March 29, 2024
Newtons law in human life article by Dr V N Shinde
Home » जडत्व : दगडाचे अन् माणसाचे !
विशेष संपादकीय

जडत्व : दगडाचे अन् माणसाचे !

मनस्वी इच्छा देहाप्रकृतीवर असंतुलित बल म्हणून कार्य करते. मनाने एखादे कार्य करण्याचे निश्चित केलेले असेल, तर माणूस उठून काम करतो. नाही तर लोळत पडतो. लोळत राहणारा माणूस आणि दगडाची कृती समान ठरते. मात्र जडत्व प्राप्त झालेल्या दगडास शेंदूर फासून देव बनवला जातो, तर माणसाने जडत्व धारण केले तर त्याला आळशी संबोधून कचरा केला जातो. तेव्हा जडत्व बाळगायचे का?

डॉ. व्ही. एन. शिंदे

सतराव्या शतकात न्यूटनने लावलेला गुरूत्वाकर्षणाचा शोध सर्वांच्या लक्षात असतो, तो त्याच्याशी जोडलेल्या सफरचंदाच्या कथेमुळे. न्यूटनने लावलेला तो एकमेव शोध नाही. न्यूटननी सैद्धांतिक भौतिकी आणि प्रायोगिक भौतिकीमध्ये तितक्याच ताकतीने मुशाफिरी केली. महत्त्वाचे शोध लावले. न्यूटनने मांडलेल्या गतीच्या नियमांमुळेच औद्योगिक प्रगतीला गती मिळाली, हे मान्य करावेच लागेल. न्यूटनने गतीचे तीन नियम मांडले. ते सार्वकालिक आहेत. मात्र ते पदार्थांसाठी, सर्वसाधारण वेगासाठी लागू पडतात. म्हणजेच ज्या घटनांचा संबंध सर्वसामान्यांचा येतो. प्रकाशाच्या वेगाइतका किंवा त्यापेक्षा जास्त वेग असलेल्या वस्तू किंवा कणांचा संबंध भौतिकीतील संशोधकापर्यंत मर्यादित असतो. त्यामुळे सामान्य मानवाच्या गरजेचे किंवा त्याला अनुभवता येतील, असे न्यूटनचे तीन नियम महत्त्वाचे ठरतात.

त्यापूर्वी पाश्चात्य राष्ट्रात पदार्थांच्या गतीसंदर्भात ॲरिस्टॉटल यांचे मत गृहीत धरत असत. ॲरिस्टॉटल यांच्या मते ‘जड वस्तूंना किंवा पदार्थांना स्थिर राहायला आवडते. त्याचवेळी धुरांसारख्या हलक्या वस्तू अवकाशात जातात आणि स्थिर राहतात. अंतराळात असणाऱ्या तारकांना अवकाशातच राहायला आवडते. प्रत्येक पदार्थाची स्थिती ही स्थिर स्थिती असते. पदार्थाला सरळ रेषेत जाण्यासाठी कोणाच्यातरी आधाराची गरज असते.’ अशा भन्नाट विचारावर न्यूटनच्या गतीविषयक नियमांच्या मांडणीपर्यंत पाश्चात्य राष्ट्रे विश्वास ठेवत होती. दुसरीकडे पुर्वेकडील राष्ट्रे आध्यात्मीक उन्नतीपर्यंत पोहोचली होती. मनाच्या गतीची मांडणी केली गेली होती. मात्र पदार्थांच्या गतीविषयक नियमांची मांडणी आढळत नाही.

न्यूटनने गतीविषयक नियमांची मांडणी केल्यानंतर पदार्थांची गती समजून घेणे सोपे झाले. त्यावर आधारीत उपकरणांची आणि वाहनांची निर्मिती झाली गेली. यातील तिसरा नियम सर्वसामान्यांच्या लक्षात राहतो. विश्वातील सर्व बले अन्योन्यक्रियेच्या स्वरूपात आढळतात. एखाद्या वस्तूवर बल क्रिया करत असेल तर त्या बलाला तितकाच विरोध करणारे बल कार्यान्वीत असते. यानुसार एकदिशीय बल कधीच कार्यान्वीत नसते. म्हणजेच निसर्गामध्ये कोणताही भौतिक बदल, विरोधाशिवाय होत नाही. न्यूटनने मांडलेला दुसरा नियम वस्तूवर कार्य करत असणाऱ्या सदिश बलांची बेरीज त्या वस्तूंचे वस्तुमान आणि त्या वस्तुचे त्वरण यांच्या गुणाकाराइतके असते, असे सांगतो. एखादी गतीप्राप्त वस्तूला, गती देणारे बल किती आहे, हे या नियमाच्या आधारे काढता येते. न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम हा जडत्वाचा नियम म्हणूनही ओळखला जातो. एखादी वस्तू संतुलीत बले कार्यान्वीत असताना स्थिर असते. जडत्वीय संदर्भचौकटीतून पाहिल्यास प्रत्येक वस्तू, तिच्यावर कोणतेही बाह्य बल कार्यान्वीत नसेल, तर स्थिर राहते किंवा स्थिर गतीने मार्गक्रमण करते.

प्रत्यक्ष जीवनात या नियमाची आपण वारंवार अनुभूती घेतो. बसमधून प्रवास करताना, चालकाने अचानक ब्रेक दाबला, तर आपण पुढे ढकलले जातो. वाहन कोणतेही असले तरी हा अनुभव प्रत्येकाने घेतलेला असतो. रस्त्यावरून गाडी जाताना अचानक वळण आले, तर आपण वळणाच्या विरूद्ध दिशेला ढकलले जातो. हे दोन्ही अनुभव न्यूटनच्या गतीविषयक पहिल्या नियमानुसार घडत असते. आपण कोणत्याही वाहनातून प्रवास करताना आपल्या शरीराने गती पकडलेली असते. मानवी शरीर गतीमध्ये असताना अचानक लावलेला ब्रेक, वाहनाची गती कमी करतो. ब्रेक शरीराची गती कमी करू शकत नाही. त्यामुळे वाहनाची गती कमी करण्यासाठी ब्रेक लावला की वाहन थांबते. मात्र शरीर त्याच गतीने पुढे जात असते. कोणत्याही वाहनाने गती पकडलेली असते, तेव्हा यंत्राने निर्माण केलेली शक्ती कार्य करत असते. वाहनाला गती देण्यासाठी जे बल कार्यान्वीत असते, त्याला विरोध करण्याचे कार्य, वाहनामध्ये भरलेले साहित्य, प्रवाशांचे वजन करत असते. जमिनीसोबत टायरचे घर्षण होत असते. त्यातून रस्त्याही वाहनाच्या गतीला विरोध करत असतो. वातवारणातील हवाही विरोध करते. मात्र यंत्राने तयार केलेली शक्ती, सर्व विरोधी बलांपेक्षा जास्त असेल, तरच गाडी गती पकडते. अशा बलाची मात्रा जोपर्यंत वाहनाला मिळते, तोपर्यंत वाहन पळते. बल कमी झाले, की वाहन थांबते.

वाहनाच्या पदार्थांच्या गतीला लागू असणारा न्यूटनचा तिसरा नियम मानवी देहालाही लागू पडतो. जडत्वाच्या सिद्धांतानुसार, सर्व पदार्थांना स्थिर राहायला आवडते. म्हणूनच मानवी देहाला लोळत ठेवायला आवडते. जडत्वामध्ये पदार्थाचे किंवा वस्तूचे ‘वस्तुमान केंद्र’ किंवा ‘सेंटर ऑफ मास’ हे महत्त्वाचे असते. निसर्गातील सर्व वस्तुमान असणाऱ्या चल, अचल, सजीव, निर्जीवास एक वस्तुमान केंद्र असते. तो एक बिंदू असतो. तो बिंदू आणि जमीन यांच्यातील अंतर जितके जास्त असेल तितकी पदार्थाकडे किंवा देहाकडे स्थितीज ऊर्जा जास्त असते. स्थितीज ऊर्जा जास्त असणारा प्रत्येक पदार्थ, किमान स्थितीज ऊर्जावस्था प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो.

माणूस जेव्हा उभे असतो, तेव्हा त्याच्या शरीराच्या वस्तुमानाचे केंद्र जमिनीपासून दूर असते. त्यामुळे शरीराची स्थितीज ऊर्जा जास्त असते. ही अवस्था अस्थिर असते. थोडा वेळ उभे राहिल्यानंतर बसावेसे वाटते. खूर्चीत बसलेल्या व्यक्तीच्या देहाचे वस्तुमानाचे केंद्र, हे जमिनीपासून तसे दूरच असते. देहाची स्थितीज ऊर्जा किमान अवस्थेला पोहोचलेली नसते. त्यामुळे खूप वेळ बसून राहिल्यानंतर थकवा येतो आणि शरीर पसरून लोळावेसे वाटते. ज्यावेळी मानवी देह जमिनीला समांतर पसरलेला असतो, तेव्हा देहाने किमान स्थितीज ऊर्जा धारण केलेली असते. त्यामुळे मानवाला अशा अवस्थेत लोळत राहावेसे वाटते. या अवस्थेतून बाहेर काढायचे काम मन करते. मनस्वी इच्छा देहाप्रकृतीवर असंतुलित बल म्हणून कार्य करते. मनाने एखादे कार्य करण्याचे निश्चित केलेले असेल, तर माणूस उठून काम करतो. नाही तर लोळत पडतो. लोळत राहणारा माणूस आणि दगडाची कृती समान ठरते. मात्र जडत्व प्राप्त झालेल्या दगडास शेंदूर फासून देव बनवला जातो, तर माणसाने जडत्व धारण केले तर त्याला आळशी संबोधून कचरा केला जातो. तेव्हा जडत्व बाळगायचे का?

Related posts

वडणगेकरांनी करून दाखवलं सुसज्ज क्रीडांगण साकारलं..

राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

गावगाडा साहित्य पुरस्कार जाहीर

Leave a Comment