सदैव मनुष्य हा लहरींच्या तणावाखाली वावरत आहे. ध्वनीच्या लहरी, मोबाईलच्या लहरी, विविध तरंगाच्या लहरी, कृत्रिम वाऱ्याच्या लहरी अशा विविध लहरींनी आपले स्वास्थ बिघडत आहे. मानसिकताच बदलत चालली आहे. सदैव मन या लहरींनी विचलित होत आहे. आधिच चंचल असणारे हे मन या लहरींनी अधिकच चंचल झाले आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
प्रेमाची पेटी । बांधली एकाच्या पोटी ।
मग आणिले तटी । सायुज्याचा ।। ९२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा
ओवीचा अर्थः एकाच्या पोटी प्रेमाची पेटी बांधली आणि मग त्यास मोक्षाच्या काठावर आणले.
प्रेमाचे चार शब्द एखाद्याच्या जीवनात मोठा बदल घडवू शकतात. इतकेच प्रेमाने हे सर्व जग जिंकता येऊ शकते. पण आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रेमाचे चार शब्दही कानावर पडणे कठीण होऊन बसले आहे. आजकाल इंटरनेटवर एका क्षणात सर्व काही उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे प्रेमावर वाट्टेल तितके साहित्य वाचायला मिळू शकते. इतकेच काय तर प्रेमाची गाणीही सहज उपलब्ध होऊ शकतात. पण हे सर्व कृत्रिम प्रेम आहे. प्रत्यक्ष जीवनात मात्र असे फारच क्वचित घडताना पाहायला मिळत आहे. कामावरून परतल्यानंतर घरात चार प्रेमाच्या गोष्टी होऊ शकतील अशी परिस्थिती आज फारच क्वचित अनुभवास येते. व्यस्त जीवनशैलीमुळे प्रेमाचा संवादच होऊ शकत नाही. दररोज काहीं-ना-काही तरी वेगळेच चित्र आपल्यासमोर उभे राहात असते. अनेक प्रश्न, समस्या भेडसावत असल्याने प्रेमाचा संवादच जीवनातून नष्ट झाला आहे असे वाटते. अशाने आपली मानसिक स्थितीही बिघडू लागली आहे. यासाठी आता खरी गरज आहे ती घराघरात प्रेमाचा संवाद घडवण्याची. प्रत्येकाच्या जीवनात प्रेमाचा वर्षाव करण्याची. तरच जीवन खरे सुखी होऊ शकेल. यासाठीच साने गुरुजी यांनी जगाला प्रेम अर्पावे असे म्हटले असावे. सर्व जग प्रेमाने भरून टाकावे असे स्वप्न त्यांनी पाहीले असावे.
आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक लहरींनी आपले मन हे विचलित होत आहे. क्षणक्षणाला निर्माण होणाऱ्या या विविध लहरींनी आपल्या मनाचे प्रदुषण होत आहे. अशा लहरींच्या कंपनामुळे मनाची स्थिरताच भंग पावली आहे. मनावर होणारा हा लहरींचा परिणाम आपल्या शरीरावर, आपल्या आरोग्यावर होऊ लागला आहे. सदैव मनुष्य हा लहरींच्या तणावाखाली वावरत आहे. ध्वनीच्या लहरी, मोबाईलच्या लहरी, विविध तरंगाच्या लहरी, कृत्रिम वाऱ्याच्या लहरी अशा विविध लहरींनी आपले स्वास्थ बिघडत आहे. मानसिकताच बदलत चालली आहे. सदैव मन या लहरींनी विचलित होत आहे. आधिच चंचल असणारे हे मन या लहरींनी अधिकच चंचल झाले आहे. मानसिक आजार यामुळेच वाढीस लागले आहेत. यावर उपाय शोधण्याची खरी गरज आहे. साधना हा त्यावरील उपाय होऊ शकतो. पण आपण दिवसभर साधना करू शकत नाही. काही ठराविक वेळ आपण साधना करू शकू. पण साधनेतही या लहरींचा व्यत्यय हा होत राहातोच. साधनेतून या लहरींवर विजय मिळवता येईल पण साधनेसाठी किती वेळ देणार हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. लहरींपासून निर्माण झालेल्या मानसिक तणावावर साधनेचा जरूर उपाय करावा. यामुळे सकारात्मक बदल जीवनात घडू शकतात. पण त्यालाही मर्यादा आहेत. यासाठी या लहरींना रोखू शकणारा उपाय शोधावाच लागेल.
मोबाईलच्या लहरींना जामरने रोखता येऊ शकते. ठराविक कक्षा जामरने लहरीमुक्त करता येऊ शकते. म्हणजे या लहरींचा व्यत्यय आपणास त्या ठराविक कक्षेत होऊ शकत नाही. तसा जामर आपण आपल्या जीवनात प्रेमाने निर्माण करू शकतो. प्रेमाची पेटी बांधून या लहरीवर प्रेमाच्या संवादाने रोखता येऊ शकते. जीवनातील सर्व प्रकारच्या लहरींचे प्रदुषण रोखण्यासाठी प्रेमाची पेटी आपण आपल्या गळ्यात बांधायला हवी. गळ्यातून प्रकट होणारा प्रत्येक शब्द हा प्रेमाचा असेल तर आपण या लहरींना रोखू शकतो. प्रेमाने माणसाचे मन बदलते. मनामध्ये आनंद उत्पन्न होतो. प्रेमाच्या या आनंदाने जीवनात सुख, शांती, समाधान आणता येऊ शकते. प्रेमाच्या या पेटीमुळे जीवनाच्या प्रवासात बुडण्याची भितीही नष्ट होते. भीती गेल्याशिवाय पोहता येत नाही. पोटाला बिंडा किंवा डबा बांधला आहे तोपर्यंत आपणाला बुडण्याची भिती नसते. बिंडा बांधून, डबा बांधून पोहण्याचा सराव केला जातो. तसे प्रेमाची पेटी बांधून जीवनाच्या प्रवासात पोहण्याचा सराव करावा. एकदा का प्रेमाने पोहता आले म्हणजे पुन्हा बिंडा बांधण्याची गरज भासणार नाही.
सोहम ही सुद्धा एक स्वराची लहरच आहे. ही लहर आपण पकडायला शिकायचे आहे. जीवनाच्या प्रवासात सोहमची ही लहर आपण प्रेमाने बांधून ठेवायची आहे. पकडायची आहे. जीवनाच्या प्रवासात ही लहर आपणास पकडता आली तर आपणाला मोक्षाचा किनारा निश्चितच गाठता येऊ शकेल. यासाठी प्रेमाने ही लहर पकडायला हवी. प्रेमाने हे जीवन सुखमय करायला हवे. यासाठीच स्वतःसह इतरांवर प्रेम करायला शिकले पाहीजे. प्रेम हे आपल्या जीवनात आनंदाची लहर उत्पन्न करते. सर्व प्रदुषणाच्या लहरी या आनंदाने नष्ट होतात. यासाठीच प्रेमाची पेटी बांधून जीवनाच्या प्रवासात पोहता यायला हवे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.