कोणाला विद्वत्तेचा माज असतो तर कोणाला संपत्तीचा, श्रीमंतीचा माज असतो. माझ्यासारखा मीच हा अहंकार असतो. धन हे क्षणभंगुर आहे. आज आहे उद्या नाही. आज श्रीमंती आहे उद्या नाही. श्रीमंतीने माणसांनी झाडे तोडली. घरे बांधली. वसाहती वाढवल्या. साध्या छपराच्या घरांचे सिमेंटाच्या घरात रूपांतर झाले. छपराच्या घरात गारवा होता. सिमेंटच्या घरात आज उकाडा जाणवत आहे. तेथे गारवा उत्पन्न करण्यासाठी कृत्रिम थंडावा निर्माण करावा लागतो.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
कां मातलिया सरडा । पुढती बुड पुढती शेंडा ।
हिंडणवारा कोरडा । तैसा जया।।689।। ज्ञानेश्वरी अध्याय 13 वा
ओवीचा अर्थ – माजलेला सरडा जसा झाडाच्या बुडापासून ते शेंड्यापर्यंत व पुन्हा शेंड्यापासून बुडापर्यंत रिकाम्या खेपा करतो, त्याप्रमाणे ज्याचे भटकणे निरर्थक असते.
माजलेला सरडा झाडावर नुसत्या उड्या मारत असतो. माजलेला हत्ती दिसेल त्या वस्तूंची आदळआपट करतो. सोंडेने झाडे तोडतो. सर्वत्र नुकसान करत हिंडतो. माजलेला बैल मालकालाही शिंगाने मारत सुटतो. माजलेल्या गायी-म्हशी लाथा मारतात. माज ही अंगात चढलेली मस्ती आहे, गुर्मी आहे. माणसांमध्येही हीच लक्षणे दिसतात. अज्ञानपणाचे हे लक्षण आहे. यातून नुकसानच अधिक होते. पण ही रग, मस्ती, माज चढतो कशाने? इतका गर्व येतो कशाने? सर्वसंपन्न माणसांमध्ये याचे प्रमाण अधिक असते. हा अंगभूत गुण आहे.
कोणाला विद्वत्तेचा माज असतो तर कोणाला संपत्तीचा, श्रीमंतीचा माज असतो. माझ्यासारखा मीच हा अहंकार असतो. धन हे क्षणभंगुर आहे. आज आहे उद्या नाही. आज श्रीमंती आहे उद्या नाही. श्रीमंतीने माणसांनी झाडे तोडली. घरे बांधली. वसाहती वाढवल्या. साध्या छपराच्या घरांचे सिमेंटाच्या घरात रूपांतर झाले. छपराच्या घरात गारवा होता. सिमेंटच्या घरात आज उकाडा जाणवत आहे. तेथे गारवा उत्पन्न करण्यासाठी कृत्रिम थंडावा निर्माण करावा लागतो. छपराच्या घरात मात्र नैसर्गिक गारवा होता. थंडावा होता.
अज्ञानाने निसर्गावर आपण अन्याय करत आहोत. नैसर्गिकता नष्ट करून कृत्रिमतेचा अवलंब करत आहोत. पण कृत्रिमपणा हा क्षणिक आहे. त्याला मर्यादा आहे. याचे भान आपणास नाही. इंधन आहे तोपर्यंत गाडी चालणार आहे. इंधन संपले की गाडी बंद पडणार याचे भान आपणास नाही. त्यावेळी दुसरे काही तरी शोधले जाईल असा विश्वासही आहे. हे नाही तर ते. असे बदलते जीवन आपण जगत आहोत. सध्या असे जगणे ही काळाची गरज झाली आहे. असा विश्वासही बळावला आहे. पण आता पुन्हा कृत्रिम रासायनिक शेतीकडून नैसर्गिक, सेंद्रिय शेतीकडे पुन्हा आपण वळत आहोत. त्याची गरज भासत आहे हेही विसरता कामा नये.
केलेल्या चुका आता लक्षात येऊ लागल्या आहेत. उत्पन्नवाढीचा माज आपणास चढला होता. काळाची गरज असे म्हणून आपण त्या स्वीकारत आहोत. पण पुन्हा काळाची गरज म्हणून नैसर्गिक शेतीचाही स्वीकार करावा लागतो आहे. याचा विचार करायला हवा. जीवन जगताना भान ठेवले असते तर ही वेळ आली नसती. पण निसर्ग चक्राचा नियम आहे. कृत्रिमता ही क्षणिक आहे. नैसर्गिक हे कायम आहे. शाश्वत आहे. त्याचा स्वीकार करायला हवा. माज हासुद्धा नैसर्गिक आहे. पण अज्ञानातून उत्पन्न झालेल्या माजावर आवर घालायला हवा. म्हणजे जीवनात चुका होणार नाहीत.