नैसर्गिक संसाधने वापरताना महात्मा गांधींचा एक विचार सर्वांनी लक्षात घ्यायला हवा. ते म्हणतात, ‘जमीन, पाणी आणि निसर्गाती संसांधने आपल्या बापजाद्यांची जहांगिरी नाही, तर ती पुढच्या पिढीकडे सोपवण्याची जबाबदारी आहे’. आपण अनेक सण, उत्सव साजरे करतो. त्याच्या मूळ रूपात अनेक बदल कालौघात झाले. त्यामुळे नैसर्गिक संसाधनांचा वापर करतो. यातून निसर्गाची पर्यायाने पर्यावरणाची हानी करतो.
डॉ. विलास शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
मागील काही वर्षापासून निसर्ग संवर्धन आणि पर्यावरणाचा जागर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. मूळात जगाला याची जाणीव झाली ती १९७० च्या दशकामध्ये. त्यावेळी डीडीटीचा मोठ्या प्रमाणातील वापर प्रथम सस्तन प्राण्यांना कसा घातक ठरतो, ते संशोधकांनी सांगितले. त्यानंतर मानवामध्ये डीडीटीचे अंश प्राण्यांच्या दूध आणि मांसातून येत असल्याचे शोधण्यात आले. गिधाडासारखी प्रजाती यातून नष्ट होत असल्याचे निदर्शनास आले. गिधाडांना वाचवण्यासाठी अभयारण्ये निर्माण करण्यात आली. मात्र त्याचा हवा तसा परिणाम झालेला दिसून येत नाही. २०२१ मध्ये ‘इंटरगव्हर्मेंटल पॅनेल फॉर क्लायमेट चेंज’ने युनोला दिलेल्या अहवालानुसार पृथ्वीवरील जीवसृष्टिला किती आणि कसा धोका निर्माण झाला आहे ते संशोधकांनी सांगितले. त्यानुसार परिणामही दिसू लागले आहेत. पुणे, बेंगलोरमध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस अगदी आयपीसीसीच्या अहवालातील निष्कर्षानुसार आहेत. पाकिस्तानमधील पूराने हजारो लोकांचा जीव घेतला. आपण यासाठी पावसाला आणि निसर्गाला दोष देत असलो, तरी हे मूळात मानवाने निर्माण केलेली समस्या आहे. मानवाने आपल्या स्वार्थासाठी, सुखासाठी निसर्गाला, निसर्गातील संसाधनाना हवे तसे ओरबडले. हवी तशी लूट केली. त्याचा परिणाम म्हणजे निसर्गाचा लहरीपणा आहे.
भारतीय संस्कृतीच नव्हे, तर सर्व धर्म पंथांची मूळ शिकवण ही निसर्गस्नेही आहे. कोणताही धर्म, पंथ मानवाला त्याच्या आचरणामध्ये, सण, सोहळे आणि उत्सवामध्ये निसर्गाला हानी पोहोचवण्याची शिकवण देत नाही. मात्र कालानुरूप त्यामध्ये अनुचित प्रथा परंपरा येतात. यामध्ये दुर्बलांवर, महिलांवर मोठ्या प्रमाणात बंधने आणण्यात आली. बालविवाह, बाल-जरठ विवाह, पतीचे निधन झाल्यानंतर सती जाण्याची प्रथा, विधवांचे मुंडण करणे, विधवांना समजात मिसळू न देणे, देवदासी अशा अनेक परंपरा निर्माण करण्यात आल्या. काम तसे कोणतेच हलके नसते. मात्र तथाकथीत हलकी कामे करणाऱ्या समुहाला अस्पृश्य मानण्याची प्रथा पुढे आली. त्यानंतर तर यामध्ये इतका अनिष्टपणा आला की विशिष्ट वर्गाच्या लोकांना गळ्यात मडके आणि मागे झाडू बांधून फिरायला लावले जात असे. कायद्याचा बडगा असो, किंवा समाजाची बदललेली मानसिकता आज काही प्रमाणात यात फरक आला आहे. बदलत्या युगात यातील अनेक प्रथा नष्ट झाल्या आहेत, तर काही ग्रामीण भागात आढळतात. बालविवाहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. बाल-जरठ विवाहही घटले आहेत. मुलींच्या शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढल्याने यात घट झाली आहे. देवदासींची प्रथाही जवळपास संपुष्टात आली आहे. मात्र अजूनही विधवांना सौभाग्यालंकार घालू दिले जात नाहीत. मासीक पाळी आलेल्या महिलांना अजूनही ‘बाहेर बसवले’ जाते. अनेक अनिष्ट प्रथा आणि परंपरा कालबाह्य झाल्या असल्या तरी नव्या गोष्टींचा अंतर्भावही मोठ्या प्रमाणात होत आहे.
सण, उत्सव साजरे करताना असे आलेले बदल समाज सोईने वापरत असतो. त्याचा फटका निसर्ग आणि पर्यावरणाला बसतो. अशा अनेक प्रथा आणि परंपरा आज आपण पाळत आहोत. त्या प्रथेमागील भावना समजून घेण्यापेक्षा केवळ कर्मकांडाला महत्त्व देण्यात येते. त्यातून होणारे निसर्गाचे नुकसान टाळले तरी खूप काही साध्य होऊ शकते, मात्र आपल्या सोईसाठी सारासार विवेक हरवून बसलेला मानव याकडे लक्ष देत नाही. आयुर्वेदामध्ये अनेक वनस्पतींचा मानवी आरोग्य निरामय ठेवण्यासाठी उपाय सूचविण्यात आले आहेत. औषधी उपयोगासाठी वनस्पतीचा एखादा भाग जसे की, पान, फूल, फळ, साल, मूळ वापरावे लागते. हे झाडापासून तोडण्यापूर्वी त्या झाडाची क्षमा मागून, त्या झाडाला त्याचा तो भाग देण्याची, विनंती करावी, असे सांगणारी भारतीय संस्कृती आहे. मात्र आपले अनेक सण साजरे करताना आलेले बदल निसर्गाची हानी करतात आणि आपण ते लक्षात घेत नाही. या आलेल्या बदलांचा आणि त्यातून होणाऱ्या निसर्गाच्या हानीचा विचार करायला हवा.
गुढी पाडवा हा नववर्षाचा प्रारंभाचा दिवस. या दिवशी दारात गुढी उभा करण्याची परंपरा पुराणानुसार वसू राजाने सुरू केली, असे संदर्भ मिळतात. वसू राजाला स्वर्गलोक हवा होता. तो एक आदर्श राजा होता. त्याचे मन इंद्रदेवाने वळवले आणि तुझ्या राज्याचे स्वर्गात रूपांतर कर म्हणून सांगितले. वसू राजाने पृथ्वीवर आल्यानंतर पहिली गुढी उभारली. त्यांने बांबूच्या टोकाला शालू, लिंबाची डहाळी आणि हार घालून गुढी रोवली. आजही गुढी अशाचप्रकारे उभी केले जाते. मात्र टोकाला तांब्या उपडा बसवण्यात येतो. कडुलिंबाची डहाळी गुढीला वरती बांधण्यात येते. ही प्रथा केव्हापासून आली याचे संदर्भ मिळत नाहीत. गुढी उभारताना, आरोग्यासाठी उपकारक कडुलिंबाच्या फुलांमध्ये गुळ, हरभऱ्याची भिजवलेली डाळ घालून खाण्याची प्रथा आहे. यासाठी कडुलिंबाची फुले असणारी एक डहाळी लागते. मात्र अनेक महाभाग कडुलिबांच्या गावाला पुरतील एवढ्या फांद्या तोडून आणतात. त्यांच्यापैकी कोणाला विचारले तर सांगतात, ‘येत होतो, शेजारच्या वहिनी, आमच्यासाठीही आणा म्हणाल्या. त्यांच्यासाठीही घेतल्या.’ एक फांदी वाढण्यासाठी एक वर्षाचा काळ लागतो. अशा अनेक फांद्या तोडून झाडाच्या वाढीचा वेग आपण कमी करतो. दुसऱ्या दिवशी या नेलेल्या फांद्यापैकी ढिगभर फांद्या कचऱ्यात टाकल्या जातात. हे आपण टाळायला हवे. कडुलिंबाचे आरोग्याच्या दृष्टीने असणारे महत्त्व जाणून उपयोगासाठी आवश्यक तेवढाच भाग घ्यायला हवा. झाडांची कत्तल थांबवायला हवी.
त्यानंतर येणारा सण म्हणजे वटसावित्री पौर्णिमा. हा सण तर आता केवळ उपचार आणि इतरांना, विशेषत: वडिलधाऱ्यांना काय वाटेल म्हणून साजरा केला जातो. यासाठी वडाच्या झाडापर्यंत जाण्याचे कष्टही घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे, सण साजरा करण्यासाठी, बाजारातून वडाची फांदी विकत आणून तिचे पूजन केले जाते. यामागेही वडाच्या झाडाचे महत्त्व जनमाणसात रूजावे, हा हेतू होता. महिलांना घराबाहेर पडण्याचे निसर्गात, रमण्यासाठी ते एक कारण होते. वडाचे झाड जमिनीतील पाणी शुद्ध करणारे. मात्र याच वडाच्या फांद्यांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात येते आणि बाजारात त्या विकल्या जातात. झाडांपासून तोडलेल्या फांद्यांची पूजा करून नवरा सात जन्म कसा मिळणार? हे मात्र समजत नाही. वडाचे झाड दिर्घायुषी. ते लावावे, जगवावे, प्रत्येक गावात किमान एकतरी वडाचेझाड असावे असा यामागे हेतू होता. वडाच्या झाडाचे महत्त्व लक्षात घेऊन हे प्रयोजन करण्यात आले. त्यामुळे वडाची पूजा करायचीच असेल तर त्यासाठी वडाचे झाड लावावे आणि जगवायला हवे. फांद्याऐवजी किमान वडाचे रोप कुंडीत लावून वाढवायला हवे आणि त्याची पूजा करावी.
पुढे आपण साजरी करतो, नागपंचमी. पूर्वी नागपंचमीच्या दिवशी वारूळाच्या ठिकाणी सापासाठी दूध ठेवले जात असे. घरात नागोबाचे चित्र काढून त्याची पूजा केली जात असे. बत्तीस शिराळा येथे जिवंत सापाला पकडून खेळवण्यात येत असे. वन्यजीव संरक्षक कायद्याने याला बंदी घालण्यात आली. तरीही अनेक ठिकाणी प्रत्यक्ष सापाला दूध पाजण्याचा प्रयत्न केला जातो. यात अनेकांचा जीव जातो. साप दूध पीत नाही, तरीही हे प्रयत्न करण्यात येतात. नागाची किंवा सापाची पूजा करण्याची परंपरा होती. साप शेतातील उंदराचा त्रास कमी करतात, म्हणून त्याची पूजा करून कृतज्ञता व्यक्त करण्यात येत असे. साप उपकारकर्ता आहे. त्याला मारू नये म्हणून ही प्रथा. मात्र आता तिचे रूप बदलले आहे. श्रावण महिन्यात आणखी एक सण येतो तो म्हणजे गोकुळाष्टमी. त्यात दहिहंडीचा उत्सव सुरू झाला. दहिहंडी कोण किती थराची रचतो याला आता महत्त्व प्राप्त झाले आहे. शारीरिक कसरतीचा भाग म्हणून हा उत्सव साजरा करण्यास कोणाची हरकत असण्याचे कारण नाही. मात्र डॉल्बी आल्यापासून लोकांनी त्यावर ठेका धरायला सुरुवात केली. डॉल्बीचा दणदणाट लोकांना त्रस्त करत असतो. उत्साह वाढवण्यासाठी संगीत आवश्यक असे आयोजक सांगतात. मात्र डॉल्बीच का? याचे उत्तर कोणीच देत नाही. ढोल ताशाच्या आवाजात खरेतर उत्साह वाढतो.
पुढचा महत्त्वाचा सण येतो तो गणपतीचा. घरी मातीचा गणपती बनवून, त्याची पूजा करण्यात येत असे. पुढे प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती बनवल्या जाऊ लागल्या. गणपती घरीच बनवणे, जवळपास बंद झाले आहे. काही भागात दीड दिवस, काही भागात पाच तर काही भागात अकरा दिवस गणपती बसवण्यात येतात. गणपतीची रोज पूजा करण्यात येते. पूर्वी गाण्याचे, भजनाचे कार्यक्रम आयोजीत करण्यात येत असत. अनेक गणेश मंडळे व्याख्यानमालाही आयोजित करत असत. या गणपती पूजनातून मोठ्या प्रमाणात निर्माल्य साठते. ते शेतात नेऊन टाकायला हवे. त्यावर पाय पडू नये म्हणून ते नदीत टाकण्यात येत असे. आता वाहणाऱ्या नद्याच राहिलेल्या नाहीत. नद्यांच्या पात्रात अनेक ठिकाणी डबकी आढळतात. मूळात हे निर्माल्य नदीत टाकण्याची गरज नसते. ते शेतात मातीखाली गाडल्यास कूजून त्याचे खत तयार होईल. त्याला कोणाच्या पायाचा स्पर्श होण्याचाही प्रश्न उरणार नाही. गणपतीची मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरीसची असल्याने त्या पाण्यात विरघळत नाहीत. पाण्याच्या पात्रात त्या अनेक दिवस तशाच राहतात. पात्रात किंवा पाण्याच्या साठ्यात मूर्त्या तशाच राहतात. त्यातच गणपती रंगवण्यासाठी सध्या रसायनापासून बनवलेले रंग वापरण्यात येतात. त्यामुळे गणपती पाण्यात विसर्जीत केल्यानंतर पाणी प्रदूषीत होते. कोल्हापूरकरांचे याबाबत कौतुक करावे तेवढे थोडे! नेत्यांनी गणपती नदीतच विसर्जीत करण्याला पाठिंबा दिलेला असतानाही, लोकांनी मोठ्या प्रमाणात मूर्त्या दान करण्यास सुरुवात केली आहे. सध्या गणेश उत्सवात डॉल्बीच्या होणाऱ्या वापरावर न्यायालयानेही निर्बंध घातले आहेत. तरीही, डॉल्बीचा वापर करण्यात येतो. झुंडीच्यापुढे अनेकदा पोलिसही मजबूर होत, मात्र मागील काही दिवसांपासून पोलिसांनी कडक अंमलबजावणी करायला सुरुवात केली आहे. डॉल्बीमुळे होणारे ध्वनीप्रदूषण आणि त्यामुळे वृद्धांना, कमकुवत हृदयाच्या लोकांना, रूग्णांना होणारा त्रास मोठा असतो. ध्वनी प्रदूषण आणि पाण्याचे प्रदूषण या गोष्टी टाळून हा उत्सव साजरा करायला हवा. गणपतीला विद्येची, ज्ञानाची देवता म्हणून पूजले जाते. त्यामुळे या काळात व्याख्यानमाला, प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करायला हवे.
‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे म्हटले जाते. मात्र दसऱ्याच्या सणालाही पर्यावरणाची हानी मोठ्या प्रमाणात होते. दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून आपट्याची पाने आणि चांदी म्हणून शमीची पाने मोठ्यांना देण्याची पद्धत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरात घट बसवण्यात येत. यामध्ये धान्य रूजवण्यासाठी ठेवत. दसऱ्यादिवशी डोक्यावरील टोपीमध्ये उगवलेल्या धान्याचे तुरे घालून बालगोपाळ सोने वाटत गावात फिरत. कोणाच्या घरातील धान्य कसे रूजले, यावरून कोणते पीक रब्बी हंगामात पेरावे, याचा ज्येष्ठांना अंदाज येत असे. मोठ्यांना आदर देण्याचे संस्कार व्हावेत, हाही या सोने-चांदी वाटण्याच्या प्रथेमागे हेतू होता. मात्र आज आपट्याची किंवा शमीची पाने काढावीत, इतकी झाडेच राहिलेली नाहीत. सोन्याची म्हणून बहुतांश लोक कांचनवृक्षाची पाने सोने म्हणून देतात. शमीच्या पानासारखी दिसणारी अनेक वृक्षांची पाने निसर्गात आढळतात, मात्र ती चांदी म्हणून दिली जात नाहीत. कांचनच्या पानांची मात्र मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात येते. लोक मोठमोठ्या फांद्या आणून विक्रीला ठेवतात. त्यामुळे झाडांचे नुकसान मोठ्या प्रमाणात केले जात आहे. सोने म्हणून पाने द्यायचीच असली तर, केवळ आपट्याची पाने तोडून द्यायला हवीत. मात्र आज आपट्याची झाडे अभावानेच दिसत आहेत. त्यामुळे आपट्याच्या झाडांची लागवड करून दसरा साजरा करायला हवा. खरे तर आपणास सण साजरा करण्यासाठी ज्या-ज्या झाडांची, त्यांच्या पाना-फुलांची किंवा फळांची गरज पडते अशा सर्व झाडांची लागवड करून ते-ते घटक उपलब्ध होतील याची खात्री करून घ्यायला हवी.
दिवाळीचा सणही सर्वांच्या आनंदाचा. खरीपातील कमी कालावधीची मूग, उडिद, हुलगा, तीळ अशी पिके शेतातून गोठ्यात किंवा घरात आलेली असतात. रब्बीच्या पिकांची पेरणी झालेली असते. या दोन्ही हंगामाच्या मध्ये येणारा काळ दिवाळीचा असायचा. आता पावसाच्या अनियमतेप्रमाणे हेही बदलले आहे. मात्र पूर्वी दोन हंगामाच्यामध्ये येणारा हा काळ काहीसा निवांतपणाचा. मुलांनी मामाच्या गावाला, सासुरवाशीणीनी माहेरी जाण्यासाठी हा कालखंड निश्चित केलेला असावा. दिवाळीच्या सणामध्ये पर्यावरणाला हानी पोहोचवणारी बाब म्हणजे फटाके. पूर्वी टिकल्या घेऊन बालगोपाळ आनंद साजरा करायचे. फटाक्यांचा आवाज गल्लीतच विरत असे. आता मात्र गावापासून कोसभर दूर आवाज सहज पोहोचवणारे फटाके फोडले जातात. मात्र काळाच्या ओघात नवनव्या फटाक्यांचे शोध लागत गेले. आणखी मोठ्या आवाजाचे फटाके लोकांना हवे होते. ते शोधले गेले. आकाशात आतषबाजी करणारे फटाके तयार झाले. फटाक्यांचा आवाजाचा ज्येष्ठ नागरिक, रूग्णांना आणि बालकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. फटाक्यांमुळे होणारे हवेचे प्रदूषणही गंभीर बाब आहे.
दिवाळीमध्ये प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणात होतो. फटाक्यांना दमट हवेपासून सुरक्षीत ठेवण्यासाठी, आकश कंदील तयार करण्यासाठी, विजेच्या दिव्यांच्या माळा बनवण्यासाठी प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. दुसरा भाग म्हणजे बहुतांश फटाके तयार करण्यासाठी कागदाचा वापर करण्यात येतो. कागद निर्माण करण्यासाठी झाडांना तोडावे लागते. फटाके फुटल्यानंतर कागदाचे इतके छोटे तुकडे होतात की त्यांचा पुनर्वापर करता येत नाही. फटाक्यांच्या, भेटवस्तूंच्या पॅकिंगसाठी पुठ्ठाही मोठ्या प्रमाणात वापरण्यात येतो. दिवाळीपासून थंडीची सुरुवात होते. बहुतांश पुठ्ठ्यांचा वापर शेकोटीसाठी करण्यात येतो. वाढत्या लोकसंख्येसाठी लागणारा ऑक्सिजन झाडेच पुरवतात. या झाडांची कत्तल करूनच पुठ्ठे आणि कागद बनवण्यात येतो. फटाक्यांमुळे होणारे ध्वनी, वायू प्रदूषण हा तर महत्त्वाचा भाग आहेच, पण त्यामुळे जल प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होते. त्याचबरोबर नैसर्गिक संसाधनाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
दिवाळीसाठी बनवला जाणारा आकाश कंदिल हा नैसर्गिक संसाधनापासून न बनवता प्लॅस्टिकपासून बनवले जाऊ लागले आहेत. घरावर, कार्यालयावर केली जाणारी रोषणाईसाठी वापरली जाणारी विद्युत कोळसा किंवा इंधन तेल वापरून मिळवली जाते. त्यामुळे प्रदूषण करून मिळवली जाणारी वीज आपण रोषणाईसाठी जाळत असतो. मूळात एवढ्या मोठ्या घराची आवश्यकता असते का? एवढी रोषणाई करून आपण केवळ आपल्या मोठेपणाचे, श्रीमंतीचे दर्शन घडवत असतो. त्यासाठी वापरली जाणारी विद्युत ऊर्जा अन्य उत्पादक कामासाठी वापरली जाऊ शकते. सण साजरा करत असताना संसाधनांचा किमान वापर करण्याबाबत गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
सर्वांच्या आनंदाचा सण असतो तो होळीचा. होळी नंतर येणारी रंगपंचमी सर्वांनाच हवी असते. होळीचा सण साजरा करण्यामागे परस्परांबद्दल मनामध्ये असणारा द्वेष गाडून पुन्हा गावातील सर्वांनी सौहार्दाने राहावे, हे कारण. जपानमध्ये मनातील राग, ताण घालवण्यासाठी होळीशी साधर्म्य असणारी पद्धती आहे. तेथे कार्यालयामध्ये एक खोली राखून ठेवलेली असते. त्यामध्ये सुट्टीच्या तासात कर्मचाऱ्यांनी जाऊन तेथे ठेवलेल्या पुतळ्यावर आपला सर्व राग काढावा आणि मन शांत करून पुन्हा कामाला लागावे, असे अपेक्षीत केले जाते. पूर्वी गावात एका ठिकाणी होळी पेटवली जात असे. होळीची पूजा करत. त्यानंतर होळीभोवती गावातील लोक येउन बोंब मारत. दुसऱ्या दिवशी होळीची राख लोक घेऊन जात. ती राख परसदारी लावावयाच्या वेलीसाठी वापरण्यात येत असे. होळी पेटवलेल्या जागेची स्वच्छता आपोआप होत असे. मात्र आज होळीचा सण कसा साजरा केला जातो? आपल्या सोईसाठी आपण सर्वत्र डांबरी किंवा काँक्रिटचे रस्ते बनवले आहेत. घराच्या आजूबाजूला पायाला माती लागू नये म्हणून पेव्हिंग ब्लॉक बसवून घेतले जातात किंवा कोबा करण्यात येतो. यामुळे आपणाला स्वच्छता मिळते असे वाटते. मात्र, जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण घटते. सध्या होळी रस्त्यावर पेटवली जाते. होळी पेटवल्यानंतर खालच्या रस्त्याचे डांबर जळते. त्यातून कार्बन मोनॉक्साईडसह अनेक घातक वायू वातावरणात पसरतात. होळीची राख उचलण्याचे सौजन्य कोणीही दाखवत नाही. खरं तर होळी पेटवणाऱ्यांची ती नैतिक जबाबदारी असते. मात्र ती राख स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी सफाई करेपर्यंत तशीच पडलेली असते. रस्ता खराब होतो, तेथे डांबर जळून केवळ खडी राहते. खड्डा पडतो. तो खड्डा लगेच भरून घेतला नाही, तर पावसाळ्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नावाने आपण खडे फोडत बसतो. आज प्रत्येक अपार्टमेंट, सोसायटीमध्ये होळीचा सण साजरा केला जातो. त्यामध्ये कोणाची होळी मोठी याची शर्यत लागते. त्यातून होणारे मोठ्या प्रमाणात प्रदूषण, रस्त्याची हानी याचा कोणताही विचार केला जात नाही.
त्याला जोडून येणारा सण हा रंगपंचमी. वसंत ऋतूचे आगमन झालेले असते. निसर्गात रंगोत्सव फुललेला असतो. या रंगोत्सावात सहभागी होण्यासाठी हा उत्सव आपण साजरा करतो. यामध्ये निसर्गातील विविध वनस्पतींपासून बनवलेलय रंगांचा वापर केला जात असे. पिवळी माती, पळस फुलांपासून रंग बनवण्यात येत. आज नैसर्गिक रंगांची जागा रासायनिक रंगांनी घेतलेली आहे. या रंगांना धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करण्यात येतो. काही ठिकाणी तर स्थानिक स्वराज्य संस्थांना दोनवेळा पाणी सोडावे लागते. हे रासायनिक रंग अनेकदा डोळे, त्वचा यांना अपाय पोहोचवतात. मात्र आधिक उठावदार रंग खेळण्यासाठी या रंगांचा वापर करण्यात येतो. यातून पाण्याचा अपव्यय होतो. पाणी प्रदूषीत होते. चेहऱ्यांवर आलेल्या गडद रंगांचा गैरफायदा घेणाऱ्या काही समाजकंटकांचा, महिलांना होणारा त्रास हा आणखी वेगळा भाग.
मानवी स्वभाव उत्सवप्रिय आहे. भारत किंवा केवळ भारतीय संस्कृतीच उत्सव साजरे करायला शिकवते असे नाही. जगभर उत्सव साजरे केले जातात. मात्र आपण सारासार विवेक हरवत गेलो आणि सण साजरे करताना मध्येच आलेल्या अनिष्ट प्रथातून निसर्गाचे, पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहोत. गुढी पाडव्यापासून होळीपर्यंत सर्व सण अवश्य साजरे करावेत. या सणांचे प्रयोजन विशिष्ट हेतूने करण्यात आले आहे. ते समजून घेणे आणि त्यानुसार सण साजरे करणे आवश्यक आहे. यातील अनिष्ट प्रथांचा, पर्यावरणाला नुकसान पोहोचवणाऱ्या गोष्टी तातडीने बंद व्हायला हव्यात. भारतातील एका उद्योगपतीने बांधलेले घर मध्ये चर्चेचा विषय बनले होते. ते दिवाळीमध्ये सजवण्यासाठी किती मोठ्या प्रमाणात विद्युत वापरली जात असेल, याचा विचार करायला हवा. त्या घराला व्यवस्थीत ठेवण्यासाठी लागणारे पाणी आणि ऊर्जेचाही विचार करायला हवा. झाडांची लागवड करण्याची गरज असलेल्या काळात फांद्या गरजेपेक्षा जास्त तोडणे, झाडांचे नुकसान करणे टाळायला हवे. रासायनिक रंगांचा वापर करून जल प्रदूषण करणे, टाळायला हवे. गणपतीच्या मूर्तीची उंची हाही चिंतेचा विषय आहे. ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, प्रकाशाचे प्रदूषण, जल प्रदूषण आणि पर्यायाने जमिनीचे प्रदूषण करत आपण पुढच्या पिढीला आणखी विनाशाच्या जवळ नेत आहोत याचे भान ठेवायला हवे. आशेचा किरण म्हणजे अनेक सुशिक्षित घरात फटाक्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. गणेशोत्सवातही समाज प्रबोधनाचे कार्य व्हायला हवे. पूर्वी सुरू असलेल्या व्याख्यानमाला निदान ऑनलाईन स्वरूपात सुरू व्हायला हव्यात. शेवटी नैसर्गिक संसाधने वापरताना महात्मा गांधींचा एक विचार सर्वांनी लक्षात घ्यायला हवा. ते म्हणतात, ‘जमीन, पाणी आणि निसर्गातील संसाधने आपल्या बापजाद्यांची जहागिरी नाही, तर ती पुढच्या पिढीकडे सोपवण्याची जबाबदारी आहे.’