आजवर कोकणातून अनेक जण विधानसभेवर किंवा लोकसभेवर निवडून गेले, पाच – दहा वर्षांनी ते कुठे आहेत, काय करतात हे शोधावे लागते. अनेक जण काळाच्या ओघात दिसेनासे झाले. पण नारायण राणे यांची प्रतिमा वर्षानुवर्षे कोकणचा वाघ अशीच आहे. आक्रमकता, आवेश आणि निश्चय हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांना राजकीय जीवनात चौफेर अनेक विरोधक निर्माण झाले, पण राणेसाहेबांचे स्थान कोकणवासीयांमध्ये कायम आहे.
डॉ. सुकृत खांडेकर
लोकसभा निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघातून भाजपने आपली उमेदवारी जाहीर करण्यापूर्वीच नारायण राणे यांच्या प्रचाराने हे दोन्ही जिल्हे ढवळून निघाले आहेत. एक बार फिर मोदी सरकार आणि अब की बार ४०० पार या घोषणांनी तसेच राणे यांच्या सभा व भाषणांनी कोकणात भगवे वादळ निर्माण केले आहे. या वेळी दोन लाखांच्या मताधिक्याने या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार विजयी झाला पाहिजे, असा संकल्प त्यांनी जाहीर केला आणि भाजपचे हजारो कार्यकर्ते पक्षाच्या महाप्रचंड विजयासाठी निवडणुकीच्या संग्रामात जिद्दीने उतरले आहेत.
१० एप्रिल हा नारायण राणे यांचा जन्मदिवस. गेली सहा दशके त्यांचा वाढदिवस मुंबई आणि कोकणात धुमधडाक्याने साजरा होत आहे. त्यांनी जरी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करायचे ठरवले तरी त्यांचे कार्यकर्ते, चाहते, निष्ठावान हा दिवस सणवार उत्सवासारखा साजरा करतात. नारायण राणे यांनी सार्वजनिक जीवनात त्यांच्या सान्निध्यात आलेले व त्यांच्यासाठी झटणारे शेकडो-हजारो कार्यकर्ते जपले आणि वाढवले. आपल्या कुटुंबातील सदस्यांसारखी त्यांची काळजी घेतली. म्हणूनच निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे झालेल्या कार्यकर्ता संमेलनात त्यांनी माझा कार्यकर्ता, माझा अभिमान असल्याचे सांगितले. आपल्या सार्वजनिक वाटचालीत आपला कार्यकर्ता हाच आपला सर्वकाही आहे म्हणूनच प्रचंड विजयाचा संकल्प आपण साध्य करणार, हा आपला त्यांच्यावर नितांत विश्वास आहे….
नारायण राणे यांचे व्यक्तिमत्त्व सर्वसामान्य लोकांना आवडते. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचे पत्रकार तर नेहमीच त्यांच्या प्रेमात असतात. कारण त्यांचे वागणे-बोलणे कधीच मिळमिळीत नसते. अनावश्यक विषयांवर ते कधी बोलणार नाहीत. आपली भूमिका मांडताना ते कधीच अघळ-पघळ बोलत नाहीत. राजकारणातील लढाऊ नि आक्रमक नेता ही त्यांची प्रतिमा गेली साठ वर्षे कायम आहे. मिळालेल्या विजयातून ते कधी हुरळून जात नाहीत आणि मनाविरुद्ध घडले म्हणून कधी खचून गेले नाहीत. सन २००५ मध्ये शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यापासून मातोश्रीला त्यांनी अंगावर घेतले नाही, असा एक महिनाही गेला नसेल. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून त्यांच्या नेतृत्वाला कंटाळून अनेक नेते, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी बाहेर पडले पण ठाकरे यांना ‘अरे ला कारे’ असा जाब विचारण्याची हिम्मत केवळ नारायण राणेच दाखवू शकतात.
आजवर कोकणातून अनेक जण विधानसभेवर किंवा लोकसभेवर निवडून गेले, पाच – दहा वर्षांनी ते कुठे आहेत, काय करतात हे शोधावे लागते. अनेक जण काळाच्या ओघात दिसेनासे झाले. पण नारायण राणे यांची प्रतिमा वर्षानुवर्षे कोकणचा वाघ अशीच आहे. आक्रमकता, आवेश आणि निश्चय हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांना राजकीय जीवनात चौफेर अनेक विरोधक निर्माण झाले, पण राणेसाहेबांचे स्थान कोकणवासीयांमध्ये कायम आहे. सार्वजनिक जीवनात नारायण राणे हे जनतेला दादा म्हणून परिचित आहेत. अनेक स्पर्धक आले व गेले पण दादांना पर्याय नाही, हेच त्यांचे मोठे यश आहे.
शाखाप्रमुख पदापासून केलेली त्यांची विलक्षण अशी वाटचाल आहे. त्यांच्या यशाबद्दल आणि समृद्धीबद्दल अनेकांना आश्चर्य वाटतेच पण हेवा वाटणारे अधिक आहेत. हे यश किंवा वैभव त्यांना घरात बसून मिळालेले नाही. वडिलोपार्जित तर मुळीच नाही. लहानपणी चेंबूरला मावशीकडे पत्र्याच्या खोलीत राहायचे. बाहेर ओटीवर झोपायचे. चेंबूरला शिकताना आजूबाजूच्या दहा इमारतींमध्ये सकाळी पेपर टाकून चार पैसे मिळवायचे. पुढे मिळेल तिथे सात-आठ नोकऱ्या केल्या. आयकर खात्यातही नोकरी केली. अंडी विकली. समाजसेवेचे वेड आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आकर्षण यातून त्यांचे करिअर घडत गेले.
शिवसेना, काँग्रेस आणि भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास झालाय. शिवसेनेत तब्बल ३९ वर्षे काढली. शिवसेनाप्रमुखांचे विचार आजही त्यांच्या रोमारोमात भिनले आहेत. शिवसेना कोकणात वाढविण्यासाठी त्यांनी रक्ताचे पाणी केले. म्हणूनच बाळासाहेबांच्या हयातीनंतर त्या पक्षात जे चुकीचे घडत आहे, शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना व तत्त्वांना तिलांजली देऊन पक्ष स्वार्थासाठी पक्ष चालवला जातो आहे याचा त्यांना मनस्वी राग आहे. म्हणूनच उद्धव ठाकरे जेव्हा जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नाव घेऊन टीका करतात आणि भाजपच्या विरोधात बोलतात तेव्हा नारायण राणे यांना संताप अनावर होतो. मातोश्रीवर प्रखर हल्लाबोल करताना त्यांच्या टीकेतून आगीचे लोळ बाहेर पडताना दिसतात. शिवसेनाप्रमुखांनी अहोरात्र मेहनतीतून उभी केलेली, घाम व रक्त सांडून आमच्यासारख्या शिवसैनिकांनी वाढवलेली शिवसेना उद्धव यांनी कोठे नेऊन ठेवली, हा खरा त्यांचा संताप असतो.
सत्तेच्या पदावर असो किंवा संघटनेत जबाबदारी दिलेली असो, झपाटून काम करणे हा त्यांचा स्वभाव आहे. उद्धव ठाकरे यांचा उदय झाल्यापासून नारायण राणेंसारखे झपाटणारे व जनप्रिय नेते जवळपासही नकोत असे पक्षात वातावरण निर्माण केले गेले. निर्णय प्रक्रियेपासून सर्वच ज्येष्ठांना अंधारात ठेवले जाऊ लागले. राणे नंतर काँग्रेसमध्ये आले तेथेही त्यांनी जिद्दीने काम केले. पण पक्षश्रेष्ठींनी त्यांना दिलेला शब्द पाळला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या नेतृत्वाविषयी त्यांना जास्त विश्वास वाटू लागला. भाजपने त्यांचे आपुलकीने स्वागत केले. त्यांना राज्यसभा खासदार केलेच पण मोदींनी त्यांच्या सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रीपद व महत्त्वाचे खातेही दिले. नारायण राणे, निलेश राणे व नितेश राणे या सर्व परिवाराने गेल्या काही वर्षांत कोकणात पक्षाची संघटना जोमाने बांधली. कोकणातील गावागावांत भाजपचे झेंडे फडकू लागले. राणेंच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांची फौज लोकसभा निवडणुकीत एकजुटीने व एकदिलाने काम करताना दिसत आहे.
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना पोलीस-प्रशासनाने ज्या नामवंतांना त्रास दिला, त्या सर्वांना भाजपने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे. नारायण राणे केंद्रीय मंत्री असूनही त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ठाकरे सरकारने महाड – चिपळूणला पोलिसांचा फौजफाटा पाठवला होता. अभिनेत्री कंगना रणाैत यांच्या घरावर बुलडोझर नेण्यात आला होता. खासदार नवनीत राणा यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचणार असे जाहीर केल्यावर त्यांना पोलीस बळाचा वापर करून कोठडीत डांबण्यात आले होते. आज राणे हे भाजपासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ पिंजून काढत आहेत. कंगना यांना हिमाचल प्रदेशमधील मंडीमधून भाजपने उमेदवारी दिली आहे, तर नवनीत राणा या भाजपच्या तिकिटावर अमरावतीतून लढत आहेत. ठाकरे सरकारने ज्यांना टार्गेट केले होते, त्यांना भाजपने सन्मान दिला आहे.
निवडणूक आली की, पक्षाची उमेदवारी मिळविण्यास अनेक इच्छुक असतात. महिना-दोन महिन्या अगोदरपासून मतदारसंघात त्यांचे फलक झळकू लागतात. राणे यांनी पक्षाकडे कधीच काही मागितले नाही. मला तिकीट द्या अशी विनंतीही केली नाही. पक्षाने निवडणूक लढवायला सांगितली, तर आपण आदेशाचे पालन करू, असे त्यांनी नम्रपणे म्हटले होते. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी व अब की बार ४०० पार हे उद्दिष्ट गाठण्यासाठी त्यांनी प्रचारात त्यांच्या सर्व टीमसह झोकून दिले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी विमानतळ उभारला गेला हे सर्व श्रेय नारायण राणे यांनाच आहे. त्यांनी केलेला पाठपुरावा हा महत्त्वाचा होता. ज्यांनी विमानतळाला विरोध केला तेच विमानतळाच्या उद्घाटनाला कसे पुढे पुढे करीत होते हे कोकणातील जनतेने बघितले आहे. स्वत: उभारलेले सुसज्ज इस्पितळ ही तर राणे यांनी कोकणातील जनतेला दिलेली देणगी आहे. डॉक्टर-इंजिनिअर होण्यासाठी आता कोकणातील मुलांना दूरवर धावावे लागू नये, याची दक्षता राणे यांनी घेतली आहे. शिक्षणाच्या सर्व सुविधा या उपलब्ध आहेत. एवढेच नव्हे तर दोडा मार्गला पाचशे उद्योग उभारले जाणार आहेत, त्यामागे त्यांचीच धडपड आहे. अठ्ठावीस पूल उभे राहिले. रस्ते, वीज, पाणी अशा सुविधा आहेत. विरोधक मात्र विकासाची कामे करण्यापेक्षा त्या कामांचे ठेके कसे मिळतील त्यातच गर्क आहेत. राणे यांनी दिल्लीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच कोकणातील माणसांच्या रांगा त्यांच्या घरी-दारी सर्वत्र दिसतात, हे त्यांचे वैभव आहे.
डॉ. सुकृत खांडेकर
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.