March 31, 2025
Narayan Surve Literary Conference 2025 at Ravindra Natya Mandir, Mumbai
Home » ऐसा गा मी ब्रह्म जनकवी नारायण सुर्वे
विशेष संपादकीय

ऐसा गा मी ब्रह्म जनकवी नारायण सुर्वे

‘सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन’ चे निमित्त

लेखक रजनीश राणे यांच्या स्वामीराज प्रकाशन आणि कवी अजय कांडर यांच्या प्रभा प्रकाशनतर्फे 27 मार्च 2025 रोजी मुंबई रवींद्र नाट्यमंदिर येथे एक दिवशीय ‘सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन’ आयोजित केले आहे. यानिमित्ताने समीक्षक रमेश सावंत यांनी कविवर्य नारायण सुर्वे यांच्या कवितेचा घेतलेला हा मागोवा !

‘ शिपायाची नोकरी ते साहित्य संमेलनाध्यक्ष असा विलक्षण प्रवास करणारे सुप्रसिध्द कवी कोण ?’ या प्रश्नाचे उत्तर ‘कविवर्य नारायण सुर्वे’ हे असेल हे बऱ्याच वाचकांना माहीत आहे. याचे कारण म्हणजे तळागाळातल्या श्रमिकांचे जीवनानुभव कवितेत मांडणारे कविवर्य नारायण सुर्वे आपल्या आयुष्याचा बराच काळ लालबागसारख्या कामगार वस्तीतील चाळीत राहत होते हे सर्वश्रुत आहे. सुर्वे हे सुरुवातीला काही वर्षे गिरणी कामगार होते. त्यानंतर ते शिकले आणि मग शिपाई, आणि प्राथमिक शिक्षक असे टप्पे पार करता करता कवी झाले. त्यांचा हा प्रवास इथेच थांबला नाही तर ते १९९५ च्या परभणी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. या शिवाय त्यांना १९९८ सालचा ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाला.

या पार्श्वभूमीवर मराठी कवितेच्या क्षेत्रात झेंडा रोवणारे सुप्रसिध्द कवी नारायण सुर्वे यांना कोणत्या आईने जन्म दिला हे गूढ असले तरी त्यांच्या जन्मानंतरची कहाणी खूपच हृदयद्रावक आहे. मुंबईच्या इंडिया वुलन मिलमधील स्पिनिंग खात्यात ‘साचेवाले’ म्हणून काम करणाऱ्या गंगाराम कुशाजी सुर्वे या गिरणी कामगाराला ते मुंबईच्या फूटपाथवर दिसले आणि त्यांनी त्या अनाथ मुलाला घरी आणले. गंगाराम सुर्वे आणि कमला मिलमध्ये काम करणाऱ्या श्रीमती काशीबाई गंगाराम सुर्वे या जोडप्याने या अनाथ मुलाला स्वीकारले, त्यांना सांभाळले, वाढवले आणि आपले नावही दिले. अशा प्रकारे ‘गंगाराम सुर्वे ’ या कामगाराला रस्त्यावर मिळालेले एक बालक पुढे ‘ नारायण गंगाराम सुर्वे’ या नावाने ओळखले जाऊ लागले. नारायण सुर्वे हा मुलगा पुढे प्रख्यात कवी झाला. त्यांची ही संघर्षपूर्ण जीवनकहाणी केवळ मराठी साहित्यक्षेत्रालाच नव्हे तर कुणालाही अचंबित आणि विचारप्रवृत्त करणारी आहे.

नारायण सुर्वे यांना आपले आईवडील कामगार होते, त्यांच्यामुळेच मुंबईच्या कामगारवर्गाशी आपण जोडले गेलो, याचा विलक्षण अभिमान वाटत असे. हा अभिमान त्यांनी आपल्या लेखनातून, भाषणांतून अनेकदा व्यक्तही केला आहे. सुर्वे यांच्या कवितेमधूनही ही भावना वारंवार डोकावताना दिसते. ‘सनद’ या कवितासंग्रहाच्या मनोगतात नारायण सुर्वे आपल्या जन्माविषयी लिहितात, ‘मी अनाथ मुलगा म्हणून जन्माला आलो, ही अतिशय दुःखद गोष्ट आहे. भूषणास्पद नाही. जन्मदात्री आई जेव्हा माझी नाळ कापून, माझ्यापासून अलग झाली असेल, तेव्हा तिच्या डोईवर आकाश फाटले असेल…; परंतु पुढल्या भवितव्याने काही वेगळेच ठरवलेले दिसते…. माझी नाळ कापली जाऊन मी अलग झालो खरा; परंतु कुणीतरी चटकन् मला आपल्या स्तनाशी घेतलेही. ही माझी दुसरी माय. जन्मदात्रीपेक्षाही थोर. मी जन्मलो तेव्हा काही नाव धारण करून जन्मलो नाही. मात्र मी नसेन तेव्हा ह्या पृथ्वीच्या पाठीवर एक नाव ठेवून जाईन – ते म्हणजे नारायण गंगाराम सुर्वे…’

सुर्वे ह्यांचे बालपण अत्यंत प्रतिकूल अवस्थेत गेले असले तरी ते शिकले आणि त्यांनी मराठी साहित्याच्या जगात नाव कमवून आपले जीवन सार्थक केले. नारायण सुर्वे यांचे बालपण मुंबईच्या गिरणगावात, गिरणी कामगारांच्या जगात गेले. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतांमधून मुंबईत आलेल्या, पोटासाठी श्रम विकणाऱ्या आणि त्यासाठी पूर्णपणे गिरण्या आणि कारखान्यांवर अवलंबून असलेल्या कामगारांशी सुर्वे यांचा अगदी जवळून संबंध आला. या संघर्षपूर्ण जीवनात त्यांनी हॉटेलमध्ये पोऱ्या, कापड गिरणीत बिगारी अशी कष्टाची कामे केली. त्यानंतर अक्षरओळख झाल्यावर त्यांनी प्राथमिक शाळेत शिपायाची नोकरी केली. पुढे त्यांना प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. त्यांचे वाचन चौफेर होते. मराठीशिवाय हिंदी आणि उर्दू ह्या भाषा त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत करुन घेतल्या होत्या. कामगार चळवळीमुळे सुर्वे यांचा परिचय मार्क्सवादी तत्त्वज्ञानाशी झाला.

या तत्त्वज्ञानामुळे सुर्वे यांच्या विचारांना आणि त्यांच्या निष्ठेला विशिष्ट दिशा मिळाली. यातूनच परिस्थितीला सामोरे जाण्याचे धैर्य असलेला आणि परिवर्तनासाठी लढणारा नारायण सुर्वे हा कार्यकर्ता निर्माण झाला, असे म्हणता येईल. कार्यकर्ता म्हणून सुर्वे यांनी कामगार चळवळीमध्ये प्रत्यक्ष भाग घेतला. लालबागच्या चाळीत आपल्या शेजारीपाजारी राहणाऱ्या कामगारांना सभांची माहिती देणे, पुस्तके वाचून दाखवणे आणि कम्युनिस्ट विचारांचा परिचय करून देणे; ही कामे नारायण सुर्वे करीत. त्यांना सर्व जण ‘मास्तर’ म्हणत. याशिवाय थाळीप्रचार, खडूप्रचार करणे, पोस्टरे चिकटवणे, संपाच्या वेळी पिकेटिंग करणे, युनियनची वर्गणी गोळा करणे, निवडणुकांमधील कामे, मिरवणुकीत सहभागी होणे, इत्यादी अनेक कामे सुर्वे यांनी केली. कम्युनिस्ट चळवळीच्या प्रचारासाठी शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमरशेख आणि शाहीर गवाणकर यांनी निर्माण केलेल्या कलापथकांमध्येही सुर्वे सहभागी झाले.

सुर्वे हे स्वतः या श्रमिकांच्या जगाचा एक भाग असल्यामुळे या कामगारविश्वाचे प्रश्न त्यांनी फार जवळून पाहून समजून घेतले. गिरणगावातला कामगारवर्ग आपल्या गावाशी आणि गावातील संस्कृती आणि जीवनाशी नाते जोडून होता. सुर्वे यांनी या कामगार वर्गाच्या द्विधा मानसिक अवस्थेचे आणि सुखदुःखांचे अगदी जवळून निरीक्षण केले. कामगारवर्गावर होणारा अन्याय, या वर्गाची होणारी आर्थिक आणि राजकीय पिळवणूक, या वर्गाच्या वाट्याला आलेली ‘सर्वहारा’ अवस्था सुर्वे यांनी प्रत्यक्ष अनुभवली. या सर्व अनुभवांतूनच कवी नारायण सुर्वे यांची जीवनदृष्टी घडत गेली. वर्ष १९४८ मध्ये त्यांनी कृष्णा साळुंके यांच्याशी विवाह केला. कृष्णाबाई सुर्वे यांनी नारायण सुर्वे यांच्याशी संसार करताना जीवनभर जो संघर्ष केला त्या आठवणी सांगणारे कृष्णाबाई यांचे ‘ मास्तरांची सावली’ हे आत्मकथन प्रसिद्ध आहे.

विपन्नावस्था आणि दारिद्र्याचे चटके ह्यांमुळे त्यांच्याकडून सखोल अनुभवसंपन्न असे लेखन सहजस्फूर्तीने घडले. ‘ऐसा गा मी ब्रह्‌म’ (१९६२) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतर माझे विद्यापीठ (१९६६), जाहीरनामा (१९७५) आणि नव्या माणसाचे आगमन (१९९५) हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले. सनद (१९८२) आणि निवडक नारायण सुर्वे (१९९४) ह्या त्यांच्या निवडक कवितांचे संपादित संग्रह. उर्दू साहित्यिक कृष्ण चंदर ह्यांच्या उर्दू कथांचा सुर्वे ह्यांनी केलेला अनुवाद तीन गुंड आणि सात कथा (१९६६) ह्या नावाने प्रसिद्घ झाला. दादर पुलाकडील मुले (१९७५) ही त्यांची अनुवादित कादंबरी. त्यांच्या निवडक कवितांचा इंग्रजी अनुवाद ऑन द पेव्हमेंट्‌स ऑफ लाइफ (१९७३) ह्या शीर्षकाने प्रसिद्घ झाला आहे. नारायण सुर्वे यांनी फारसे गद्यलेखन केलेले नसले तरी त्यांनी लिहिलेले लेख, व्यक्तिचित्रे, दिलेल्या मुलाखती व भाषणे यांपैकी काही लेखन एकत्रित स्वरूपात ‘माणूस, कलावंत आणि समाज’ या संग्रहात प्रसिद्ध झाले आहे.

या लेखनामधून सुर्वे यांची जीवनदृष्टी आणि साहित्यविषयक भूमिका स्पष्टपणे व्यक्त झाली आहे. समकालीन साहित्याविषयीचे आणि समीक्षेविषयीचे त्यांचे विचारही या संग्रहातील लेखनामधून प्रकट झाले आहेत. सुर्वे यांना कामगारशक्ती आणि मार्क्स ह्यांबद्दल आस्था आणि जवळीक वाटत असे. परंतु त्यामुळेच त्यांची कविता काही टीकाकारांना प्रचारकी वाटते. सुर्वे ह्यांच्या बाजूने आणि विरोधात लिहिणारे खूप टीकाकार भेटले असले तरी सुर्वे यांची कविता अभ्यासासाठी विद्यापीठात स्वीकृत केली गेली, हे त्यांच्या कवितेचे महत्त्व सिद्घ करते. त्यांच्या कवितेची गुजराती, हिंदी तसेच जगातील अनेक भाषांत भाषांतरे झालेली आहेत.

१९५८च्या सुमारास नारायण सुर्वे यांनी काव्यलेखनाला प्रारंभ केला. त्या वेळी ते शाळेत शिपाई म्हणून काम करीत होते. मुख्यतः ते कामगारांचीच वस्ती असलेल्या बोगद्याच्या चाळीतील अंधाऱ्या खोलीत राहत होते. आपले अल्पशिक्षण, साहित्यक्षेत्राशी दुरान्वयानेही नसलेला संबंध, आपली अभावग्रस्त परिस्थिती आणि सामाजिक स्थान यांचा विलक्षण दबाव सुर्वे यांच्या मनावर होता. असे असूनही या दबावाखाली त्यांची कविता गुदमरली नाही किंवा दडपली गेली नाही. सुर्वे कविता लिहू लागल्यानंतर बाबूराव बागुलांच्या प्रयत्नांमुळे ‘नवयुग’मध्ये त्यांची कविता छापून आली. सुरुवातीच्या काळात त्यांच्या कविता ‘ युगांतर’, ‘मराठा’, इत्यादी नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाल्या. १९६२ साली ‘ऐसा गा मी ब्रह्म’ हा सुर्वे यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. समकालीन कवितेपेक्षा सुर्वे यांच्या कवितेचे असलेले वेगळेपण या संग्रहामुळे स्पष्टपणे जाणवू लागले. १९६३ साली ‘ऐसा गा मी ब्रह्म’ला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्कारामुळे सुर्वे प्रसिद्धीच्या झोतात आले आणि वाचक-रसिकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. ‘माझे विद्यापीठ’ हा सुर्वे यांचा दुसरा कवितासंग्रह १९६६ मध्ये प्रसिद्ध झाला. ‘ माझे विद्यापीठ’ संग्रहातील कवितेच्या खालील ओळीतून जगण्याच्या अपरिहार्यतेची जाणीव दिसून येते.

आता आलोच आहे जगात, वावरतो आहे उघड्या नागड्या वास्तवात
जगायला हवे; आपलेसे करायलाच हवे, कधी दोन घेत, कधी दोन देत
‘ऐसा गा मी ब्रह्म’ या कवितासंग्रहामध्ये दिसून येणारी कवीच्या सृजनशीलतेची बीजे या दुसऱ्या संग्रहात विकसित रूपात व्यक्त झाली. या संग्रहातील ‘ दोन दिवस’ या कवितेत शब्दांतून जी जाणीव आणि भावना व्यक्त होते ती पाहा,
‘दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे ’
१९७५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘जाहीरनामा’ या तिसऱ्या संग्रहाने नारायण सुर्वे यांच्या कवितेचे स्वरूप अधोरेखित केले. यानंतर ‘सनद’ हा निवडक कवितांचा संग्रह (१९८२), ‘नव्या माणसाचे आगमन’ (१९९५) आणि ‘नारायण सुर्वे यांच्या गवसलेल्या कविता’ हा अप्रकाशित कवितांचा संग्रह (१९९५) असे तीन संग्रह प्रसिद्ध झाले आहेत.

अशा प्रकारे नारायण सुर्वे यांच्या कवितेतून कष्टकऱ्यांचे जग व्यक्त होत होते, जे त्यांच्या कवितेचे प्रथमदर्शनी जाणवणारे वैशिष्ट्य आहे. मराठी कवितेचे हे तोवर कधीच व्यक्त न झालेले वैशिष्ट्य होते. समकालीन सामाजिक परिस्थितीवर, त्यातील अन्याय्य गोष्टींवर, प्रश्नांवर, माणसाच्या माणूसपणाचा अपमान करणाऱ्या व्यवस्थेवर भाष्य करणे हा सुर्वे यांच्या कवितेचा स्थायीभाव आहे. हे भाष्य करीत असताना सुर्वे यांच्या कवितेतून मार्क्सवादी विचारांची दिशा स्पष्टपणे व्यक्त होते. परंतु माणसाशी असलेल्या आत्मीय संबंधांमुळे आणि त्या संबंधांतून कवितेत प्रकट होणाऱ्या या मार्क्सवादी जाणिवेमुळे सुर्वे यांची कविता मार्क्सवादी विचारांचे सूचन करीत असली, तरी प्रचारकी स्वरूप धारण करीत नाही. सुर्वे यांची जीवनावर आणि माणसांवर दृढ श्रद्धा आहे. सुर्वे यांच्या मते माणूस हाच साहित्याचा केंद्रबिंदू आहे. म्हणूनच साहित्य आणि समाज यांचा अतूट संबंध असतो, असे सुर्वे मानतात. माणसाचा, त्याच्या स्वभावधर्माचा, माणसाच्या सर्जनशीलतेचा आणि सामर्थ्याचा कुतूहलाने घेतलेला शोध सुर्वे यांच्या कवितेत सातत्याने जाणवत राहतो. माणसावरील आणि जीवनावरील या श्रद्धेमुळे आणि प्रेमामुळेच सुर्वे यांच्या कवितेतील आशावादी सूर कधीही लोप पावलेला दिसत नाही.

सुर्वे यांच्या कवितेला विलक्षण लोकप्रियता लाभली आहे. आजवर त्यांच्या काव्यवाचनाला उदंड प्रतिसाद लाभला आहे. सुर्व्यांच्या कवितेतील प्रासादिकता हे याचे एक कारण म्हणता येईल. अगदी परिचित वाटणारी, रोजच्या वापरातल्या बोलीभाषेसारखी भासणारी, प्रमाण मराठी आणि बोली यांची स्वाभाविक मिश्रण असणारी भाषा, ओळखीची वाटणारी प्रतिमासृष्टी आणि सहज वाचता येतील, समजून घेता येतील अशा गद्यसदृश लयी यांमुळे सुर्वे यांची कविता समाजाच्या सर्व थरांतील लोकांच्या तोंडी वसलेली दिसते. एका बाजूला गद्यसदृश लयीची कविता निर्माण करणार्‍या सुर्व्यांनी सुरुवातीला गाणीही लिहिली आहेत. शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमरशेख, शाहीर गवाणकर यांच्याबरोबर कलापथकांमध्ये वावरताना सुर्वे यांच्यावर जे संस्कार झाले, त्यांतून प्रेरणा घेऊन त्यांनी १९५६ मध्ये ‘डोंगरी शेत’ हे आपले पहिले गीत लिहिले.

स्त्रीच्या कष्टांचा आणि वेदनेचा अनुभव स्त्रीसुलभ भाषेतून देणार्‍या या गीताला समाजाच्या सर्व थरांतील लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शाहीर अमरशेखांनी हे गीत खेड्यापाड्यांत, अगदी घरोघरी पोहोचवले. त्या काळी लोकप्रियतेमुळे हे गीत केवळ सभासंमेलनांत किंवा चळवळींच्या विविध उपक्रमांत नव्हे, तर धंदेवाईक तमाशांच्या खेळांमध्येही गायले जात होते. या गीताची रेकॉर्ड हातोहात खपली. या गीतानंतर सुर्वे यांनी ‘गिरणीची लावणी’, ‘महाराष्ट्राच्या नावानं’ हा गोंधळ, ‘गाडी आणा बुरख्याची’ हे गीत, अशी सुमारे पंधरा ते वीस गीते लिहिली. त्यांपैकी आठ गीते ‘ऐसा गा मी ब्रह्म’ या संग्रहात आढळतात. यानंतर मात्र सुर्वे यांनी गीते लिहिली नाहीत. आपला पिंड गीतकाराचा नाही हे त्यांनी ओळखले आणि कवितेवरच लक्ष केंद्रित केले. ‘कविता श्रमाची’ आणि ‘गाणी चळवळीची’ हे दोन गीतसंग्रह सुर्वे यांनी संपादित केले आहेत.

आपल्या ८३ वर्षांच्या आयुष्यात नारायण सुर्वे यांना अनेक मोठे पुरस्कार, मानसन्मान, शिष्यवृत्ती आणि गौरववृत्ती मिळाल्या. त्यांच्या ‘ऐसा गा मी ब्रह्‌म’ आणि ‘माझे विद्यापीठ’ या दोन कवितासंग्रहांना महाराष्ट्र शासनाचे प्रथम पुरस्कार मिळाले. ‘सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार’या पारितोषिकाचेही ते दोनदा मानकरी ठरले. परदेश प्रवास करण्याचा योगही त्यांना आला. त्यामुळे त्यांना १९७३ व १९७६ साली सोव्हिएट युनियनचा तसेच १९८५ साली मॉरिशसचा प्रवास घडला. ते अनेक आंतरराष्ट्रीय संमेलनांमध्ये आणि परिषदांमध्ये सहभागी झाले.

अमेरिकेतील ‘महाराष्ट्र फाउंडेशन’ चा पुरस्कारही त्यांना देण्यात आला. ‘नारायण गंगाराम सुर्वे’ ह्या त्यांच्यावर निघालेल्या माहितीपटाला राष्ट्रीय पातळीवरचा प्रथम पुरस्कार मिळाला. ‘सनद’ साठी भारत सरकारचा साहित्य पुरस्कार ‘पद्श्री पुरस्कार’ (१९९८), मध्य प्रदेश सरकारचा ‘कबीर पुरस्कार’ (१९९९) कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ‘जनस्थान पुरस्कार’ हे त्यांना मिळालेले आणखी काही महत्त्वपूर्ण पुरस्कार. सुर्वे यांनी १९८९ साली आयोजित झालेल्या दलित, आदिवासी, ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. त्याचप्रमाणे १९९५ साली परभणी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या कवितांचे अन्य अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले असल्याने सुर्वे यांना अन्य भाषिक रसिकांचीही भरघोस दाद मिळाली आहे. अशा प्रकारे भारतातच नव्हे, तर जगभरात त्यांच्या कवितेचे चाहते आहेत. १९६० नंतरच्या मराठी कवितेचा विचार करताना नारायण सुर्वे यांची कविता हा मर्ढेकरांनंतर मराठी कवितेने गाठलेला एक महत्त्वाचा टप्पा ठरतो. मानाचे अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळूनही शेवटपर्यंत सामान्य माणूस आणि रस्त्यावरील कवी राहिलेले कविवर्य नारायण सुर्वे यांचे १६ ऑगस्ट २०१० रोजी ठाणे येथे निधन झाले. या प्रसंगी अवघ्या विश्वाचे दुःख आपलेसे करणाऱ्या कविवर्य नारायण सुर्वे यांच्या ‘ ऐसा गा मी ब्रह्म ’ या कवितासंग्रहातील ‘ चार शब्द ‘ या कवितेतील ओळी आठवतात आणि आपले मन त्यांच्या आठवणीने भरून येते.
‘ एकटाच आलो नाही युगाचीही साथ आहे
सावध असा, तुफानाची हीच सुरुवात आहे ’

  • रमेश नागेश सावंत
    चलभाष – ९८२१२६२७६७

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading