April 25, 2024
Need of teachers are thinkers and researchers
Home » गुरु, शिक्षक हे विचारवंत अन् संशोधकवृत्तीचे हवेत
विश्वाचे आर्त

गुरु, शिक्षक हे विचारवंत अन् संशोधकवृत्तीचे हवेत

आत्मज्ञानाच्या लढाईत शिष्यालाच स्वतः लढाई करायची आहे. गुरुच्या मार्गदर्शनाखाली शिष्याने स्वतः प्रगती साधायची आहे. गुरु हा केवळ आत्मज्ञानाच्या प्रक्रियेत संप्रेरकाप्रमाणे काम करतो. गुरु आणि शिक्षक यातील फरकही यासाठीच समजून घ्यायला हवा.

राजेंद्र कृष्णऱाव घोरपडे, मोबाईल – 9011087406

म्हणौनि पार्था तूं या । दैवी संपत्ती स्वामिया ।
होऊनि पावें उवाया । कैवल्याचिया ।। २७० ।। ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा

ओवीचा अर्थ – म्हणून अर्जुना, तू या दैवी संपत्तीचा स्वामी होऊन मोक्षाच्या सुखाला प्राप्त हो.

युद्धाला तयार होण्यासाठी, प्राप्त परिस्थितीचा सामना करण्यासाठी अर्जुनाला कृष्ण सांगत आहेत. आप्त, स्वकियांना कसे मारायचे या मानसिकतेत अडकलेल्या अर्जुनाला बाहेर काढण्यासाठी कृष्णाने सत्याचे तत्त्वज्ञान अर्जुनाला सांगितले. प्रत्येक मानवाचे जीवन जगण्याचे युद्ध हे असेच आहे. हे युद्ध ज्याचे त्याला स्वतः लढायचे आहे. गुरु फक्त इथे मार्गदर्शक आहेत. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे सांगत ते शिष्याला धीर देत सत्याचा जागर करत असतात. जीवनाच्या रथाचे ते सारथी आहेत. म्हणूनच आपण जे काही घडते आहे ते त्याच्याच मुळे असे समजून जीवनात कार्यरत व्हायचे आहे. सुख मिळाले, दुःख मिळाले ते त्याच्याच मुळे त्यामुळे दोन्हीही समपातळीत पाहायचे आहे. स्वतःचे युद्ध हे स्वतःच लढायचे आहे. हा लढा स्वतःच उभा करायचा आहे.

अध्यात्मातील हे तत्त्वज्ञान समजून घेण्याची गरज आहे. गुरु फक्त आपणास प्रोत्साहित करतात, धीर देतात. दैवाच्या कृपेने हे राज्य स्वतः चालुन आले आहे. त्याचा स्वीकार करण्यास गुरु सांगत आहेत. दैवी संपत्तीचा स्वामी होण्यास सांगत आहेत. यासाठी ही लढाई लढायची आहे. असूरी गुणांचा विषाणू कसा घातक आहे तर जीवाणू उपयुक्त कसे आहेत हे सांगत आहेत. दैवी आणि असूरी गुणांची ओळख यासाठीच ते करून देत आहेत. जीवाणू आणि विषाणू यांच्यातील फरक समजून घ्यायचा आहे. हे दोन्ही हे आपल्यातच आहेत. त्यांना पोषक वातावरण निर्माण झाल्यास ते प्रकट होतात. यासाठी त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे असते. आरोग्यदायी जीवनासाठी त्याची गरज असते. हे विषाणू नियंत्रणात ठेवणारी यंत्रणाही आपल्या शरीरात आपणासच उत्पन्न करायची आहे. यासाठी शरीराला आवश्यक असणाऱ्या घटकांची पूर्तताही आपणासच करायची आहे.

आत्मज्ञानाच्या लढाईत शिष्यालाच स्वतः लढाई करायची आहे. गुरुच्या मार्गदर्शनाखाली शिष्याने स्वतः प्रगती साधायची आहे. गुरु हा केवळ आत्मज्ञानाच्या प्रक्रियेत संप्रेरकाप्रमाणे काम करतो. गुरु आणि शिक्षक यातील फरकही यासाठीच समजून घ्यायला हवा. शिक्षक शाळेत आपणास बाराखडी शिकवतात. अबकडई हे शब्द शिकवतात त्यांची तोंड ओळख करून देतात. जे शिक्षक विचारवंत असतात ते त्या शब्दाच्या खोलात जातात. तो शब्द कसा निर्माण झाला इथे पासून त्या शब्दाचे भूत-भविष्य-वर्तमान शिकवतात. पण गुरु असतात ते शिष्याला या शब्दाची अनुभूती देतात. जे विचार अनुभूती देतात ते खऱ्या अर्थाने विचारवंत असतात. यासाठी शिक्षकाने किंवा गुरुने केवळ शिक्षक असून उपयोगाचे नाही तर त्याने संशोधक, विचारवंत होणे गरजेचे आहे. संशोधक वृत्ती त्यांच्यामध्ये असेल तर ती वृत्ती शिष्यामध्ये आपोआपच उत्पन्न करता येते.

शिष्याने नुसता इतिहास शिकायचा नसतो. इतिहास जाणून घेऊन मनाचे समाधान करून घ्यायचे नसते. तर इतिहास, त्यातील कथा, दंतकथा, आख्यायिका आणि इतिहासाचा खराखूरा नसलेला कल्पित असा भाग पूर्णपणे आकलनाने समजून घ्यायचा असतो. सत्यासाठी खोल अभ्यासासाठी खूप गरज आहे. देवाची उपासना कुळाचा रक्षणकर्ता मानून केली जाते. नुसता देव पुजायचा म्हणून पुजायचा नसतो. त्यामागील प्रयोजनही अभ्यासायचे असते. गुरुंची पुजा ही पुजा म्हणून करायची नसते तर तर ज्ञानदानाची परंपरा कायम ठेवण्यासाठी करायची असते. आत्मज्ञानी परंपरेच्या संवर्धनासाठी करायची असते. शेवटी देव हा स्वतःमध्येच असतो. त्या देवाची अनुभूती घेऊन गुरुंच्या मार्गदर्शनात त्याचे संवर्धन करायचे असते. यातूनच समाधी अन् मोक्ष साधायचा असतो.

Related posts

सात्विक विचारातून फुटावा सात्त्विकतेचा पान्हा

लोडशेडींगमधून ग्रामीण वास्तवावर प्रकाश

स्वतंत्र कोकण विद्यापीठ विकासासाठी गरजेचे

Leave a Comment