October 15, 2024
Gharandaj Savali Book introduction by Randhir Shinde
Home » Privacy Policy » धडाडीच्या प्रशासक डॉ. उषा इथापे
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

धडाडीच्या प्रशासक डॉ. उषा इथापे

डॉ. इथापे यांच्याबद्दलची नव्या पिढीला फारशी माहिती नाही. शिवाजी विद्यापीठाच्या पायाभरणी काळात कुलसचिव म्हणून उल्लेखनीय कार्य केलेल्या डॉ. इथापे यांचे इतक्या वेगाने विस्मरण व्हावे, याचे आश्चर्य वाटते. अर्थात, भारतीय समाजजीवनात या प्रकारचा विस्मरणांचा इतिहास पदोपदी पाहायला मिळतो. त्याचबरोबर स्त्रियांच्या कर्तबगारीची नोंद क्वचितच घेतली जाते किंवा अप्रत्यक्षपणे त्याकडे डोळेझाक देखील होते. डॉ. इथापे यांनी शिवाजी विद्यापीठातील कुलसचिव म्हणून जवळपास १७ वर्षे (१९६६-८३) काम केले. डॉ. इथापे यांनी गुणवान प्रशासकाची नाममुद्रा विद्यापीठ वाटचालीवर उमटविली. शिवाजी विद्यापीठात त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांच्याविषयी आदरयुक्त दबदबा निर्माण झाला. विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्याविषयी आदराची भावना होती. त्यांच्या कार्यपद्धतीत व स्वभावदृष्टीत मानवीयतेचे दर्शन होते. डॉ. इथापे यांचे कार्य माझ्या आधीच्या पिढीलादेखील फारसे माहिती नाही. त्यामुळे डॉ. इथापे यांचे कार्य आणि आठवणी लेखनबद्ध व्हाव्यात, या अपेक्षेने हा ग्रंथ आकाराला आला आहे. या ग्रंथामुळे शिवाजी विद्यापीठाच्या वाटचालीवर देखील काहीएक
प्रकाश पडेल.

उषा शिंदे यांचा जन्म ४ ऑगस्ट, १९२६ रोजी ग्वाल्हेर येथील शिंदे सरदार घराण्यात झाला. शिंदे घराणे ग्वाल्हेरमधील प्रमुख सरदार घराण्यापैकी एक होते. कुटुंबात उषा या प्रमिला या नावाने ओळखल्या जात. वडील अप्पासाहेब शिंदे यांना आठ मुले होती. चंद्रसेन, शांताबाई, हरिश्चंद्र, उषा, लीलावती, राणोजी, आबासाहेब व शशिकला; अशी ही भावंडे होती. त्यापैकी उषा या चौथ्या क्रमांकाच्या. उषा यांचे बालपण ग्वाल्हेरमध्ये गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे सरदार डॉटर स्कूलमध्ये झाले, तर माध्यमिक शिक्षण १९०५ साली स्थापन झालेल्या गजराराजा गर्ल्स हायस्कूलमध्ये झाले. हे हायस्कूल ग्वाल्हेर येथील लष्कर भागात आहे. त्यांचा विवाह मध्यप्रदेश (हरदा) येथील गणपतराव इथापे यांच्याशी झाला. विवाहानंतर त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण हरदा येथे झाले असावे. सासरे राघोजीराव इथापे यांचे त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले.

डॉ. उषा इथापे यांनी पुणे विद्यापीठातून ‘इब्राहिम आदिलशाह द्वितीयकालीन दक्खिनी हिंदी पुस्तकों ‘नौरस’ तथा इब्राहिमनामा की आलोचनात्मक व्याख्या’ या विषयावर पीएच.डी. पदवी मिळवली. पुणे विद्यापीठाच्या हिंदी विषयातील त्या पहिल्या विद्यावाचस्पती. त्यांनी हा प्रबंध स्वतंत्रपणे (मार्गदर्शकांशिवाय) सादर केला. ग्वाल्हेरहून विवाहानंतर त्या पुण्यास आल्या, त्या त्यांच्या मोठ्या बहीण शांताबाई यांच्यामुळे. शांताबाई यांचे पती अनंतराव जाधव हे पुणे नगरपालिकेत उपआयुक्त पदावर कार्यरत होते. त्यामुळे उषा इथापे या पती गणपतराव इथापे यांच्यासमवेत पुण्यास आल्या. या काळातच त्यांनी पीएच.डी. केली. त्यानंतर डॉ. उषा इथापे यांनी मुंबईला इस्माईल युसुफ महाविद्यालयात १९५७ ते १९६१ या काळात हिंदी भाषा साहित्याचे प्राध्यापक म्हणून काम केले. १९३० साली स्थापन झालेले इस्माईल युसुफ महाविद्यालय, मुंबई येथे जोगेश्वरी भागात आहे.

त्या काळात मुंबईत त्यांना राहण्याचा प्रश्न बिकट होता. त्यामुळे त्या रेल्वेने प्रवास करत. ‘पुण्याहून सकाळी सहाच्या जनता एक्स्प्रेस रेल्वेने त्या निघत. धावपळ करत १०.४५ वाजता त्या कॉलेजमध्ये पोहोचत. परतीचा प्रवास मुंबईहून निघणाऱ्या ५.२० वाजताच्या रेल्वेने निघून पुण्यात रात्री ९.२० मिनिटांनी पोहोचत. दिवसाचे बारा तास त्यांचे प्रवासात जात.’ ( संदर्भ – सुवर्णमहोत्सवी स्मरणिका, इस्माईल युसुफ महाविद्यालय, मुंबई, १९८०). मुंबईतील राहण्याचा प्रश्न व प्रवासाच्या धावपळीमुळे त्या चिंतेत होत्या. याच काळात दुर्गा भागवतांशी त्यांची रेल्वे प्रवासात मैत्री झाली. प्रवासात त्यांच्याबरोबर इस्माईल कॉलेजच्या प्रा. कुल्सुम पारीख (गंजीकर) याही असत. दुर्गाबाईंनी इथापे यांची एक आठवण सांगितली आहे. ती अशी : दुर्गाबाई व उषा यांच्यात कुल्सुम पारीख यांचा विषय निघाल्यावर, भडाभडा बोलत उषा म्हणाली, ‘अहो, त्या बयेने कॉलेज जसं आपल्या मुठीत ठेवलं आहे. ही श्रीमंत आहे. रोज नव्या साड्या नेसते नि फॅशन करते. तिची मैत्रीण सरोजिनी शेंडेपण तिचीच कॉपी करते. ज्या अध्यापिकांना बेतात भागवायचं आहे, त्यांना यांच्या चैनी कशा परवडणार? आमच्यासारख्यांची या दोघी नेहमी टिंगल करीत असतात. कंटाळा आला आहे. पण पोटापायी नोकरी करावी लागते.’ (संदर्भ – दुर्गा भागवत, ‘आठवले तसे’, वरदा बुक, पुणे, पाचवी आवृत्ती, २०२२ पृ. २२३, २४) या उद्गारावरूनदेखील उषा इथापे यांचा साधेपणा व त्या काळची मानसिक स्थिती लक्षात येते.

त्या काळात कोल्हापूरला ताराराणी शिक्षण संस्थेचे कीर्ती महाविद्यालय सुरू झाले होते. ताराराणी शिक्षण संस्थेचे संस्थापक व्ही. टी. पाटील यांच्या विनंतीवरून डॉ. उषा इथापे प्रथमतःच कोल्हापुरात कीर्ती महाविद्यालयात प्राचार्य म्हणून रुजू झाल्या. त्यानंतर त्यांनी काही महिने विवेकानंद महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून काम केले. हे कीर्ती महाविद्यालय पुढे रयत शिक्षण संस्थेकडे हस्तांतरित झाले. २१ नोव्हेंबर १९६४ रोजी डॉ. उषा इथापे या शिवाजी विद्यापीठात उपकुलसचिव म्हणून रुजू झाल्या. १९६५ साली त्यांच्याकडे प्रभारी कुलसचिव पदाचा कार्यभार होता. १० डिसेंबर, १९६६ रोजी त्यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिव म्हणून निवड झाली. त्यानंतर १९८३ पर्यंत त्या शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिव म्हणून कार्यरत होत्या. एखादी महिला दीर्घकाळ कुलसचिव पदावर काम करणारी भारतीय विद्यापीठ पातळीवरील ही एकमेव बाब आहे.

शिवाजी विद्यापीठ

शिवाजी विद्यापीठाची स्थापना १८ नोव्हेंबर, १९६२ रोजी झाली. त्याआधी येथील महाविद्यालये पुणे विद्यापीठाशी संलग्नित होती. आरंभकाळात विद्यापीठाअंतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर व रत्नागिरी जिल्ह्यातील महाविद्यालयांचा समावेश होता. शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेत महाराष्ट्राचे त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व महसूल मंत्री बाळासाहेब देसाई यांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्याच बरोबर पी. सी. पाटील, सी. रा. तावडे, व्ही. टी. पाटील, बाळासाहेब खर्डेकर, माधवराव बागल व रत्नाप्पा कुंभार यांचा विद्यापीठ कल्पनेला पाठिंबा होता. शिवाजी विद्यापीठ स्थापनेवेळी पुण्यातील मंडळींचा बराचसा विरोधाचा स्वर होता. यामागे लगतच्या काळातील कोल्हापूर-पुणे संबंधाची किनार होती. मात्र डॉ. आप्पासाहेब पवार यांच्यासारखे दूरदृष्टीचे कुलगुरू आरंभकाळात शिवाजी विद्यापीठास लाभले. राजाराम महाविद्यालयाची उज्ज्वल आणि ऐतिहासिक परंपरा कोल्हापुरात होती. शैक्षणिक क्षेत्रात राजारामने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण तसेच कर्नाटकातील प्रबोधनाचे प्रवेशद्वार म्हणून राजाराम महाविद्यालयाकडे पाहिले जाते. राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण यांचे ‘शिवाजी विद्यापीठ व्हावे’ असे स्वप्न होते. ते त्यांचे विद्यार्थी डॉ. आप्पासाहेब पवार यांनी मूर्त स्वरूपात आणले. त्याआधी राजाराम महाविद्यालयातील रसायनशास्त्राचे नामवंत प्राध्यापक, लेखक, भाषांतरकार बाळाजी प्रभाकर मोडक यांनीदेखील १९०४ साली मुंबई येथे, मायभाषेचे विद्यापीठ व्हावे, असा विचार मांडला होता. राजाराम महाविद्यालयात ज्ञानवंतांची मोठी मांदियाळी होती. ज्ञानपीठ परितोषिक विजेते लेखक विंदा करंदीकर राजाराम महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. त्यांनी ‘परंपरा आणि नवता’ हा ग्रंथ, त्यांचे राजाराम महाविद्यालयामधील प्रा. यशवंत गणेश नाईक यांना कृतज्ञतापूर्वक अर्पण केला आहे. या शहराने आणि महाविद्यालयाने नवी दृष्टी दिली, असे करंदीकरांनी कोल्हापूरबद्दल म्हटले आहे.

साठच्या दशकात कोल्हापूरच्या सामाजिक जीवनात व राजाराम महाविद्यालयातही अभिजन व बहुजन असा सुप्त संघर्ष होता. मराठीतील लोकप्रिय कादंबरीकार ना. सी. फडके हे राजाराम महाविद्यालयात प्राध्यापक होते, तर आप्पासाहेब पवार हे त्या वेळी राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य याच्याबद्दल एकांगी, पक्षपातीपणाचे वर्णन केले आहे. फडके यांनी पवार जातीयवादी व ब्राह्मणद्वेष्टे होते, असे हेतुपूर्वक चित्र रेखाटले आहे. ‘सरकारी शिक्षणखात्यातील एका अधिकारपदावर ते आले. डेप्युटी डायरेक्टर झाले, पुढे डायरेक्टरही झाले आणि शिक्षण खात्यातल्या अधिकार पदावरून निवृत्त होण्याची त्यांची वेळ आली तेव्हा (जणू त्यांच्यासाठीच) शिवाजी विद्यापीठ अस्तित्वात आलं. त्या विद्यापीठाच्या कुलगुरूपदावर ते अलगद जाऊन बसले. हुजरेगिरीत प्रवीण असलेल्या त्यांच्यासारख्या माणसांचं परमेश्वर भलं करतो हेच खरं.’ (‘माझं जीवन एक कादंबरी’, ना. सी. फडके, कुलकर्णी ग्रंथागार, पुणे, १९६९,२००). यावरून त्या काळचा कोल्हापूरविषयक प्रस्थापित ब्राह्मणी दृष्टिकोन ध्यानात येईल.

प्रा. एन. डी. पाटील यांनी त्यांच्या आत्मपर लेखनात त्या काळातील राजाराम महाविद्यालयामधील आप्पासाहेब पवार व प्रा. ना. सी. फडके संबंधावर प्रकाश टाकला आहे. त्यांनी प्राचार्य म्हणून डॉ. पवार यांच्या कर्तृत्वाची व कार्यशैलीची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. ‘ना. सी. फडके हे कोल्हापूरच्या वातावरणात अनेक वर्षे राहूनही कोल्हापूरची नस समजून घेऊनही त्यांनी चुकीच्या भूमिका घेतल्या. विशेषतः बहुजन समाजाबद्दल त्यांच्या मनात शुष्क कोरडेपणा होता.’ डॉ. पवार यांच्या विसनगर (गुजरात) येथील बदलीला फडके कारणीभूत असावेत. ना. सी. फडके यांनी त्यांच्या ‘झंकार’ साप्ताहिकात आप्पासाहेब पवार यांच्यावर अतिशय असभ्य भाषेत लेखन केले. त्याचा प्रतिवाद करणारा निषेध लेख विद्यार्थिदशेतील एन. डी. पाटील यांनी शं. बा. भोसले यांच्या ‘लोकसेवक’मध्ये लिहिला. फडके यांच्या निषेधाची सभा एन. डी. पाटील यांच्या पुढाकाराने कोल्हापूर नगरपालिकेच्या हॉलमध्ये घेतली. ‘निषेधाचे कारण एवढेच की, त्यांनी आप्पासाहेब पवारांची बदली झाल्यावर हे लिहिले, ते इथं असताना लिहिलं असतं तर मला आक्षेप घेण्याचे कारण नव्हते, आप्पासाहेब सत्तेवर असताना म्याव मांजर होते. कधी हुंकार काढला नव्हता. बदली झाल्यावर हुंकार निघू लागला, याचा विशाद वाटत होता.

तेही शिक्षक, हेही शिक्षक. परंतु फडके यांनी लिहिलेले मला आवडले नव्हते. मी माझी भूमिका व्यक्त केली.’ नगराध्यक्ष शेळके हे त्या सभेचे अध्यक्ष होते. या सभेस महाविद्यालयातील विद्यार्थी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. या सभेत फडके यांचा निषेध करण्यात आला. ( संदर्भ – ‘माझी संघर्षयात्रा’, एन. डी. पाटील, विजिगीषा प्रकाशन, कोल्हापूर, २०२०, पृ. ४९,५०). यावरून त्याकाळातील घटना-घडामोडीवर प्रकाश पडतो. त्याचबरोबर विनोदात्म लेखन करणारे लेखकही बऱ्याच प्रमाणात सुधारणेबद्दल नकाराचा सूर आळवतात. अगदी पु. ल. देशपांडे यांनी ‘अंगुस्तान विद्यापीठ’ नावाच्या विनोदी लेखात विद्यापीठ नव्याने उभं राहत असताना घडामोडींची टिंगल केली आहे. या लेखासही शिवाजी विद्यापीठाच्या स्थापना घडामोडींचा संदर्भ आहे. त्यामुळे शिक्षण व सांस्कृतिक क्षेत्रातील पुणे येथील मंडळींचा त्यास विरोध होता. राजाराम महाविद्यालय हे प्रमुख आणि महत्त्वाचे महाविद्यालय असताना, विद्यापीठ कशाला ? तसेच ते सक्षमपणे उभा राहू शकेल का ? अशा शंका घेतल्या जात होत्या.

‘पुणे विद्यापीठ असताना कोल्हापूरला स्वतंत्र विद्यापीठ आणि कशाला पाहिजे, विद्यापीठ म्हणजे साधी गोष्ट आहे काय ? ते चालवणे म्हणजे साधेसुधे काम आहे काय ? कुणीही उठावे आणि कुठेही विद्यापीठे सुरू करावीत, यामध्ये कोणाचे आणि कोणते हित साधले जाणार आहे ? अशी गावोगाव विद्यापीठे निघू लागली तर विद्येचा दर्जा घसरणार नाही का ? विद्यापीठ म्हणजे खायची वस्तू आहे का ? अशा चर्चा त्या काळी होत होत्या. ( संदर्भ – डॉ. ‘आप्पासाहेब पवार काळ आणि कर्तृत्व’, किसनराव कुराडे, अक्षरवेध प्रकाशन, गडहिंग्लज, २०१९, पृ. १५२). लेखक ना. सी. फडके यांनीही ‘कोल्हापुरात आता शिवाजी विद्यापीठ नावाची आणखी एक खानावळ सुरू झाली आहे.’ असे हेटाळणीदर्शक उद्गार काढले होते. ( संदर्भ – किसनराव कुराडे, पू. १५२). त्या सार्वत्रिकीकरणासाठी कोल्हापुरात विद्यापीठ व्हावे, अशी लोकभावना होती. वेळी वाढती महाविद्यालये व शिक्षणाच्या त्यास राजकीय नेतृत्वाचा पाठिंबा मिळाला.

शिवाजी विद्यापीठाचे स्वप्न अनेक वर्षांपासूनचे होते. त्यास सार्वत्रिक पाठिंबाही होता. एकदा बापूजी साळुंखे हे सोंडूरच्या महाराजांकडे गेले हेते. त्यांच्याशी गप्पा मारताना, ‘बहुजन समाजाचे बहुजन चालविलेले सर्वांकरता असलेले विश्वविद्यालय निघावे’ अशी चर्चा झाली. वेळी महाराज बापूजींना म्हणाले, ‘हे विद्यापीठ केंब्रिजच्या धर्तीवर असावे.’ त्या वेळी बापूजी म्हणाले होते, “It Shoud not be mere copy of any other University. There Must be something Orignal of our own’ ( संदर्भ – शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे दैनंदिनी’, शरद साळुंखे, स्वामी विवेकानंद संस्था, कोल्हापूर, २०११, पृ. ५२).
१ सप्टेंबर १९६२ रोजी महाराष्ट्र शासनाने शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली. त्या वेळचे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक डॉ. आप्पासाहेब पवार यांची शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून नेमणूक झाली.

डॉ. आप्पासाहेब पवार : संस्थापक कुलगुरू

शिवाजी विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार (१९०६-१९८१) यांच्या दूरदृष्टीचा मोठा प्रभाव विद्यापीठ वाटचालीवर आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आप्पासाहेब पवार यांचे शिक्षण एम.ए.एल.एल.बी. पर्यंत झाले. लंडन विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. व बार अॅट लॉ ही पदवी प्राप्त केली. डॉ. आप्पासाहेब पवार यांनी राजाराम महाविद्यालयात इतिहासाचे प्राध्यापक व प्राचार्य म्हणून काम केले. विसनगर (गुजरात) येथे प्राचार्य म्हणून काम केले होते. महाराष्ट्र राज्याचे पहिले शिक्षण संचालक होण्याचा मान त्यांना मिळाला. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीचे ते प्रभारी अध्यक्ष होते. ते इतिहास संशोधक होते. लंडन विद्यापीठात त्यांनी ‘द रीजन ऑफ शाहू छत्रपती’ (१७०८-१७४९) या विषयावर (१९३४) पीएच.डी. पदवी संपादन केली. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात इतिहासविषयक कागदपत्रे, हस्तलिखिते विविध ठिकाणांहून मिळवली. ज्ञानदृष्टी व प्रशासनदृष्टीचा उत्तम असा संगम त्यांच्या कार्यपद्धतीत होता. त्यांनी कुलगुरू म्हणून शिवाजी विद्यापीठाची उत्तम घडी बसवली. डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या कल्पक दृष्टीतून साकारलेले महत्त्वाचे संशोधन केंद्र म्हणजे शाहू संशोधन केंद्र. सामाजिक शास्त्राचे व इतिहासविषयक संशोधनात या केंद्राने मोलाची भर घातली आहे. महात्मा फुले व राजर्षी शाहू महाराज तसेच कोल्हापूर संबंधीचे इतिहासविषयक संशोधन प्रकाशात आणण्याचे काम या केंद्राने केले आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या पत्रवाड्मयाचे नऊ खंड या केंद्राच्या वतीने प्रकाशित केले आहेत. (संदर्भ – संपा. विलास संगवे, बी. डी. खणे), तर अलीकडे ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. जयसिंगराव पवार यांनी संपादित केलेले ग्रंथ या केंद्राच्या वतीने प्रकाशित करण्यात आले आहेत. कोल्हापूरचा पंचखंडात्मक इतिहासही या केंद्राच्या वतीने प्रकाशित होतो आहे. शाहू संशोधन केंद्राच्या स्थापनेसाठी डॉ. आप्पासाहेब पवार यांची एक तज्ज्ञ समिती नेमली होती. यामध्ये डॉ. आप्पासाहेब पवार यांच्यासह डॉ. आ. ने. उपाध्ये (कोल्हापूर), डॉ. ए. एस. घाटगे (डेक्कन कॉलेज), एस. आर. तावडे (कोल्हापूर), जे. के. पाटील (सोलापूर), डॉ. (सौ.) उषाबाई इथापे व धनंजय कीर यांचा समावेश होता. (‘कृतज्ञ मी कृतार्थ मी’, धनंजय कीर, पॉप्युलर प्रकाशन, पृ. २०४, १९८७).

डॉ. पवार यांनी विद्यापीठास धोरणात्मक दिशा दिली. नवनवीन योजना राबविल्या. भारतभरातून उत्तम आणि सरस संशोधकांना विद्यापीठात प्राध्यापक म्हणून आमंत्रित केले. विद्यापीठ आणि समाज यांच्यात सुयोग्य समन्वय घडवून आणला. विद्यापीठ विकासासाठी नवे पायंडे पाडले. बहिःशाल विभाग, प्राध्यापक प्रशिक्षण वर्ग, ‘कमवा आणि शिका’ योजना यांसारखे उपक्रम कार्यान्वित केले. महाविद्यालयाच्या संख्या वाढीसाठी प्रयत्न केले. डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या ज्ञानप्रशासन दृष्टीचा खोलवरचा ठसा शिवाजी विद्यापीठाच्या आजवरच्या वाटचालीवर आहे. ‘डॉ. आप्पासाहेब पवार हे शिवाजी विद्यापीठाचे खऱ्या अर्थाने शिल्पकार होते. आप्पासाहेब पवार यांनी पाठ्यपुस्तक प्रकाशन योजना, उद्बोधन वर्ग, विद्यार्थी कल्याण मंडळ, विद्यार्थी भवन, कमवा आणि शिका योजना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, व्हिजिटिंग स्टुडंटशिप स्कीम, बहिःशाल शिक्षण मंडळ, बालक मंदिर असे शिक्षणविषयक उपक्रम यशस्वीपणे सुरू केले व राबविले. जिथे वैराण माळ होता, तिथे विद्येचे नंदनवन फुलले, ही किमया डॉ. आप्पासाहेब पवार यांची आहे.’ ( संदर्भ – ‘डॉ. आप्पासाहेब पवार’, अरुण भोसले, श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर, २०१२ पू. ६४). या साऱ्या विद्यानगरीचे प्रेरक, योजक, कल्पक परिपूर्ती करणारे कुलगुरू म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल.

विद्यापीठे आणि कुलसचिवपद

कुलसचिवपद हे तसे विद्यापीठातील महत्त्वाचे पद. कुलसचिव हा विद्यापीठाचा मुख्य प्रशासकीय अधिकारी असतो. हे पद एकाच वेळी शैक्षणिक व प्रशासनिक कामातील दुवा असतो. कुलगुरू, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांच्यातील कामाचा दुवा म्हणून त्याकडे पाहिले जाते. विद्यापीठांचे नेतृत्व सर्वसाधारणपणे कुलगुरू करत असतात. विद्यापीठाच्या एकंदर वाटचाल धोरणात कुलगुरूंचा सहभाग केंद्रवर्ती असतो. त्यामुळे स्वाभाविकच कुलसचिव पदाकडे लक्ष जात नाही. अपवादभूत असेच कुलसचिव त्यांच्या त्यांच्या कामामुळे लक्षात राहिले आहेत. त्यापैकी शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. उषा इथापे यांचा प्रशासनावर उल्लेखनीय ठसा उमटला आहे.

मुंबई विद्यापीठात १८५८ पासून १९०२ पर्यंत ब्रिटिश अधिकारी कुलसचिव पदावर कार्यरत होते. मुंबई विद्यापीठाचे रॉबर्ट शार्प सिनक्लेअर हे पहिले कुलसचिव होते. मुंबई विद्यापीठात आरंभी दोन वर्षांसाठी कुलसचिवपदी नेमणूक करण्यात येई. मुंबई विद्यापीठात पीटरसन (१८७७-८९), फर्दुनजी एम. दस्तुरखान बहादुर (१९०२-३०), एस. आर. डोंगरकेरी (१९३१-५६), टी. व्ही. चिदंबरम (१९५६-७७), जी. एम. राजर्षी (१९८०-९०) यांनी दीर्घकाळ कुलसचिव पदाची जबाबदारी सांभाळली.’ ( संदर्भ -‘ऐसा ज्ञानसागरू : बखर मुंबई विद्यापीठाची’, अरुण टिकेकर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, २०२३ पुनर्मुद्रण, पृ. ३६०). नागपूर विद्यापीठात डॉ. बलराज अहेर हे कुलसचिव म्हणून तेरा वर्षे कार्यरत होते. पुणे विद्यापीठात व. ह. गोळे हे बारा वर्षे (१९५८-७०) कुलसचिव होते. भारतातील एकंदर विद्यापीठांमध्ये दीर्घकाळ कुलसचिव पदावर कार्यरत व्यक्ती फारशा आढळत नाहीत. त्याचबरोबर प्रशासकीय सेवेत चार-पाच दशकांपूर्वी अपवादभूत स्त्रियांची उपस्थिती होती. प्रशासनातील सार्वजनिक व्यवहारावर पुरुषसत्ताकेंद्री वर्चस्व होते. तुरळकच स्त्रिया प्रशासनातील मुख्य पदावर होत्या. विद्यापीठाच्या कुलसचिव म्हणून स्त्रियांना फारसे स्थान पुणे आढळत नाही. प्रगत म्हणविल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या त्र्याहत्तर वर्षांच्या इतिहासात कुलसचिव म्हणून एकही स्त्री आढळत नाही. यावरूनदेखील विद्यापीठ प्रशासनातील स्त्री अधिकाऱ्यांचा अल्प सहभाग लक्षात येईल. अलीकडील काळात तर बहुतांश विद्यापीठ प्रशासनातील गुंते व कामाच्या विस्तारामुळे सर्वत्र पुरुष कुलसचिवांचीच संख्या जास्त आहे. एस.एन.डी.टी. विद्यापीठात महिला कुलसचिव असण्याची शक्यता आहे. या संदर्भातील माहिती मिळविण्याचा केला; परंतु ती मिळू शकली नाही.

शिवाजी विद्यापीठातील डॉ. उषा इथापे यांचा कार्यकाळ

डॉ. उषा इथापे या आरंभ काळातील कुलसचिव होत्या. त्या आधी शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव म्हणून आरंभी बी. ए. चौगुले (एम.ए.) हे काही काळ होते. १९६४ साली मा. य. वैद्य यांची कुलसचिव म्हणून नेमणूक झाली. वैद्य हे शिक्षणतज्ज्ञ व प्रागतिक विचारांचे होते. ते धुळे येथील शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य (१९५६) होते. वैद्य हे पाली आणि अर्धमागधी विषय शिकवत. ‘तळं उन्हातलं’ नावाचे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी राजवाडे यांच्या इतिहासलेखनावर पीएच.डी. केली होती.

डॉ. इथापे या कुलसचिव म्हणून शिवाजी विद्यापीठात येण्याआधी कोल्हापुरातील कीर्ती महाविद्यालयात प्राचार्य होत्या. काही महिने विवेकानंद महाविद्यालयात होत्या. २१ नोव्हेंबर १९६४ रोजी त्या विद्यापीठात उपकुलसचिव म्हणून रुजू झाल्या. २९ मार्च, १९६५ रोजी काही महिने त्यांनी प्रभारी कुलसचिव पदाचा कार्यभार सांभाळला. तर १० डिसेंबर, १९६६ रोजी त्यांची रीतसर कुलसचिव म्हणून नेमणूक झाली. त्यांच्या अखेरच्या काळात (१९८१-८३) विद्यापीठ व त्यांच्यातील विसंवादामुळे न्यायालयीन चौकशी झाली. त्यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आले. ३० सप्टेंबर १९८१ रोजी विद्यापीठ कार्यकारी परिषदेने त्यांना निलंबित केले. त्यानंतर न्यायालयीन खटला चालू राहिला. न्यायालयीन चौकशीत त्यांचे आरोप सिद्ध झाले नाहीत; परंतु काही आरोपांवरील अनियमितता दाखवून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्या काळात विद्यापीठ कार्यकारी परिषदेत दोन गट पडले. १ मार्च, १९८४ रोजी डॉ. इथापे यांनी कुलसचिव पदाचा राजीनामा दिला.

कुलसचिव पदाच्या कार्यकाळात डॉ. इथापे या इंग्लंडमधील एक्स्टर विद्यापीठात १९६८-६९ साली एक वर्षासाठी प्रशासकीय शिक्षणासाठी सहभागी झाल्या. विद्यापीठ पातळीवर भारतातून दोन व्यक्तींची अशी निवड झाली होती. डॉ. आप्पासाहेब पवार यांचा कुलगुरू म्हणून कालावधी हा १९६२ ते १९७५ होता. त्यानंतर बॅ. पी. जी. पाटील (१९७५-१९७८), प्राचार्य भा. शं. भणगे (१९७८-१९८०), प्राचार्य रा. कृ. कणबरकर यांनी (१९८३-८६) विद्यापीठाचे कुलगुरू पद भूषविले. इथापे यांच्या राजीनाम्यानंतर हणमंतराव पाटणकर यांची विद्यापीठाचे पाचवे कुलसचिव म्हणून निवड झाली. (संदर्भ – दै. पुढारी, २५ मे, १९८४)

१९७५ मधील विद्यार्थी आंदोलन

शिवाजी विद्यापीठात एप्रिल-मे १९७५ मध्ये मोठे विद्यार्थी आंदोलन झाले. विद्यापीठाच्या आजवरच्या वाटचालीतील हे सर्वात मोठे विद्यार्थी आंदोलन होते. त्याची व्याप्ती मोठी होती. शिक्षकांच्या संपामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी गोंधळात होते. तसेच विद्यार्थ्यांना २०० रुपये शासनाने आर्थिक साहाय्य करावे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी परीक्षांवर बहिष्कार टाकला. शिक्षकांचा हा संप वेतनश्रेणीतील मागणीसाठी व शिक्षकांचे पगार हे शासकीय कोषागारमधून व्हावेत यासाठी होता. तसेच या विद्यार्थी आंदोलनावर त्या वेळच्या महाराष्ट्राच्या दुष्काळाची सावली होती. दुष्काळामुळे बिकट परिस्थिती उद्भवलेली होती. कोल्हापुरातील सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी व विद्यार्थी नेत्यांनी हे आंदोलन उभे केले. तसेच संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही परीक्षांवरील बहिष्कार मागणी केली होती. ‘कराडला कृष्णा घाटावर विद्यार्थ्यांची एक बैठक झाली होती.’ (संदर्भ – दै. पुढारी, २८ एप्रिल, १९७५). विद्यार्थ्यांनी कोल्हापुरात व विद्यापीठावर सलग तीन दिवस मोर्चे काढले. तेही भव्य स्वरूपात.

२७ एप्रिल रोजी कोल्हापुरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी एकत्र झाले. त्यांनी न्यू कॉलेज व राजाराम कॉलेज येथे मोर्चा नेला. तेथील प्रात्यक्षिक परीक्षा बंद करण्यात आल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांचा हा मोर्चा विद्यापीठात आला. पाच ते सहा हजार विद्यार्थ्यांचा मोर्चा विद्यापीठ आवारात आल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थी मोर्चा रस्त्यावरील गाड्या आडवत. त्या दिवशी कुलगुरू पी. जी. पाटील हे साताऱ्यास होते. कुलसचिव डॉ. इथापे यांना समजताच त्या तातडीने कार्यालयाकडे आल्या. यावेळी त्यांच्या गाडीवर विद्यार्थी आंदोलक नाचले. त्यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढली व कुलगुरू आल्यानंतर सिनेट बैठक बोलवून हा निर्णय तातडीने घेऊ, असे सांगितले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखता, जिल्हाधिकारी श. गो. दैठणकर व जिल्हा पोलीसप्रमुख त्यागी हे विद्यापीठात दाखल झाले होते. त्यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढली. २८ तारखेला परत बिंदू चौकात विद्यार्थ्यांची मोठी सभा झाली. त्यामध्ये पवन शिर्के (गोखले महाविद्यालय) धनंजय पाठाडे (राजाराम महाविद्यालय), शाम पाटील (कॉमर्स महाविद्यालय) संपतराव पोवार (शाहू महाविद्यालय), आकाराम पाटील (न्यू कॉलेज), दिग्विजय खानविलकर (शहाजी महाविद्यालय) असे विविध महाविद्यालयांतील हे विद्यार्थी सेक्रेटरी, नेते या आंदोलनात सहभागी होते. ‘वुई वॉण्ट बहिष्कार’ या घोषणेने विद्यार्थ्यांनी कोल्हापूर दणाणून सोडले होते. जवळपास पाच हजार महाविद्यालयीन युवकांचा हा मोर्चा होता. विद्यापीठ आवारात आल्यानंतर समुदाय राजर्षी शाहू सभागृहात शिरू लागल्यानंतर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी हस्तक्षेप केला. लाठीमार व अश्रुधुराचा वापर केला. यात काही विद्यार्थी व पोलीस जखमी झाले. या काळात तीनेक दिवस कोल्हापूर उत्स्फूर्त बंद होते. बसेस बंद होत्या. शहरात बंदीहुकूम होता. विद्यापीठाने विद्यार्थ्यांची शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींशी चर्चा चालू ठेवली. कार्यकारी परिषदेने व समाजातील अनेक व्यक्तींनी विद्यार्थ्यांना शांततेचे आवाहन केले. या काळात विद्यापीठ कार्यकारी परिषदेवर एस. एम. घाटगे, प्रा. ए. ए. पाटील, डॉ. निर्मलकुमार फडकुले, प्रा. के. भोगीशियन, प्रा. ए. डी. शिंदे व प्रा. रा. कृ. कणबरकर हे सदस्य होते. ६ जून रोजी विद्यार्थ्यांची एक सभा पाटाकडील तालीम येथील गणेश हॉलमध्ये घेण्यात आली होती. या प्रकरणात त्या वेळीच्या शिक्षणमंत्री श्रीमती प्रभा राव यांना हस्तक्षेप करावा लागला व परीक्षा लवकरच जाहीर करण्यात येतील, असे सांगावे लागले.

विद्यार्थी आंदोलनातून मार्ग मिळावा व परीक्षा सुरक्षितरीत्या पार पडाव्या म्हणून एक समिती स्थापन केली होती. त्याचे अध्यक्ष सर्वोदयी नेते भ. दुं. श्रेष्ठी होते. या समितीत पी. बी. सांळुखे, जीवनराव सावंत, गोविंद पानसरे, डी. सी. नरके यांचा समावेश होता. पुढे मेच्या तिसऱ्या आठवड्यात परीक्षा सुरळीत सुरू झाल्या. विद्यार्थ्यांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था महानगरपालिकेच्या शाळांमध्ये केली होती. (संदर्भ – दै. पुढारी, ७ मे, १९७५). या आंदोलनाचे पडसाद शहरभर पसरलेले होते. विद्यापीठ आवारातील मोर्चावेळी इमारतीवर दगडफेक, नासधूस झाली होती. विद्यापीठ कॅन्टीनमधील मोडतोड व सर्व पदार्थ मुलांनी फस्त केले होते. तसेच परत जाताना हॉटेल ओपलमधीलही सर्व पदार्थ संपवून टाकले. होते. पोलिसांची धरपकड सुरू होती. तरुण वर्गात त्या काळी हिप्पी केशभूषेची फॅशन होती. आंदोलनात या फॅशनमधील बरीच मुले होती. पोलीस अशा मुलांना तत्काळ पकडून नेत म्हणून बऱ्याच मुलांनी ताबडतोड. बिटल्स हिप्पी केशभूषा काढून टाकून पैलवान कट करून घेतला होता. (संदर्भ – दै. पुढारी, २, ३ व ४ मे, १९७५)

हे आंदोलन प्रकरण पी. जी. पाटील व कुलसचिव म्हणून डॉ. इथापे यांनी योग्य पद्धतीने हाताळले. मात्र त्यांचे एकांगी वार्तांकन ‘गर्जना’ नियतकालिकात आले होते. माजी कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्यामुळे ते उद्भवले, अशा बातम्या वृत्तपत्रातून पेरल्या गेल्या. ‘गर्जना’सारख्या साप्ताहिकात डॉ. पवार व डॉ. इथापे यांच्या कार्यपद्धतीवर शिवराळ, कठोर भाषेतील लेख प्रसिद्ध झाला. ( संदर्भ – ‘डॉ. आप्पासाहेब पवारांच्या कारवाया’, ‘गर्जना’, १६ मे, १९७५). यामागे हेतुपुरस्सर गटबाजीचे राजकारण लक्षात येते.

आदर्श, कणखर आणि निर्भीड प्रशासक

उत्तम प्रशासक व कार्यकुशल कुलसचिव म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या दीर्घ वाटचालीत इथापे यांच्या कर्तृत्वाचा मोठा ठसा उमटला आहे. डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या नेतृत्वाला त्यांनी साजेशी साथ दिली. कुलसचिवपद हे विद्यापीठाचे संवैधानिक महत्त्वाचे पद. विद्यापीठाच्या प्रशासनावर व एकूण घडामोडींशी कुलसचिवांचा प्रमुख संबंध असतो. कर्मचारी, शिक्षक, प्रशासन धोरण, बैठका नियोजन यासंबंधीचा भाग कुलसचिवांना महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत भाग असतो. उत्तम प्रकारची निर्णयक्षमता, धोरण राबविण्याची धडाडी व निर्भयपणा इथापे यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. प्रशासकीय टिपण्या, नोंदी, शेरे, निरीक्षणे, पत्रमजकुरातले कौशल्य इथापे यांच्या जवळ होते. प्रशासकीय कामातील नैतिक दबदबा आणि दरारा यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीचा विद्यापीठाच्या एकंदर कार्यशैलीवर प्रभाव पडला आहे. त्यापैकी एक दीक्षान्त सभारंभ. १९६६-८२ या काळात दरवर्षी दीक्षान्त समारंभांना महाराष्ट्रातील नामवंत ज्ञानवंत व लोकप्रतिनिधी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. डॉ. इथापे या कुलसचिव असतानाच्या कार्यकाळात शिक्षणतज्ज्ञ डॉ. दौलतसिंग कोठारी, अर्थतज्ज्ञ डॉ. सी. डी. देशमुख, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. बी. गजेंद्रगडकर, यशवंतराव चव्हाण, केंद्रीय शिक्षणमंत्री व्ही. के. आर. व्ही. राव, मधुकरराव चौधरी, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायधीश जी. एन. वैद्य, केंद्रीय उद्योग विज्ञान तंत्रज्ञान मंत्री सी. सुब्रमण्यम, डॉ. सतीश चंद्रा (यूजीसी अध्यक्ष),पद्मश्री डॉ. व्ही. के. गोकाक, बॅ आप्पासाहेब पंत, डॉ. बी. डी. नागचौधरी (कुलगुरू, जे. एन. यू), मोहम्मद हिदायतुल्ला (न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालय), राज्यपाल ओ. पी. मेहरा हे दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहूणे होते. या दीक्षांत समारंभाच्या नियोजनात कुलसचिवांचा महत्त्वाचा सहभाग व जबाबदारी असते. डॉ. आप्पासाहेब पवार व कुलसचिव डॉ. उषा इथापे यांच्या कार्यकाळात महत्त्वाच्या इमारती, योजनांची उभारणी झाली. मुख्य इमारतींचे बांधकाम झाले. मुख्य इमारत, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, वनस्पतिशास्त्र, मानव्यविद्या व ग्रंथालय इमारतींचे बांधकाम पूर्णत्वास आले. या पायाभूत सुविधांवर कुलसचिव म्हणून इथापे यांची देखरेख असे शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील अश्वारूढ पुतळ्याजवळील प्रांगण रिकामे होते. १९७५ साली अश्वारूढ पुतळ्याबाजूला रिंगणाकृती विटांचा कठडा व बाग करण्यात आली. या कठड्याला लागणाऱ्या विटा या ‘कमवा आणि शिका’ योजनेतील विद्यार्थ्यांनी तयार केल्या होत्या. स्वाभाविकच या कामावर डॉ. इथापे यांचे जाणीवपूर्ण लक्ष होते. मुख्य इमारतीसमोरील भव्य अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामास प्रारंभ व अनावरण १९७३ ते ७५ या काळात झाले. शिवपुतळ्यासमोर उद्यानही याच काळात निर्माण झाले. शिवछत्रपतींची देखणी शिल्पकृती बी. आर. खेबूडकर यांच्या कल्पनेतून साकार झाली. छत्रपती शाहू संशोधन केंद्राचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण व वसंतराव नाईक यांच्या हस्ते झाले. यशवंतराव चव्हाण, वि. स. खांडेकर (१९७४-७४), लता मंगेशकर (१९७९), धनंजय कीर व माधवराव बागल (१९८०-८१) यांना डी.लिट. पदवीने याच काळात सन्मानित करण्यात आले.

डॉ. उषा इथापे यांच्या आरंभकाळात विद्यापीठात सर्वच विद्याशाखा एकत्रित होत्या. कला, सामाजिकशास्त्रे, विज्ञान, कायदा, वैद्यकीय, वाणिज्य, कृषी. शिक्षणशास्त्र, व अभियांत्रिकी विद्याशाखा एकत्रित होत्या. सिनेट, सिंडिकेट व अॅकॅडमिक कौन्सिल अशी कार्यकारी परिषद होती. १९६६-६७ या इथापे यांच्या कार्यकाळात विद्याशाखांचे पुढील अधिष्ठाता होते. डॉ. एन. एन. उपाध्ये (कला). प्राचार्य ए. ए. पाटील (सामाजिकशास्त्रे), डॉ. आर. डी. शिंगटे (विज्ञान), डब्ल्यू डी. आडके (कायदा), प्राचार्य बी. बी. सेठना (वैद्यकीय), प्राचार्य भा. शं. भणगे (वाणिज्य), प्राचार्य ए. ए. मेमन (कृषी) डॉ. एस. आर. तावडे (शिक्षणशास्त्र), प्राचार्य व्ही. के. केळकर (अभियांत्रिकी) आणि बी. डी. चौधरी (अभियांत्रिकी) हे अधिष्ठाता होते.

डॉ. आप्पासाहेब पवार हे उत्तम प्रशासकाबरोबरच ज्ञानवंत होते. इतिहास संशोधक होते. शैक्षणिक संशोधनात्मक विषयावर तसेच विद्यार्थिकेंद्री विषयांवर परिषदा, कार्यशाळा व चर्चासभांचे आयोजन करत. अगदी अखिल भारतीय कुलगुरू परिषदांपासून आंतर विद्यापीठ क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन त्यांनी केले. त्याची जबाबदारी, नियोजन कुलसचिव म्हणून डॉ. इथापे यांच्याकडे असे. विविध कर्मचारी व शिक्षकांच्या सहकार्याने या उपक्रमांचे यशस्वी नियोजन त्यांनी केले. मराठा इतिहासावर व्याख्याने आयोजित केली. प्राचीन साहित्यावर बाळाचार्य खुपेरकर शास्त्री, तत्त्वज्ञानाचे नामवंत प्राध्यापक एन. ए. निकम (कुलगुरू, म्हैसूर विद्यापीठ), अ. के. नारळीकर, धनंजय कीर, माधवराव बागल, गं. बा. सरदार व पुढील टप्प्यावरही महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जन्मशताब्दी निमित्ताने (१९७३) एन. डी. पाटील, महर्षी शिंदे व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनकार्यावर व्याख्याने झाली.

विद्यापीठाच्या आरंभीच्या काळात डॉ. आप्पासाहेब पवार यांनी नव्या उपक्रमास प्रारंभ केला. हे सर्व उपक्रम विद्यार्थिकेंद्री व शिक्षककेंद्री होते. विद्यार्थी कल्याण विभाग, जिमखाना, विविध मार्गदर्शन शिबिरे, कोचिंग वर्ग, टिचिंग क्लब, मुद्रणालय, कंझ्युमर्स विभाग, एन. एस. एस. लिडरशिप शिबिरे, बहिःशाल विभाग सुरू केले. कलर अवार्डिंग फंक्शन आयोजित केले जाई. विद्यार्थी व शिक्षकांच्या विविध विषयांवरील परिषदा होत. ग्रामीण भागात विद्यार्थी नेतृत्व शिबिरे होत. एक गाव एक पाणवठ्याची शिबिरे उजळाईवाडी, गोकूळ शिरगाव अशा गावांत घेतली गेली. एन. एस. एस.ची शिबिरे ग्रामीण भागात, चारही जिल्ह्यांत होत. आरोग्य शिबिरे दूरवरच्या खेड्यात होत. एका वार्षिक अहवालात दूरवरच्या शेवटच्या निजाम सीमारेषेवरील उंदरगावात (ता. बार्शी) आरोग्य शिबिर घेतल्याची नोंद आहे. जून १९८१ मध्ये सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर अभयारण्यात विद्यार्थ्यांचे प्रशिक्षिण शिबिर आयोजित केले होते. यात १२०० वृक्षांची तेथे ‘निसर्गाची उपयुक्तता व विकास’ या विषयावर ६१ महाविद्यालयातील लागवड केली होती. शिवाजी विद्यापीठाच्या सर्व प्रकारच्या प्रसिद्धी, छपाई ग्रंथांवर कुलसचिव म्हणून इथापे यांचे प्रकाशक म्हणून नाव असे. ‘विद्यापीठाचे ‘शिवसंदेश’ नावाचे नियतकालिक प्रसिद्ध होत असे, त्याचे संपादक म्हणून डॉ. इथापे काम पाहत होत्या.

‘कमवा आणि शिका’ योजना

शिवाजी विद्यापीठाची ‘कमवा आणि शिका’ ही विद्यार्थ्यांसाठीची महत्त्वाची योजना. गरीब, गरजू विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू झाली. यामागे आप्पासाहेब पवार यांची दूरदृष्टी होती. श्रम, शिक्षण व स्वावलंबी आत्मविश्वासाचे बळ या योजनेत होते. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण व कर्नाटक सीमाभागातील अनेक गरीब विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ झाला आहे. अनेक गरीब कुटुंबातील मुले केवळ आणि केवळ ‘कमवा आणि शिका’ योजनेमुळे शिकू शकली. या योजनेत शिकलेले विद्यार्थी कर्तबगार झाले. राज्याच्या शिक्षण संचालकांपासून विद्यापीठाच्या कुलगुरूंपर्यंत सन्मान यातील काही विद्यार्थ्यांना मिळाला. डॉ. आप्पासाहेब पवार यांच्यासमोर रयत शिक्षण संस्थेत कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या ‘कमवा आणि शिका’ योजनेचे मॉडेल होते. त्या धर्तीवर विद्यापीठात १९६७ साली कमवा आणि शिका ही योजना सुरू झाली. ‘कमवा आणि शिका’ योजनेची इमारत विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या व या योजनेतील विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून बांधण्यात आली. ज्येष्ठ लेखक चंद्रकुमार नलगे हे या योजनेचे काही वर्षे अधीक्षक होते. या विद्यार्थ्यांकडून शेती केली जाई. यामध्ये ऊस व जिराईत धान्ये पेरली जात. भवनकडे बैलगाडीदेखील होती. पिठाची गिरणी व हायवे कॅन्टीन मुले चालवत.

विद्यार्थीहित हा डॉ. इथापे यांच्या कार्यशैलीचा प्रमुख भाग होता. विद्यार्थ्यांच्या हितास अग्रक्रम त्यांच्याकडे होता. विद्यार्थ्यांच्या अडीअडचणीत त्या आस्थेने लक्ष घालत. प्रसंगी विद्यार्थ्यांच्या अडचणीत नियमांना मुरड घालून साहाय्य करत. विद्यार्थी भवन हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. ‘कमवा आणि शिका’ योजनेकडे त्यांचे काळजीपूर्वक लक्ष होते. अनेक गरीब मुलांना त्या साहाय्य करत. भवनाला वारंवार भेटी देत. महिन्यातून एक-दोन वेळा मुलींबरोबर भोजन करत. विद्यार्थी भवनच्या विद्यार्थ्यांचा त्यांना अभिमान वाटे. शिक्षणानंतर नोकरीसाठी भवनच्या विद्यार्थ्यांना मदत करत. त्यामुळे भवनच्या सर्वच विद्यार्थ्यांच्या त्या माउली वाटत. डॉ. आप्पासाहेब पवार व डॉ. उषा इथापे यांच्या दूरदृष्टीचे आणि द्रष्टेपणाचे एक उदाहरण म्हणजे वंचित भटक्या समाजातील मुलांच्यासाठीची सुरू केलेली शाळा. शिवाजी विद्यापीठाच्या मोकळ्या आवारालगत कंझारभाट या भटक्या समाजाची लोकवस्ती होती.. या समाजात शिक्षणाचा अभाव होता. ती मुले इकडेतिकडे वावरत. त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न होता. या गरीब मुलांसाठी विद्यापीठ परिसरात शाळा सुरू करण्यात आली. वंचित, भटक्या मुलांसाठी शाळा सुरू करणारे भारतातील शिवाजी विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ असावे. ‘दि. १७ नोव्हेंबर, १९६९ रोजी कंजारभाट स्कूलचा शुभारंभ झाला.’ ( संदर्भ -‘आप्पासाहेब पवार : काळ आणि कर्तृत्व’, किसनराव कुराडे, पृ. १४७)

विद्यार्थ्यांच्या माउली

१९६४ ते १९८२ या काळात ज्यांनी विद्यापीठात शिक्षण घेतले. अशा कर्तबगार विद्यार्थ्यांच्या मनात शिवाजी विद्यापीठाबद्दल व डॉ. इथापे यांच्याबद्दल कृतज्ञतेची भावना आहे. या ग्रंथातील सर्वच लेखकांनी इथापे यांच्या कार्यशैलीबद्दल, प्रशासन कामाविषयी व सुहृदयतेविषयी अंतःकरणपूर्वक लिहिले आहे. विशेषतः या सर्वांच्या लेखनात मातृत्वाची, आधारसावलीची प्रतिमा आहे. आयुष्याच्या तरुण वयाच्या उमेदीच्या लाभलेल्या शिक्षणकाळात भेटलेल्या मातृरूपी आधारवडामुळे आयुष्याला वळणाचा उल्लेख आहे. डॉ. इथापे यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या या ग्रंथातील लेखकांपैकी बहुतांश त्या काळातील विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी व कुटुंबीय आहेत. या सर्वांनीच कृतज्ञतेने इथापे यांच्या कार्यशैलीच्या, प्रशासनातील कणखरपणाविषयीच्या आठवणी सांगितल्या आहेत. तसेच त्यांच्या एकंदर व्यक्तिमत्त्वातील मानवीयता व सुहृदयेतच्या आठवणी सांगितल्या आहेत. विद्यार्थी भवनच्या अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी आधारवड ठरलेल्या कृतज्ञता स्मृती आहेत. इथापे यांच्या मातृरूपाच्या, वात्सल्याच्या या आठवणी आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या आजवरच्या ऐतिहासिक अवकाश व्यापणाऱ्या एकमेव स्त्री म्हणून त्यांचा गौरव केला आहे. असंख्य विद्यार्थांनी आयुष्यात उजेड पेरणाऱ्या मातृदेवता या रूपात त्यांच्याकडे पाहिले आहे. प्रशासनातील ‘नोबेल शलाका’ अशी नोंद आहे. अनेकांच्या आयुष्याला त्यांचा परीसस्पर्श लाभला. त्यामुळे त्यांची आयुष्ये उजळली. डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी महाराष्ट्रातील हिंदी संशोधक म्हणून त्यांच्याकडे पाहिले आहे. कुटुंबीयांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे. डॉ. इथापे यांच्याविषयी विद्यार्थ्यांनी ज्या मातृहृदयी भावना व्यक्त केल्या आहेत, त्या फार भावपूर्ण मानवीयतेच्या हृद्य अशा आहेत. या पार्श्वभूमीवर नारायण सुर्वे यांची ‘सुने आभाळ’ ही कविता आठवते,
‘तिच्या मायेच्या हाताने
जोजविले आहे त्यांना
तिच्या स्नेहाळ बोटांनी
घास भरविले त्यांना
आज नाही ती हयात
फक्त उरे परिमळ
माझ्या खोलीच्या आतील
सुने सुने हो आभाळ’
( संदर्भ -‘सुर्वे’, नारायण सुर्वे यांच्या समग्र कविता, पॉप्युलर, पुनर्मुद्रण, २०१६) या प्रकारची भावना असंख्य विद्यार्थ्यांची आहे.

कौटुंबिक जीवन

करारी, धाडसी डॉ. उषा इथापे यांचे बालपण ग्वाल्हेर संस्थानात गेले. शिंदे कुटुंबातील भावंडे व बहिणींचे त्यांनी काळजीने पाहिले. त्यांच्या आयुष्याची घडी बसवली. त्यांची लग्नं जुळवून देण्यापासून ते वेळोवेळी त्यांना मोलाचे साहाय्य केले. मध्यप्रदेशातील होशिंगाबाद जिल्ह्यातील हरदा येथील गणपतराव राघोजीराव इथापे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांचे पती गणपतराव इथापे हे पुणे नगरपालिकेत करवसुली अधिकारी म्हणून कार्यरत होते. थोर समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या शिवाजीनगर येथील ‘रामविहार’ या निवासस्थाना शेजारीच तरुण गणपतराव राहत असत. महर्षी शिंदे यांच्या भगिनी समाजसुधारक जनाक्का शिंदे यांचे ३० एप्रिल, १९५६ रोजी अपघाती दुर्दैवी निधन झाले. त्या आधी दोन दिवस शिंदे यांच्या घराशेजारी काश्मिरी कुटुंबातील गौरीदेवीमट्टू ही तरुणी स्टोव्हचा भडका उडाल्यामुळे घराबाहेर धावत आल्या. शिंदे यांच्या घरात वृद्ध जनाक्का बसल्या होत्या. पेटत्या साडीनिशी त्या तरुणीने जनाक्कांना मिठी मारली. या गोंधळात तरुण गणपतरावांनी बाहेर येऊन या दोघींच्या कपड्यावरील आग विझवली होती. ( संदर्भ – दै. सकाळ, पुणे, ३० एप्रिल, १९५६). कोल्हापुरातील सामाजिक, औद्योगिक क्षेत्रातील अनेक मंडळींशी गणपतराव इथापे यांचा स्नेह होता. कोल्हापुरातील सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग होता. कोल्हापूर लायन्स क्लबचे ते अध्यक्ष होते. सामाजिक क्षेत्रातील मंडळींशी व वैद्यकीय क्षेत्रातील लोकांशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते. त्यांचा लोकसंपर्क दांडगा होता. डॉ. उषा इथापे यांच्या स्वभाव- कार्यदृष्टीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची जडणघडणीची पार्श्वभूमी ही संस्थानी सरदार घराण्यातील होती. सुखवस्तूपणा, सुबत्तेविषयीची आकांक्षा, प्रतिष्ठा, मरातबाचे जग आवतीभोवती होते. ग्वाल्हेर सोडून त्या कोल्हापुरात स्थिरावल्या व प्रशासनात यशस्वी ठरल्या. कोल्हापूरच्या समाजजीवनाशी व शैक्षणिक जीवनाशी एकरूप झाल्या.

इथापे यांच्या माहेरकडून व सासरकडून महाराष्ट्रातील विविध भागात बरेच नातेवाईक मंडळी होती. कोल्हापुरात उदयसिंहराव गायकवाड, छात्रजगद्गुरू बेनाडीकर मंडळी त्यांच्या नात्यातील होती. सी. रा. तावडे, खानदेशात उत्तमराव पाटील, दौलतराव आहेर, अक्कलकोटचे फत्तेसिंहराजे भोसले कुटुंबदेखील त्यांच्या स्नेही नातलग मंडळींपैकी होते. बापूजी साळुंखे यांच्या शैक्षणिक कार्यामुळे डॉ. इथापे यांचा त्यांच्याशी संबंध आला. १९६४ साली विवेकानंद महाविद्यालय स्थापन होत असताना, बापूजी साळुंखे यांचा विद्यापीठाशी वारंवार संबंध आला. मे, १९६४ मध्ये इथापे या कीर्ती महाविद्यालयात प्राचार्य असताना, बापूजींनी त्यांना ‘विवेकानंद’मध्ये प्राध्यापक म्हणून येण्याची विनंती केली होती. विद्यापीठात उपकुलसचिव म्हणून रुजू होण्याआधी काही महिने इथापे यांनी विवेकानंद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले. बापूजी साळुंखे यांच्या निधनानंतरच्या दुखवटा पत्रात डॉ. उषा इथापे यांनी म्हटले होते, ‘संस्थेच्या स्थापनेनंतर ज्या वेगाने संस्थेची वाढ झाली त्याचे सर्व श्रेय प. पू. बापूजींच्या कष्टाळू वृत्तीला. गरजा विसरून त्यांनी आपले जीवन संस्थेला वाहून घेतले होते. साधी व पवित्र राहणी व निष्कलंक चारित्र्य या दोन गुणांची जोड त्यांच्या प्रयत्नांना मिळाल्याने त्यांनी संस्थेला सबंध महाराष्ट्रात आजचे मानाचे स्थान मिळवून दिले.’ ( संदर्भ – ‘पत्रात भेटणारे बापूजी’, शरद साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद संस्था, कोल्हापूर, २०१२, पृ. १४६)

अखेरचे वादळी पर्व

डॉ. इथापे यांचा १९७५ ते ८४ हा कालखंड संघर्षमय होता. डॉ. इथापे व विद्यापीठ व्यवस्थेत विसंवाद निर्माण झाला. त्याला अनेक कारणे असावीत. कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार हे निवृत्त झाले होते. त्यानंतर डॉ. पी. जी. पाटील कुलगुरू म्हणून आले होते. डॉ. पी. जी. पाटील हे रयत परंपरेतील होते. कर्मवीर भाऊराव पाटलांचे विद्यार्थी. फर्डे वक्ते प्रसिद्ध होते. विद्यापीठाचे नेतृत्व बदलले की, काहीएक कार्यपद्धतीत फरक पडतो. तसा तो डॉ. पवार आणि पाटील, कणबरकर यांच्यातही पडला असावा. कर्मचारी संघटनेचा पाया या काळात घातला गेला. कर्मचारी संघटना कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी जागृत होती. या काळात डॉ. इथापे व कर्मचारी सेवक संघात काहीएक विसंवाद निर्माण झाला. डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या कार्यकाळात कर्मचारी संघटना होऊ शकली नव्हती. डॉ. पवार व डॉ. इथापे हे दीर्घकाळ विद्यापीठात होते. त्यामुळे सुप्तपणे काहीएक अदृश्य विरोधी गटही निर्माण झालेला असावा. विद्यापीठाने डॉ. इथापे यांच्यावर शंभरेक कारणांमुळे दोषारोप ठेवले. त्यासाठी निवृत्त न्या. एस. डी. जहागीरदार यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी समिती नेमली. हे दोषारोप सामान्य व सर्वसाधारण स्वरूपाचे होते. कर्मचारी संघटनेने इथापे यांच्याविरोधात १० मार्च, १९८० रोजी १०० तक्रारींची पुस्तिका सादर केली व विरोधात मार्च १९८० मध्ये आंदोलन झाले. १९७७ ते ७९ या काळातील विद्यापीठ खर्चाचे हिशेब, विद्यापीठ कामांवरील आतोनात खर्च, त्यांच्यामुळे कर्ज काढले गेले, नियमबाह्य विद्यार्थी प्रवेश तसेच वैद्यकीय केंद्रातील डॉ. इथापे यांचे नातभाचे डॉक्टर हे खासगी प्रॅक्टीस करतात, असे आरोप करण्यात आले होते. या आरोपांची चौकशी करण्यासाठी शाहू महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. आर. डी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समितीही नेमण्यात आली होती. या समितीने २१ नोव्हेंबर, १९८० रोजी अहवाल सादर केला होता. या आरोपांच्या चौकशीसाठी न्यायालयाने उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश एस. डी. जहागीरदार यांची एक सदस्यीय चौकशी समिती नेमली होती. श्री. जहागीरदार यांनी विद्यापीठात थांबून या आरोपांची सर्व तऱ्हेची चौकशी केली. १ एप्रिल, १९८१ ते ३ जूनपर्यंत सलग ४३ दिवस ही चौकशी झाली. यात पंचावन्न जणांच्या साक्षी झाल्या. आंदोलन, आरोप व प्रशासनातील विसंवाद पाहता, कुलपती कार्यालयाने डॉ. उषा इथापे यांचे निलंबन केले. त्या वेळी कुलपती होते ओमप्रकाश मेहरा. मा. कुलपतीच्या पत्रावरून विशेष विद्यापीठ कार्यकारिणीची या प्रश्नावरून वादळी सभा झाली. कार्यकारिणीपुढे न्या. जहागीरदार समितीचा अहवाल न वाचता मान्यतेस टाकण्यात आला. ठरावाच्या बाजूने व विरोधात खंडाजगीची चर्चा झाली. राज्यपाल तथा कुलपती आय. एच. लतिफ यांनी, डॉ. इथापे यांच्या चौकशीस विलंब का? अशी विचारणा विद्यापीठाकडे केली होती. (संदर्भ – दै. पुढारी, १५ ऑक्टोबर, १९८२). विद्यापीठाच्यावतीने अॅड. पी. के. चौगुले हे काम पाहत होते.

डॉ. इथापे यांच्या निलंबनाला, चौकटीला, विसंवादाला अनेक कंगोरे होत. २० ऑक्टोबर, १९८२ रोजी विद्यापीठ कार्यकारिणीने सातारा येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. जी. वाळके यांची चौकशी करून त्यांना पदावरून काढून टाकण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला होता. (संदर्भ – दै. पुढारी, २१ ऑक्टोबर, १९८२) त्यांच्या पत्नीच्या भावाचा मुलगा बी.कॉम. परीक्षा देत होता, या कारणाने अशी कारवाई व्हावी, असा निर्णय घेण्यात आला होता. डॉ. वाळके हे इथापे यांच्या जवळचे होते. त्यामुळेही अशा घटना घडल्या असाव्यात. तसेच त्या काळातील शिवाजी विद्यापीठातील दोन शिक्षण संस्थांमधील अंशतः टकराव व विद्यापीठ नेतृत्वाचा त्याबद्दलच्या सापेक्ष दृष्टिकोनाबद्दल काहीएक परिणाम झालेला असावा. विद्यापीठ वाटचालीतील अंतर्गत संघर्ष, आधीचा नेतृत्वाची कार्यपद्धती या घटनेस कारणीभूत असावी.

जहागीरदार चौकशी समितीने अहवालात स्पष्टपणे इथापे यांच्यावर केलेल्या आरोपात काहीही तथ्य नसल्याचे नमूद केले होते. त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात अशा प्रकारची भ्रष्टाचार आरोपाची नोंद झालेली नाही, असा उल्लेख केला. त्यामुळे विद्यापीठ कार्यकारी मंडळाने डॉ. इथापे यांचे निलंबन मागे घेतले. त्याचा राजीनामा मंजूर केला व त्यांना कार्यमुक्त करण्यात आले.

जहागीरदार समितीने संपूर्ण चौकशीअंती अंतिमतः असा निष्कर्ष नोंदवला होता. ‘That in the enquiry there was no charge of corruption against her. That during her career there was no stigma of adverse remark against her.
That the enquiry was for the conduct of the petitioner for a period of 15 years of mere during which no officer had brought any irregularities to her notice and that the Petitiner was ready to tender an apology.’
या प्रकरणात शासनाच्या निर्णयानुसार सप्टेंबर-ऑक्टोबर १९८१ मध्ये डॉ. इथापे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानुसार सांगली जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी आर. वाय. चव्हाण यांची कुलसचिवपदी नेमणूक करण्यात आली. या निर्णयाविरुद्ध डॉ. इथापे या न्यायालयात गेल्या होत्या. ( संदर्भ – दै. पुढारी, १ ऑक्टोबर १९८१). या निलंबन कारवाईचा निषेध नोंदवत डॉ. उषा इथापे यांनी पत्र स्वीकारले; मात्र अधिकारसूत्रे स्वीकारण्यास नकार दिला. शासनाकडून सांगलीचे उपजिल्हाधिकारी रवींद्र यशवंतराव (आर. वाय.) चव्हाण यांच्याकडे कुलसचिव पदाची जबाबदारी एक वर्षासाठी डेप्युटेशनवर नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर उपकुलसचिव श्री. रा. अ. कडियाळ यांच्याकडे कुलसचिव पदाचा कार्यभार सोपवण्यात आला. या न्यायालयीन खटल्यात कुलपती कार्यालयाकडून अॅड. सी. जे. सावंत यांनी, शासनाकडून श्री. बोबडे व डॉ. इथापे यांच्यावतीने अॅड. पी. आर. नाईक यांनी काम पाहिले.

दि. १ ऑक्टोबर १९८१ रोजी इथापे यांच्या निलंबन प्रश्नावर विद्यापीठ कार्यकारिणी बैठक झाली. ती वादळी ठरली. त्यात इथापे विरोधक आणि समर्थक गट असे चित्र दिसते. (संदर्भ – दै. पुढारी, २ ऑक्टोबर १९८१). न्या. जहागीरदार समितीचा २८१ पानी अहवाल सभेपुढे ठेवण्यात आला. काही सदस्यांनी हा ठराव मतदानास टाकण्याचा आग्रह धरला. सदस्य डॉ. घुगे व रँ. चौधरी यांच्यात खडाजंगी झाली. १९ सदस्यांपैकी १५ सदस्य बैठकीस उपस्थित होते. कुलगुरू कणबरकर यांनी अहवालाचे निष्कर्ष वाचून दाखवले. ठराव ९ विरुद्ध ६ मतांनी मंजूर झाला आणि डॉ. इथापे यांच्यावर निलंबन कारवाई कायम करण्यात आली. ठरावाच्या बाजूने कुलगुरू डॉ. रा. कृ. कणबरकर, प्राचार्य के. भोगीशियन, डॉ. गजानन जाधव, डॉ. व्ही. बी. घुगे, प्रा. चंद्रकांत पाटगावकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. दुबे, प्रा. संभाजीराव जाधव, हिंदुराव साळोखे व मधुकर शिर्के यांनी मतदान केले. तर इथापे यांच्या बाजूने अॅड. विलास शहा, प्रा. एम. जी. शितोळे, प्रा. एस. आर. पाटील, विलास वाळके, प्रा. एन. के. डुके व रँ. वामन चौधरी यांनी मतदान केले. ( संदर्भ – दै. पुढारी, २ ऑक्टोबर १९८१). रँ. चौधरी हे कुलपती निर्देशित सदस्य होते.

१० मार्च, १९८० ते २३ मार्च, १९८३ रोजी पर्यंत डॉ. इथापे यांचा राजीनामा अशी तीन वर्षे हा संघर्ष व चौकशी चालू राहिली. २१ ते २३ मार्च, १९८३ रोजी विद्यापीठ कार्यकारिणीत या प्रश्नावर वादळी चर्चा झाली. या चर्चेचा वृत्तांत दै. पुढारीमध्ये (दि. २४ मार्च, १९८३) विस्तृत प्रसिद्ध झालेला आहे. या वार्तांकनावरून असे चित्र दिसते की, या सभेपुढे निलंबनाबाबत पाच पर्याय ठेवण्यात आले होते. डॉ. इथापे यांना बडतर्फ करण्यात यावे. त्यांना सक्तीची सेवानिवृत्ती द्यावी. सन्मानाने त्यांचा राजीनामा घेण्यात यावा आणि त्यांना पुन्हा सेवेत द्यावे. अशी चर्चा या सभेत झाली. ४० पैकी ११ आरोपांचा ठपका या सभेत ठेवला गेला. इथापे यांनी सत्तेचा दुरुपयोग केला. त्यांच्यामुळे गटबाजीला उधाण आले, असे विरोधी गटाकडून मांडण्यात आले. इथापे विरोधाची बाजू प्रा. डी. यू. पवार, आर. एस. माने, व्ही. बी. इनामदार व शिवाजीराव मोरे यांनी मांडली. तर इथापे यांची बाजू अॅड. विलास शहा, अॅड. के. ए. कापसे यांनी मांडली. या कार्यकारी सभेत झालेली चर्चा, मतमतांतरे ही विद्यापीठ कार्यप्रणालीवर, गटबाजी व्यवहारावर प्रकाश टाकणारी आहेत. यावेळी डॉ. इथापे यांच्या निलंबनावर डॉ. शिवाजीराव मोरे यांनी ठराव मांडला. ठरावाच्या बाजूने कुलगुरू डॉ. कणबरकर, प्रा. डी. यू. पवार, हिंदुराव साळोखे, व्ही. बी. इनामदार, मधुकर शिर्के, प्रा. आर. एस. माने, शिवाजीराव मोरे व एस. जी. फडके यांनी मतदान केले. तर इथापे यांच्या बाजूने अॅड. विलास शहा, के. ए. कापसे, प्राचार्य बाबर, राघवेंद्र पाटील, माळी आणि आर. के. सक्सेना यांनी मतदान केले. कुलपतींचे प्रतिनिधी श्री. कोल्हटकर हे तटस्थ राहिले. त्यानुसार इथापे यांनी कुलसचिव पदाचा राजीनामा दिला. (संदर्भ – दै. पुढारी, २४ मार्च, १९८३). इथापे यांच्या बाजूच्या सदस्यांचे म्हणणे असे होते की, डॉ. इथापे यांचे विद्यापीठाच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. जे दोषारोप ठेवण्यात आले होते ते गौण स्वरूपाचे होते व ते कार्यालयीन कामकाजातील त्रुटींमधून निष्पन्न झालेले होते. वरिष्ठ अधिकारी म्हणून डॉ. इथापे यांचा त्याच्याशी संबंध नव्हता. त्यामुळे त्या दोषी ठरत नाहीत. मात्र कोणत्याही संस्थात्मक निर्णयात बहुसंख्य मतांना महत्त्व असते. त्यानंतर डॉ. इथापे यांनी आपली बाजू मांडली होती. ‘कुलगुरूंनी माझा बळी दिला’, अशा सौम्य शब्दांत प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे या बैठकीत इथापे यांना नोकरीतून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाविरुद्ध डॉ. इथापे न्यायालयात गेल्या. उच्च न्यायालयाचे न्या. चांदुरकर यांनी दिलेल्या निर्णयात इथापे यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जावी, असे मत मांडले. ( संदर्भ -दै. पुढारी, २ मार्च, १९९४). त्यानुसार डॉ. इथापे यांनी आपल्यावरील कारवाई रद्द करावी, असा विनंतीअर्ज केला होता.

त्यानुसार मार्च, १९८४ रोजी झालेल्या विद्यापीठ कार्यकारिणी सभेत डॉ. इथापे यांचा निलंबन आदेश मागे घेण्यात आला. त्यांच्या बडतर्फीचा ठराव ९ विरुद्ध ८ मतांनी फेटाळला. ‘त्यावेळी डॉ. इथापे यांना दिलेली शिक्षा कमी करावी हा ठराव बहुमताने संमत झाला. बैठकीचे कामकाज काही काळ स्थगित करून श्री. विलास शहा हे श्रीमती उषा इथापे यांच्या निवासस्थानी गेले व राजीनामा घेऊन आले. सध्याच्या परिस्थितीत आपण मुक्तपणे काम करू शकत नाही, म्हणून या प्रकरणावर पडदा पडावा, अशी विनंती त्यांनी कुलगुरूंना केल्याचे कळते.’ ( संदर्भ -दै. पुढारी, २ मार्च, १९८४). त्या दिवशी कार्यकारिणीने निर्णय बदलू नये म्हणून कर्मचारी संघटनेने कामकाजावर बहिष्कार टाकला होता.

डॉ. उषा इथापे यांनी नंतरच्या काळात राहुरी विद्यापीठ व भारती विद्यापीठात शैक्षणिक सल्लागार म्हणून काही काम पाहिले. मात्र त्या तेथे फारशा रमल्या नाहीत. डॉ. उषा इथापे यांचे नाव कुलगुरू म्हणून पुणे विद्यापीठ व शिवाजी विद्यापीठात चर्चेत होते. त्यांचे नामनिर्देशनही या विद्यापीठात झाले होते. अखेरच्या संघर्षकाळात न्यायालयीन लढाईसाठी त्यांची बरीच वर्षे आणि वेळ गेला. आर्थिक अडचणीमुळे मानसिक स्वास्थ्यही काही प्रमाणात हरवले. निवृत्तीनंतर त्या, ७, राजरल अपार्टमेंटस, टाकाळा येथे राहत होत्या. वयाच्या पंचाऐशीव्या वर्षी १३ एप्रिल, २००६ रोजी रात्री त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. मृत्यूनंतर
त्यांनी देहदान केले.

शिवाजी विद्यापीठाच्या एकंदर वाटचालीत विविध परिवर्तने, वळणे पाहायला मिळतात. १९६२ ते ७६ हे पहिले पर्व. या काळात विद्यापीठाचा बहुल विस्तार झाला. या काळात शिवाजी विद्यापीठाच्या घडण वाटचालीत कुलसचिव म्हणून डॉ. उषा इथापे यांचा महत्त्वाचा सहभाग होता. या काळात भौतिक सुविधांबरोबर शैक्षणिक गुणवत्तेचा लंबक विस्तारला. डॉ. इथापे यांची त्यांची म्हणून स्वतंत्र कार्यशैली निर्माण झाली. निरपेक्ष भावनेने आणि त्यांनी संस्थात्मक कार्याचा आदर्श निर्माण केला. प्रशासनाला सुनियोजित वळण लावले. त्यांच्या कार्यशैलीत सुहृदय मानवीयतेचे दर्शन होते. त्यांच्या कार्यकाळातील शेवटची वर्षे संघर्षाची आणि विसंवादाने भरलेली होती. विविध कारणांमुळे डॉ. इथापे यांना न्यायालयीन लढाईला तोंड द्यावे लागले. अशा शिवाजी विद्यापीठातील कर्तबगार प्रशासक आणि सुहृदय व्यक्तिकार्याचे स्मरण निश्चितच प्रेरणादायी ठरेल.

डॉ. रणधीर शिंदे
३-अ, पंचशील हौसिंग सोसायटी,
हनुमान नगर, उजळाईवाडी, कोल्हापूर. ४१६००४
९८९०९१३०३१

पुस्तकाचे नाव – घरंदाज सावली डॉ उषा इथापेः कार्य आणि आठवणी
संपादक – रणधीर शिंदे
प्रकाशक – शब्दशिवार प्रकाशन, सोलापूर
किंमत – ३०० रुपये


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading