November 21, 2024
Market picture of survival in Akshardan Dipawali Issue
Home » अक्षरदानमध्ये जगण्याच्याही बाजाराचे चित्र !
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अक्षरदानमध्ये जगण्याच्याही बाजाराचे चित्र !

गावोगावी भरणारे आठवडी बाजार ते आताच्या डिजिटल युगातील ऑनलाईन बाजार या स्थित्यंतराचे दर्शन या अंकात घडते. तसेच विविध जातीधर्माचे, पंथाचे लोक बाजाराशी समरस झालेले दिसतात. तेव्हा त्यांच्यात निर्माण झालेली समता, एकमेकांप्रती असलेली आपुलकी, बंधुभाव, त्यांच्यातील जातीधर्मविरहित सौहार्दतेचे बंध, आयुष्यभरासाठी जोडलेली माणुसकीची नाती ही मूल्ये बाजाराच्या ठिकाणी बहरलेली असायची.

डॉ. योगिता राजकर
संवाद -98908 45210

दिवाळी अंकांच्या वैभवशाली परंपरेत ‘अक्षरदान’ दिवाळी अंकाचं महत्त्व आता अधोरेखित होत आहे. संपादक मोतीराम पौळ २०१४ पासून प्रकाशित करत असलेला हा दिवाळी अंक दरवर्षी अनोखा विषय घेऊन प्रसिद्ध होत असतो. विषयांची मूलभूत मांडणी आणि सुबक निर्मिती हे या अंकाचे वैशिष्ट्य.

ललित साहित्य, संत वाड्मयविशेषांक, स्पर्धापरीक्षा, बळीराजा ,साहित्य अकादमी , बोलीभाषा, निर्मिती प्रक्रिया, साहित्य सिनेमा ,जत्रा ,पहिली निवडणूक असे एकाच विषयाला वाहिलेले दिवाळी अंक प्रकाशित करणे ही संपादक पौळ यांच्या दिवाळी अंक संपादनाची खासियत. एकाच विषयाची परंपरा पुढे नेताना सन २०२४ चा अक्षरदान दिवाळी अंकाचा यावर्षीचा विषय आहे ‘गावोगावचा बाजार’.अक्षरदानचा हा अकरावा अंक असून चित्रकार सरदार जाधव यांनी मुखपृष्ठावर बाजाराचे दर्शन घडविणारे आशायानुरुप चित्र रेखाटले आहे. मुखपृष्ठाचे डायमेन्शन रसिकांच्या मनात विचाराचे विविध तरंग उमटवत राहतात. वाचकांनी यावर्षीच्या या दिवाळी अंकाचे उत्तम स्वागत केले आहे.

संपूर्ण अंकच ग्लॉसी पेपरवर छापला असून आतील रेखाटने, छायाचित्रे आतील लेखाला अधिक बळकटी देणारी आहेत. अंकाची एकूण मांडणी उत्तम केली गेली आहे. गावोगावी भरणारे आठवडी बाजार ते आताच्या डिजिटल युगातील ऑनलाईन बाजार या स्थित्यंतराचे दर्शन या अंकात घडते. तसेच विविध जातीधर्माचे, पंथाचे लोक बाजाराशी समरस झालेले दिसतात. तेव्हा त्यांच्यात निर्माण झालेली समता, एकमेकांप्रती असलेली आपुलकी, बंधुभाव, त्यांच्यातील जातीधर्मविरहित सौहार्दतेचे बंध, आयुष्यभरासाठी जोडलेली माणुसकीची नाती ही मूल्ये बाजाराच्या ठिकाणी बहरलेली असायची. काळाच्या ओघात त्यातील ओलाव्याचे हे बंध सैलावत जाताना, हळूहळू नाती विरत जाताना, माणुसकीचा रंग फिकट होत जाताना बाजाराचे बदलते विश्व आणि त्याचे अनुभव विचार करायला प्रवृत्त करतात. बाजार या गोष्टीचा किती विविध दृष्टिकोनातून विचार करता येतो, त्या विषयाच्या संदर्भाने विविध मिती वाचताना थक्क व्हायला होते. विविध प्रकारचे बाजार भरलेले नजरेने पाहता येतात, पण जे नजरेआड भरतात त्याचे अस्वस्थ करणारे वास्तवदर्शी चित्र आपल्याला अंतर्मुख करते.

गावोगावच्या बाजाराचे हुबेहूब चित्रण आठवणीतले बाजार या पहिल्या विभागात वाचायला मिळते. ऊवाsचे, उंदराsचे, ढेकणाsचे औषिध.. हा दासू वैद्य यांच्या पहिल्या लेखाच्या शीर्षकावरून आपण बाजारात प्रवेश करतो आणि बाजाराचा मनसोक्त आनंदही घेतो. या बाजाराच्या सफरीने या दिवाळी अंकाची सुरुवात होते. गोंदवल्याचा माणदेशी बाजार, तुळजापूरचा बाजार, ठाणे नवी मुंबईचा बाजार, भर रंगात आलेला बाजार असे बाजाराचे विविधरंगी चलतचित्र नजरेसमोरून सरकत राहते. ज्योती डेरेकर, आबिद शेख, राजकुमार धुरगुडे, सुरेन्द्र पाटील, पंकज भोसले, प्रमोद मुनघाटे, पांडुरंग सुतार यांनी बाजाराच्या आठवणी जागविल्या आहेत. काश्मिरच्या दल सरोवरात पाण्यावर तरंगणाऱ्या बोटीवरच्या अनोख्या झिल बाजाराची सफर घडवली आहे संजय ऐलवाड यांनी. बाजाराचे मनोज्ञ दर्शन हे लेख घडवितात.

लाहोरचा ‘बाजार ए हुस्न’ हिरामंडी, हा प्रशांत पवार यांचा लेख हिरामंडी भागात मुजरा सादर करणाऱ्या तवायफ ते सेक्स वर्कर्सपर्यंतचा प्रवास उलगडतो. समीर गायकवाड यांनी मध्यप्रदेशातील भरणाऱ्या स्त्रियांच्या बाजाराचे भयाण वास्तव मांडले आहे. एकेकाळी कामाठीपुरा हे शरीर विक्रीचा मोठा बाजार पण आता त्याचे स्वरूप कसे बदलले आहे याविषयी लिहिले आहे संजीव साबडे यांनी. सूरज चौधरी यांनी पुण्यातील बुधवार पेठेतील वेशा बाजाराविषयी सांगितले आहे. असे देहांच्या बाजाराचे वास्तव चित्रण या लेखांमधून उलगडते.

पुण्यातील जुन्या बाजाराची खास सफर ज्योती बागल यांनी घडवली आहे. १९६५ सालापासून दर रविवारी दिल्लीत पुस्तकांचा बाजार भरतो. दर्यागंज संडे बुक मार्केटचा भरलेला हा बाजार खास रिपोर्ताजच्या अंगाने प्रथमेश तेलंग यांनी समजावून दिला आहे. भुतानचा लिंग प्रतिकृतींचा बाजार, सिनेमातल्या ‘बाजारा’ ची माया, हे लेख वाचकांची उत्सुकता चाळवतात. भरल्या बाजारी जाईन मी या लेखात वारकरी संतांनी आपल्या रचनांमधून बाजाराची शब्दबद्ध केलेली रूपे श्रीरंग गायकवाड यांनी उलगडली आहेत. साहित्यातला बाजार,पक्ष्यांचा बाजार, बैलबाजार, कांदा बाजार, फ्रँकफर्टचा बुक बाजार ते पारंपरिक बाजाराचे रुपडे बदलणारा ऑनलाईन बाजार या विविध प्रकारच्या बाजाराचे विविधरंगी कोलाज असेही बाजार या विभागात सचित्र वाचताना वाचक बाजाराशी समरस होतो.

बाजार या विषयाशी संबंधित लेख जसे आहेत तसेच या विषयाला कवेत घेणाऱ्या सद्याच्या नामवंत कथाकारांच्या कथाही या अंकात आहेत. प्रियांका पाटील यांची ग्रामीण बोलीभाषेतील शेवटचा बाजार ही कथा वंचित घटकाचा बाजाराशी असलेला संबंध दर्शविते. बगळ्या ही प्रदीप ईक्कर यांची कथा, केशरी पेढे ही सुनीता बागवडे यांची कथा, बाजारू सांड ही आशिष वरघणे यांची कथा साऱ्याच वाचनीय आहेत. तसेच बाजाराच्या नोंदी आपणास अंकात ठिकठिकाणी वाचायला मिळतात.

व्यासंगी ज्येष्ठ पत्रकार तथा विख्यात कवी अजय कांडर यांनी बाजाराच्या कविता विभागाचे संपादन केले असून मराठीतील गुणवंत १५ कवींच्या बाजाराच्या कविता यात आहेत. यात माझीही कविता समाविष्ट केली आहे. जगण्याची प्रगल्भता हीच कवीच्या कवितेची प्रगल्भता असते. असे अभ्यासपूर्ण भाष्य त्यांनी बाजार न दिसणाऱ्या भावनांचा अवशेष या संपादकीयात केले आहे. ते मुळातूनच वाचावे असे आहे.

पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आठवडी बाजारापासून जगभरात भरणारे विविध प्रकारचे बाजार याचे मनोहारी तसेच भयावह चित्र अंतर्मुख करणारे आहे. बाजार या विषयाभोवतीचा हा लेखनप्रपंच असला तरी हे सर्व लेखन वाचताना आपणही या बाजाराचा एक भाग कसे झालो आहोत आणि आपले आयुष्य बाजार कसे झाले आहे हाच विचार मनात येऊन जातो. हेच या दिवाळी अंकाचे वैशिष्ट्य आहे. हा संस्मरणीय ‘बाजार’विशेषांक अक्षरदान दिवाळी अंकाने प्रसिद्ध केल्याबद्दल संपादक मोतीराम पौळ यांना धन्यवाद!

पुस्तकाचे नाव – अक्षरदान दिवाळी अंक
संपादक – मोतीराम पौळ ( संवाद – ९६३७९९३३१९ )


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading