September 7, 2024
Reconciliation with China possible through increased trade
Home » व्यापार वृद्धीतून चीनशी सलोखा शक्य !
सत्ता संघर्ष

व्यापार वृद्धीतून चीनशी सलोखा शक्य !

आशिया खंडातील भारत व चीन या दोन महासत्ता आहेत. केवळ दोघांची सर्वाधिक लोकसंख्याच नाही तर  सर्वाधिक वेगाने प्रगती होणाऱ्या अर्थव्यवस्था आहेत. पाकिस्तान प्रमाणेच शेजारील चीनचा आपल्याला सातत्याने उपद्रव होतो. चीनची विस्तारवादी भूमिका आणि उभय देशांमधील लष्कराच्या झालेल्या चकमकी  चिंताजनक आहेत. मात्र आर्थिक व  व्यापारी संबंध अधिक दृढ करून दोन्ही देश सामंजस्याने राहू शकतील. या दृष्टिकोनातून घेतलेला हा आढावा.

नंदकुमार काकिर्डे,
लेखक पुणे स्थित जेष्ठ अर्थविषयक पत्रकार आहेत

भारत स्वतंत्र झाल्यापासून सातत्याने आपण चीन आणि पाकिस्तान या दोन्ही शेजारी देशांबरोबर गुण्यागोविंदाने राहण्यात अपयशी ठरलेलो आहोत. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंध हे हिंदू – मुस्लिम धार्मिक वादातून निर्माण झाले असून त्याच्या झळा  मोठ्या प्रमाणावर भारताला बसत आहेत. चीन बरोबर आपली धार्मिक तेढ अजिबात नाही.  मात्र चीनची विस्तारवादी भूमिका आणि जागतिक पातळीवर कोणालाही भीक न घालण्याची त्यांची वृत्ती जास्त त्रासदायक ठरत आहे. करोना नंतरच्या काळात चीनची आर्थिक प्रगती काहीशी मंदावलेली आहे. त्याचवेळी भारताची अर्थव्यवस्था खूप चांगली वेगाने विकसित होत असून जर भारताने चीन बरोबरचे व्यापारी आणि आर्थिक संबंध अधिक दृढ केले तर कदाचित आपले संबंध भविष्यकाळात सुधारू शकतील अशी शक्यता आहे.

गेल्या दोन-तीन वर्षात आणि विशेषतः 2020 मध्ये गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीन यांच्यातील लष्करामध्ये झालेली चकमक आणि त्यात उभय देशांच्या जवानांचा झालेला मृत्यू हा निश्चितच  खेदजनक, क्लेशकारक  घटना होती.  दुर्दैवाने त्यानंतर भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारण्याच्या ऐवजी त्यात जास्त तणाव निर्माण होताना दिसत आहे. चीनकडून सातत्याने दबावाचे राजकारण केले जात आहे हेही नाकारता येणार नाही. मात्र अशावेळी आपली लष्करी क्षमता आणखी बळकट करून व आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळी प्रतिमा निर्माण करून आपण  चीनवर काही प्रमाणात आंतरराष्ट्रीय पातळीवर अप्रत्यक्षरित्या दबाव निर्माण केला आहे.  भारताचे रशियाशी असलेले संबंध चांगल्या पद्धतीने सुधारलेले असून आपण अमेरिकेच्या तुलनेत रशियाकडे काही प्रमाणात  झुकलेलो आहोत हेही गेल्या वर्षा दोन वर्षात प्रकर्षाने जाणवलेले आहे. एकाच वेळेला अमेरिका, रशिया, युरोपातील काही देश व चीन यांच्याशी  अंतर राखून संबंध वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे आपले स्वातंत्र्य, सार्वभौमत्व याला कोठेही तडा जाऊ न देता आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळ्या प्रकारे जगाचे नेतृत्व करण्याची संधी आपल्याला लाभलेली आहे. जी-ट्वेंटी या वीस देशांच्या  समूहाचे नेतृत्व करत आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. 

गेल्या पाच वर्षात भारत आणि चीन यांच्यातील व्यापारात चांगली वाढ होत आहे. 2017-18 मध्ये भारत आणि चीन यांच्यात केवळ 89 बिलियन डॉलर एवढा व्यापार  होता. त्यात सतत चांगली वाढ होत आहे. 2022 मध्ये उभय देशात  136 बिलियन डॉलरच्या घरात व्यापार उदीम  झालेला आहे. यात चीनने भारतात 118 बिलियन डॉलरची मालाची निर्यात केली तर आपण चीनमध्ये 18 बिलियन डॉलरच्या मालाची निर्यात केली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अलीकडेच संसदेमध्ये बोलताना चीनशी असलेले संबंध हे “नॉर्मल” नाहीत असे मान्य करून जोपर्यंत चीन  नियंत्रण रेषेमध्ये एकतर्फी बदल करते किंवा सीमारेषांवर लष्करी बळ वाढवत रहाते तोपर्यंत हे संबंध सुधारणार नाहीत असे नमूद केले होते.  उभय देशांमध्ये अनेक वाद,  अडचणी, असूनही व्यापारात मात्र सातत्याने जोरदार वाढ होत आहे.

भारत आणि चीन यांच्यातील संबंध हे सलोख्याचे असणे हे उभयतांच्या हिताचे निश्चित आहे. त्याच दृष्टिकोनातून जर आपण आगामी काळामध्ये चीन बरोबरचे व्यापारी संबंध जास्त दृढ केले तर त्याचा लाभ दोघांनाही होऊ शकेल.  दोन्ही देशातील आर्थिक, व्यापारी व्यवहाराचे प्रमाण लक्षात घेतले तर  आपण चीनला टाळून काही आर्थिक व्यवहार किंवा व्यापार करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. अगदी साधे उदाहरण झाले द्यायचे झाले तर  भारतातील औषध निर्माण किंवा मोबाईल उत्पादन क्षेत्र  मोठ्या प्रमाणावर चीनी उत्पादकांवर अवलंबून आहे हे   दुर्लक्षून चालणार नाही. औषध उत्पादक मोठ्या प्रमाणावर चीनच्या कच्च्या मालाच्या आयातीवर अवलंबून आहेत. चीन आणि अमेरिका यांच्यात  590 ते 600 बिलियन डॉलर इतका व्यापार होतो.  त्यापेक्षा जास्त व्यापार हा युरोपियन देशांची होत असून तो साधारणपणे 650 बिलियन डॉलरच्या घरात आहे . त्याचप्रमाणे जपान बरोबरही 320 बिलियन डॉलरच्या घरात व्यापार आहे. आपल्या तुलनेत चीनची अर्थव्यवस्था खूप मोठी आहे.जगात चीन दुसऱ्या क्रमांकावर तर आपण पाचव्या क्रमांकावर आहोत. चीनने सतत बावीस वर्षे दहा टक्क्यांपेक्षा विकासदर जास्त राखला.आपल्याला एकदाही दहा टक्के विकासदर गाठता आला नाही. काही वेळा तर आपला विकासदर नकारात्मक होता.चीनचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न(जीडीपी)आपल्यापेक्षा पाच पट जास्त आहे.

आपण दोघे आशियाई खंडामध्ये असलो तरी आपल्यापेक्षा चीनचा व्यापार अन्य देशांशी  लक्षणीय आहे. व्हिएतनाम, थायलंड , इंडोनेशिया या देशांचा व्यापार  भारतापेक्षा जास्त आहे. एका दृष्टीने चीनला भारत हा काही मोठा व्यापारी देश नाही परंतु दोन्ही देशांची  लोकसंख्या ही आज जगाच्या २५ टक्के झालेली आहे. चीनमध्ये लाखभर भारतीय रहातात. त्यामुळे भारताकडे  एक चांगला व्यापारी भागीदार म्हणून चीन पाहण्यास लागलेला आहे. गेल्या काही वर्षात भारतात निर्माण उत्पादन केलेले मोबाईल आयफोन किंवा इलेक्ट्रिक वाहने यांची संख्या लक्षात घेतली तर त्यात चिनी उत्पादकांचा  सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे.

ऑप्पो, व्हिवो, फोसून, मिडीया, हायर हे चिनी उत्पादक आहेत. आपलेही अदानी, डॉ.रेड्डीज, जिंदाल, गोदरेज, बीएचईएल व अरोबिंदो फार्मासारखे उत्पादक तेथे कार्यरत आहेत. चीनलाही भारतीय बाजारपेठेचे  आकर्षण आहे. अशावेळी  चीनशी मतभेद किंवा वादविवाद  करून जर प्रश्न सुटणार नसतील तर उभय देशांमधील आर्थिक व्यवहार किंवा आर्थिक व्यापार आयात निर्यात मोठ्या प्रमाणावर वाढवून संबंध सुधारण्याचे प्रयत केले पाहिजेत. उभय देशांमध्ये  नवीन माहिती तंत्रज्ञान किंवा अन्य क्षेत्रामध्ये भागीदारी करता आली तर अनेक नव्या उत्पादन कंपन्यांची स्थापना  मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. पुढील काही काळामध्ये व्यापारात भरघोस वाढ झाली तर कदाचित आपसातील  मतभेद किंवा वादविवादाचे विषय मागे पडतील.

आजच्या घडीला युरोपातील अनेक देश चीन बरोबरचे संबंध व्यापारी संबंध मोठ्या प्रमाणावर वाढवत आहे त्यात जर्मन, फ्रान्स तसेच ऑस्ट्रेलिया यांनी  चीन बरोबरचे व्यापारी संबंध वाढवलेले आहेत.  ही स्थिती ब्राझीलच्या बाबतही आहे त्यांच्यातही चांगल्या प्रकारे व्यापार व्यवसाय वाढत आहे. इंडोनेशिया आणि व्हिएतनाम यांच्या बरोबर  सागरी सीमांवरून वाद आहेत परंतु त्यांच्यात होणारा व्यापार हा यावर एक चांगला मार्ग आहे असे दिसते. 

देशहिताच्या दृष्टिकोनातून चीन बरोबरचे संबंध सुधारण्यासाठी व्यापार वृद्धीचा मार्ग चोखळला अयोग्य ठरणार नाही असे वाटते. लष्करी बळांचा वापर करण्याकडे कोणाचाही कल यापुढे  राहणार नाही हे नव्या जगाचे मॉडेल लक्षात घेऊन भारतानेही अशाच प्रकारे उभय देशांमधील लोकसंख्या, कामगार व तरुण पिढी  यांचा लाभांश घेण्याच्या दृष्टिकोनातून व्यापार  वाढवला तर ते  हितकारक ठरेल परंतु सातत्याने  जुन्या गोष्टी न उगाळता जर व्यापाराच्या माध्यमातून जर एकमेकांशी चांगले संबंध निर्माण करता आले तर असे वाटते की हा एक चांगला मार्ग ठरू शकेल. अमेरिका रशिया आणि युरोपातील अनेक राष्ट्रे चीनबरोबरचे व्यापारी संबंध वाढवताना दिसत असतील तर भारताने त्याला अपवाद करण्याची गरज नाही. आपल्या औषध उत्पादकांना अजून चीनची बाजारपेठ खुली नाही. परंतु व्यापार वृद्धीचा मार्ग आज तरी हाताळायला हरकत नाही.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

दुर्गराज रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा…

‘दुर्गांच्या देशातून…’ ची तपपूर्ती…

भेंडीवरील विषाणुजन्य हळद्या रोगाचे व्यवस्थापन

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading