July 27, 2024
Culture needs to be protected to protect the country
Home » संस्कृती संरक्षण हवे देशाच्या संरक्षणासाठी
मुक्त संवाद

संस्कृती संरक्षण हवे देशाच्या संरक्षणासाठी

सरकार, शास्त्रज्ञ, सैनिक वगैरे देशाच्या संरक्षणासाठी आहेतच पण आपणही आपला खारीचा वाटा जर उचलला तरच देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी गेलेले अनेक वीरांचे बलिदान व्यर्थ गेले नाही असे म्हणता येईल… आपल्या भारताच्या आणि धर्माच्या संरक्षणासाठी कटिबद्ध होऊ या… हाच देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी आपण सारे प्रण करू या..

सौ सुनेत्रा विजय जोशी
रत्नागिरी.

मौल्यवान गोष्टींना नेहमीच संरक्षणाची गरज असते. आपण आपल्या मौल्यवान वस्तुंचे नेहमी संरक्षण करतो. कुठेही उघड्यावर पडलेली आमची वस्तू दिसली रे दिसली की आई नेहमी म्हणायची. “आपले राखावे आणि दुसर्‍याला यश द्यावे” .. आपणच आपली किंमती वस्तू कुठेही टाकायची. मग चोराला आयतेच फावते. आणि इतरांना सुध्दा ती चोरण्याचा मोह होऊच शकतो. त्यापेक्षा आपणच नीट ठेवावे ना..

दागिन्यांचे संरक्षण आपण लाॅकरमधे ठेवून करतो. पैशाचे ते बॅंकेत ठेऊन करतो. इतकेच काय लाईफ इन्शुरन्स पाॅलिसी घेऊन आपण आपल्या मृत्यूनंतर सुध्दा आपल्या वारसांचे आयुष्य सुरळीत चालावे म्हणून काळजी घेतो. हे ही एक संरक्षणच की. पण हे झाले ज्याचे त्याचे स्वतःपुरते मर्यादित. पण आपण ज्या समाजात राहतो, ज्या देशात राहतो त्याचे काय?

त्याप्रती पण आपली काही कर्तव्ये असतातच ना? ती विसरून कसे चालेल. देशाचे नुकसान झाले तरी आपल्याला खंत वाटायला हवी. आणि अशी खंत वाटून घेण्यापेक्षा आधीच काळजी का घेऊ नये? एखाद्या गोष्टीचे संवर्धन करण्यासाठी आधी त्याचे संरक्षण करणे जरुरी आहे. ती असेल तर वाढवता येईल. पण मुळात ती नसेलच तर काय?

संरक्षण हे अनेक गोष्टींचे करायला हवे. निसर्गाचे म्हणजे पर्यायाने पर्यावरणाचे संरक्षण करायला हवे. आपल्याला निरोगी आयुष्य हवे तर उत्तम अन्न, पाणी, हवा सगळे हवे. त्यामुळे जलसंपत्तीचे संरक्षण करायला हवे. झाडांचे संरक्षण म्हणजे जंगल संरक्षण करायला हवे. मान्य आहे की वाढत्या लोकसंख्येमुळे घरांसाठी वृक्षतोड अनिवार्य आहे. पण मग नवीन झाडे लगेच लावायला हवीत.तसेच औषधी वनस्पतींचे संरक्षण करून संवर्धन करायला हवे. तसेच शुध्द हवेसाठी वाहनांमुळे होणारे प्रदूषण सुध्दा कमी करायला हवे. अन्यथा भविष्यात आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील.तसेच स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचे असते त्यांचे शील. त्यासाठी स्वतः ज्युडो कराटे सारख्या कला अवगत करून स्वतःचे संरक्षण करता यायला हवे. हे नुसते शिकून उपयोग नाही तर वेळ आली की त्याचा उपयोग करण्याचे धैर्य मनात असायला हवे.

अजून एक महत्वाचे म्हणजे लहान मुलांचे संरक्षण.. आता हे काय? तर त्यासाठी संस्कार आणि संस्कृती चे संरक्षण करायला लागेल.
आपला देश उज्वल पवित्र अशा परंपरांसाठी जगात सर्वत्र गौरविल्या जातो. पण आपण आज आधुनिकतेच्या नावाखाली संस्कार आणि संस्कृतीची पायमल्ली चालवलेली आहे. आपण त्यावर फालतू जोक्स करून देवदेवतांची तसेच धर्माची खिल्ली उडवतो. आपल्या धर्माचे संरक्षण करणे ही आपलीच जबाबदारी आहे ना? तसे इतर धर्मात कुणी करतांना दिसत नाही.यावर जरूर विचार करावा. आपण मात्र आपल्या देवदेवतांवर नको ते बोलतो.आणि आयते कोलीत त्यांच्या हातात देतो. पाश्चात्य लोक आता श्रीमद्भगवत्गीता शिकत आहेत. आणि हिंदू धर्म समजून घेत आहेत. आणि आपण कित्येकांनी मात्र ती अजून वाचलेली पण नाही. हा अमुल्य ठेवा जतन करून धर्माचे संरक्षण करायला हवे. तेव्हा संस्कृती संरक्षण हे देशाच्या संरक्षणासाठी जरुरीचे आहे. आजची लहान मुले आणि तरूण हे देशाचे उद्याचे भावी आधारस्तंभ आहेत. ते भक्कम असतील तरच देशाचे संरक्षण करू शकतील. लहान मुलांना योग्य वळण लागले नाही तर ती हिंसा अत्याचार याला बळी पडून वाईट मार्गाला लागतील. मग ती पुढे देशाचे कसे संरक्षण करणार?

आणि देशच सुरक्षित नसेल तर आपले काय? तेव्हा या सगळ्या गोष्टींच्या संरक्षणाइतकेच किंवा त्याहून महत्त्वाचे देश संरक्षण आहे.एकदा गुलामगिरीचा कटू अनुभव आपण घेतला आहेच. आणि कितीतरी जणांच्या बलिदानानंतर आपण स्वातंत्र्य मिळवले आहे. देशाच्या संरक्षणासाठी सरकार नेहमी कटिबद्ध असते. संरक्षण खाते त्याचसाठी असते. विविध नियम कायदे बनवल्या जातात. देश स्वतंत्र झाल्यावर देशाच्या सुरक्षिततेसाठी अनेक गोष्टी झाल्या. त्यातलीच एक म्हणजे 1958 साली संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची स्थापना. देशाच्या पंतप्रधानाच्या सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था काम करते.देशाच्या सुरक्षिततेसाठी काय काय करता येईल याचा विचार करून अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि उपकरणांचा विकास करणे त्यासाठी संशोधन. तसेच यात एरोनाॅटिक्स, राॅकेट आणि क्षेपणास्त्र, इलेक्ट्रॉनिक इनस्ट्रुमेंन्टेशन, व्हेईकल, नोवल सिस्टीम, आर्मामेन्ट टेक्नॉलॉजी वगैरे सारख्या इतर शाखांचाही यात समावेश होतो. तसेच स्फोटक वस्तुंची सुरक्षितपणे हाताळणी करण्याचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळते. बर्‍याच प्रयोगशाळा आणि शास्त्रज्ञ यावर सतत कार्यरत असतात. लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे तसेच बंदूका, राॅकेट अशी अनेक उपकरणे आपण विकसित केली आहेत.

सरकार, शास्त्रज्ञ, सैनिक वगैरे देशाच्या संरक्षणासाठी आहेतच पण आपणही आपला खारीचा वाटा जर उचलला तरच देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी गेलेले अनेक वीरांचे बलिदान व्यर्थ गेले नाही असे म्हणता येईल… आपल्या भारताच्या आणि धर्माच्या संरक्षणासाठी कटिबद्ध होऊ या… हाच देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी आपण सारे प्रण करू या..
जय हिंद..


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात ‘अशानं आसं व्हतं’ या ग्रंथाचा समावेश

मराठी भाषागौरव दिन आणि राजभाषा दिवस यातील फरक 

संस्कृती संवर्धनासाठी अनुवाद संशोधन होणे गरजेचे – माया पंडित

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading