September 25, 2023
Meditation Study Yoga article by rajendra ghorpade
Home » अभ्यासयोग म्हणजे काय ?
विश्वाचे आर्त

अभ्यासयोग म्हणजे काय ?

आपला स्वर आपणच ऐकायला शिकले पाहिजे. ही क्रिया सुरवातीला अवघड वाटते. पण हळूहळू त्याची सवय होते. अभ्यासाने यावर यश मिळवता येते. स्वर कसा ऐकायचा ? येणारे अडथळे कसे दूर करायचे ? हळूहळू त्यावर कसे नियंत्रण साधायचे याचा अभ्यास केल्यास उत्तरे आपोआप मिळत जातात.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

अगा अभ्यासयोगु म्हणिजे । तो हा एकु जाणिजे ।
येणें कांही न निपजे। ऐसें नाहीं ।। 110 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 12 वा

ओवीचा अर्थ – अरे अभ्यासयोग जो म्हणतात, तो हाच एक आहे, असे समज. याच्या योगाने कोणतीही गोष्ट प्राप्त होणार नाही, असे नाही.

वाघ, सिंह हे हिंस्र प्राणी आहेत. त्यांच्याजवळ जाणेही धोकादायक असते. पण त्यांचा अभ्यास करून त्यांच्यावर नियंत्रण मिळवता येते. त्यांनाही आपल्या ताब्यात ठेवता येते. अभ्यासाने प्राणीही माणसाळू शकतात. सापालाही गारुडी ताब्यात ठेवतात. पुंगीच्या तालावर नाचवतात. इतका मोठा बदल हिंस्र प्राण्यांमध्ये होऊ शकतो. मग अध्यात्माचा अभ्यास केला तर आत्मज्ञानी का होता येणार नाही ?

नकारात्मक विचार केला तर प्रगती होणारच नाही. सकारात्मक विचार नेहमी करायला हवेत. फक्त अभ्यास योग्य पद्धतीने करायला हवा. तरच यात यश मिळू शकेल. आपणास हे का जमत नाही. यावर विचार करायला हवा. प्रश्नांची उत्तरे शोधायची सवय लावायला हवी. इतकी मोठी मजल आपणास मारता येणे शक्य नाही असा नकारात्मक विचार करून आपण कधीच प्रगती करू शकणार नाही.

अभ्यास केला तर परीक्षेत यश निश्चित मिळते. अभ्यास न करता यशाची मोठी स्वप्ने पाहणे म्हणजे नैराश्य ओढवून घेण्यासारखे आहे. हे जमणार नाही. यापेक्षा हे मला का करता येणार नाही अशा विचार करायला हवा. स्पर्धा ही नेहमीच असते. पण येथे स्पर्धा स्वतःशीच आहे. स्वतःची स्पर्धा स्वतःशी केल्यास अपयश कधीच येत नाही. साधनेचा अभ्यास केल्यास आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. साधनेत हळूहळू प्रगती होत राहाते. एकदम काहीच घडत नाही.

उन्हाळा सुरू झाला की नदी आटते. झऱ्याचे पाणी आटते. पण ही क्रिया पटकन होत नाही. जसा उन्हाचा ताण वाढेल तसे हळूहळू पाणी कमी होत जाते. तसे यशही एकदम हस्तगत होत नाही. हळूहळू अभ्यासाचा जोर जसा वाढेल तसे यश टप्प्यात येते. साधना म्हणजे काय ? सोऽहं म्हणजे काय ? हे जाणून घ्यायला हवे. सोऽहं हा स्वर आहे. तो स्वर कसा ऐकता येतो याचा अभ्यास करायला हवा.

आपला स्वर आपणच ऐकायला शिकले पाहिजे. ही क्रिया सुरवातीला अवघड वाटते. पण हळूहळू त्याची सवय होते. अभ्यासाने यावर यश मिळवता येते. स्वर कसा ऐकायचा ? येणारे अडथळे कसे दूर करायचे ? हळूहळू त्यावर कसे नियंत्रण साधायचे याचा अभ्यास केल्यास उत्तरे आपोआप मिळत जातात. विष कसे पचवायचे याचा अभ्यास केला तर विष सुद्धा पचवता येणे शक्य आहे. मग सोऽहं चा आपला स्वर आपणच कसा ऐकायचा याचा अभ्यास करून तो ऐकायला हवा. त्यात रममाण व्हायला हवे. तरच आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग सुकर होईल.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Related posts

तुळसीचे संवर्धन फायद्यासाठी नव्हे तर जैवविविधता जोपासण्यासाठी व्हावे

आध्यात्मिक तेज

नाशवंत शरीर ओळखा अन् लढा

Leave a Comment