October 14, 2024
Antarctica Tour video by Jaiprakash Pradhan
Home » Privacy Policy » अंटार्क्टिकाची सफर…(व्हिडिओ)
पर्यटन

अंटार्क्टिकाची सफर…(व्हिडिओ)

लाॅकडाऊनच्या कालावधीत घरी असला तरी, घरबसल्या पहा पृथ्वीतलावरील सातवा खंड. मनुष्यवस्ती नसलेल्या व ९८ टक्के बर्फाच्छादित अंटार्क्टिकाची रोमहर्षक, चित्तथरारक सहल…एन्ड ऑफ द वर्ल्ड भटकंतीमध्ये…आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान व जयंती प्रधान यांच्या व्हिडिओद्वारे…

अद्‍भुत, विस्मयजनक अंटार्क्टिका खंडावर आम्ही जवळजवळ नऊ-दहा दिवस होतो. आमची अठरा दिवसांची क्रूझ एक्स्पीडिशन क्रूझ होती. निरनिराळ्या बेटांच्या जवळ हिमनगांचा अंदाज घेऊन आमची मोठी क्रूझ थांबायची आणि मग झोडियाक या छोट्या रबराच्या बोटीतून आम्ही गटागटानं त्या बेटावर उतरायचो. क्रूझिंग म्हणजे त्याच झोडियाकमध्ये बसून, विविध बेटांच्या पाच-सहा किलोमीटरच्या परिसरात तास-दीड तास फिरवण्यात येत असे. त्यामुळे अंटार्क्टिकाची भव्यदिव्य पर्वतराजी, नानाविध आकार प्राप्त झालेली ग्लेशियर्स, निरनिराळे पक्षी, प्राणी यांची माहिती मिळाली. त्यांचे फोटोही काढता आले. अंटार्क्टिकातल्या धाडसी-चित्तथरारक ‘अ‍ॅक्टिव्हिटीज’ही प्रत्यक्ष पाहता आणि अनुभवता आल्या.

कसं आहे अंटार्क्टिकावरील हवामान…

अंटार्क्टिका आणि आर्क्टिक सर्कल ही पृथ्वीची दक्षिणेकडची आणि उत्तरेकडची दोन टोकं. अंटार्क्टिकाचं एकूण क्षेत्रफळ सुमारे १ कोटी ४० लाख चौरस किलोमीटर. जगातल्या एकूण बर्फापैकी ९० टक्के बर्फ या प्रदेशात आहे. जवळजवळ ९८ टक्के अंटार्क्टिका हे संपूर्णपणे बर्फाच्या चादरींनी व्यापलं आहे. या बर्फाची सरासरी जाडी दोन ते चार किलोमीटरपर्यंत असते. दक्षिणेकडच्या या सातव्या खंडावरचं सरासरी तापमान उणे ५५ अंश सेल्सिअस इतकं राहतं आणि तिथं कायम राहणारी मनुष्यवस्ती नाही. पृथ्वीचं उत्तरेकडचं टोक म्हणजे आर्क्टिक सर्कलची रेषा. ही सुमारे १६ हजार किलोमीटरवर पसरलेली आहे. या रेषेच्या उत्तरेकडचा प्रदेश हा सुमारे दोन कोटी चौरस किलोमीटर क्षेत्राचा असून, तो पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या साधारणत: चार टक्के म्हणावा लागेल. हाडं गोठवणारी थंडी, कधी चोवीस तासांचा अंधार, तर कधी चोवीस तासांचा उजेड, अशा विचित्र हवामानामुळे तिथं जेमतेम ४० लाखांची वस्ती आहे.

पोहोचल्याचे सर्टिफिकेट

अशा या पृथ्वीची उत्तर आणि दक्षिण दोन्ही टोकं सर करण्यात मी आणि पत्नी जयंती यशस्वी झालो. पृथ्वीच्या अगदी दक्षिण टोकावर आम्ही दोघांनी चांगली ४७ दिवसांनी भटकंती केली. त्यात अंटार्क्टिकावर आमचं जवळजवळ १० दिवसांचं वास्तव्य होतं. उत्तर टोक आणि आर्क्टिक सर्कल आणि आमचे तर फारच जवळचे संबंध जुळून आले. आर्क्टिक सर्कलची रेषा नॉर्वे, स्वीडन, फिनलँड (ग्रीमसे), अमेरिका (अलास्का), कॅनडा (युकॉन, वायव्य प्रदेश वगैरे) आणि रशिया अशा आठ राष्ट्रांमधून जाते. त्यापैकी रशिया वगळता सात राष्ट्रांमधून आम्ही दोघांनी, निरनिराळ्या मोसमात ती रेषा ओलांडली आणि त्याची सर्टिफिकेट्‍सही आम्हाला मिळाली.

अद्‍भुत, विस्मयजनक अंटार्क्टिका

अंटार्क्टिका आणि आर्क्टिक सर्कल या दोघांना पाय लागल्यानंतर, या दोन्ही टोकांमधला फरक वर्णन कसा करायचा असा प्रश्‍न सारखा मनात येत होता. अंटार्क्टिकाच्या क्रूजवर वाचायला मिळालेल्या एका ख्यातनाम दर्यावर्दीच्या पुस्तकात तो फार उत्कृष्टपणे दिलेला आढळला. : ‘जवळ एक रायफल, काही दारुगोळा, थंडीपासूनच्या संरक्षणासाठी पांघरुण, स्नो नाईफ आणि भरपूर अनुभव पाठीशी असलेला माणूस ‘आर्क्टिक सर्कल’मध्ये टिकाव धरू शकेल. मात्र, अंटार्क्टिका खंडाच्या बाबतीत तसं म्हणता येणार नाही. इथं तुम्हाला सभोवतालच्या अथांग सागरात विविध प्रकारचे वन्य पक्षी, प्राणी भरपूर प्रमाणात दिसतील; पण ते किनाऱ्यावर अगदी अल्पकाळासाठी म्हणजे केवळ अंडी घालण्यासाठी येतात. अंटार्क्टिकात भटकंती करताना लागणारी किंवा लागू शकणारी प्रत्येक गोष्ट स्वतःची स्वतः बरोबर न्यावी लागते. तसंच त्यांचा वापर कसा करायचा, याचं ज्ञानही ज्याचं त्याला असण्याची आवश्यकता असते. तरच तो या खंडावर तग धरू शकतो. इथं कधी कोणतं संकट उभं राहील याचा काहीच अंदाज बांधता येत नाही. या ना त्या तऱ्हेनं गंभीर समस्या उभी राहतेच. त्यावर मात करण्याचा आत्मविश्‍वास, आत्मनिर्भयता असणारी व्यक्तीच अंटार्क्टिकावर राहू शकते.’ अशा या अद्‍भुत, विस्मयजनक अंटार्क्टिका खंडावर आम्ही जवळजवळ नऊ-दहा दिवस होतो.

धाडसी-चित्तथरारक ‘अ‍ॅक्टिव्हिटीज

आमची अठरा दिवसांची क्रूझ ही लक्झुरियस नव्हे, तर एक्स्पीडिशन क्रूझ होती. अंटार्क्टिकाच्या वास्तव्यात आमच्या भटकंतीचं स्वरूप साधारणत: दोन प्रकारे होतं. १) लँडिंग आणि २) क्रूझिंग. निरनिराळ्या बेटांच्या जवळ हिमनगांचा अंदाज घेऊन आमची मोठी क्रूझ थांबायची आणि मग झोडियाक या छोट्या रबराच्या बोटीतून आम्ही गटागटानं त्या बेटावर उतरायचो. क्रूझिंग म्हणजे त्याच झोडियाकमध्ये बसून, विविध बेटांच्या पाच-सहा किलोमीटरच्या परिसरात तास-दीड तास फिरविण्यात येत असे. त्यामुळे अंटार्क्टिकाची भव्यदिव्य पर्वतराजी, नानाविध आकार प्राप्त झालेली ग्लेशियर्स, निरनिराळे पक्षी, प्राणी यांची माहिती मिळाली. त्यांचे फोटोही काढता आले. अंटार्क्टिकातल्या धाडसी-चित्तथरारक ‘अ‍ॅक्टिव्हिटीज’ही प्रत्यक्ष पाहता आणि अनुभवता आल्या. ‘मून’ आयलँडवर आम्हाला एक धक्कादायक प्रकारच बघायला मिळाला.

पाण्याखाली ज्वालामुखी

एक्स्पीडिशनच्या टीमनं क्रूझवरच्या पर्यटकांना आधीच सांगितलं होतं, की ‘ज्यांना अगदी थंड पाण्यात उतरण्याची चांगली सवय आहे, त्यांनी इथं पोहण्याचं धाडस करायला हरकत नाही. एक-दोन अंश सेल्सिअस तापमान आणि थंडगार वारे याचं भान मात्र ठेवा.’ आम्ही बघितलं, की तीन जण केवळ स्विमिंग कॉश्‍च्युम घालून पाण्यात उतरले. त्यांचं अंग अक्षरश: कापत आणि थरथरत होतं. दोन डुबक्या मारून ते किनाऱ्यावर आले. अंटार्क्टिकात काही ठिकाणी पाण्याखाली ज्वालामुखी आहे. ‘हाफ मून बे’ इथल्या डिसेप्शन आयलँडच्या परिसरात ज्वालामुखी असल्यानं किनाऱ्यावर थोडं उबदार पाणी आढळतं. त्यामुळंच हौशी, धाडसी पर्यटक हे धाडस पत्करू शकतात.

‘कयाकिंग’ करणारे वीरही

त्या खेरीज ‘कयाकिंग’ करणारे वीरही आढळतात. कयाकिंग म्हणजे रबराच्या छोट्या बोटीत बसून एक जण दोन्ही हातांनी वल्हवत असतो आणि लहान-मोठ्या हिमनगांतून ते मार्ग काढत असतात. मात्र, त्यासाठी हवामान योग्य असण्याची आवश्यकता असते. त्याची खात्री केल्यानंतर एक्स्पीडिशन टीमचे सदस्य कयाकिंगसाठी परवानगी देतात. कयाकिंगसाठी बोटी, वल्ही, योग्य कपडे प्रत्येकाला पुरवण्यात येतात. कोण कयाकिंग करू शकतो याचे निकष आहेत. ती व्यक्ती बारा वर्षांपेक्षा मोठी असावी, तिचं आरोग्य उत्तम असावं इत्यादी. आमच्या क्रूझवरचे चाळीस-पन्नास अमेरिकन, ब्रिटिश, युरोपियन, कॅनेडियन प्रवासी ते धाडस करताना नेहमी आढळायचे.

स्नो श्युईंग’चा अनुभव

मी आणि पत्नी इथल्या अतिधाडसी उपक्रमात सामील झालो नाही; पण ‘स्नो श्युईंग’चा अनुभव मात्र घेतला. कोणत्याही बेटावर उतरलो, की बर्फात चालण्यासाठीचे ‘स्नो श्यू’ आणि अणकुचीदार काठ्या आम्हाला देण्यात येत असत. या स्नो श्यूची रचना अशी असते, की तुमचं वजन व्यापक पृष्ठभागावर पसरलं जातं. याचा एकदम परिणाम असा जाणवतो, की बर्फाच्या चादरी, डोंगरावरचे चढ-उतार यावरून अगदी सराईत आणि सहजपणे तुम्ही चालू शकता. एका रांगेत सर्वजण बर्फाच्छादित डोंगर चढत-उतरत असतात. पुढे-मागे प्रशिक्षक असतात. ही लांबलचक रांग बघायला मस्त वाटते. अंटार्क्टिकात नानाविध धाडसी उपक्रम करणाऱ्यांची खरोखरच कमाल म्हणावी लागेल.

कॅनेडियन दाम्पत्याचा विक्रम

एखाद्या बर्फाच्छादित बेटावर, वाऱ्याच्या लहरींच्या साथीत, पेंग्विन्स आणि अन्य प्राण्यांचे आवाज ऐकत, मध्यरात्रीच्या सूर्यप्रकाशात स्लीपिंग बॅगमध्ये गुडगुप्प होऊन झोपून जायचं. नुसतं ऐकलं, तरी अंगावर काटा उभा राहतो ना? पण क्रूझवरची आपली उबदार केबिन सोडून अंटार्क्टिकाच्या एखाद्या बेटावर रात्रीच्या वेळी मुक्कामासाठी जाणारे धाडसी वीर आमच्यात होते. त्यासाठी त्यांना विशिष्ट अशा प्रकारचे तंबू पुरवण्यात येतात. काहींचं आणखी एक पाऊल पुढं… रात्री उणे १०-१५ अंश सेल्सिअस तापमानात या तंबूतही न राहता चक्क उघड्यावर झोपण्याचं धैर्य ते दाखवतात ! त्यांच्यासाठी माउंटेनिअरिंग बिव्ही सॅक्स आणि एक पोर्टेबल टॉयलेट देण्यात येतं. मात्र, हे धाडस एका व्यक्तीस एकदाच करण्याची परवानगी असते. आमच्या बोटीवरच्या एका कॅनेडियन दाम्पत्यानं एकदा हा विक्रम केला.

बापरे ! व्हेल मासा

हॅट्स ऑफ टू देम! ‘नेको हार्बर’ हे अंटार्क्टिकाचं एक मुख्य बेट मानलं जातं. तिथूनच्या क्रूझिंगची बहार तर विचारूच नका. झोडियाकमधून आम्ही विहार सुरू केला. तापमान २-३ अंश सेल्सिअस, ३५-४० किलोमीटरच्या वेगानं वारे वाहत होते. काही क्षणात आमची छोटी बोट एकदम थांबली. बोटीपासून अवघ्या ४०-५० फुटांवर, निदान ५०-६० फूट लांबीच्या व्हेल माशाची फण्याप्रमाणे उभी शेपटी दिसली. बोटीचं इंजिन बंद करण्यात आलं. कॅमेरे सरसावून बसलो; पण चार-पाच मिनिटं काहीच हालचाल दिसली नाही. आणि एकदम अक्षरश: ६०-७० फुटांवर उसळी मारून तो व्हेल मासा वर आला. बापरे ! त्याच्या नुसत्या शेपटीचा जरी फटका झोडियाकला बसला तर काय? अगदी पूर्ण शांतता पसरली. तो लांबलचक व्हेल जवळजवळ अर्धा पाण्याच्या वर आला. प्रथम त्याचं डोकं दिसलं. आपली अक्षरश: धडकी भरते. मग शेपटीचा फणा दाखवत तो गायब झाला. तो ब्ल्यू व्हेल असल्याची माहिती बरोबरच्या तज्ज्ञानं दिली. जयंतीनं त्या सर्व प्रसंगाचं मस्तपैकी शूटिंग केलं. त्या दिवशी व्हेल आणि ग्लेशियरवर सुस्तावलेल्या पांढऱ्या-काळ्या अजस्त्र सील माशांच्या बाबतीतही आमचं नशीब जोरदार होतं. निदान चार-पाच वेळा त्यांचं मस्त दर्शन झालं.

डॅमॉय हट

अंटार्क्टिकाच्या उत्तर दिशेकडे आमचा प्रवास सुरू झाला. ‘डॅमॉय पॉइंट’ या अत्यंत महत्त्वाच्या बेटावर आम्ही उतरलो. तिथं सन १९७५ ते १९९३ या कालावधीत ब्रिटनचं ‘ऑपरेशनल एअर ट्रांझिट स्टेशन’ होतं. ‘डॅमॉय हट’ या नावानं ते केंद्र ओळखलं जातं. ‘महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा’ म्हणून २००९ मध्ये त्याला मान्यता मिळाली आणि आता पर्यटकांना पाहण्यासाठी ते केंद्र खुलं करण्यात आलं आहे. मात्र, त्या बेटावर उतरणं आणि त्या हटपर्यंत जाणं खरोखरच मोठं कठीण होतं. बेटावर उतरल्यानंतर मोठमोठाले दगड चढून वर जावं लागतं. त्यातले काही तर अक्षरश: चार-पाच फूट उंच आणि कमालीचं निसरडं. पायात गुडघ्यापर्यंत जड रबरी बूट… सुसाट वारे आणि तापमान एक-दोन अंश सेल्सिअस त्यामुळे अक्षरश: कसरत करतच तो गड चढावा-उतरावा लागला. त्या हटकडे जाण्याचा मार्ग संपूर्णपणे बर्फातून होता. जवळजवळ अडीच किलोमीटर लांबीचा तो लुपवॉक होता. भुसभुशीत बर्फात पाय गुडघ्यापर्यंत आत जायचा. तो बाहेर काढून मग पुढं पाऊल टाकायचं… मधून चांगला चढ आणि मग छोट्या टेकडीत लपलेली निळ्या रंगाची ‘डॅमॉय हट’ दिसली. ती जमिनीपासून थोडी उंचावर बांधली असून, बाहेरच्या बाजूला समोरच बर्फ खणून काढण्याची उपकरणं लावली होती. कारण तिथं राहणारे संशोधक काही कामासाठी थोड्या वेळाकरिता हटबाहेर जायचे आणि परत यायचे, तर हटचा संपूर्ण दरवाजाच बर्फात गाडून गेलेला असायचा. मग प्रथम या उपकरणांनी बर्फ खणून काढावा लागायचा आणि मग आत प्रवेश करता यायचा. ती हट अतिशय उत्तमरित्या जतन केली आहे. त्या हटच्या आतही जाता येतं. त्यामध्ये साधारणत: चार शास्त्रज्ञ राहत होते. त्यामुळे दोन बंक बेड्स तिथं होते. गॅस, मायक्रोवेव्ह, अन्य मोजकी उपकरणं, खाद्यपदार्थांचे डबे दिसले. इथं खाद्यपदार्थांचा साठा निदान सहा महिन्यांकरिता करून ठेवावा लागतो. त्याला लागूनच त्यांचं संशोधन कार्यालय. या हटला भेट दिल्यामुळे उणे ४०-५० अंश सेल्सिअस तापमानातही शास्त्रज्ञ तिथं कसे राहतात, त्यांचं जीवन कसं असतं, याची कल्पना येऊ शकली.

अंटार्क्टिका करार

अंटार्क्टिकाचं हवामान इतकं विचित्र असतं, की प्रतिकूल हवामानामुळे आठवडा-दोन आठवडे, अगदी महिना-महिना तिथं अडकून पडल्याची अनेक उदाहरणं आजही सांगण्यात येतात.जन्मस्थान अंटार्क्टिका अंटार्क्टिकावर कोणत्याही देशाचा राजकीय हक्क नाही. या खंडाची नैसर्गिक संपत्ती कायम रहावी, तसंच खंडाचा उपयोग केवळ शास्त्रीय संशोधनासाठी व्हावा आणि लष्करी हालचाली, स्पर्धा आणि खनिजसंपत्ती संशोधनास प्रतिबंध करण्यासाठी सन १९५९मध्ये ‘अंटार्क्टिका करार’ झाला. त्यावर स्वाक्षऱ्या करणाऱ्या‍ देशांची संख्या पन्नासच्या घरात पोचली आहे. तरीही अंटार्क्टिकावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी विविध देशांमध्ये चढाओढ सुरूच असते. त्यासाठी निरनिराळ्या क्लृप्त्या लढवतात. अर्जेटिना देशानं निराळाच मार्ग अनुसरला. अगदी दिवस भरत आलेल्या गरोदर महिलेची त्यांनी निवड केली. ती आणि तिच्यासोबत डॉक्टरांचं एक पथक अंटार्क्टिकातल्या अर्जेंटिनाच्या केंद्रात मुक्कामाला गेलं. तिथं त्या महिलेनं बाळाला जन्म दिला. त्या बाळाचं जन्मस्थान हे अंटार्क्टिका असल्याचं सांगून केंद्राच्या त्या बेटावर अर्जेंटिनानं आपला हक्क सांगण्याचा प्रयत्न केला. विलक्षण योगायोग अंटार्क्टिकाच्या सहलीवर जाणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची मनापासून एक प्रार्थना असते : ‘संपूर्ण प्रवासात माझी प्रकृती उत्तम राहू दे.’ अंटार्क्टिकात रुग्णालय नाही. क्रूझवर प्राथमिक, जुजबी वैद्यकीय उपचार केले जातात. मात्र, थोडा गंभीर आजार असेल, तर सर्वांत जवळचं वैद्यकीय केंद्र म्हणजे चिलीमधलं पुंटा ऐरेनास. तिथं नेण्याचा केवळ हॅलिकॉप्टरचा खर्च एक कोटीच्या घरात आणि तेही सारं निसर्गच्या कृपेवर अवलंबून.

विलक्षण योगायोग

अंटार्क्टिकाच्या क्रूझवर माझ्या बाबतीत घडलेलं एक विलक्षण योगायोगाचं उदाहरण मुद्दाम सांगावंसं वाटतं. अंटार्क्टिकावर असतानाच एकाएकी माझे दोन्ही डोळे लालभडक झाले. थोडे दुखतही होते. जवळचे आय ड्रॉप्स टाकले; पण लाली काही कमी होत नव्हती. अमेरिकेत गेली पन्नास वर्षं राहत असलेले; पण मूळ भारतीय असलेले एक डॉक्टर क्रूझवर पर्यटक म्हणून आले होते. त्यांनी डोळे पाहिले आणि त्यांच्याकडचे ड्रॉप्स दिले. मात्र, लाली काही जात नव्हती. अखेर बोटीवरच्या डॉक्टरांना डोळे दाखवण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि त्यांची वेळ घेण्याकरिता मी व पत्नी रिसेप्शन काउंटरवर गेलो. इतक्यात आदल्या दिवशी डोळे पाहिलेल्या डॉक्टरांच्या मित्रानं पत्नीला पाहून इंग्रजीत विचारलं : ‘‘How are your husband’s eyes?’’ ते ऐकून शेजारीच उभ्या असलेल्या एका गोऱ्या‍ माणसानं विचारलं : ‘‘Who has an eye problem? I am an eye specialist from USA.’’ पत्नीनं सांगितल्यावर त्या अमेरिकन नेत्रतज्ज्ञानं तिथल्या तिथंच माझे डोळे तपासले. इन्फेक्शन वगैरे काही नसल्याचा निर्वाळा दिला. त्यांच्याकडचे आय ड्रॉप्स दिले. संध्याकाळी डोळे एकदम निवळले होते. पत्नीला डोळ्यांबाबत प्रश्न विचारायला आणि नेमके डोळ्यांचेच डॉक्टर शेजारी हजर असण्याचा हा योगायोग विलक्षण म्हणावा लागेल.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading