात्मिक गरज लक्षात घेऊन तिच्यामार्फत प्रबोधनाची, जागृतीची भूमिका निभावण्याचे काम तिने सातशे वर्षे नेटाने केले. श्रीसंत शिरोमणी नामदेव महाराज, श्रीसंत जनाबाई, संतश्रेष्ठ ज्ञानेश्र्वर महाराज, श्रीसंत चोखोबाराय, जगद्गुरू तुकाराम महाराज, श्रीसंत सावता महाराज, श्रीसंत सोयरा, श्रीसंत गोरोबा इथून सुरु झालेली ही चळवळ अगदी अलीकडे म्हणजे विसाव्या शतकात संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यापर्यंत कार्यरत होती. या नावात अनेकांची भर टाकता येईल.

स्वातंत्र्यानंतर मात्र या चळवळीचा संकोच झाला. आध्यात्मिक क्षेत्रातील प्रबोधनाचे काम जवळजवळ ठप्प झाले. बुवाबाजी सोकावली, चमत्कार, अंधश्रद्धानी डोके वर काढले. जन सामान्यांच्या प्रबोधनाचे हे एक मोठे क्षेत्र सनातनी मंडळींनी आपल्या ताब्यात घेतले. त्याचे सामाजिक, राजकीय परिणाम आज आपण भोगत आहोत.

या क्षेत्राचे समाजातील स्थान लक्षात घेऊन काही पुरोगामी मंडळींनी गेली दहा-बारा वर्षे अथक परिश्रम घेऊन महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी पंढरपूर येथे ‘संत विचार पीठ’ स्थापन केले. निमित्त होते साने गुरुजींनी केलेल्या मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या स्मारकाच्या उभारणीचे. पंढरपूर येथे श्री कैकाडी महाराज आणि श्री तनपुरे महाराज हे दोन असे मठ आहेत की ,ज्यांनी समतेचा विचार या प्रतिकूल परिस्थितीत सतातत्याने जोपासला.

पंढरपूर येथे आयोजित संत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशनचे अध्यक्ष हनुमंत बागल होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक राणा, संजय गोपाल, विजय दिवाणे, राजन इंदुलकर आदी उपस्थित होते.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून साने गुरुजींनी १ मे ते १० मे १९४७ या दरम्यान श्री तनपुरे महाराज मठात प्राणांतिक उपोषण केले होते. याच मठात साने गुरुजींच्या या लढ्याचे स्मारक दोन वर्षांपूर्वी उभे राहीले. याच प्रक्रियेतील पुढचे पाऊल संत विचार पिठाच्या उभारणीचे ठरले आहे. गेली सलग तीन वर्षे पंढरपूरमधील स्वेरी, स्वाईप या शिक्षण संस्था तसेच श्री तनपुरे महाराज आणि श्री कैकाडी महाराज मठात संमेलने पार पडली.

भारत जाधव महाराज, बद्रिनाथ महाराज तनपुरे, दादासाहेब रोंगे, राजाभाऊ अवसक, ज्ञानेश्वर बंडगर महाराज, निशिकांत परचंडराव, शिवाजी शिंदे, सारंग कोळी तसेच पुरोगामी किर्तनकार श्यामसुंदर सोन्नर महाराज यांनी तसेच इतर अनेकांनी या अत्यंत महत्वपूर्ण प्रक्रियेत पुढाकार घेतला.

संत विचार पिठाचे मुख्य कार्य समता, बंधुता, स्वातंत्र्य तसेच विवेकनिष्ठ विचाराचे प्रबोधन जनसामान्यांमध्ये करणे हे असणार आहे. या वाटचालीला महाराष्ट्रातील पुरोगामी संस्था, संघटना, विचारवंतांचे सहकार्य मिळणे नितांत गरजेचे आहे. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक तसेच राष्ट्र सेवा दलाचे ठिकठिकाणचे स्थानिक गट यांनी या भूमिकेतून पुढाकार घेतला आहे. इतरानीही तो घ्यावा जेणेकरून ही वाटचाल अधिक मजबूत आणि समृद्ध होईल.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

हरीत क्रांतीचे जनक : स्वामीनाथन !

शिष्याने गुरूला लिहिलेले पत्र

पक्षांतरबंदी कायद्याचा अभ्यास कमी पडला…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading