कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनाच्यावतीने महर्षी शिंदे आणि सर्वसमावेशक भारताची संकल्पना यावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. यामध्ये अनेक मान्यवर वक्ते, तज्ज्ञ, अभ्यासक सहभागी झाले होते. इतिहासातील अनुभवातून अन् महापुरुषांच्या व्यक्तिचरित्रातून सध्या देशात भेडसावणाऱ्या ज्वलंत अन् विविध प्रश्नांवर उपाय, पर्याय पुढे यावेत या दृष्टीने अशा राष्ट्रीय चर्चासत्राचे महत्त्व निश्चितच आहे. यातून एक वेगळी दिशा भावीपिढीला निश्चितच मिळू शकेल यादृष्टीने अशा परिषदांकडे पाहायला हवे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, डॉ. व्ही. एन. शिंदे, डॉ. पी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनासाठी अध्यासनाचे प्रमुख प्रा. रणधीर शिंदे आणि मराठी विभागाचे प्रमुख नंदकुमार मोरे यांनी भरवलेल्या चर्चासत्रामध्ये महर्षी शिंदे यांच्या कार्यावर विविध अंगांनी प्रकाश टाकण्यात आला. महर्षी शिंदे यांनी हाताळलेले प्रश्न हे भारताचे मुलभुत प्रश्न होते आणि यातील अनेक प्रश्न आजही स्वतंत्र भारतात सुटलेले नसल्याने हे चर्चासत्र निश्चितच एक दिशादर्शक झाले असेच म्हणावे लागेल.
किशोर बेडकिहाळ यांचे बीजभाषण ऐकण्यासाठी ऑडिओवर क्लिक करा…
बीजभाषणामध्ये किशोर बेडकिहाळ यांनी महर्षी शिंदे यांना महात्मा गांधी यांच्याप्रमाणे सर्वधर्मसमभाव अपेक्षित असल्याचे सांगितले. सहिष्णुता अन् राजकारणाला एक अध्यात्मिक अधिष्ठान महर्षींना अभिप्रेत होते. राजकारणाचे आध्यात्मिक अधिष्ठान सुटल्यामुळेच अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत असे महात्मा गांधी यांच्याप्रमाणे महर्षी मानत, असे बेडकिहाळ म्हणाले. आजची देशातील परिस्थितीही काहीशी अशीच आहे. अध्यात्माच्या, धर्माच्या नावावर राजकारण केले जात आहे. पण प्रत्यक्षात अध्यात्म आणि धर्म समजला नसल्यामुळे सर्वत्र गोंधळ पाहायला मिळत आहे. राजकारणासाठी या धर्माच्या भावनिक मुद्यांचा वापर केला जात आहे. प्रत्यक्षात अध्यात्मिक अधिष्ठान, सहिष्णुता पाहायला मिळत नाही.
लढणारे अन् लिहिणारे अशा दोन्ही भुमिकेत महर्षीं दिसून येतात. तत्कालिन समाजसुधारकांकडे संस्थात्मक संघटनांचे पाठबळ नव्हते. नेमका हाच मुद्दा महर्षी ओळखून कार्य केले, असे मतही बेडकिहाळ यांनी मांडले. खरंच आहे. आज देशात अनेक विचारवंत आहेत. ते आपली मते मांडत असतात. देशात आज शेती प्रश्न, आत्महत्या, पर्यावरण संवर्धन, समाज परिवर्तन, साहित्य, भाषा संवर्धन, अध्यात्म, प्रदुषण, मुलगी वाचवा अशा विविध प्रश्नांच्या चळवळी आहेत. पण या चळवळींना फारसे यश मिळालेले पाहायला मिळत नाही. असे का ? तर या प्रश्नाचे उत्तर आपणाला महर्षी शिंदेच्या कार्यात दिसून येईल. त्यांनी संस्था उभ्या केल्या. संस्था संघटनेतून कार्य केले.
समाजसुधारकांकडे म्हणजेच आजच्या चळवळीच्या कार्यकर्त्यांकडे संस्थात्मक संघटनाचे पाठबळ उभे राहायला हवे. वर्तमानपत्रातून प्रबोधनाचे कार्य जरूर होते. ते व्हायलाच हवे पण त्याला जोड संस्थेच्या माध्यमातून द्यायला हवी. नुसती लिहिणारी चळवळ असता कामा नये तर लढणारीही चळवळ हवी. लढणारी याचा अर्थ त्या प्रश्नावर उपाययोजना करणारी चळवळ हवी. कचऱ्याचा, प्रदुषणाचा प्रश्न आहे. याबाबत लेख लिहून नुसतीच जनजागृती करणारे कार्यकर्त्ये खूप असतात पण प्रत्यक्ष कचऱ्याची विल्हेवाट लावणारी पर्याय देणारी संस्था, प्रदुषण कमी करण्यासाठी पर्याय देणारी संघटनात्मक संस्था उभी राहायला हवी. शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर नुसतीच शेतकरी आंदोलने होतात. कर्जमाफीसाठी आंदोलन उभे राहाते. पण या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन काम करणारी संघटनात्मक संस्था उभी राहील्यास हा प्रश्न कायमचा निकाली लागू शकतो. मग याबाबत प्रबोधनापासून शेतकऱ्याला स्वयंपूर्ततेकडे नेणारे पाठबळ देणारी संस्था उभी राहील्यास हा प्रश्न मिटू शकतो. पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी श्रमदानातून गावांनी प्रश्न मिटवले तसे अशा प्रश्नावर लोकसहभागातून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केल्यास निश्चितच यात यश मिळेल. पर्यावरणावर नुसत्या गप्पाच रंगतात. मुळ प्रश्न सुटतच नाही. पर्यावरण संवर्धन करणाऱ्या सामाजिक संस्था उभ्या राहील्यास प्रबोधनाबरोबरच मुळ प्रश्नाला सुद्धा पर्यायी उत्तर मिळू शकेल. कार्यातून, प्रात्यक्षिकातून प्रश्न सुटायला हवेत. तरच तो लढा खऱ्या अर्थाने यशस्वी झाला असे म्हणता येईल.
अनिष्ट रुढी परंपरेविरोधात कायदा केल्याने प्रश्न सुटतात असे कधीही होत नाही. कायद्याने होणाऱ्या सामाजिक परिवर्तनाला मर्यादा आहेत, असे मत महर्षींचे होते असे बेडकिहाळ म्हणाले. प्रत्येक गोष्ट कायद्याने सुटतोच असे नाही. म्हणून नुसते कायदे करा आणि प्रश्न सोडवा असे होत नाही. सामाजिक प्रश्न सोडवताना कायद्याला किती महत्त्व द्यायचे हे सुद्धा विचारात घ्यायला हवे. कचरा फेकणाऱ्याला दंड लागू केल्यास कचरा फेकण्याचा प्रश्न खरंच सुटतो का ? कचरा फेकणारा कचरा फेकतच राहातो. आपण दंड किती करत बसणार ? यासाठी गरज आहे ती त्या व्यक्तीच्या प्रबोधनाची. यासाठी प्रबोधनाने, सामाजिक परिवर्तनाने हे प्रश्न अधिक सुटतात. हे विचारात घ्यायला हवे. महर्षींचे असे विचार आजही कसे उपयुक्त ठरतात यावर भर द्यायला हवा. प्रश्नावर उत्तर, पर्याय अशा चर्चासत्रातून मिळत राहील्यास अशी ही चर्चासत्रे निश्चितच नवी दिशा देणारी ठरू शकतील यात शंकाच नाही.
शेषराव मोहिते म्हणाले, शेतकरी आणि कामगार हे दोघेही श्रमजीवी आहेत आणि या दोघांनी एकत्र येऊन संघटन उभे करण्याची गरज आहे. पण या दोघांत वाद लावून स्वतःची पोळी भाजणारे अनेक आहेत, असे मत महर्षींनी स्वातंत्र्यापूर्वी मांडले होते. आज स्वातंत्र्यानंतर हे किती खरे आहे हे दिसते. कामगार शेतमालाचे भाव कमी व्हावेत यासाठी मोर्चा काढतो तर शेतकरी शेतमालाला भाव मिळावा यासाठी मोर्चा काढतो. दोघांनी एकत्र येऊन प्रश्न सोडवला तर खऱ्या अर्थाने प्रश्न सुटु शकतो. पण कोणतेही सरकार असे करताना दिसत नाही. परदेशातील शेतकऱ्यांचा बाजारपेठेवर जसा ताबा आहे तसा ताबा भारतीय शेतकऱ्यांनी मिळवला पाहीजे, याशिवाय तुम्हाला तरणोपाय नाही असे महर्षी शिंदे यांचे मत होते. इतकेच नव्हे तर उत्पादन वाढवण्याबरोबरच उत्पन्न वाढवा या मताचे महर्षी होते. यासाठी त्यांनी परदेशातील शेतकऱ्यांनी बाजारभावासाठी जादाचा कापूस जाळूण टाकल्याचे उदाहरणही दिले होते. असेही मोहिते म्हणाले. सध्या शेतीचे हे प्रश्न आजही कायम आहेत. अशावेळी महर्षीचे विचार निश्चितच महत्त्वाचे वाटतात. कारण आज शेतीचे उत्पादन दुप्पट करू अशी घोषणा होते त्यासाठी प्रयत्न होतात पण शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवू यासाठी कोणताही प्रयत्न होत नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले तरच शेतकऱ्याची स्थिती सुधारेल. आत्महत्येचा प्रश्न सुटेल हे विचारात घ्यायला हवे.
या चर्चासत्राचे वैशिष्ट्य म्हणजे यात तरुण अभ्यासकांना बोलण्याची संधी देण्यात आली होती. तज्ज्ञांच्यासह तरुणांकडून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या विचारांचा जागर व्हावा हा उद्देश संयोजकाचा असावा. यामध्ये प्रा. अशोक चौसाळकर, प्रा. गोपाळ गुरु, प्रा. सुनिलकुमार लवटे, हेमंत राजोपाध्ये, प्रा. जयसिंग सावंत, प्रा. राजन गवस, प्रा. शेषराव मोहिते, प्रा. टी. एस. पाटील, डॉ. अवनीश पाटील, प्रा. प्रकाश पवार, प्रा. गोविंदे काजरेकर, प्रा. श्रुती तांबे, प्रा. भारती पाटील, प्रा. प्रवीण बांदेकर, डॉ. दत्ता घोलप, सुशील धसकटे, प्रा. जयसिंगराव पवार यांनी सहभाग घेत महर्षी शिंदे यांच्या विविध पैलुवर प्रकाश टाकला.