सीमा भागातील ज्येष्ठ लेखक महादेव मोरे यांचे बुधवारी ( ता. २१ ऑगस्ट ) वृद्धापकाळाने निधन झाले. लेखक म्हंटले की आपल्याला अनेक नामवंत चेहरे डोळ्यासमोर तरळतात. पण काही चेह-यामागचे चेहरे या तेजपटलाच्या मागे अंधारात राहूनही आपली चमक मागे सोडतात. महादेव मोरे हे त्यातीलच एक नाव. मराठीतील एक ज्येष्ठ, श्रेष्ठ लेखक. सीमाभागातील गोरगरीब आणि तळागाळातील कष्टकरी सामान्य माणसातलं माणूसपण, त्यांच्या कथा-व्यथा महादेव मोरे यांनी आपल्या कथा-कादंबरीमधून मांडल्या. आज त्यांच्या जाण्याने मराठी साहित्यात एक पोकळी निर्माण झाली आहे ती भरून येणारी नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
सुचिता घोरपडे
suchitapatilhll@gmail.com
निरंजनी आम्ही बांधियले घर I निराकारी निरंतर राहिलोसे I I
समाजात अशा अनेक व्यक्ती असतात की ज्या आयुष्यभर केवळ संघर्षमय जीवनच जगत राहतात. पण त्याची वाच्यता किंवा तक्रार ते कधीही कुठेही करत नाहीत. अगदी निर्गुण, निराकार असतात. आणि आजवर या वृत्तीनेच आयुष्य कंठत आलेले संवेदनशील मनाचे ज्येष्ठ लेखक म्हणजे महादेव मोरे. निस्पृह व्यक्तीमत्व असणारे आणि निरपेक्षपणे जगणारे हे लेखक सीमाभागातील निपाणी या गावचे. निपाणी हे तंबाखूसाठी प्रसिद्ध असणारे कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील एक महत्त्वाचे गाव आणि व्यापारी केंद्र. १९५६ मध्ये भाषावर प्रांतरचनेत निपाणीसह अनेक मराठी भाषिक गावे कर्नाटकात गेली. सीमावासीयांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी अनेक आंदोलने केली, बलिदान दिले. पण सीमाप्रश्न कायमच अधांतरी राहिला. ज्या सीमाभागात आजवर लोकांनी मराठी संस्कृती, मराठी अस्मिता जपली आहे त्या सीमाभागातील मराठी भाषिक आजही आपल्या न्यायासाठी, हक्कासाठी खितपत पडला, उपेक्षित राहिला. आणि या सीमाप्रश्नासारखा इथला हा मोठा लेखकही उपेक्षितच राहिला आहे.
लेखक म्हंटले की आपल्याला अनेक नामवंत चेहरे डोळ्यासमोर तरळतात. पण काही चेह-यामागचे चेहरे या तेजपटलाच्या मागे अंधारात राहूनही आपली चमक मागे सोडतात. महादेव मोरे हे त्यातीलच एक नाव. मराठीतील एक ज्येष्ठ, श्रेष्ठ लेखक. सीमाभागातील गोरगरीब आणि तळागाळातील कष्टकरी सामान्य माणसातलं माणूसपण, त्यांच्या कथा-व्यथा महादेव मोरे यांनी आपल्या कथा-कादंबरीमधून मांडल्या. या कथांनी मराठी साहित्यात आपले एक वेगळे असे वैशिष्ट्य निर्माण केलेले आहे. शोषितांच्या अंतरंगाचा वेध घेणा-या त्यांच्या कथा वास्तवाचे विदारक चित्र उभे करतात. विडी कामगार स्त्रियांच्या भावविश्वाचा घेतलेला आढावा मनाला हेलावून टाकतो. त्यांचे लिखाण वाचकाच्या मनात घर करून राहते.
साहजिकच वाचकाच्या मनात घर करून राहिलेल्या लेखकाचे घर कसे असेल याबद्दल वाचकाच्या मनात अनेक अंदाज बांधले जातात. लेखकाची लिहिण्याची खोली कोणती असेल.. त्याचे टेबल कसे असेल.. तो कोणता कागद-कोणता पेन लिहिण्यासाठी वापरत असेल असे अनेक आराखडे बांधले जातात. पण या आराखड्याला इथे मात्र ओरखडा पडेल. कारण महादेव मोरे या अवलिया लेखकाने घरात राहून लिखाण केले नाही तर गिरणीत काम करत असताना फावल्या वेळी ते लिखाण करत असत. मिळेल त्या कागदावर साध्या पेनाने बाकड्यावर बसून ते लिहित. अगदी साधी वेशभूषा आणि डोक्यावर गिरणीतील पीठामुळे पांढरी टोपी घातलेले महादेव मोरे गिरणीत उभे राहून अगदी बारा बारा तास काम करत. कधी कधी अचानक एखादे दळप घेऊन कुणी आले तर ते लगेच आपले लिखाण बाजूला ठेवत आणि पहिले दळप दळून देत. मग परत राहिलेले लिखाण करत. मुळातच कोरीव हस्ताक्षर असल्याने परत परत लिहित बसायच्या नादी ते लागत नसत. आणि तेवढा वेळही त्यांच्याकडे नसे. मग जसं लिहिलं जाईल तसंच ते प्रसिद्धीसाठी पाठवत. त्यांच्या गिरणीतील कामाच्या मध्ये त्यांना कुणी भेटायला आलेलेही आवडत नसत. त्यामुळे तशी कुणी भेटायला येण्याची इच्छा व्यक्त केली तर ते सरळ नकार देत.
त्यांच्या एका कथेत त्यांनी अगदी सहज आपल्या घराचा उल्लेख करताना म्हंटले आहे की, “माझ्या घरापेक्षाही मी उंच दिसेन असे माझं बुटकंसं साध्या खापरीचं घर आहे. कोणी थोडा उंचेला माणूस अनपेक्षितपणे मला भेटायला आला तर त्या अनाहुताचे स्वागत आधी माझ्या घराची चौकट करते. म्हणजे टण्णदिशी ती अभ्यागताच्या डोकीला लागते आणि माझ्यापेक्षा माझ्या घराचे स्मरण त्याला दीर्घकाळ होत राहते.” किती मिश्किलपणे ते बोलून जातात. पण मिश्किलपणे कोट्या करणारे महादेव मोरे गिरणीत दळप घेऊन आलेल्या वंचितांच्या व्यथा ऐकून तितकेच हळवे आणि गंभीर होतात. त्या लोकांची वेदना त्यांच्यातील लेखकाला टोचणी देऊ लागते, तेंव्हा त्यांची लेखणी झरू लागते. या वेदनेचे बीज कथारूप घेऊन तरारून उगवून येते.
महादेव मोरे यांचा जन्म १९३९ सालचा. त्यांनी त्यांचे एस.एस.सी. पर्यंतचे शिक्षण निपाणी येथे केले. तर पुढील इंटर आर्ट्स पर्यंतचे शिक्षण गोखले कॉलेज कोल्हापूर येथे केले. त्यांनी कॉलेज जीवनात एका स्पर्धेसाठी लिहिलेली ‘म्हाईचा दिवस’ ही पहिली कथा. त्या कथेला केवळ पहिले पारितोषिकच मिळाले नाही तर साप्ताहिक स्वराज्य सारख्या त्याकाळच्या नामाकिंत नियतकालिकेमध्ये प्रसिद्ध होण्याचे भाग्यही लाभले. आणि इथूनच त्यांच्या लिखाणाचा पाया रचला गेला. या कथेला मिळालेला १०रू हा मोबदला रोज मजुरी करून मिळणा-या सव्वा रुपयापेक्षा कितीतरी पटीने जास्त होता. पण इंटरआर्ट्सला ते फेल झाल्याने त्यांना गावी परतावे लागले. कारण होस्टेलमध्ये राहून परत परिक्षा देण्याएवढी तेंव्हा त्यांची परिस्थिती नव्हती. त्यात आपण शिकत आहोत आणि आपल्यापेक्षा लहान भावडांना वडीलांनी काढून दिलेल्या गिरणीत काम करावे लागत आहे हा एक अपराधभावही त्यांच्या मनात होता. त्यांच्या वडिलांचा टॅक्सीचा व्यवसाय होता. पण घरात त्यांच्या एकट्याच्या कमाईवर बारा-तेरा माणसांचे पालनपोषण करणे अवघड जात होते. त्यामुळे त्यांचे भाऊही अल्पवयातच काम करू लागले. महादेव मोरे यांनी सुद्धा शेतात मजूरी केली. वह्या,पुस्तके घेणा-या हातात कुदळ, खोरे, टिकाव, घमेली, पहार अशी अवजारे आली. उन्हातान्हात काम करून जीव पोळून गेला. सवय नसल्याने हाताला फोड आले. ते फुटून घट्टे पडले. पण बसून खायचे नाही.. जोवर स्थिरसावर होता येत नाही तोवर मिळेल ते काम करायचे हा त्यांचा दृढनिश्चय होता. इथे काम करत असताना शेतात अनेक मजूर येत. त्या श्रमजीवी लोकांशी आस्थेने ते बोलत. त्यांच्या अडीअडचणी समजून घेत. त्यांच्या मनाला फुंकर घालत. या लोकांचे जिवंत चित्रण मोरे यांच्या अनेक कथांमधून पहायला मिळेल.
महादेव मोरे यांच्या वडिलांना वाटायचे की पोराने केवळ लेखन-वाचनच करीत बसायला नको तर स्वतःचा संसार-प्रपंच चालविण्यापुरता पैसाही मिळवायची अक्कल यायला हवी. म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना कामगार चौकातील घरात राहण्यास सांगितले. त्यांचे ते घर साध्या कुंभार खापरीचं छप्पर असलेलं. पावसाळ्यात छपराच्या पावळीणीच्या धारा दारापुढील गटारीवर टाकलेल्या शहाबादी फरशीवर पडून त्यांचं पाणी दारांच्या फळ्यांवर व चौकटीच्या लाकडावर उसळून बडविले जाई. त्यामुळे दाराचा चौकटीचा खालचा भाग कुजून निकामी झालेला. चौकटीच्या खालच्या पोकळ फटीत काळ्या दगडाच्या चिपा मारून डगडगणा-या, पडायच्या अवस्थेत असलेल्या चौकटीला एका प्लास्टिक ट्रेचा तुकडा मारून त्यांनी जोडाप दिलेले. पण जास्त पावसात तेही निखळून पडे. त्या फटीतून मग मांजर-उंदरांची अगदी घरातील सदस्यांसारखी येजा होई.
महादेव मोरे यांनी मोटार रिपेअर गॅरेजही चालवले. गाड्या दुरुस्त केल्या. ते गॅरेज अक्कुबाईच्या अड्ड्यात होते. पुना- बेंगलोर हायवेमुळे त्या रोडला तशी मेकॅनिकचं कामे येत. पण १९६० सालच्या आसपास गाड्यांची संख्याच मुळात कमी असल्याने रिपेअरची कामेही तशी तुरळकच. जर एखादे दिवशी काम नसेल तर घरी जेवायला जाऊन घरच्यांवर भार नको म्हणून ते उपाशीच बसत. कारण घरात खाणारी पंधरा वीस माणसे. पण घरातील सगळेच कामात. कुणी टॅक्सी घेऊन तर कुणी शेतात. मग ते त्या रिकाम्या वेळेत लिहित असत. स्वतः महादेव मोरे सुद्धा टॅक्सी चालवत. त्या काळी गावातील टॅक्सी धंद्यात ४८ मॉडेल शोव्हरलेट किंवा फोर्डकार, वॉक्झल, स्टुडबेकर, हिलमन अशा विदेशी गाड्यांचा भरणा होता. एखादी हिंदुस्तान, लॅन्डमास्टर कोणी आणून टॅक्सीसाठी फिरवू लागले होते. मोरे यांना मात्र टॅक्सी चालवायला सुरुवात केली तेंव्हा जुनी फियाट मॉडेलची कार चालवायला मिळाली. टॅक्सी फिरवून अनुभव क्षेत्र विस्तारत होतं. पण ते शब्दबद्ध करायला त्यांना सवडच मिळत नव्हती. लेखक म्हणून ते संपून जात होते पण तरीही ते लिखाणावर प्रेम करीत होते. त्यांनी भागीदारीत सुरू केलेले स्वतःचे गॅरेज, त्यांचे भागीदार असणा-या लोकांच्या व्यसनामुळे, बाहेरख्यालीपणामुळे बुडीत चालले होते. त्यामुळे महिन्याचा खर्चही निघत नसे. अशा परिस्थितीत त्यांना गॅरेज बंद करावे लागले.
गॅरेज बंद झाल्यावर त्यांनी सटवाई रोडला पिठाची गिरणी चालू केली. या ठिकाणी काम करत असताना समाज जीवनाची अनुभूती खूप जवळून मिळत गेली. आणि मुळच्याच लिखाण करण्याच्या छंदाने उसळी घेतली. साहित्य म्हणजे समाजजीवनाचा आरसाच. समाजाचे प्रतिबिंबच त्यात पडत असते. त्यामुळे साहजिकच या समाजातील माणसे, त्यांचे जगणे महादेव मोरे यांच्या लिखाणातून उमटत राहते. गिरणीत काम करत असताना मोरे यांना अशी अनेक माणसे भेटत गेली.
आजूबाजूच्या खेडेगावातूनही निपाणीत रोजगारासाठी माणसे येत. मग आठवड्याचा पगार झाला की इथूनच बाजार करत. पण गहू- जोंधळ्याचं ओझं घरला घेऊन जाऊन निवडून आणण्यापेक्षा ते मोरे यांच्या गिरणीतच निवडत आणि दळून नेत. कारण खेड्यांवर वीज नसे.या लोकांसाठी मोरे यांनी दोन सुपं ठेवली होती. गोड्या तेलाचे रिकामे डबेही ठेवलेले असत. बाजार करून राहिलेच तर दळपाचे पैसे मोरेंना द्यायचे नाहीतर उधारी खात्यावर ते आहेच. गिरणीत अनेक भागातून दळप दळून न्यायला लोकं येत असत. यात सुगीच्या दिवसात महाराष्ट्रातून, परराज्यातून कधी बार्शी- अकलूज तर अहमदनगरकडूनही अनेक भटक्या जमाती सीमाभागात कामधंद्यासाठी येत. या भटक्या जमातीत मग डोंबारी, गोसावी, फासेपारधी, मांगगारूडी असे अनेक लोक असत. त्यांच्या सहवासामुळे साहजिकच सीमाभागातील बोलीहून निराळ्या बोलीभाषा त्यांच्या कानावर पडत. त्या माणसांचा बोलण्याचा बाज, हेल ते कुठंतरी आतवर साठवून ठेवत. आणि मग कालांतराने त्या लोकांचे जगणे, भोगणे मनात दाटी करू लागले ते कागदावर सांडले जात असत. निपाणीत एक मोठा भांडी कारखाना आहे. अल्युमिनियम व पितळेची भांडी तेथे तयार करतात. त्या कारखान्यात परराज्यातून अनेक कामगार येतात. कधी चेन्नई कडील तर पंजाबमधील हे कामगार स्वतःचे जेवण स्वतः बनवून खात. त्यामुळे पीठासाठी त्यांना मोरे यांच्या गिरणीत जावे लागे. मग आपसूकच बोलता बोलता अनेक गोष्टी मोरे यांच्या पोटलीत साठत. काही धनिक साहेब मंडळी घरकामासाठी बाहेरगावाहून मुली कामाला आणत. त्या मुली त्या साहेब लोकांच्या घरातील धुणी-भांडी, जेवण, मालकाची पोरं सांभाळणे अशी सगळी कामे करत. आणि मग जेंव्हा कधी दळायला येत आपली रामकहाणी म्हादू मामाला म्हणजे मोरे यांना सांगत असत. तंबाखूच्या वखारीत कामाला जाणा-या बायकांची गा-हाणी ऐकून मोरे हळवे होत. त्यांच्यावर होणारा अन्याय, त्यांची पिळवणूक यामुळे ते दुःखी होत. अस्वलवाली बुढ्ढी, पंजाबी सुखबीर, इनामदारांचे दळप आणणारी आणि मोरे मामा एवढं गंद दळून द्या असं म्हणणारी गब्रु, तंबाखू वखारीत काम करणा-या महिला, वारयोषिता यांच्यासारख्या अनेक व्यक्तीरेखा महादेव मोरे यांच्या साहित्यातून डोकावतात. आपल्या कर्मकहाणीचं दुखणं मोरे मामांना सांगून त्या स्त्रिया मनावरली लसलसणारी खपली काढत. त्या महिलांना-त्या लोकांना रखरखीत व्यवहारी जगात मोरे मामांचे चार दोन मायेचे शब्द वळीवासारखे वाटत असत.
समाजात वावरत असताना मोरे यांना अनेक गोष्टींचे आकलन होत गेले. अज्ञान आणि दारिद्र्यात जगणारे लोक कसे वाममार्गाला लागतात ते त्यांनी पाहिले. यातूनच मग वाढणारी व्यसनाधीनता आणि व्यसनाने रसातळाला जाणारं कुटुंब, मारामारी, गुन्हेगारी आणि राजकारणातील लोकांचे साटे-लोटे या सगळ्यांना त्यांनी आपल्या लेखणीतून जगासमोर आणले. भोळ्या समजुतींच्या आहारी गेलेल्या गोरगरीब जनतेची अनेक रूपे आपल्याला मोरे यांच्या कथातून दिसू शकतील. देवदासी स्त्रियांचे जगणे-भोगणे, दलाल, मालकवर्गाच्या पिळवणूकीला बळी पडणारी माणसे महादेव मोरे यांच्या कथा कादंबरीमध्ये जिवंत झालेली पाहता येतील. निपाणीसारख्या उस- तंबाखूचे व्यापारी केंद्र असलेल्या निमशहरी गावातील जुगार अड्डा, दारूअड्डा यामुळे वाढलेले अनैतिक धंदे याचा घेतलेला आढावाही मोरे यांच्या साहित्यातून प्रकट होतो.
मध्यमवर्गीय जीवन जगणा-या लोकांच्या परीघाबाहेरही एक जग आहे. उपेक्षितांचे जग. या उपेक्षित लोकांच्या भावभावनांचा कानोसा महादेव मोरे यांनी घेतला. पांढरपेशी आयुष्य जगणा-यांना कल्पनाही करवता येणार नाही असे दाहक वास्तव मोरे यांच्या लिखाणातून चित्रित झाले आहे. या लोकांचे समाजजीवन, त्यांची जीवनपद्धती आपल्या लिखाणातून अतिशय समर्थपणे महादेव मोरे यांनी रेखाटली आहे. म्हणूनच महादेव मोरे यांचे साहित्य चिंतन करायला लावते. साहित्यिकांच्या साहित्यात समाज हा नेहमी डोकावतच असतो. याच समाजजीवनाची नेमकी भाषाशैली मोरे यांना अवगत असल्याने सामान्य वाचकाला त्यांच्या साहित्याविषयी एक आपलेपणा, जिव्हाळा वाटतो. कारण त्या त्यांच्या कथा असतात. जिथे अगदी बोलायलाही पैसे पडतात अशा जगात माणुसकीची हिरवळ जपत जगणारे वाचकप्रिय महादेव मोरे यांच्यासारखे लेखक विरळच म्हणावे लागतील.
लेखकांची घरे या चंद्रकुमार नलगे संपादित पुस्तकातील लेखात ते म्हणतात की, ‘चार भिंतीने घर उभं राहतं, पण ते उभं करणारा माणूस? त्याचं आयुष्य विचारात घेणं व किती कष्टाने ही वास्तू त्याने उभी केली ह्याचेही शब्दचित्र जर उभं केलं तर ते गौण ठरू नये. कारण ताजमहलापेक्षा तो उभं करणारा त्याहून मोठा. त्यामुळे ‘माझं घर’ अशी वास्तू उभी केली तर ती उभी करणा-यालाही सलाम. असा हा माझाच मला सलाम.’ असं ते हसत हसत बोलून जातात.
चौकटीत राहून लिखाण करणे महादेव मोरे यांना कधी जमलेच नाही म्हणून तर त्यांनी चौकटीबाहेरील जग इतक्या प्रभावीपणे मांडले. आपले नाणे खणखणीत असेल तर ते वाजणारच त्यासाठी कोणत्याही गटबाजीची गरज नाही हे खूप वर्षापूर्वीच महादेव मोरे यांनी सांगून ठेवले आहे. त्यामुळे कधीही त्यांनी प्रसिद्धीचा हव्यास धरला नाही. ते लिहित राहिले. आपल्या वाचकांसाठी. त्यांचे साधे सरळ मनाला भिडणारे लिखाण त्यांच्या वाचकांसाठी पर्वणीच असते. अनेक अक्षरांची घरे झाली. परंतू जात्यातून पडणा-या पांढ-या टिपूर चांदण्यांचा लेप देऊन उभं राहिलेलं महादेव मोरे यांचे घर जगावेगळे आहे.
(साभार – परंतु दिवाळी अंक- २०२२)
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.