September 9, 2024
Man is caste and humanity is the religion
Home » मानव हीच जात, माणूसकी हाच धर्म
विश्वाचे आर्त

मानव हीच जात, माणूसकी हाच धर्म

उत्तम अधमीं संचरती । ऐसे वर्णावर्ण मिसळती ।
तेथ समूळ उपडती । जातिधर्म ।। २५० ।। ज्ञानेश्वरी अध्याय १ ला

ओवीचा अर्थ – उच्चवर्णाच्या स्त्रियांचा नीज वर्णाच्या लोकांत संचार होतो, अशा रीतीनें वर्ण संकर होतो व त्यामुळे जातिधर्म मुळापासून उखडले जातात.

युद्ध म्हणजे विनाशच. यात अनेक गोष्टींचा नाश होतो. जातिधर्म मुळापासून उखडले जातात. यासाठी युद्ध नको अशी मनस्थिती अर्जुनाची झाली होती. अर्जुनाला असे वाटत होते, पण प्रत्यक्षात तसे होत नाही. धर्माच्या रक्षणासाठी हे युद्ध आहे. जातिधर्म ही परंपरागत समस्या आहे. ही कधीच नष्ट होत नाही. यासाठी त्यात गुंतून न पडता आहे त्या परिस्थितीत न्याय, धर्मरक्षण, सत्याच्या विजयासाठी लढणे महत्त्वाचे आहे. युद्धात अत्याचाराचा, क्रुरतेचा कळस गाठला जातो. उच्च-नीच हे भेदभाव विकोपाला जातात. अखेर यात विनाशच होतो. पण याकडे आपण वेगळ्या नजरेतून पाहाणे गरजेचे आहे. डोळसपणे या समस्येकडे पाहीले तरच खरे चित्र आपणासमोर उभे राहील.

युद्धाकडे काहींजण फायदा म्हणूनही पाहातात. विविध उद्योगांना युद्धामुळे चालना मिळते, ते त्याकडे फायद्याच्या नजरेतून पाहातात. दोघांच्या युद्धात तिसऱ्याचाही लाभ होत असतो. आयात-निर्यात बंद झाल्याने इतर देशांना यात संधी उपलब्ध होत असते. ते देश याकडे त्या नजरेतून पाहातात. अलिप्त राहून स्वार्थ पाहाणारेही बरेच असतात. आपण एखाद्या गोष्टीकडे कसे पाहातो यावर सर्व अवलंबून आहे. म्हणजेच विचारसरणीही यात महत्त्वाची आहे. यासाठी कोणत्याही गोष्टीची व्यर्थ चिंता करू नये. अशी चिंता करून त्यात गुंतून पडणे योग्य नाही. न्यायधर्माची बाजू घेऊन लढत राहीले पाहीजे.

संकर होईल. जातीधर्म उखडले जातील अशी चिंता करणे व्यर्थ आहे. या अशा काही समस्या आहेत त्या कधीच सुटत नाहीत अन् संपतही नाहीत. त्या तशाच असतात. कारण विचारसरणीच तशी असते. यासाठी यात गुंतून राहाणे योग्य नाही. उच्चवर्णातील लोक फक्त अत्याचार करतात असे कधीच नाही. नीचवर्णातील एखादी व्यक्ती शिकली सवरली अन् संपन्न झाली की ती सुद्धा इतरांचे शोषण करू लागते. याचाच अर्थ ही मानवाची एक वृत्ती आहे. यासाठी उच्च-नीच असा कोणताही भेदभाव नाही. नीच असूनही ती नीच व्यक्तींचे शोषण करते. अशा घटना घडलेल्या आहेत. पूर्वापार चालत आल्या आहेत. याचा अर्थ वृत्ती अन् विचारसरणी समजून घ्यायला हवी. त्यामुळे ही समस्या आहे. त्याला जातीधर्माची जोड दिली गेली आहे त्यामुळे तसे वाटते. प्रत्यक्षात तसे नाही. अत्याचार जात-धर्म पाहून केला जात नसतो तर ती एक नीचवृत्ती असते. मानसिक वृत्ती आहे.

समाजातील अशा काही समस्या त्यामुळेच पिढ्यानपिढ्या तशाच आहेत. अशा समस्यांची चिंता करणेही व्यर्थ आहे. युद्धामुळे, वादविवादामुळे त्या वाढतील असा विचार करणेही व्यर्थ आहे. यासाठी याकडे दुर्लक्ष करणेच योग्य ठरू शकते. यात गुंतून पडल्यास काहीच हाती लागत नाही. कारण विचारसरणी, मानसिकता बदलणे सहज शक्य नसते. यासाठीच साधी राहाणी आणि उच्च विचार याची गरज आहे. माणसाकडे पैसा आला, संपत्ती झाली की मग त्याला त्यासोबत गर्व येतो. अंगात मस्ती चढते अन् माज येतो. यातूनच दुष्टभाव, वृत्ती जागृत होते अन् अत्याचाराच्या घटना घडतात. यात जात-धर्म काहीही पाहीले जात नाही. उच्च-नीच असेही पाहीले जात नाही. यासाठीच माणसाची मानसिकता ढळू न देणे गरजेचे आहे. त्याच्यातील माणूसकी जीवंत राहील याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठीत सद्विचारांची संगत, सत्संग गरजेचा आहे. मानव हीच जात आहे अन् माणूसकी हाच धर्म आहे. याच विचाराचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करायला हवा. हा विचार जबरदस्तीने कधीही लादता येत नाही. तो मनातून उत्पन्न व्हावा लागतो यासाठी त्याचे संवर्धन करताना तो इतरांवर लादणे योग्य नाही. हे लक्षात घ्यायला हवे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

पद्म पुरस्कार-2025 साठी नामांकन प्रक्रिया सुरू

हिरण्यकेशी भव्य दहीहंडी…

अंगात येणे ईश्वर भक्तीचा मार्ग नव्हे

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading