February 29, 2024
Manikrao Khul interview on weather forecast
Home » महाराष्ट्रात एक फेब्रुवारीपर्यंत जाणवणार थंडी
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

महाराष्ट्रात एक फेब्रुवारीपर्यंत जाणवणार थंडी

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातील थंडी महाराष्ट्रात कशी असेल?

पुढील आठवड्यातील म्हणजे १ फेब्रुवारीपर्यन्त महाराष्ट्रात थंडी जाणवणार असली तरी सध्या महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया अश्या १२ जिल्ह्यात मात्र पहाटेचे किमान तापमान हे १२ डिग्री से.ग्रेड (म्हणजे सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने अधिक) तर दुपारचे कमाल तापमान २६ डिग्री से. ग्रेड(म्हणजे सरासरी पेक्षा २ डिग्रीने  कमी) दरम्यानचे राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ह्या १२ जिल्ह्यांमध्ये पहाटेची थंडी त्यामानाने जरी कमी वाटत असली तरी दिवसाचा ऊबदारपणाही कमी जाणवण्याची शक्यताही अधिक आहे. म्हणून कमाल व किमान अश्या दोन्हीही तापमानाच्या एकत्रित परिणामातून हिवाळ्याला साजेशी अश्या थंडीचा अनुभव ह्या जिल्ह्यात येवू शकतो.

जळगांव जिल्ह्यात तर पहाटेचे किमान तापमान हे १० डिग्री से. ग्रेड च्या आसपास किंवा त्याखाली एकांकापर्यंतही घसरू शकते. मुंबईसह कोकण व उर्वरित महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यात मात्र पहाटेचे किमान तापमान हे १४ डिग्री से.ग्रेड तर दुपारचे कमाल तापमान २८-३० डिग्री से. ग्रेड म्हणजे दोन्हीही तापमाने त्यांच्या सरासरी इतके किंवा त्या पेक्षा एखाद्या डिग्रीने कमी दरम्यानचे असु शकते.
ह्या  आठवड्यादरम्यान महाराष्ट्रात थंडीच्या लाटीची शक्यता मात्र जाणवणार नाही, अशा अंदाज आहे.

सध्याची महाराष्ट्रातील ही थंडी कश्यामुळे टिकून राहणार ?

सध्या उत्तर भारतात विविध कारणांनी जरी थंडी कमी जाणवत असली तरी उत्तर भारतात समुद्रसपाटी पासून दहा ते बारा किमी. उंचीवर पश्चिम दिशेकडून ताशी २५० ते २८० किमी असे वेगवान प्रवाही झोताचे ‘ पश्चिमी’ वारे पूर्वेकडे अजुनही वाहत आहे. ह्या पश्चिमी झोताच्या परिणामातून त्या जाडीच्या पातळीखाली एकवटलेली संचित थंडी ह्या तयार झालेल्या(धरणरूपी)स्रोतातून पाट-पाण्यासारखी प्रमाणात थंडी विनाअडथळा महाराष्ट्राकडे वाहत येत आहे.
२५ व २८ जानेवारी दरम्यान लागोपाठ दोन पश्चिमी झंजावात पश्चिम हिमालयीन क्षेत्रात प्रवेशित होत आहे. पश्चिमी वारा झोत व पश्चिमी झंजावात अश्या दोघांचा एकत्रित परिणाम म्हणून तर कमी तीव्रतेची का होईना पण ती अधिक कालावधी दिवसाच्या वहनामुळे महाराष्ट्राला थंडीचा फायदा  होत आहे.

थंडीचा महाराष्ट्रातील शेतपिकावर कसा परिणाम होवु शकतो ?

सध्या जानेवारीतील थंडी जरी कमी भासत असली तरी,  चालु ‘ एल-निनो व कमी पर्जन्यमान वर्षाच्या रब्बी हंगामातील शेतपिकांना मात्र ह्या ‘ जिवंत ‘ अश्या सातत्यपूर्ण थंडीतून , मावा, बुरशी, किडी पासूनचा होणारा आघात व तणे ह्यांपासून काहीशी सुटका तर मिळालीच व ती सुरक्षितही राहिली. भाजीपाला, भरडधान्ये शेतपिके, फळबागा उस व आल्यासारखी दिर्घकालावधीच्या पिकांना वातावरणीय अवस्था ही एक जमेची बाजूच समजावी.

एकूणच टंचाई वर्षातील माफक थंडीचा हा हिवाळा सध्या पिकांना संजीवनी प्राप्त करून देत फार मोठी मदत करत आहे, हा उमगही शेतकऱ्यांनी मनी ठेवावा. असे वाटते. येथे ‘ जिवंत थंडीचा ‘ अर्थही ग्रामीण बोली भाषेसारखाच जसे विहिरींना ‘ जिवंत पाणी ‘  म्हणजे  ‘ माफक पण कायम ‘ असाच घ्यावा, एव्हढेच!

महाराष्ट्रात पुढील आठवड्यासाठी पावसाचा काय अंदाज असु शकतो ?

                   सध्या एल -निनो तीव्रतेत आहे. आय.ओ.डी( भारत महासागरीय पाण्याच्या पृष्ठभाग उष्णतेची द्वि- ध्रुवीता) तटस्थेत तर एमजेओ( मॅडन व ज्यूलियन ची हवेच्या कमी दाबाची दोलणे) देशाच्या महासागरीय क्षेत्राच्या बाहेर पडली आहे. पावसासाठीची पूरकतता त्यामुळे ह्या आठवड्यात वजाबाकीत म्हणजे कमी झाली आहे.
                विदर्भ वगळता उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात  पुढील  आठवड्यात म्हणजे गुरुवार दि.१ फेब्रुवारी पर्यन्त पावसाची शक्यताही जाणवत नाही. मात्र विदर्भातील ११ व नांदेड एक अश्या १२ जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे तेथील थंडी कमी झाली. परंतु गुरुवार २५ जानेवारी पासून पुन्हा सध्या पडत असलेल्या थंडीसारखी थंडी पूर्ववत होण्याची अपेक्षा करू या!

फेब्रुवारी व मार्च ह्या दोन महिन्यात महाराष्ट्रातील वातावरणाबद्दल आज काय बोलता येईल?

एक फेब्रुवारी नंतर दोन्हीही (फेब्रुवारी व मार्च) महिने ही गारपीट हंगामाचे असतात. तसेच वातावरणात त्या दरम्यान घडणाऱ्या ‘वारा खंडितता ‘  प्रणालीतून पडणाऱ्या पावसाचे असतात.
खरं तर येणाऱ्या दोन महिन्यातील ह्या घटना त्या वेळी वातावरणीय काय प्रणाल्या असतील त्यानुसार त्या वेळीच दहा दिवस, पंधरवडा अश्या लघुपल्ल्याच्या तसेच प्रत्येक महिन्याच्या मिळणाऱ्या अंदाजातूनच ह्याबाबत बोलणे योग्य होईल, असे वाटते. सध्या अजूनही अधिक तीव्रतेतील ‘ एल- निनो ‘ ह्या घटनांना मारकही ठरू शकतो. म्हणूनच त्या घटना घडतीलच असा लगेचच अर्थ आजच काढू नये. फक्त हंगामी घडणाऱ्या वातावरणीय घटनांच्या कालावधीची आठवण असावी म्हणून उल्लेख केला, एव्हढेच!

येणाऱ्या पावसाळ्याबाबत काही भाष्य करता येईल काय?

‘नोआ ‘ सारख्या संस्थेने मागे सुपर ‘एल-निनो ‘ ची वार्ता पसरवल्यानंतर, भारत देशातील खाजगी संस्थाही त्यांच्या सुरात -सूर मिसळून येणाऱ्या पावसाळ्यात देशात कमी पावसाची शक्यता असु शकते, असे सांगितले. त्यामुळे त्या वेळी जनतेच्या मनात काहीसे भितीचे वातावरण तयार झाले होते.
आणि आता ह्याच संस्थेकडून येत्या पावसाळ्यात चांगल्या पावसाची शक्यता जाणवत आहे, असा खुलासा त्यांच्याकडून येत आहे. 
                   ह्याबाबत एव्हढीच टिपण्णी करावीशी वाटते कि, जेंव्हा १५ एप्रिल २०२४ ला भारतीय हवामान खात्याकडून जून ते सप्टेंबर अश्या ४ महिन्याच्या पावसाळी हंगामाचा पहिला मान्सूनचा अंदाज बाहेर येईल, तेंव्हाच ह्या गोष्टीबाबत चित्र स्पष्ट होईल. तो पर्यन्त संयमच असावा, असे वाटते.

Related posts

गावगाडा साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

उत्कृष्ट संसदपटू ‘विधीज्ञ’ बापूसाहेब परुळेकर

सकारात्मक विचारांची उभारू गुढी

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More